विनोद जाधव एक संग्राहक

Friday 29 May 2020

शिवरायांचे अष्टप्रधान मंडळ

आजही फक्त महाराष्ट्रतील नव्हे तर संपुर्ण भारतात नव्हे नव्हे विदेशात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यकारभाराचे दाखले देतात. याचं मुख्य कारण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं अष्टप्रधान मंडळ. छत्रपती शिवाजी महाराजांनी जून १६७४ मध्ये स्वतःस राज्याभिषेक करून घेतला आणि हिंदवी स्वराज्याचा स्वतंत्र आणि लोकशाही राज्याचा शुभारंभ केला.

छत्रपती हेे स्वराज्याचे सार्वभौम व सर्वसत्ताधारी होते त्याच्यावर कोणाचेही नियंत्रण नव्हते, राज्याच्या सर्व क्षेत्रात त्याची निरंकुश सत्ता चालत होती. पण शिवरायांच्या स्वराज्याचा मुख्य हेतू प्रजाहीत असल्याने.

स्वराज्याची जनताही शिवरायांच्या साठी जीव ओवाळून टाकत असे. स्वराज्यात न्यायदानाचे अंतीम अधिकार छत्रपतींकडेच होते. स्वराज्याचा डोलारा सांभाळण्यासाठी शिवाजी महाराजांनी अष्टप्रधान पद्धती स्वीकारली. राज्यकारभाराची निरनिराळी कामे त्यांनी या मुख्य अष्टप्रधान मंत्र्यांकडे सोपवली होती. ते मंत्री आपल्या कामाबद्दल वैयक्तिकरीत्या छत्रपतींना जबाबदार असत.

राज्याभिषेकावेळी अष्टप्रधानांची नेमणूक पूर्ण झाली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मंत्र्यांना संस्कृत नावे दिली. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही मंत्रिपदे वंश परंपरागत न ठेवता जी व्यक्ती कर्तबगारी दाखवेल त्या धर्तीवर ठरवण्यात आले.

पंतप्रधान : छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंत्रिमंडळातील सर्वोच्च मंत्री. छत्रपती शिवाजी महाराजांनंतर स्वराज्याचे महत्वाचे सर्व अधिकार पंतप्रधान यांच्या कडे असायचे. पंतप्रधानांचे मुख्य काम म्हणजे स्वराज्याच्या सर्व राज्यकारभारावर  देखरेख ठेवणे.

थोडक्यात महाराजांच्या गैरहजेरीत राजाचा प्रतिनिधी म्हणून जी महत्त्वाची व्यक्ती काम करायची, यावरूनच हे पद किती महत्वाचे आहे हे दिसून येते. राज्याभिषेकावेळी मोरोपंत त्रंब्यक पिंगळे हे पंतप्रधान होते आणि त्या पदासाठी पंतप्रधानाला वार्षिक १५ हजार होन पगार होता.

पंत अमात्य : पंत अमात्य या पदाला पूर्वी मुजुमदार म्हणत असे. मंत्रिमंडळातील हा महत्त्वाचा मंत्री होता. स्वराज्यातील सर्व महाल आणि परगण्यांचा एकूण जमाखर्च त्या क्षेत्रातील अधिकार्‍याकडून येत असे तो जमाखर्च बरोबर आहे की नाही हे पाहण्याचे त्याचे काम पंत अमात्य या मंत्र्यांकडे असायचं. हा जमाखर्च वेळोवेळी महाराजांसमोर सादर करावा लागत असे. राज्याभिषेकाच्या वेळी रामचंद्र नीलकंठ पंत हे पंत अमात्य होते आणि त्यांच्या पदाला वार्षिक १२ हजार होन पगार होता.

पंत सचिव : पंत सचिव हे सुद्धा एक महत्त्वाचं पद असून राजधानीत किंवा छत्रपती शिवरायांना जाणार्‍या येणार्‍या सर्व पत्रव्यवहारावर लक्ष ठेवणे हे त्याचे काम होते.

शिवाजी महाराजांकडून निरनिराळ्या सुभेदारांना व इतर अधिकार्‍यांना वेळोवेळी जी आज्ञापत्रे पाठवली जात असे त्याची नोंदणी आणि त्यावर लक्ष ठेवण्याचं काम सुरनीस म्हणजे च पंत सचिवांच असायचं. स्वराज्याचे लहान मोठे सर्व दफ्तर व जमीन महसुलाच्या व्यवहारावरही लक्ष ठेवण्याचं काम पंत सचिवांच असायचं. राज्याभिषेकाच्या वेळी अण्णांजी पंत दत्तो हे पंत सचिव होते आणी त्यांच्या त्या पदासाठी वार्षिक १० हजार होन पगार होता.

मंत्री : महाराजांच्या खाजगी कारभाराकडे लक्ष ठेवणे. महाराजांची रोजनिशी ठेवणे, त्यांच्या भोजन व्यवस्थेकडे लक्ष ठेवणे, वैयक्तिक संरक्षणाकडे लक्ष पुरविणे, खाजगी, कौटुंबिक आमंत्रणे करण्याची कामे त्यांना करावी लागत. पायदळचा बंदोबस्त करणे. छत्रपती शिवरायांच्या महत्वाच्या नोंदी ठेवणं ही वाकनीसांची म्हणजेच मंत्र्यांची कामं त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.

सेनापती : छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याचे घोडदळ व पायदळ हे दोन प्रमुख विभाग होते. या विभागांचा प्रमुख म्हणजे सेनापती पूर्वी याला सरनौबत म्हणत असे. स्वराज्याच्या सर्व सैन्यावर सेनापतींचा अंमल असायचा. छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकावेळी हंबीरराव मोहिते हे सेनापती आहे आणि त्या पदासाठी सेनापतीला वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.

पंत सुमंत : परराष्ट्रांना खलिते पाठविणे किंवा परराष्ट्रांकडून आलेले खलिते घेणे, त्यासंबंधात नियमितपणे महाराजांना माहिती देणे. खलिते पाठवताना त्यासंदर्भात सल्ला देणे. त्याच बरोबर परराष्ट्रातून हेरांच्या साहाय्याने बातम्या काढण्याचे काम त्यांना करावे लागे. राज्याभिषेकाच्या वेळी रामचंद्र त्रिंबक पंत सुमंत म्हणून काम पाहत होते ज्यासाठी त्यांना वार्षिक १० हजार होन पगार होता.

न्यायाधीश : दिवाणी व फौजदारी दोन्ही प्रकारच्या गुन्ह्यांबाबत खटले चालवून न्यायनिवाडा करून रयतेला न्याय देणे हे त्यांचे काम न्यायाधीशांचं होतं. न्यायदानाचे महत्वाचे कार्य न्यायाधीशांचे असायचे. राज्याभिषेकाच्या वेळी निराजीपंत रावजी हे न्यायाधीश म्हणून कामकाज पाहत. वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे.

पंडितराव दानाध्यक्ष  : धर्मखात्याचे प्रमुख होते. दानधर्म करणे, पंडित, विद्वानांचा सन्मान करणे, धार्मिक कार्याबाबत सल्ला देणे. ही काम पंडितराव दानाध्यक्ष संभाळत असे त्यांना वार्षिक १० हजार होन पगार मिळत असे. प्रत्येक प्रधानाजवळ एक सहकारी मुतालिक असायचा अष्ट प्रधान मंडळाच्या गैर हजेरीत मुतालिक कामकाज पाहत असे.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...