विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 20 May 2020

पन्हाळगड ते विशाळगड #भाग_दुसरा

पन्हाळगड ते विशाळगड
#पन्हाळा_ते_खेळणागड_निरोप :-
फुलाजीचा दरडावणीचा स्वर ऐकताच बाजीने
फुलाजीचा आलिंगन दिले अन आपसूकच त्याच्या
तोंडून , " दादा ss " शब्द बाहेर पडले अन डोळ्यांत
अश्रू दाटले . बाजीने फुलाजीचा निरोप घेतला अन
राजांची पालखी घेऊन पुढे धावू लागला . जौहरचा वेढा
पार झाला होता . सोबतीचे पाच सहाशे वीर बहिर्जीने
ठिकठिकाणी पेरून ठेवलेले नजरबाज दाखवतील त्या
दिशेने अन त्यांच्या मागे मागे उर फुटेतो खेळणा गडाच्या
दिशेने धावत होते . राजांच्या पालखीचे हशम त्याच
वेगाने आदलाबदली होत होते . मध्यरात्रीचा प्रहर सरला
होता . पहाटेचा प्रहर चालू झाला होता , अजूनही सगळे
धावतच होते . पन्हाळ्यापासून विशाळगडाचं अंतर वीस
कोसांच्या आसपास , त्यापैकी पंधरा एक कोस अंतर
पार झालं असेल कदाचित . अजूनही बरच अंतर बाकी
होतं . बाजीने सगळ्यांना थांबण्याचा इशारा केला . थोडा
वेळची विश्रांती अन लगेच पुन्हा धावायचं होतं .
पावसाची रिपरिप आता कमी झाली होती . सगळे
झाडांच्या , खोडाच्या , दगडांच्या आडोशाला विश्रांती
घेत होते . अचानक एक हेर धावत येताना पाहून बाजी
ताडकन उठून उभा राहिला .
" बाजी , निघा . मसूद खान आपल्याच दिशेने घौडदौड
करत यितुय . हजार दोन हजार हशम अस्त्याल . घाई
करा बाजी , न्हायतर घात हुईल . "
बाजीने मोठ्याने आवाज दिला , " चला रं , निघा . "
त्यासरशी राजांची पालखी उचलली गेली . अचानक
पालखी उचलल्यामुळे राजे जरा दचकलेच . पालखीचा
पडदा जरा बाजूला सारून म्हणाले ,
" बाजी , काय झालं ? "
बाजी राजांच्या पालखी जवळ येऊन म्हणाला , " राजं ,
निघावं लागल , मसूद खान यितुय मागणं . "
राजे , " हं . . म्हणजे सुगावा लागलाच तर . चला बाजी ,
लवकरात लवकर खेळणा गाठावा लागेल . "
" जी म्हाराज . "
राजांची पालखी उचलली गेली अन पुन्हा दौड चालू
झाली . राजांच्या डोक्यात विचारचक्र चालू होते .
' कोण आपण ? ? ? ?
अन कोण हि माणसं ? ? ?
राजे म्हणवून घेणारे आपण . . .
आपण कसले राजे ? ? ?
खरे राजे लोक तर हे . . .
स्वतःच्या जीवाची पर्वा न करता या घनदाट जंगलातून ,
काट्याकुट्यातून , दगडा धोंड्यातून , आपला जीव
वाचावा , आपण सुखरूप राहावं म्हणून उर फुटेतो
धावणारी हि माणसं . . . .
ना जात ना पात बघून आपल्यासाठी जीव देणारी ही
माणसं . . . .
आपला घरदार वाऱ्यावर सोडून स्वराज्यासाठी
लढणारी , झगडणारी हि माणसं . . .
शिवा . . .
फुलाजी . . .
बहिर्जी . . .
बाजी . . .
आपल्यासाठी जीवावर उदार होणारी हि माणसं . . .
हीच तर खरी राजा माणसं . . .
आपण कसले राजे . . . ?
आपण तर फक्त नावाचेच राजे . . . '
तांबडं फुटायची वेळ होऊ लागली होती . पाऊसही
पूर्णपणे थांबला होता . पहाटेचा थंडगार वारा घामाने
चिंब भिजलेल्या अंगावर विसावत होता . तेव्हढाच
काय तो शरीराला थंडावा मिळत होता . पण कुणालाच
त्याची फिकीर नव्हती . धावून धावून सगळ्यांची छाती
खाली वर धपापत होती . थोड्याच वेळात सगळे
गजाखिंडीपाशी येऊन पोहोचले होते . मसूद खान
मागावरच होता , कोणत्याही क्षणी तो आपल्याला
गाठेल अन तुंबळ लढाई जंपेल अशी परिस्थिती होती .
बाजीने थोडं बाजूला होऊन आसपासच्या झाडीचा
अन खिंडीच्या उंचच उंच दरडींचा अंदाज घेतला .
बाजीच्या मनानं एक विचार पक्का केला . दुसऱ्या क्षणी
धावणाऱ्या मावळ्यांवर नजर फिरवली अन थांबण्याचा
इशारा केला . राजांची पालखी खाली ठेवण्यात आली .
पटापट सगळे मावळे आडोसा शोधून आपलं अंग टाकून
विसावू लागले . बाजी राजांच्या पालखी जवळ आले .
राजेही पायउतार झाले .
राजे , " काय झालं बाजी , असं अचानक का थांबलात ? "
बाजी , " राजं . . मागून मसूद खान यितय , कवा बी
आपल्याला गाठलं . त्याच्याकडं दोन तीन हजार
हशम असत्याल , आधीच आपलं मावळ पळून पळून
दमल्यात , अशा परिस्थितीत त्येला आपण तोंड न्हाय
देऊ शकत . "
राजे , " बाजी . . मग आपण हि खिंड लढवू . जागा
मोक्याची आहे . "
" न्हाय राजं . . तुम्ही तीन चारशे मावळा घेऊन
खेळण्याच्या वाटनं निघा . आम्ही दोनशे मावळे हि खिंड
अडवून धरू . "
" नाही बाजी . आम्हीही इथेच थांबणार . "
" न्हाय राज , उशीर करू नगा . निघा राजं . . "
" तुम्हाला एकट्याला सोडून . . . ? ते शक्य नाही . "
राजांचं वाक्य पूर्ण होतं न होतं तोच बाजी दरडावणीचा
स्वरात म्हणाला ,
" ऐकावं राजं . . माँसाहेबांची आण हाय तुमास्नी . . हितं
वाद घालत बसाय येळ न्हाय . आन , आता कितीस अंतर
राहिलंय , चार पाच कोस फक्त . गडापातूर आपण पोहोचे
पर्यंत मसूद खानानं आपल्याला मधीच गाठलं तर लय
अवघड होऊन बसल राजं . म्हणून म्हंतुय तुम्ही फूड
निघा अन गडावं पोहोचल्याव तोफचं बार करा . म्हंजी
आम्हास्नी कळलं की तुम्ही सुखरूप पोहोचलाय ते . "
राजांचा उर भरून आला होता . राजे एकटेच बाजीला
सोडून जाण्याच्या मनस्थितीत नव्हते . कसेबसे राजे
बोलले ,
" ठीक आहे बाजी . पण लक्षात असू द्या , जसे तोफेचे
बार ऐकू येतील , आसपासच्या जंगलात पसार व्हा अन
लागलीच आम्हाला येऊन भेटा . "
" जी राजं . . आता निघावं . . येळ नका दवडू . "
राजांनी साश्रु नयनांनी बाजींना आलिंगन दिले अन
निरोप घेतला . राजांची पालखी उचलली गेली अन पुन्हा
विशाल गडाच्या दिशेने तीन साडे तीनशे मावळे धावू
लागले .
पुढील लेख उर्वरित भागात...
" जय जिजाऊ "
" जय शिवराय "
" जय शंभुराजे "
कथालेख :-
इतिहासाचा भंडारा

No comments:

Post a Comment

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...