#लोकांच्या_देहावसानानंतरच्या_विधींची_काळजी_घेणारा_लोकराजा_राजर्षी_शाहू
~~~~~~~~~~~~~~
राजर्षी शाहू महाराजांनी लोकसेवेचं व्रत स्वीकारून आपलं आयुष्य जनकल्याणासाठी खर्ची घातलं म्हणून ते खऱ्या अर्थाने 'लोकराजा' ठरले.
शाहू महाराजांच्या कार्यातील एक दुर्लक्षित पण अत्यंत महत्वाचा पैलू आपल्यासमोर आणण्याचा हा छोटासा प्रयत्न..
त्या काळात आपल्या प्रजेचं आयुष्य समृद्ध करण्याचा प्रयत्न करणारे संस्थानिक अगदी हाताच्या बोटावर मोजावे इतके कमी होते. पण आपल्या प्रजेची मृत्यूनंतरसुद्धा परवड होऊ नये, त्यांचे अंत्यविधीचे सोपस्कार व्यवस्थित पार पडावेत हा विचार करणारा शाहूराजा म्हणूनच इतरांपेक्षा सर्वश्रेष्ठ ठरतो.
सर्वसामान्य लोकांच्या मृत्यनंतर होणा-या सोपस्कारामध्ये
अडचणी येऊ नयेत,मृत शरीराची हेळसांड होऊ नये,जातीनिहाय होणारे मरणोत्तर
विधी योग्यरित्या पार पडावे म्हणून समाजातील प्रत्येक जातीच्या लोकांना या
राजाने आपल्या खाजगी मालकीचे कित्येक भूखंड देऊ केले.
काही ठिकाणचे
भूखंड स्वतः विकत घेऊन ते समाजासाठी दिले तर अनेक ठिकाणी अश्या जमिनी घेऊन
त्या जमिनीच्या मालकास त्याच आकाराचा भूखंड महाराजांनी दिल्याच्या नोंदी
आहेत.
या जमिनी देताना लोकांच्या भविष्यातील व्याप्तीचा आणि लोकसंख्या वृद्धीचा विचार अशा जमिनी देताना शाहू छत्रपतींनी केल्याचे दिसून येते.
फक्त जमिनी देऊन थांबणे हा शाहूराजाचा स्वभावच न्हवता.
त्यापुढे जाऊन ज्या त्या धर्मातील लोकांच्या मृत्यू पश्चात होणाऱ्या
विधीकरिता उपयोगात येणारे घाट ,प्रार्थनेसाठी लागणारी जागा, या गोष्टींची
बांधणी शाहू राजांनी स्वखर्चाने करून दिली.
अनेक ठिकाणी पाण्याची मोफत सोय केल्याच्या नोंदी देखील या कामाची साक्ष देतात.
स्मशानाच्या ठिकाणी दिवाबत्तीची सोयसुद्धा या लोकराजाने करून दिली होती याचे पुरावे आजही या स्मशानामध्ये ठळक पणे दिसतात.
हिंदू लोकांसाठी दिलेला पंचगंगा काठावरील भूखंड,
लिंगायत समाजासाठी सिध्दार्थनगर मधला भूखंड,
मुस्लिम समाजातील लोकांना दफन भूमीसाठी दिलेला बागल चौक मधील भूखंड ही कोल्हापूर शहरातील प्रातिनिधिक उदाहरण आहेत.
स्मशानासाठी साठी जागा देताना आजूबाजूच्या लोकांना याचा त्रास होऊन
जनतेच्या आरोग्यास बाधा येणार नाही याचा विचार शाहू छत्रपतींनी केला होता.
महाराजांच्या नजरेस आलेल्या अशा स्मशानाच्या तत्कालीन जागा त्यांनी
तात्काळ तिथून हालवून त्या समाजास योग्य ठिकाणी जागा देण्यात आल्या होत्या.
छत्रपती शाहूमहाराजांच्या हुजूर ऑफिसमधील ठराव बुकांमध्ये नोंद असलेल्या खालील नोंदींवरून या राजाचे हे कार्य आपल्यासमोर येईल.
असे ठराव खालील प्रमाणे :-
● कll करवीर कौलव येथील सरकारी जमीन स्मशानाकरिता मिळावी यासाठी मंजूरी आदेश.
● करवीर येथील मुसलमान कबरस्तान करीता पाऊण इंची पाण्याची सोय नळासहित मोफत करून करून देण्याबद्दल व हे काम 8 दिवसात पूर्ण करून देण्यावबाबतचा आदेश
● दिंडणेर्ली स्मशानात बंडू बाबाजी यास दोन थडगी बांधण्यास मंजुरी आदेश
● वाणी समाजाला स्मशानभूमीसाठी दिलेली जमीन 13 गुंठे भरते पण पण मोबदला देताना 12 गुंठे दिला आहे त्यास 1 गुंठा कुरणांपैकी देणेसाठीचा आदेश.
● कll करवीर पंचगंगा नदीचे तटाकडील नदीच्या पात्रातील जमीन स्मशानात देणे आदेश.
● जितीच्या ओढ्यामधील हिंदू व भंगी जातीसाठी असलेली स्मशाने आरोग्यास
अपायकारक असल्याने भंगीजमातीसाठी रंकाळा येथे व हिंदू समाजासाठी जवळचे
पंचगंगा स्मशान वापरासाठी काढलेला आदेश.
(जिती म्हणजे जयंती नदी. आज या
जयंतीच्या ओढ्यात अडकणाऱ्या कचऱ्यामुळे कोल्हापूरकरांच्या आरोग्याचा
प्रश्न उद्बभवतो. अशावेळी त्याकाळी या ओढ्यात असणारी स्मशाने हलवून
दुसरीकडे नेणाऱ्या शाहूराजाची दूरदृष्टी जाणवते.)
● भंगी समाजाच्या स्मशानासाठी सर्व्हे नंबर 706 मोफत देणेबाबतचा आदेश.
● समस्त हिंदूवृंदांसाठी प्रेतदहनास मिळालेली जागा गलिच्छ असल्यामुळे पुलापासून आईसाहेबांच्या घाटापर्यंतची जागा परत देण्यासाठी दिलेला आदेश.
● मौ. मिणचे पैकी आळते येथील मलंग फकिराची जमीन मुसलमान लोकांच्या
स्मशानासाठी देण्याचा विचार होत असताना जमीन गावाजवळ असलेने,जमीनीजवळच्या
विहिरीतील पाणी पिण्याचे असलेने व जमिनीमागे असलेल्या गावच्या मुख्य देवळात
शाळा भरत असलेने ही जमीन हुजुरास पसंत नाही.
याबदली दुसरी सोयीस्कर जागा पसंती प्रमाणे व क्षेत्राचा विचार करून देणायाबाबतचा आदेश.
● मौ. आळते येथील मुसलमान लोकांच्या स्मशानाकरिता दिलेल्या जमिनीस कबर बांधनेस हरकत व गावाच्या बाजूकडे प्रेते पुरणेचे नाहीत या बद्दलचा आदेश.
● मौ. नवे बालिंगेच्या लोकांस शिंगणापूर गावचा सर्व्हे नंबर 200 देण्याबाबतचा मंजुरी आदेश
● महार व मांग लोंकांच्या स्मशानाकरिता कll करवीर सर्व्हे नं 805 पो.नं.3 एकर गुंठे 28 कृष्णा बाबाजी जाधव यांची कोटकरी इनामाची घेऊन त्यांच्या मोबदला आकाराच्या मानाने मोबदला जमीन देण्याचा आदेश.
● तेली समाजाच्या लोकांसाठी मसनवटीकरिता जमीन दिली.
● रुकडी येथील सर्व्हे नं 12 येथील मुसलमान लोकांच्या स्मशानासाठी असून ते कमी करून सर्व्हे नं.133 मध्ये तितक्याच क्षेत्राची जागा देण्याबद्दल आदेश.
● शाहूपुरीतील लिंगायत व गवळी समाजाच्या स्मशानासाठीची जागा बदलून त्यालगतची जागा देणे व मोबदल्याची तजवीज करण्याबद्दलचा आदेश.
● सांगरूळ येथील स.नं.124 जमीन 369 आकार 4 ही सरकारी पडीची जमीन मराठा व महार मसनवारीसाठी सोडून कागदी तरतूद करण्याबाबतचा आदेश.
हुजूर दप्तरी नोंद असलेले हे अस्सल आदेश
छत्रपती शाहूंच्या प्रजेविषयी असलेल्या आत्मीयतेची जाणीव करून देतात.
आमचे भाग्य थोर म्हणून आपल्याला असा लोकोत्तर महापुरुष राजा म्हणून लाभला.
कितीही गुण गायलेतरी त्याचे आमच्यावरील उपकार फिटणार नाहीत. उलट त्याच्या
ऋणात राहण्यातच आम्हाला धन्यता आहे.
लोकराजा शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांना त्रिवार अभिवादन...!
प्रसाद वैद्य
शाहू युथ फौंडेशन
मो.9822116662
~~~~~~~~~~~~~
माहिती साभार :-
श्री. गणेश खोडके साहेब
अभिलेखपाल
कोल्हापूर पुरालेखागार
सर्व कर्मचारी
कोल्हापूर पुरालेखागार
इंद्रजीत माने
शाहू अभ्यासक
~~~~~~~~~~~~~~
No comments:
Post a Comment