मिर्झा अबू तालिब म्हणजे शायिस्ताखान.
(वाचकांनो लेख थोडा मोठा आहे पण अत्यंत गमतीशीर माहितीने भरलेला आहे. तरी वाचून आनंद घ्यावा हि विनंती. )
शायिस्ता शब्दाचा पर्शियन अर्थ होतो सभ्य गृहस्थ. (Gentle; courteous; decent, Polite, well behaved.)
हा पर्शियन होता. म्हणजे आजच्या इराणचा. ह्याच्या आज्याचे नाव मिर्झा घियास बेग. आणि ह्याच्या बापाचं नाव अबुल हसन उर्फ असफ खान. (असफ खान हि पदवी आहे. )
शायिस्ताखानचा आजा आणी बाप हा मुगल सल्तनतीच्या जहांगीर आणि शहाजहाँचा वजीर होते.
जहांगीरने ह्या शायिस्ताखानाच्या आज्याला मुगल दरबारची सेवा केली म्हणून ‘शायिस्ता खान’ हि पदवी दिली होती. तिथून पुढे आजोबाची परंपरा चालवत मिर्झा अबू तालिबनेही म्हणजे ' शायिस्ताखान ' ने हीच पदवी दिलेले नाव धारण केले.
शायिस्ताखानाच्या आईच नाव दिवाणजी बेगम. हिला पाच अपत्य होती. त्यातील एक मुलगी हि पुढे शहाजहाँची बायको झाली. तीच नाव अर्जुमंद बानू बेगम म्हणजेच मुमताज महल.
तिचा शायिस्ताखान हा धाकटा भाऊ.
शहाजहानच्या मुलांपैकी एक औरंगजेब याचा हा शायिस्ताखान नात्याने मामा होता.
अफझलखानाचा कोथळा बाहेर काढून शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या शूर मावळ्यांनी थेट कोल्हापूरपर्यंत धडक मारून पन्हाळा किल्ला २८ नोव्हेंबर १६५९ रोजी स्वराज्यात जिंकून आणला.
आता शिवाजीराजाच्या तावडीतून विजापूर सल्तनत वाचत नाही असे पाहून विजापूर सल्तनतीचा जीव वाचविण्याची विनंती पत्रे आग्र्याला औरंगजेबाला तातडीने पाठविली गेली आणि औरंगजेबाने मामा शायिस्ताखानाला स्वराज्यावर पाठविला.
ह्या शायिस्ताखानाच्या स्वराज्यावरील मोहिमेची माहिती आपल्याला सभासदाची बखर, चित्रगुप्ताची बखर, शेडगावकर भोसल्यांची बखर, श्री शिवप्रताप, एकान्नव कलमी बखर, शिवदिग्विजय, पंतप्रतिनिधीची बखर, जेधे करीना, बुसातीन सलातीन, मुखतलुब लुबाब, शिवाय मासिरे आलमगीर, बर्नियर चे प्रवास वृत्तांत, मनुचीचे प्रवास वृतान्त, कॉस्मा द गार्डा अश्या स्वरूपाच्या भरपूर साऱ्या ठिकाणांवरून मिळते.
फेसबुकवरील महाराष्ट्र धर्म समुहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
सगळ्यात महत्वाचे:
सगळ्यात महत्वाचे:
शायिस्ताखानाची नेमकी बोट किती तुटली?
शिवदिग्विजय बखरीत खानाच्या उजव्या हाताची फक्त करंगळी तोडून घेतली, तर एक्यानवव्या कलमी बखरीत खानाचा अंगठा तोडला असे म्हंटले आहे. सभासदाच्या बखरीत खानाची उजव्या हाताची तीन बोटे तोडली असे म्हंटले आहे. तर जेधे करिन्यात शायिस्ताखानाचा हातच तोडल्याचे म्हंटले आहे. मल्हार रामरावाच्या बखरीत दोन बोटे तोडून घेतली असे म्हंटले आहे.
तर बखरी अशी सगळी वेगवेगळी माहिती सांगतात.
माहिती कितीही विसंगत असो पण खानाची बोटे तुटली हे नक्की.
आता ती महाराजांनी कशी तोडली ते पाहू.
ह्यातील शिवदिग्विजय बखर जरा वेगळी माहिती सांगते ती आधी पाहू.
" शास्ताखान पुण्यास आला. त्याचा शोध महाराजांनी लाविला. महाराज पुणे शहरचे घराघरास माहित पक्के. मनसबा करून रायगडीवरून निघोन राजगडास आले. तेथे लोकांची निवड केली. तेथून सिंहगडास येऊन शास्ताखान कोठे राहतात, निजतात, बसतात कोठे?
नित्य व्यवस्थेची चौकशीची बातमी ठेवून पुण्यास जाण्याचा बेत ठरविला.
मार्गांनी गेले तरी चौकीचे लोक पाहतील, बातमी पोहचेल, शत्रू हुशार होईल जाणोन, आडमार्गी रात्री जावे, असा सिद्धांत करून समागमे शामराजपंत घेऊन निघाले.
आडमार्गे पुण्यास आले. स्वपुरी अन्य विचार केल्यास नाश आपलाच होईल. यास्तव आडमार्गे गेले.
काही लोक कात्रजच्या घाटानी मार्गा मार्गांनी पोत दिवटीसारखे दिसावे म्हणून लोक पाठविले. त्यांनी झाडा झाडांस पोत बांधून काही गुरांचे शिंगास पोते लाविले.
(पोते म्हणजे मशाली.)
ते पुण्याहून स्वारी (म्हणजे शिवाजी महाराज) परत आले म्हणजे इशारा होताच ऐकावेच्छेदे पेटवावी अशी तरतूद ठेऊन डोणजचे खिंडीने लोकांसह खासा उतरले, परंतु
जाते समयी दुसरे मार्गे जावे असा विचार केला, आणी पाच सात हजार लोक निवडक नामी बराबर घेतले.
त्यासह आंबीलओढा येथे येऊन सर्व लोकांस विचारिले कि, शास्ताखानाचे शीर कापुन आणून द्याल कि काय? ज्याला हिम्मत असेल त्यांनी यावे नसल्यास प्राण वाचवून परत जावे. आम्ही हिंदू धर्माकरिता फकिरी घेतली आहे. राज्य द्रव्य सर्व अनुकूळ असोन, या प्रवाही पडलो. त्यास माझे सोबतीची पुरे असतील, ते माझे बरोबर येतील. यशापयेश श्री स्वाधीन.
स्पष्ट सांगावे, म्हणताच महाराज तू धनी आईबाप आहेस. धर्म सर्वांचा आहे. तू शिरावर असता आम्हास भय नाही. शास्ताखानाची बिशाद काय? सबळ शत्रूचा मार मानीत नाही. अशी हिम्मत तुझे अन्ने करून या देही आहे. हे एकूण राजे संतोषी झाले.
शामराजपंतांसह लोकांच्या नेमणूक केल्या. कोठे हजार, कोठे पाचशे, दोनशे, शंभर, असे जागजागी ठेवीत मार्गाचे ठायी इशारत होताच, ऐकावेच्छेने एका ठिकाणी मिळावे.
नेमिल्या प्रमाणे शत्रूस चाहूल न समजता, मार्ग रोखून, पुण्यानजीक खास बाग होता, तेथे पाच चारशे लोक ठेऊन, दहावीस धारकरी, नामी खातरजमेचे बराबर घेऊन जातीने वाड्यात शिरले. मार्गी येता बराबरच्या असामींपैकी एक दोन असे मार्गात ठेवत आले.
वाड्यात खासा जातीने गेले. बराबर येसाजी कंक आणी तानाजी मालुसरे उभयता घेतले.
वाड्यात त्रिवर्ग येऊन लाल महालानजीक गेले. तेथे खोजांची चौकी. दीपांचा उजेड पाहून, दुसरे वाटेने रंगमहाली गेले. तेथे शास्ताखानाचा लेक निजला होता. त्यास पाहून हाच खान म्हणून तलवार नागवी केली.
त्याकाळी तलवारीस फिरंग म्हणावयाचा संप्रदाय होता. फिरंग ओढून वार केला. त्या वाराने खानाचे चिरंजीव यमसदना प्रति गेले. वार कारेगार, दुधड अंग केले. ( म्हणजे अंगाचे दोन तुकडे केले.)
त्या घोषे त्याची स्त्री जागी झाली. तिला महाराजांनी दबाविली. " शास्ताखान हाच कि काय?
सांग जर न बोललीस तर जीवे मारिन.' म्हणता सर्वांग कंपायमान होऊन बोबडी वळली.
कृतांताप्रमाणे महाराज तिला भासते झाले. भ्रताराचा वार पाहून रक्तावलोकने भय अत्यंत पावून शब्द कुंठित जाला. भ्रतार मारला, आपल्यास मारतील, असे वाटून
'उसका बेटा' इतके बोलिली.
शास्ताखानाचा लेक निजले ठायी पुरा झाला. भ्रतार मारला, आपल्यास मारतील या भयाने दबून बसली. तिला महाराजांनी शास्ताखान कोठे आहे? दाखव म्हणून बोलता उठवून दाखविणे प्राप्त झाले. उभी राहिली, चालवे ना, परम संकट, फलाने जागी आहेत असे बोलिली.
शास्ताखान दुसऱ्या खोलीजवळ होता. तेथे निजला होता. तिकडे जाऊन त्या खोलीत महाराज शिरले.
फिरंग तलवार नागवी दीप प्रभेकरून तेज चंचळ होताच, शास्ताखानाची स्त्री किंचित जागी होती, तिची नजर पोहचली. तशीच उठून भिऊन, पाठमोरी उभी राहिली. दूर हो म्हणताच; मारेकरी खानास मारावयास आले म्हणून आपल्यास मारले तरी चिंता नाही हे जाणून राजाच्या चरणी मस्तक ठेऊन परम लीनतेने मारू नये, असे विनयतेने बोलली.
खानही जागृत झाला. महाराजास पाहून हिम्मत करून शस्त्र हाती धरावे असे धैर्य न पुरता, हतवीर्य होऊन शेल्याचे पदरे तोंड झाकून, निद्रेचे मीस घेऊन पलंगावरी
तसेच दबून राहिला.
त्याचे स्रियेचे करुणापर भाषण ऐकून सदय अंतःकरण भोळानाथ शत्रू असून भार्येचे वचनास सनाथ केले आणी तिशी बोलू लागलें, "यास न मारिले तरी मी येथून जाताच, उठोन गडबड करून आमच्या पाठलाग करील. तेंव्हा आमची निभावनी होणार नाही. यास्तव मारणे जरुरी. नाही तरी यास वाचवितो. माझ्या वाड्यातून कूच करून परत मागे जावे. अतःपर येथे राहू नये. यास शास्त करणे ती करंगळी घेईन, आणी आम्ही बाहेर गेल्यावर यांनी हुशारी करून पाठलाग करावा. तोपर्यंत गडबड करू नये."
असे बोलल्यावरून संपूर्ण वचनास स्त्री मान्य करून होऊन शास्ताखानस उठवून मान्य करवून शफथप्रमाण खानाने व त्याच्या स्रियेने केले. नंतर शास्ताखानचे हाताची करंगळी कापून उजव्या हाताची घेतली, आणि हाती धरून वाड्याचे दिंडी दरवाज्यापाशी आणोन, "उद्या माझ्या वाड्यातून निघोन जाणे, राहिल्यास तुजला जीवे मारीन. दिंडी दरवाज्या बाहेर पडल्यावर हात सोडून महाराज यश संपादून आले. ते येसाजी कंक
व तानाजी मालुसरे यांस मिळोन बहुत आनंद झाला.
जसे येते समयी लोक ठेवित आले तसे परत घेऊन गेले. बागांत जाऊन वार केलियावरी, सिंहगडाच्या मार्गी स्वारी (महाराज) चालिले. इशरत पोहचताच, हिलालजोतचे चहूकडे कात्रजच्या मार्गानी उजाळा केला. इकडे शास्ताखानस परम आश्चर्य वाटून अंदेशात पडला. कारण कृष्णपक्षाची रात्र अंधारी, त्यांत किंचित पर्जन्य, तेणेकरून मनुष्य निरुपाय.
शिवाजीराजा केवढे शूरत्व करून गेला. मोठा मर्द हिमतीचा. याचे पिछाडीवर लोक किती असतील न कळे. खान असा विचार करून स्तब्ध राहिला.
शिवाजीराजांच्या शफतेपासून मुक्त व्हावे, यदर्थी सहा चार घटका वाट पाहून नंतर लोकांस हाक मारून, रागे भरून, तयारी करून सरंजाम पिछाडीवर पाठविला. ते लोक चहूकडे रात्रीस फिरू लागले. शिवाजीराजा कोणीकडे गेले ठावके नाही.
यवन मदोन्मत्त. दुमाला करीत चालले. त्यांजला कात्रजच्या घाटानी वाद्ये ठेविली होती, ती वाजताच चहूकडे दिवट्या-पोत प्रजवलीत झाले. हे बघोन कात्रजच्या घाटाकडे संपूर्ण यावनी सैन्य धावले.
तो महाराज सिंहगडास पावले. किल्लेदाराने दाखल होताच किल्याच्या तोफा हर्षाच्या केल्या. ठायी ठायी लोक होते, ते ही इशाऱ्याप्रमाणे परत आले.
याप्रमाणे सरकारची फत्ते झाली. खान खिन्न होऊन परत विचार करू लागले 'हाक ताक कि गैबात कैसे हुई? एक आदमी आपनेकु मिला नहीं और कादखीसे आजके खुद मिला. इस वास्ते इसका कूच भी होनेका नहीं. लड़का मारा गया.'
असे बोलून फेटा भुईवर फेकून, अंग धरणीवर टाकून, शोक करू लागला.
येथे आपला काही उपाय चालत नहीं. त्याअर्थी पातशाही बुडती, राहत नहीं. ईश्वर करणीच अशी आहे.
लोक; मारला म्हणून भिऊन माघारी आला म्हणतील. यास्तव हत्तीवर चंद्रज्योती लावून पाठलाग करावा. असा पुन्हा विचार करून आणि फौज तयार करून उजडावयाचे संधीत सिंहगडास खान दाखल झाला.
सिंहगड किल्य्याची हुशारी होती. तोफा सुरु झाल्या. यवनी फौजेचे लोक गोळा लागून जाया होऊ लागले. वेढा घालून बसावे, तरी पर्जन्य काळ, भाद्रपद मास, पहाडास
लागावं तरी शिवाजीराजा दगाबाज आहे. कोणते समई काय करील न कळे.
शिवाजीराजांचा भरवसा नाही असा बेत करितात तो किल्यावरील तोफेचा गोळा येऊन खासा हत्तीच ठार
झाला.
फेसबुकवरील महाराष्ट्र धर्म समुहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
हे वृत्त सविस्तर दिल्लीस औरंगजेबास गेले. शास्ताखानास शास्त केली आणि त्याचा चिरंजीव मारिला हे अखबार गेल्यावरून औरंगजेबाने शास्ताखानास हुजूर निघोन येणे म्हणून फर्मान पाठविला. खानाचा पादशाही सुभा दूर केला. पादशाही फौजेची नामोशी झाली असे औरंगजेब बोलला.
इथपर्यंत माहिती ह्या बखरीत आहे. ह्या बखरीत तपशिलात विसंगती आहे. बखरकार बखर लिहिताना आपल्या कल्पनांचा भरपूर वापर करत असत ह्याचा ही बखर उत्तम नमुना आहे.
मल्हार रामराव चिटणीसाची बखरही ह्याच कथेशी साम्य दाखविणारी माहिती सांगते. पण ह्यात तो खानाची दोन बोटे कापिली असे म्हणतो.
जेधे करीना ह्या बाबतीत काय म्हणतो ते पहा, " चैत्र शुद्ध अष्टमी रविवार ( ५ एप्रिल १६६३) लोकांची निवड करून पुनियात राजश्री शिवाजी महाराज स्वामींनी खासा
दहा लोकांनिशीं लाल महालात जाऊन शास्ताखानावरी छापा घातला.
बरोबर कान्होजी नाईक यांचे पुत्र चांदजी जेधे होते. मारामारी जाली. तेंव्हा शास्ताखानचा हात तुटला. मग खान पळोन गेला. त्याचा लेक अब्दुल फत्ते ठार झाला. त्या उपरी शिवाजी राजा परसातील दिंडीने बाहीर निघाले.
तो सर्जाराऊ जेधे घोडियावरी बैसोन पागेचा घोडा दुसरा खासदाराजवळ देऊन दिंडी समीप आज्ञेप्रमाणे राहिले होते. राजश्री शिवाजी स्वामी येताच घोडियावरी बैसोन मुळा नदी उतरून जरेसाकडे निघाले. जागा जागा
लष्कराच्या टोळ्या व नगारे ठेविले होते. त्याची गुली मोगलांच्या लष्करात जाली.
राजश्री स्वामी हशमाच्या व लष्कराच्या जमावानिशी दुसरे दिवशी सिंहगडास आले."
आता सभासदाची बखर ह्या विषयी काय म्हटले ते पाहू,
" तोच ते दिवशी शाहिस्तेखानच्या स्वारीची बातमी दिल्लीहून आल्यानंतर शिवाजी राजांनी जी तातडीची सल्ला मसलत केली त्या दिवशी रात्री भवानी राजियाच्या अंगात अवतरून बोलू लागली जे, 'लष्कराशी म्हणावे, शास्ताखान येतो याची फिकीर न करणे. जैसा अफझल खान मारिला तैसा शायस्ताखान मारून टाकिते. तू चिंता न करणे.
शायस्ताखान येऊन उतरलियावरी त्याचे गोटास शिरून मारामारी करणे. पराभवाते पाववीत्ये.'
ऐसे श्रीने सांगोन गेली. राजे सावध जाहलियावरी जवळ कारभारी होते त्यांनी श्रीची वाक्ये लिहून ठेविली होती, ते राजियास सांगितली.
राजियांनी श्री प्रसन्न जाहली हे ऐकोन हिम्मत धरिली आणि आपले लष्करांत मावळे लोकांत व हुजूर लोकांत निवड करून हजार माणूस निवडक लष्करामध्ये सडे राऊत ( राऊत म्हणजे घोडेस्वार ) तयार करून शास्ताखान पुण्यास आला ही खबर आणोन राजे
राजगडावरून खासा दस्तेर होऊन खाली उतरून निवडक लोक बराबर घेऊन चालिले.
दादाजी बापूजी व चिमणाजी बापूजी देशपांडिया, खेड तर्फे हरकारे होते. हे दोघेजण बहुत शहाणे व शूर राजियाचे प्रीतिपात्र. हे दोघे बंधू बरोबरी घेतले. राजियांनी
नेताजी पालकर ऐसा दोन फौजा व मावळे हशम मेळवून ऐसा पाच फौजा शास्ताखानाच्या गोटाबाहेर अर्ध्या कोसावर चौतर्फ़ा उभ्या केला.
आणि खाशा राजियांनी ढाल तलवार हाती घेऊन तयार होऊन हजार माणूस पायउतार बरोबर घेतले. खानाचे गोटांत चालिले. बिंतीस ( म्हणजे पुढे) चिमणाजी बापूजी खेडबारे चालिले. त्यांचे पाठीवर कुल फौज व राजे चालिले.
तांब्राचे दळ थोर. जागा जागा लष्करात राजियासी ' कोणाचे लोक? कोण कोठे गेले होते? म्हणोन पुसता कटकातील छबीनियांसी चवकीस पावखल गेलो होतो, ऐसे भाषणेच चिमणाजी बापूजी बोलत चालिले.
इतक्यात मध्यान्ह रात्र झाली. राजे खानाच्या डेऱ्याजवळ गेले. हजार माणसांच्या दोन्ही फौजा केल्या. खानाचे डेरियासी दोन्ही तर्फाने उभे राहिले. दोनशे माणूस
त्यामधील निवडून खासा राजियांनी आंगेंजकरून चिमणाजी बापूजींस सांगून डेऱ्याचे बाड कट्यारीने चिरून आत गेले. लोक चौकीचे निजले होते. त्यांसी कळों दिले नहीं.
पुढे खासा खानाच्या डेरियासी पावले. डेरियात खोजे व बायका ऐसे होते. त्यामध्ये कित्येक समया व मेणबत्या लावून जागत होत्या.
डेरियात पारखे लोक देखोन खोजे व बायका यांनी गिल्ला केला. इतक्यात चिमणाजी बापू याने खोजे पाच सात मारिले. ( खोजे म्हणजे तृतीय पंथी) वरकड बायका दबाविल्या.
त्यामध्ये उडदबेगिण्या वीस पंचवीस होत्या. त्या गुरकून लोकांस मारीत चालिल्या. तेंव्हा राजियांचे लोकांनी उडदबेगिण्या पाच सात मारिल्या. घाबरून त्याही दबून
राहिल्या.
इतका गलबला होताच खानास कळले कि गनिमाचे लोक आले. खासा उठून खान बायकांत शिरला.
कुल दिवे समया मेणबत्या विझविल्या. अंधार पडला. खासा ओळखता न ये. (म्हणजे महाराजांना खान सापडेना.) तेंव्हा वृद्ध वृद्ध पाहोन खासा खासा म्हणोन जागा जागा मारिले.
राजा खासा येऊन पाहता नव्हे ऐसे तीन घटिका खासे खानाचे डेरियात फिरून शोध घेतला. ( म्हणजे साधारण पाऊण तास.) शायस्ताखान बायकांत लपला. राजा
पुण्यश्लोक कि बायकांवर हात न करी.
इतक्यात मारिता मारिता शायस्ताखानाचे उजवे हाताचे तीन बोटे उडाली. गलबला थोर जाहला.
मग राजे बाहेर निघाले. तांब्राचे लष्करचे लोक 'गनीम कोठे गनीम कोठे' म्हणत धावू लागले. यांजबरोबर राजियाचे लोकही 'गनीम कोठे गनीम कोठे' म्हणत लाल महालाच्या बाहेर निघाले. आणि राजे आपली फौज सरनौबत होते त्यात मिळून निघाले. चालिले.
गनिमाची कुल फौज तयार होऊन गोटातच शोध करू लागली. त्यांना राजांचा माग लागेना.
हे स्वस्तिक्षेम दिवस उगविल्यावर खानाच्या परामृशास कुल वजीर आले. पाहता खानाची तीन बोटे तुटोन गेली. वरकड कित्येक लोकांचा नाश जाहला. बायका व खोजियांस जखमा जाहल्या. कित्येक जीवे मारिले.
ऐसे कळोंन खान बोलिला जे, " गनीम इतका खाशीयांचे डेऱ्यात शिरे तोवर कोणी वजीर हुशार जाले नाही. तेंव्हा अवघे फितव्यात मिळाले. आता इतबार कोणाचा येत नाही.
आज राजा येऊन आपली बोटे तोडीली.
उद्या मागती येऊन आपले शीर कापून नेईल.
शिवाजीराजा मोठा दगेखोर आहे. दगा दिल्हा. आणखी दगा देईल. आमचे लष्कराचा इतबार येत नाही. आपण माघारे कूच करून दिल्लीस जावे. ऐसा विचार करून तिसरे दिवशी खान माघारे चालिला.
इकडे राजे सिंहगडावरून आता राजगडास आले होते. जासूदाने खबर शत्रूच्या सैन्यातून आणविली. शायिस्तेखानाची तीन बोटे तुटोन गेली. उजवा हात जाई जाहला. ( म्हणजे हाताला तलवारीचे वार लागले.) कित्येक लोक मारिले. खान दहशत खाऊन दिल्लीस पळोन चालिला.
हे वर्तमान आले. त्यावरून राजे खुशाल जाले कि " फत्ते होऊन आली. शास्ताखानास पातशहाने नाव ठेविले. परंतु यथार्थ ठेविले नाही. ते नाव शास्तीखान आज आपण खरे केले. शास्ती केली. नाव रुजू जाहले.
ऐसे बोलून भांडी वाजविली. (म्हणजे तोफा उडविल्या.) साखरा वाटल्या. खुशाली केली आणि आपले राज्य करीत राहिले.
तर अशी ही सभासदाच्या बखरीतील माहिती.
फेसबुकवरील महाराष्ट्र धर्म समुहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
आता सगळ्यात महत्वाचे.
राजापूरच्या इंग्रजांच्या १२ एप्रिल १६६३ च्या सुरतेला पाठविलेल्या पत्रात शिवाजी महाराजांनी रावजी सोमनाथला लिहिलेल्या पत्रातील मजकूर आहे. त्या
पत्रानुसार शिवाजी राजा निवडक ४०० मावळ्यांसहित जातीने खानाचे गोटात गेला.
ह्या मारामारीत शाहिस्तेखानाचा वडील मुलगा, त्याचा जावई, त्याच्या १२ बायका, ४० मोठे दरकदार, आणि मोगलांचा सेनापती इतक्या लोकांना शिवाजी राजाने ठार मारले असे लिहिले आहे.
गिफर्डने लिहिलेल्या पत्रात शाहिस्तेखानच्या एक मुलगा मेला, दोन जखमी झाले. ६ बायका मरण पावल्या. ८ बायकांना जखमा झाल्या आणि शाहिस्तेखानाच्या परिवारातील ४० लोक ठार झाले असे लिहिले आहे.
ह्याचीच परिणीती म्हणून औरंगजेबाने अत्यंत क्रोधीत होऊन शाहिस्तेखानास लिहिलेल्या पत्रात खानास म्हंटले आहे कि " मला तुमचे हारलेले थोबाड न दाखविता
सरळ बंगालच्या सुभ्यावर तुमची रवानगी करण्यात येत आहे."
ह्याचा बदला घेण्यासाठी औरंगजेबाने आता मिर्झा राजा जयसिंगाला स्वराज्यावर पाठविले.
तर अशी हि मिर्झा अबू तालिबची म्हणजे शाहिस्तेखानाची फजिती.
लेख समाप्त.
श्री भवानी शंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम
निरंतर
No comments:
Post a Comment