विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 24 July 2020

छत्रपती संभाजी महाराजांची आग्ऱ्याहून सुटका.

छत्रपती संभाजी महाराजांची आग्ऱ्याहून सुटका.

छत्रपती संभाजी महाराजांची आज पुण्यतिथी.
छत्रपतींच्या चरणी मानाचा मुजरा.
आपल्याला सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज आग्ऱ्यावरून कसे सुटून आले ते माहित आहे. पण मागे राहिलेल्या संभाजी महाराजांचे काय झाले?
चला तर मग पाहूयात कि छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाच्या तावडीतून कसे सुटून परत स्वराज्यात राजगडास आले.
छत्रपती संभाजीराजांचा जन्म १४ मे १६५७ रोजी गुरुवार ह्या दिवशी पुरंदर किल्यावर झाला.
औरंगजेबाच्या सांगण्यावरून मिर्झा राजा जयसिंगाने ३० मार्च १६६५ ला पुरंदर किल्याला वेढा घातला. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघली फौजांचा बराच प्रतिकार केला.
पण ह्या मुघलांशी लढाया करत बसलो तर फार मनुष्यहानी होईल आणि पैसाही खूप खर्च होईल म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजा जयसिंगाबरोबर तहाची बोलणी सुरु केली.
११ जून १६६५ ला छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मिर्झा राजा जयसिंगाची पुरंदराखालील नारायणपूर येथे भेट झाली.
दिनांक १३ जून १६६५ ला मराठे आणि मुघलांचा तह झाला. तहात ठरलेल्या अटींप्रमाणे दिनांक १७ जूनला राजगडावरून छत्रपती संभाजी राजांना उग्रसेन कछवाह बरोबर मिर्झा राजा जयसिंगाच्या हवाली करण्यासाठी मुघलांच्या छावणीत पाठविण्यात आले.
आता इथं महत्वाचे.
१८ जून रोजी केवळ आठ वर्षांचे संभाजीराजे मुघलांच्या छावणीत दाखल झाले. ( साधारण आजच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या मुलाचे वय. )
छावणीत आल्यावर मिर्झा राजा जयसिंगाने छत्रपती संभाजी राजांस पोशाख आणि रुप्याच्या हौद्यासह हत्ती भेट देऊन त्यांचा सन्मान केला.
सप्टेंबर १६६५ पर्यंत शिवाजी महाराजांचे प्रतिनिधी ह्या नात्याने छत्रपती संभाजी राजे मुघलांकडे ओलीस राहिले. मधल्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मदतीने मिर्झा राजा जयसिंगाने विजापूरवर आक्रमण केले. पण त्यात मिर्झा राजा जयसिंगाला काही यश आले नाही.
तहानुसार मुघलांचा मनसबदार झाल्यामुळे आठ वर्षांच्या छत्रपती संभाजी राजांस छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर आग्ऱ्यास औरंगजेबाला भेटायला जाणे क्रमप्राप्तच होते.
संभाजी राजांच्या बालवयाचा विचार केला तर महाराष्ट्रातून दूर उत्तरेस जाणे हे फारच त्रासदायक होते ह्यात शंका नाही.
जिजाऊसाहेब आणि इतर मंडळींचा निरोप घेऊन हे दोघे पितापुत्र दिनांक ५ मार्च १६६६ रोजी आग्ऱ्यास जाण्यासाठी निघाले. तेंव्हाचा प्रवास हा मुख्यतः पालखीतुन, घोड्यावरून अथवा हत्ती किंवा उंटावरूनच करावा लागत असे.
हे दोघे पितापुत्र जेंव्हा उत्तरेस निघाले तेंव्हा हवामानही उष्ण होते. मे-जूनच्या काळात उत्तरेत खूप उन्हाळा असतो. तर अश्या खडतर प्रवासातून दोन महिने सहा दिवस प्रवास करून हे दोघे पितापुत्र दिनांक ११ मे १६६६ रोजी आग्ऱ्यास पोहचले. मालुकचंदच्या सराईत पोहचल्यावर त्यांनी आपले तंबू ठोकले.
आग्ऱ्यात आल्यावर दुसऱ्या दिवशी १२ मे १६६६ रोजी मिर्झा राजा जयसिंगाचा मुलगा असलेल्या रामसिंगाची छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी राजे ह्यांची नुरगंज बागेत भेट झाली. आता हे तिघे दरबारात पोहचेपर्यंत औरंगजेब हा दिवाण-इ-आम मधून दिवाण-इ-खास मध्ये गेला होता.
त्यामुळे हे तिघे आता औरंगजेबाला भेटायला दिवाण-इ-खास मध्ये गेले. आसदखानाने पहिल्यांदा छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबासमोर नेले. छत्रपती शिवाजी महाराजांनी एक हजार मोहरा, दोन हजार रुपये नजर आणि पाच हजार रुपये निसार म्हणून दिले. नंतर छत्रपती संभाजी राजांस औरंगजेबासमोर नेले गेले. छत्रपती संभाजी राजांनी पाचशे मोहरा एक हजार रुपये नजर आणि दोन हजार रुपये निसार म्हणून दिले.
औरंगजेब छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी राजांस उद्देशून काहीही बोलला नाही. औरंगजेबाचा वाढदिवस असल्याने सर्वांस विडे देण्यात आले. पण योग्य मान न दिल्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व दरबारासमोरच औरंगजेबाचा अत्यंत वाईट पद्धतीने पाणउतारा केला.
दुसऱ्या दिवशी दिनांक १३ मे रोजी शिवाजी महाराज दरबारात गेले नाहीत.
मात्र १३ मे रोजी संभाजी राजे रामसिंगाबरोबर दरबारात गेले आणि रामसिंगाजवळच उभे राहिले. नजराणा म्हणून औरंगजेबाने संभाजीराजांस सरोपा, रत्नजडित खंजीर, आणि एक मोत्याची माळ दिली.
औरंगजेबाशी भांडण झाल्यापासून म्हणजेच १२ मे पासून शिवाजी महाराज औरंगजेबाला भेटायलाच गेले नाहीत.
इथून पुढे शिवाजीमहाराज आणि संभाजीराजे कैद झाले. मात्र कैद जरी झाले तरी संभाजीराजे रोज रामसिंगाबरोबर औरंगजेबाच्या दरबारात जात असत.
अश्याच एका प्रसंगी औरंगजेबाने एका मल्लाबरोबर संभाजीराजांस मल्लयुद्ध (कुस्ती) खेळावयास सांगितले. पण ह्या औरंगजेबाच्या सूचनेला संभाजीराजांनी तडफदारपणे विरोध केला.
( ह्याचा पुरावा आहे आपल्याकडे. दानपत्र- संभाजी, म. म. द. वा. पोतदार संग्रह. )
"औरंगजेब बादशहाने माझे घेतलेले सर्व किल्ले मला परत दिले तर मी बादशहाला त्या बदल्यात दोन कोट रुपये द्यायला तयार आहे आणि माझा मुलगा संभाजी ह्यासही बादशहाच्या नोकरीत ठेवायला तयार आहे.
आपल्याला महाराष्ट्रात परत जाण्याची परवानगी द्यावी." अश्या आशयाचा एक अर्ज महाराजांनी मुहम्मद अमीनखान याबरोबर औरंगजेबाकडे पाठविला.
या अर्जामुळे औरंगजेब खूप चिडला आणि आता त्याने छत्रपती शिवाजी महाराजांनी कोणासही भेटू नये असा हुकूमच काढला. हुकूम काढून औरंगजेबाने आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या निवासस्थानावर चौक्या बसविल्या.
फेसबुकवरील महाराष्ट्र धर्म समुहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
आता आपण सुटत नाही हे पाहून छत्रपती शिवाजी महाराज खूप कष्टी झाले. बाळ संभाजी राजांना पोटाशी धरून त्यांनी बहुत खेद केला.
(कल्पना करा; ह्या वेळेस वडिलांच्या मनाची काय अवस्था झाली असेल आपल्या आठ वर्षाच्या लेकराकडे बघून ...)
१६६६ सालच्या जूनच्या पहिल्याच आठवड्यात औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराजांकडे त्यांचे सर्व किल्ले मागितले. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाची ही मागणी अमान्य केली.
दिनांक ७ जूनला छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाकडून परवाने घेऊन आपल्या सगळ्या सहकार्यांना परत महाराष्ट्रात पाठवून दिले.
अखेर दिनांक १८ ऑगस्ट १६६६ रोजी सकाळच्या वेळी छत्रपती
शिवाजी महाराज छत्रपती संभाजी राजांसहित पेटाऱ्यात बसून औरंगजेबाच्या कैदेतून निसटले.
ही बातमी औरंगजेबाला समजताच त्याने संतापून जाऊन चारही दिशांस शिवाजी महाराजांस पकडण्यासाठी आपले सैन्य रवाना केले.
आता इथून पुढे सगळ्यात महत्वाचे आहे.
औरंगजेबाच्या तावडीतून सुटल्यावर शिवाजी महाराज संभाजी राजांस घेऊन प्रथम मथुरेस आले. तेथे काशीपंतांकडे संभाजीराजांस हवाली केले.
सर्वांनी आपल्या दाढी मिशा काढल्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी अंगास राख फासली आणि फकिराचे रूप घेतले. त्यांच्या सहकार्यांनीही फकिराचे वेष धारण केले.
मुघलांचा पाठलाग चुकवीत छत्रपती शिवाजी महाराज साधारण पंचवीस दिवसांनी दिनांक १२ सप्टेंबर १६६६ रोजी राजगडावर आले.
आपल्या मुलाला मुगलांच्या पाठलागाचा त्रास होऊ नये म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी एक अजब युक्ती केली.
त्यांनी कवी कलशाकडून बाळ संभाजीराजे तिकडेच उत्तरेत मरण पावल्याचे पत्र आले असल्याचे जाहीर करून छत्रपती शिवाजी महाराज आता पुत्रशोक करू लागले.
त्यामुळे जवळपासचे पाटील, देशमुख कित्येक सरदार आणि राजपूत लोकांनी छत्रपती शिवाजी महाराजांना सांत्वनासाठी पत्रे पाठविली.
बाळ संभाजी राजांच्या पत्नीने येसूबाई साहेबांनी (संभाजी राजांचे १६६६ मध्ये लग्न झाले होते.) अतिशोकामुळे सती जावयाची इच्छा दाखविली. तिला मोठ्या कष्टाने परावृत्त केले.
छत्रपती शिवाजी महाराजांनी संभाजीराजांची सर्व उत्तरक्रियाही उरकून टाकली आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला दुसरा मुलगा झाल्याचे जाहीर केले.
राजगड परिसरात औरंगजेबाचे हेर फिरतच होते. त्यांनी 'संभाजी राजा दगदगीने वाटेतच मेल्याची' बातमी आग्ऱ्याला औरंगजेबाला कळविली.
हि खोटी बातमी छत्रपती शिवाजी महाराजांनी मुद्दाम पसरविली होती. त्यावेळी त्यांना छत्रपती संभाजी हा एकटाच मुलगा होता. मुघलांनी संभाजीराजांचा पाठलाग करू नये म्हणून मोठ्या युक्तीने हि अफवा पसरविली होती.
आता इकडे मथुरेत काय झाले ते पाहू.
(बखरीची भाषा समजण्यास थोडी अवघड. मोठ्याने वाचा म्हणजे लगेच लक्षात येईल.)
ह्यावर शिवदिग्विजय बखर काय म्हणते ते पहा: "आग्रा येथून निसटल्यावर शिवाजी-संभाजी कुरुक्षेत्री काही दिवस राहून मथुरेसी आले. मार्गी येता संभाजीराजे यांचे वय अल्प, चालावयाचा अभ्यास नाही. देशी जावे तरी निभावनी कशी होती ! महत्संकट वाटले.
परंतु श्री जगदंबा अनुकूल. त्यायोगे मोरोपंत पेशवे यांचे मेहुणे कृष्णाजीपंत व काशीपंत व विसाजीपंत हे त्रिवर्ग बंधू, कुटुंबसुद्धा मथुरेत राहिले होते. त्यांचा व निराजीपंतांचा परिचय होता. तीर्थ करीत करीत फिरत सर्वांची गाठ पडोन आगत-स्वागत झाले. परस्पर शपथ प्रमाण घेऊन संभाजीराजांस त्यांचे हवाली केले. महाराजांनी आज्ञा केली कि., "आम्ही देशी पावल्यावरी तुम्हास लेहून पाठवू त्या नंतर तुम्ही चिरंजीवास घेऊन यावे."
छत्रपती शिवाजी महाराज राजगडला सुखरूप पोहचल्यावर त्यांनी संभाजीराजांस परत आणण्याचा बेत केला. काशीपंत यांना पत्र गेल्यानंतर काशीपंत, त्यांची आई आणि संभाजीराजे असे त्रिवर्ग देशी (म्हणजे महाराष्ट्राकडे)निघाले.
फेसबुकवरील महाराष्ट्र धर्म समुहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
येताना वाटेत काय काय झाले याचे ह्याच बखरीत वर्णन आहे. ते असे. "मथुरेत संभाजीराजे ठेविले. त्यास आणवावे. यवनांत वृत्त न कळावे, असे विचारात महाराज असता, काशीपंत यांनी ब्राम्हणवेष संभाजीराजांस देऊन मार्गानी घेऊन येत असता पादशाही ताकीद सर्वठायी झाली होती कि ' शिवाजीराजे येथून पळून गेले, त्यास अथवा त्यांचे लेकास आणोन देईल, त्यास बक्षीस देऊन, मोठे मरातबाने त्याचे चालविले जाईल.' त्यावरून गावोगाव तलाश पाडीत होते.
(म्हणजे गावोगावी शोधत होते.)
संभाजीराजे यांस काशीपंत मार्गानी घेऊन येत असता मौजे गाव हवेली उज्जयिनी येथे काही लोकांची गाठ पडली.
संभाजीराजे आधीच स्वरुपवान, पूर्ववय, त्यायोगे सौंदर्येकरून फार चांगले दिसत. त्यावरून पाहणारांनी दूरदृष्टी 'ब्राम्हण पादचारी फिरणार, त्याचे पोटी असा पुत्र होणार नाही. कृत्रिम काही आहे.' असे मनात आणोन अडथळा केला.
काशीपंत खातरजमा बहुत तऱ्हेने त्यांची करीत; परंतु न होय. त्यावरून जिकरीस येऊन बोलते झाले कि, " शफत प्रमाण केली असता तुम्ही अप्रमाण मानिता. त्या अर्थी तुमचे मनात जसे खरे वाटेल ते कळवावे. तसे करिन, असे बोलले. उज्जयिनी गावचेही चार ग्रामस्थ मिळाले. त्यांनीही वृत्त ऐकले, तेंव्हा ब्राम्हणाची करुणा येऊन, " तुम्ही ब्राम्हण, आपला चिरंजीव म्हणता; परंतु आम्हास खरे वाटत नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा लेक असेल असे वाटते. तुम्ही मात्र नाही म्हणता. त्यास पुत्र तुमचा, तरी एक पात्री भोजन करावे, म्हणजे आमचा संशय दूर होईल."
हे ऐकोन अंतकरणात परम भय पावोन विचार करिते झाले कि, जर करिता जेवतो तो ब्राम्हण्यातून भ्रष्ट होतो, नाही जेवतो तरी यास नेतात ! (यासी नेतात म्हणजे- संभाजी राजांस पकडून नेतात. )
आमचे प्राणाशी गाठ पडती. प्राणांत संकट जाणोन विश्वेश्वरास बोलले 'सहस्र ब्राम्हण भोजनास घालू' असा नवस नवसून बोलते झाले कि व्रतबंध ब्राम्हणाचा झाला म्हणजे एकपात्री भोजन नाही.
(ब्राम्हणांच्यात व्रतबंध झाल्यावर एकाच ताटात दोघे जेवत नाहीत.)
हि वेदाज्ञा आहे. तथापि तुम्ही आमचे पुत्राचा (म्हणजे संभाजीराजांचा) अभिलाष इच्छिता तरी सांगाल ते करणे प्राप्त.
तुम्ही या गावचे अधिकारी. यांचे विद्यमाने सांगावे. स्वजातीधर्मे चालावे किंवा कसे? ते सांगाल तसे करू. म्हणोन विनयतेने बोलल्यावरून 'फराळाचे नूतन पाक करून एक जागी बसून करावा. म्हणजे तुम्हास मुक्त करू.'
असे बोलल्यावर काशीपंत पुन्हा बोलते झाले जे, 'हे पहा मी गरीब ब्राम्हण अनाथ आहे. महायात्रेस एकटे येऊ नये म्हणून कुटुंबसुद्धा मातोश्रीस घेऊन आलो. म्हातारी पुण्यवान होती. ( म्हणजे काशीपंताची आई.) ती विष्णुपद सेवून मुक्त झाली. स्रियेनी देह प्रयागी अर्पण केला. ( म्हणजे काशीपंताच्या बायकोने प्रयागला नदीत प्राणत्याग केला.)
आम्ही उभयता राहिलो. (म्हणजे काशीपंत, त्यांची आई आणि संभाजीराजे. )
ते या प्रवाही पडलो. भगवान तू त्राता आहेस. उपहारास एकंदर बसोन करू नये हे धर्मशास्र असता संकेतार्थी योजिला. विषय सुधृढ राहून बंधू पितृन्यादी वडील भेटली म्हणजे कृतकृत्या मिळविली.
असे काशीपंत बोलोन बहुत गहिवरून सरंजाम दिल्हा (म्हणजे स्वयंपाकाचे साहित्य दिले.) तो घेऊन, पाकक्रिया केली. (स्वयंपाक केला.) आणि एकपात्री (एकाच ताटात) दशमी वाढून फराळ केला.
(म्हणजे संभाजीराजे माझा मुलगा आहे हे लोकांना दाखविण्यासाठी काशीपंत आणि संभाजीराजे एकाच ताटात जेवले. )
ते ग्रामस्थांनी पाहून निरपराधे दंड या ब्राम्हणास करीत होतो असे वाटून, एक पागोटे व पाच रुपये द्यावयास काढले. तेंव्हा काशीपंत बोलले कि 'मी भिक्षुक ब्राम्हण नव्हे. गृहस्थ आहे. त्यात महायात्रा केली. तिचे मावंदे झाल्याशिवाय कोणाचे घरी पाणी देखील घेऊ नये. आपण सर्वांमुळे हा फराळ केला इतके पुरे. कृपा करावी म्हंटल्यावरून मशारनिल्हेस आज्ञा दिली.
महाराज आधीच सुकुमार. त्यात उष्णकालचे (उन्हाळ्याचे) पायी चालणे, दोन चार कोस चालता परम संकट व्हावे, असे करीत करीत गंगातीरास आले.
तेथून पुढे जावयास, घोडी घेऊन, राक्षसभुवनी गंगा उतरोन, पुण्यास आले.
निकडीचे लोक सरंजाम घेऊन ( सरंजाम म्हणजे संभाजीराजे ह्यांस घेऊन ) महाराजांकडे चालले. महाराजांस कळोन भेटीचा समारंभ चांगला करून सुमुहूर्ती भेटी घेतल्या. मोठा आल्हाद महाराजांस व मातुश्री जिजाबाईसाहेबांस व राणीवंशात झाला.
किल्लो-किल्यास डाकेनी वर्तमान जाऊन साखरा वाटल्या. तोफा झाल्या. सर्व राज्यांत सर्व जणांनी मोठा उत्साह केला. संभाजीराजांचा पुनर्जन्म झाला. काशीपंत व विसाजीपंत व कृष्णाजीपंत यांस 'विश्वासराव हा किताब देऊन पालखी हत्ती सरंजाम बहुमान वस्रे अलंकार दिल्हे."
ह्याचा आजून एक पुरावा आपल्याकडे आहे.
याविषयी मुघल दरबारचा लेखक नुक्षा-इ-दिलकुशा लिहितो, " इकडे मथुरेत शिवाजीराजांचा मुलगा होता. त्याचा चेहरा कोवळा होता आणि त्याचे केस लांब होते. ब्राम्हणांनी त्याला मुलीचा वेष दिला. नंतर तो ब्राम्हण आपल्या बायका पोरांना घेऊन निघाला. स्त्री वेषधारी मुलाला (संभाजीराजांस) हि आपली दासी आहे असे त्याने दाखविले. अश्यारीतीने त्याने त्याला शिवाजीराजांपाशी पोहचविले. छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला इतकी बक्षिशी दिली कि त्या ब्राम्हणाचे जन्माचे सार्थक झाले."
आता अत्यंत महत्वाचे.
२० नोव्हेंबर १६६६ रोजी संभाजीराजे राजगडास पोहचले. शिवाजी महाराज राजगडला आल्यानंतर २ महिने आणि आठ दिवसांनी संभाजीराजे परत राजगडाला आले.
'दोघा ब्राम्हणांनी जानवे आणि धोतर नेसवून आपला भाचा म्हणून राजगडास आणले.'
फेसबुकवरील महाराष्ट्र धर्म समुहाचे इतिहास अभ्यासक सतीश शिवाजीराव कदम ह्यांच्या अभ्यासानुसार;
कृष्णाजीपंत व काशीपंत व विसाजीपंतांपैकी असलेल्या कृष्णाजीपंताला शिवाजी महाराजांनी आग्ऱ्यावरून येताना आपल्याबरोबरच आणले होते.
(बहुतेक संभाजीराजांचा जामीन म्हणून आणले असेल.)
संभाजीराजांस सुखरूप आणल्याबद्दल शिवाजी महाराजांनी कृष्णाजीपंत त्याची आई आणि काशी त्रिमल (काशीपंत) यांना बक्षिसे दिली.
एकूण रुपये पन्नास हजार (५००००) पैकी मातुश्री आईस म्हणजे कृष्णाजीच्याआईस पंचवीस हजार रुपये , आणि काशीपंतास पंचवीस हजार रुपये बक्षीस दिले.
(हि रक्कम त्या काळी काही करोडो रुपयांची होती. )
नियती कशी असते पहा.
संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या दरबारात पाऊल टाकले तेंव्हा त्यांच्या बालमनाला कल्पनाही नसेल कि,
भविष्यात हाच औरंगजेब आपल्याला हाल हाल करून मारेल;
आणि औरंगजेबालाही त्यावेळी कल्पना नसेल कि,
ह्याच शिवाजीराजांचा सिंहासारखे शूर असलेले हे संभाजीमहाराज आणि त्यांचे मराठा वीर भविष्यात ह्याच औरंगजेबाला आणि त्याच्या मुघल सल्तनतीला महाराष्ट्राच्याच मातीत तसेच हाल हाल करून मारतील.
लेख समाप्त.
लेखाविषयी तुमची प्रतिक्रिया खाली कमेंटमध्ये कळवा आणी आपल्या महाराष्ट्र धर्मवर मित्रमंडळींना 'Invite' (आमंत्रित) करा.
श्री भवानी शंकर चरणी तत्पर
सतीश शिवाजीराव कदम
निरंतर

No comments:

Post a Comment

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...