विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 26 August 2020

छत्रपती शाहू आणि सातारा गादीची स्थापना.

 

छत्रपती शाहू आणि सातारा गादीची स्थापना.
postsaambhar ::

अजय अरूण शिंदे, त्र्यंबकेश्वर.
मित्रांनो आज आपण स्वराज्याचे पाचवे छत्रपती, शाहू महाराज यांच्या व्यक्तिमत्त्वाचा आढावा घेऊ. त्यांच्या आधी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज, कोल्हापूरचे छत्रपती शिवाजी महाराज (दुसरे) हे मराठा साम्राज्याचे छत्रपती झाले होते.
शाहू महाराज हे छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू व छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र होते. त्यांचा जन्म १८ मे १६८२ रोजी कोकणात गांगोली येथे झाला. त्यांचे जन्मनाव त्यांचे आजोबा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावावरून शिवाजी असं ठेवलं होतं मात्र पुढे त्याचा मुघली अपभ्रंश होऊन ते शाहू असं बोललं जाऊ लागले.
शाहू महाराज लहानपणापासून दुर्देवी होते. त्यांच्या जन्माच्या वर्षी औरंगजेबाने स्वराज्यावर सर्वशक्तीनिशी आक्रमण केले व छत्रपती संभाजी महाराज सात वर्षे सलग युद्धमग्न राहिले. हा कालावधी शाहू महाराजांच्या जीवनातील अत्यंत अस्थिर काळ होता. त्यांची माता महाराणी येसूबाई साहेब यांनी त्यांच्या पालनपोषणात कोणतीही कमतरता येऊ दिली नाही तरीही संभाजी महाराजांप्रमाणे शाहू महाराजांनाही पित्याचा सहवास असा मिळालाच नाही. शंभूराजे औरंगजेबाच्या हातून मारले गेले व लागलीच रायगडासारखा बुलंद किल्ला फितूरीमुळे मुघलांच्या हाती पडला. महाराणी येसूबाई साहेब यांनी धिरोदत्तपणा दाखवून राजाराम महाराज जे शंभूराजांच्या मृत्यूनंतर मंचकारोहण करते झाले होते त्यांना जिंजीला धाडले व झुल्फिकारखानासोबत करार करून स्वत: आणि छोट्या शाहूस मुघलांच्या ताब्यात दिले. औरंगजेबाने जरी मायलेकांना काही उघड उघड त्रास दिला नाही तरी शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेतच होते. त्यांना जरी कोणत्याही प्रकारचे मुस्लिम शिक्षण देण्याचा प्रयत्न केला गेला नाही तरी एका मराठा राजपुत्राला मिळणारं शिक्षणही त्यांना मिळू शकलं नाही. अशा परकीय सत्तेच्या नजरकैदेत असणाऱ्या शाहू महाराजांच्या सुटकेसाठी छत्रपती राजाराम महाराजांनी आकाश पाताळ एक केले. त्यांनी साम, दाम, दंड, भेद या सर्व नीतींचा वापर केला. राजाराम महाराजांनी केलेल्या प्रयत्नांना यश आले नाही मात्र तरीही त्यांनी अखेरपर्यंत आशा सोडली नाही. एकदा संताजी घोरपडे व त्यांच्या तुकडीने औरंगजेबाच्या तंबूपर्यंत छापा मारला मात्र शाहू महाराज त्यावेळी तेथे नव्हते.
असो अशाप्रकारे या छावणीतुन त्या छावणीत असा सुमारे अठरा वर्षे औरंगजेबाच्या सैन्यासोबत शाहू महाराजांचा प्रवास होतच राहीला. या काळात औरंगजेबाने शाहू महाराजांचे दोन विवाह करवले. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर झुल्फिकारखानाच्या सल्ल्यावरून आझमशाहने शाहू महाराजांना मुक्त केले मात्र त्यांच्या पायात काहीतरी खोडा असावा म्हणून राजमाता येसूबाई साहेब यांना मुघलांच्या ताब्यात ठेवून घेतले. लवकरच शाहू महाराज एलिचपुरास दाखल झाले व त्यांनी मराठा सरदारांना पत्रे पाठवून आपल्या बाजूने येण्याचं आवाहन केले. त्यांच्या बाजूने येणाऱ्या व्यक्तींमधे बाळाजी विश्वनाथ हा एक होता. त्याने आपली मुत्सद्दीगिरी पणाला लावून सेनापती धनाजी जाधव, सेनाखासकेल दाभाडे, सरखेल कान्होजी आंग्रे या शक्तीशाली सरदारांना शाहू महाराजांच्या बाजूला आणण्यात मोठी भूमिका बजावली. यामुळे त्याला शाहू महाराजांनी आपला दुसरा पेशवा बनवलं.
बाळाजी विश्वनाथ भट हा एक कार्यक्षम व्यवस्थापक होता. त्याने लवकरच दिल्ली दरबारी वजन असणाऱ्या सय्यद बंधूंशी जुळवून घेतलं व त्यांच्या मदतीने राजमाता येसूबाई साहेब यांना मुघलांच्या ताब्यातून परत साताऱ्यास आणलं. त्यानेच शाहू महाराज हेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे एकमेव अधिकृत वारस आहेत अशा मुघल बादशाहच्या सनदा मिळविल्या. या सनदा म्हणजे शाहू महाराजांच्या शरणागतीचे नाही तर भविष्यात मराठा साम्राज्याचे अधिकृत प्रतिक असल्याचे निदर्शक होत्या कारण कसेही असले तरी मुघल अखिल भारतीय शक्ती होते व त्यांच्या सनदांमुळे भविष्यात मराठा साम्राज्यात कोल्हापूर सातारा या दोन गादींमळे होऊ शकणारी दुही टाळता येईल अशी आशा बाळाजी विश्वनाथ व शाहू महाराज या दोघांना होती.
१७२० मधे बाळाजीचा मृत्यू झाला व शाहू महाराजांनी त्याचा कर्तबगार मुलगा बाजीराव बल्लाळ यास पेशवा बनवलं. बाजीरावाने शाहू महाराजांच्या विश्वासाचं चीज केलं व मराठा साम्राज्याचा दक्षिणेत कावेरी पासून उत्तरेत गंगा यमुनेच्या खोऱ्यापर्यंत विस्तार केला. त्याने शाहू महाराजांच्या अनेक शत्रूंचा पराभव केला. त्याच्यात व शाहू महाराजांत अनेक वादही निर्माण झाले. त्यातील प्रमुख म्हणजे शनिवार वाड्याच्या कोटाचा वाद. बाजीरावाने पुण्यात बांधलेल्या वाड्यास कोट करण्याचे ठरविले मात्र शाहू महाराजांच्या दरबारातील लोकांनी याविरोधात सल्ला दिला व शाहू महाराजांनी बाजीरावास कोट न बांधण्यास सांगितले. बाजीरावानेही कोटाचे बांधकाम थांबवलं. पुढे हा कोट शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर बाळाजी बाजीरावाने बांधून पुर्ण केला. बाजीराव पेशवा मेल्यावर शाहू महाराजांनी त्याचा १९ वर्षांचा मुलगा बाळाजी बाजीराव भट यास पेशवा बनवलं.
बाळाजी बाजीरावाने आपल्या नेतृत्वाखाली बंगाल ओरिसा मधे अनेक स्वाऱ्या केल्या. त्यातून शाहू महाराजांच्या कर्जाची परतफेड करण्याचा प्रयत्न केला. मात्र यामुळे नागपुरकर भोसले व शाहू महाराज यांच्यात मतभेद निर्माण झाले. बंगाल ओरिसा मधे स्वाऱ्यांचा अधिकार शाहू महाराजांनी रघूजी भोसले यांना दिला होता मात्र बाळाजी बाजीराव याच्या हस्तक्षेपामुळे भोसले नाराज झाले. मात्र शाहू महाराज या काळात स्वत:च्या प्रकृतीच्या व वारस नसल्याच्या काळजीने त्रस्त झाले होते यामुळे त्यांनी भोसले पेशवा वादात हस्तक्षेप केला नाही व त्याचा परिणाम म्हणून नागपूरकर भोसले हळूहळू मराठा सत्तेच्या परिघाबाहेर जाण्यात झाला. त्यांनी शाहू महाराजांच्या मृत्यूनंतर प्रथम निजाम व नंतर इंग्रजांच्या मराठा साम्राज्याच्या विरूद्ध मोहिमांत भाग घेतला.
शाहू महाराजांनी आपल्या मृत्यूपूर्वी राजमाता ताराबाई यांचे पुत्र व कोल्हापूरचे भूतपूर्व छत्रपती शिवाजी महाराज यांचे पुत्र रामराजे यांना दत्तक घेतले. या दत्तकविधानावर राजमाता ताराबाई व पेशवा बाळाजी बाजीराव यांनी पुढील काळात सातारा दरबारात बरेच राजकारण केले. दोन्ही पक्षांना छत्रपती रामराजे आपल्याच नियंत्रणात असावे असे वाटत होते. यात पुढं पेशव्याच्या पक्षाचा विजय झाला व बाळाजी बाजीरावाने मराठा साम्राज्याचा कारभार त्याला सोयिस्कर असणाऱ्या पुणे येथे नेला. शाहू महाराज मराठा साम्राज्याचे शेवटचे सर्वशक्तीशाली छत्रपती होते. त्यांच्या मृत्यूनंतर साम्राज्याचे अधिकार प्रथम पेशव्याच्या व नंतर नाना फडणवीस व महादजी शिंदे यांच्या सारख्या सरदारांच्या हाती गेले.
शाहू महाराजांचा मृत्यू १५ डिसेंबर १७४९ रोजी सातारा येथे झाला व त्यांचा अंतिम संस्कार संगम माहुली येथे करण्यात आला जेथे त्यांची समाधी आहे.
(या लेखातील काही मजकूर अथवा लेखाचा माझ्या पुर्व परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारे वापर केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.)

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...