विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 30 September 2020

दक्खन ए सुभा (प्रांत ) आणि मराठे भाग २

 

दक्खन ए सुभा (प्रांत ) आणि मराठे

भाग २
मध्ययुगात किंवा प्राचीन काळातही गाव अथवा खेडे हा सामाजिक, राजकीय व आíथक व्यवहारांचा केंद्रिबदू होता. शेती हा सर्वसामान्यांच्या जीवनाचा प्रमुख मार्ग होता. त्याचमुळे तिथल्या लोकसंख्येचे प्रमाणही आजच्या खेडय़ाच्या तुलनेत अधिक होते. या वसाहती कशा निर्माण झाल्या याचे तर्कशुद्ध उत्तर देणे काहीसे कठीण आहे. मात्र लोकांनी स्वत:हून किंवा राजाज्ञेवरून जंगले तोडून, पाणवठे पाहून खेडी वसवली असावीत असे स्थूलमानाने सांगता येते. सतराव्या शतकात या वृत्तीला राजकीय किनार लाभलेली दिसते. राजकीय फायद्यासाठी किंवा सरकारी प्रलोभनांच्या आशेने खेडय़ांची पुनर्वसाहत झालेली या काळातील अनेक उदाहरणे आढळून येतात.
खेडे हा त्या काळातील एक व्यवस्थित जुंपलेला व न कुरकुरत चालणारा गाडा होता. खेडय़ांचे नियोजन साधारणपणे दिवाणसत्ता, गोतसत्ता, धर्मसत्ता व व्यापारी सत्ता या चार अतिशय प्रबल अशा घटकांच्या माध्यमातून होत होते. राजाची, जातसंस्थांची व व्यापाऱ्यांची कारभारी मंडळी यांच्या परस्परातील प्रभावी अशा समन्वयामुळे हा गावगाडा सुरळीत सुरू होता. ही झाली बाह्य़ रचना. या रचनेखेरीज तत्कालीन समाजाची वीण सुरक्षित राखण्यासाठी गावकामगारांची वा बलुतेदारांची भूमिका अतिशय महत्त्वाची होती. अगदी नेमक्याच शब्दात सांगायचे झाले तर वतनदार, मिरासदार, बलुतेदार व उपरी यांना गावगाडय़ाची चार चाके असे मानता येते.
सरकारकडून एखाद्याला मिळालेली देणगी म्हणजे वतन व ती उपभोगणारा तो वतनदार. त्याचे पालनपोषण सारा गाव करीत असे. किंबहुना ते त्याचे हक्कच होते. या बदल्यात साऱ्या गावाचा कारभार सक्षम व कार्यक्षम करण्याची जबाबदारी त्या वतनदाराची होती. सारावसुली व गावचा विकास ही त्याची दोन प्रमुख कामे होती. या वतनसंस्थेमार्फत केंद्रीय सत्तेचे विकेंद्रीकरण साधण्यात आले होते. स्थानिक बाबींचा निकाल जेथल्या तेथे होऊन केंद्रीय सत्तेकडे जाण्यास लागणारा विलंब टाळला जावा असा या व्यवस्थेमागचा उद्देश होता. पाटील, कुलकर्णी, शेटे, महाजन, देशमुख, देशपांडे हे गावचे प्रमुख वतनदार होते. यापकी पाटील हा ग्रामसभेचा प्रमुख होता व त्याला जणू गावचा राजा असल्यासारखा मान होता.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...