विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 30 September 2020

दक्खन ए सुभा (प्रांत ) आणि मराठे भाग ३

 


दक्खन ए सुभा (प्रांत ) आणि मराठे
भाग ३
सतराव्या शतकामध्ये शिवछत्रपतींनी मराठी सत्तानिर्मितीचा डाव मांडला तेव्हा मात्र मूळ ढाच्यात बदल करण्याइतका वेळ अन् कोणत्याही प्रकारचे पाठबळ त्यांच्यापाशी निदान सुरुवातीच्या काळात तरी नव्हते. नंतरच्या काळात त्यांच्यापाशी जेव्हा आíथक, सामाजिक व राजकीय सुबत्ता आली, तेव्हा त्यांनी अतिशय कुशलतेने व दूरदृष्टीने नानाविध प्रकारच्या प्रशासकीय अन् आíथक सुधारणा घडवून आणण्याचा नि:संशयपणे प्रयत्न केला. याचमुळे शिवपूर्वकाल व शिवकाल यातील ग्रामजीवनाचे चित्र फारसा बदल न करताही रेखाटता येते. स्वये शिवछत्रपती हे राजकीय क्रांती घडवून आणण्याच्या उद्योगात निमग्न असल्यामुळे समाजसुधारकी विषयांना हात घालणे त्यांना त्यांच्या दृष्टीने हाताशी असलेल्या इतर विषयांच्या मानाने तितकेसे महत्त्वाचे वाटले नसावे.
दुसऱ्या शब्दात असेही म्हणता येईल की, परंपरागत चालत आलेल्या सामाजिक संकेतांना वा रूढीविचारांना बदलाच्या नावाखाली हादरवून सोडण्याऐवजी, त्यांच्या कार्यपद्धतीत बदल करण्याऐवजी वा त्यांना समूळ नष्ट करण्याऐवजी त्यांनी या साऱ्याचा आपल्या राष्ट्रउभारणीच्या कामामध्ये अतिशय कुशलतेने उपयोगच करून घेतला.
शिवपूर्वकालात वा शिवकालातही राज्याचे आíथक जीवन खेडय़ावरच अवलंबून होते. किंबहुना खेडे हा या आíथक स्रोतांचा मूळ झरा होता असे म्हटले तर ते वावगे ठरू नये. वर म्हटल्याप्रमाणे शेती हा प्रमुख व्यवसाय व शेतकरी हा या साऱ्याच सामाजिक व आíथक बाबींचा आस होता. खेडय़ाचे, महालाचे वा सुभ्याचे सारेच सांस्कृतिक, सामाजिक अथवा आíथक व्यवहार याच शेतकऱ्याला केंद्रिबदू मानून करण्यात येत होते. अलुतेदार व बलुतेदारांसारख्या गावगाडय़ाची चाके मानल्या जाणाऱ्या व्यक्तीही त्यांच्या योगक्षेमासाठी शेतकरी व पर्यायाने शेतीवर पूर्णतया अवलंबून होत्या. शेती व शेतकरी हे चक्र जर कुण्याही कारणाने रूंधल्यासारखे झाले, तर सगळा गावगाडाच करकरून थांबण्याची भीती केवळ स्थानिक प्रशासकांनाच नव्हे तर प्रादेशिक वा केंद्रीय राजसत्तेलाही होती. त्यामुळे काही अपवादात्मक राज्यकाल सोडले तर शेतकऱ्याची जपणूक करण्याचीच परंपरा व धोरणे साऱ्याच राजसत्तांनी राबवलेली आपल्या नजरेस पडतात. शेतकऱ्यांचा योगक्षेम म्हणजेच राज्याचा योगक्षेम ही भावना साऱ्याच राज्यकर्त्यांमध्ये दृढ होती व यासाठी सारेच वतनदार व राज्यकत्रे दक्ष होते. निजामशाहीचा वजीर मलिक अंबर याने सुरू केलेली जमीन मोजणीची व सारा आकारणीची पद्धत अगदी शिवकालातही अस्तित्वात होती ही बाब याच विचारपद्धतीचे द्योतक मानावयाला हवे.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...