विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 30 September 2020

दक्खन ए सुभा (प्रांत ) आणि मराठे भाग ४

 


दक्खन ए सुभा (प्रांत ) आणि मराठे
भाग ४
शेतीखेरीज व्यापारावरही राज्याची आíथक मदार अवलंबून होती. राज्याच्या अभिवृद्धीसाठी व्यापारी हे शेतकऱ्यांइतकेच आवश्यक आहेत ही धारणा राज्यकर्त्यांच्या मनी सतत जागी होती. यासाठी व्यापाऱ्यांना निरनिराळ्या सवलती व व्यापारी मार्गाना लाभलेले संरक्षण या बाबींवर तत्कालीन राज्यकर्त्यांचा कटाक्ष होता. याचे सर्वात लक्षवेधक उदाहरण म्हणजे इ.स. पूर्व २५० पासून सातवाहनांच्या काळात व्यापारामुळे भरभराटीला आलेली कोकणातील अनेकविध बंदरे अन् त्या व्यापाराला व व्यापारी महामार्गाना संरक्षण देण्यासाठी निर्माण झालेले सह्य़ाद्रीतील गिरिदुर्गाचे जाळे. हे सतराव्या शतकापर्यंत अव्याहतपणे सुरू होते. सतराव्या शतकातील दख्खनचा इतिहास जर ध्यानी घेतला तर उत्तम उत्पन्नाचा व राजकीयदृष्टय़ा बराचसा स्थिर समाजजीवनाचा प्रदेश म्हणूनच मध्ययुगीन महाराष्ट्राकडे पाहिले जात होते.
स्थिरतेच्या या तकलुपी कल्पनेस सतराव्या शतकाच्या मध्यंतरास शिवछत्रपतींनी छेद दिलेला आपल्याला दिसतो. याच कालखंडात कुणाला कल्पनाही करवणार नाही अशा भूप्रदेशात त्यांनी आपल्या राजकीय व लष्करी हालचालींना सुरुवात केलेली आपल्या दृष्टोत्पत्तीस येते. तेथे एक प्रश्न सहजच मनी उभा राहतो की, हे असे या पद्धतीचे काही करावे, परकीय राजवटींना आव्हान देत स्वत:चे, स्वधर्माचे राज्य उभे करावे असे त्यांच्या मनी का आले असेल? त्या कालखंडाचा विचार करता काही तुरळक उदाहरणे सोडली तर या कालखंडाचा इतिहास हा सदैव स्वत:कडे कमीपणा घेत, अपमान सहन करीत स्वत:ची वतनदारी वाचवावी याच हेतूने प्रेरित झालेला दिसतो. मग त्यासाठी स्वत:च्या स्वत्त्वाची, स्वत:च्या राष्ट्राची आहुती द्यायला लागली तरीही हरकत नाही अशा प्रकारच्या प्रवृत्तींनी व स्वार्थी विचारांनी वेढलेला दिसतो.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...