सेलुकर वाडा
देशपांडे गल्ली
अंबाजोगाई
जि बीड
पोस्टसांभार :दीपक गद्रे
श्री त्र्यंबकराव फत्तेपुरकर पेशव्यांच्या काळातील एक सरदार ,पुण्याजवळ फतेपुर( ?) येथे राहणारे ,त्यांनी पेशव्यांबरोबर बरोबर लढाईत मर्दुमकी गाजवली म्हणून पेशव्यांनी त्यांना स्वतःच्या हाताने शाल पांघरुन गौरव केला व "शालुकर " असा किताब दिला व तेव्हापासून ते शालूकर या नावाने ओळखले जाऊ लागले. त्यानंतर कांहीं वर्षांनी हे शालुकर काही कारणांनी अंबाजोगाईत आले व तेथेच स्थायिक झाले. अंबाजोगाईत त्यांनी हा वाडा बांधला
पुढे शालूकरांचा अपभ्रंश सेलूकर असा झाला व या वाड्याला सेलूकर वाडा असे नाव मिळाले .
या वाड्यात सध्या त्यांचे वंशज राहतात व 14 घरांमधुन विस्तार आहे,1990 पर्यंत या वाड्यात सव्वाशे ते दीडशे लोकांची वर्दळ असे परंतु आता कोणी नोकरीनिमित्त कामधंदा निमित्त बाहेरगावी गेले तिथेच स्थायिक झाले. या घडीला 25 ते 30 लोक येथे वास्तव्यास आहेत परंतु हा वाडा अजूनही त्याच दिमाखात उभा आहे
येथें वाड्यात वाडा असाच काहीसा प्रकार आहे बाहेरचे मोठे द्वार ज्यावर सेलूकर वाडा असे लिहिले आहे ,तेथून आत गेल्यानंतर एक अंगण आहे व त्याच्या पुढे दुसरे मोठे दार आहे तिथून दुसरा वाडा सुरु होतो बाहेरच्या अंगणात काही घर आहेत, लादण्या आहेत व आत मध्ये सर्व जुन्या बांधकामाची घरं असुन अजूनही लोक तेथे राहत आहेत . येथे एक आड आहे ज्याचे पाणी सर्व वाड्याला पुरते यावर प्रत्येकाने आपापल्या मोटारी लावल्या आहेत.मागे परस असुन परसातील मागची भिंत जवळपास 40 फूट उंचीची आहे व समोरच्या मुख्य दाराची सुद्धा भिंत जवळपास 40 फूट आहे असा हा किल्लेवजा वाडा आज तीनशे वर्षानंतर सुद्धा उभा आहे व चांगल्यापैकी नांदता आहे अर्थातच कालमानाप्रमाणे काही पडझड होत असते .
या वाड्याचे दोन्ही दरवाजे अजुनही रात्री बंद होतात. बाहेरचा दरवाजा तर बंद करण्यासाठी दोन माणसे लागतात व आगळ सुद्धा तेवढाच जड आहे पण अजूनही एवढे मोठे दार रोज रात्री बंद होते
फोटो व माहिती
डॉक्टर सोमेश्वर शामराव सेलूकर, अंबाजोगाई
श्री रामेश्वर श्यामराव सेलुकर ,अंबाजोगाई
ज्योती जयंतराव आळंदकर लातूर
(पुर्वाश्रमीची हेमा देशपांडे हिवरेकर)
No comments:
Post a Comment