विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 26 October 2020

आबाजी कृष्ण शेलूकर - पेशवाईंतील एक सरदार.

 


आबाजी कृष्ण शेलूकर
- पेशवाईंतील एक सरदार. सातारा जिल्ह्यांत कोरेगांव तालुक्यांत फत्यापूर म्हणून एक गांव आहे तेथचा हा कुलकर्णी. हा घरचा फार दरिद्री होता परंतु मोठा हुशार काराकून होता. वतनदारांच्या सवयींप्रमाणें हाल सोशीत हा तसाच पुष्कळ दिवस घरीं होता; परंतु शेवटीं कटाळून ह्याने घर सोडलें आणि पुण्यास गेला. तेथे पुष्कळ खटपटी करून ह्यानें फडांत कारकुनीची जागा मिळविली. ह्याचे अक्षर फार उत्तम होतें व लिहिण्याची शैली इतकी उत्कृष्ट होती कीं; जेंव्हां जेव्हां हा आपलें लिखाण घेऊन नाना फडणिसासमोर जाई तेव्हां तेव्हां तें पाहून नाना फार संतुष्ट होत. पुढें नानांनी आपल्या खाजगी कारकून मंडळीत त्याची नेमणूक केली. तेव्हां तर नानांची त्यावर फार मर्जी बसली. पुढें खुद्द नानांनी आपला कागदपत्रांचा रुमालहि नानांनी त्याच्या तांब्यांत ठेविला. नानांची जीं अति विश्वासू माणसें होतीं त्यांत आबा शेलूकर (शालूकर) व गोविंदराव पिंगळे हे मुख्य होते. नानाच्या कृपेनें पुढें ह्याला गुजराथची सुभेदारी मिळाली होती.
बाजीरावास पेशवाईचीं वस्त्रें आणण्यास आबा शेलूकर साता-यास गेले होते. त्यास या कामीं ३४८१ रुपये खर्च लागला ( दु. बाजीराव-रोजनिशी पा. १९ ). दुसरा बाजीराव गादीवर आल्यानंतर त्यानें आपल्या दहा वर्षांच्या भावाला ( चिमाजीआप्पाला ) गुजराथचा सुभेदार करून आबा शेलूकरास दुय्यम सुभेदार नेमिलें. पण नाना फडणिसाला शिंद्यानें कैदेंत टाकिलें तेव्हां आबाचीहि तीच वाट केली. दहा लाख रुपये देण्याच्या कबुलीवर त्याची सुटका झाली तेव्हां तो सुभेदारीच्या कामावर रुजू झाला. शेलूकर नानांच्या पक्षाचा असल्यानें बाजीरावानें गोविंदराव गायकवाडाला त्याच्या विरुद्ध उठविलें. शिंद्याची १० लाख खंडणी आबाला निकडीनें द्यावयाची होती तेव्हां त्याने गुजराथेंत मोठा जुलूम करून जादा वसूल केला व कांहीं गायकवाडी गावांपासूनहि कर जमा केला. तेव्हां गोविंदराव व आबा शेलूकर यांमध्यें लढा सुरू झाला. गायकवाडानें इंग्रजांनां वश करून घेऊन आबा शेलूकराला कैद केला व अमदाबाद तालुक्यांतील पेशव्यांचीं ठाणीं आपल्या ताब्यांत घेतलीं. तेव्हां पुणें दरबारनें तडजोड करून आबा शेलूकरास हुजूरकडे धाडून देण्यास गायकवाडास लिहिलें ( दु. बाजीराव-रोजनिशी पा. ७८ ). शेलूकर कधीं वारला हें कळत नाहीं; पण इ. स. १८१३-१४ त तो ह्यात होता; कारण त्या सालीं त्याला इतर सरदारांबरोबर निशाणास किनखाप दिल्याचा उल्लेख रोजनिशींत सांपडतो ( दु. बाजीराव रो. पा. २७७ ). पुण्यास शालूकराचा बोळ प्रसिद्ध आहे. [ भारतवर्ष पु. २, अं. ५ दु. बाजीराव रोजनिशी. ग्रँटडफ. मुं. ग़ॅ. पु. १, भा. १ ऐ. ले. सं. ]

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...