विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 31 October 2020

इतिहासप्रसिद्ध भातवडी लढाई आणि मालोजीराजे भोसले यांचे पुत्र शहाजीराजे यांचे धाकटे बंधू शरीफजीराजे भोसले


 इतिहासप्रसिद्ध भातवडी लढाई आणि मालोजीराजे भोसले यांचे पुत्र शहाजीराजे यांचे धाकटे बंधू शरीफजीराजे भोसले

पोस्टसांभार :राज जाधव

साधारणपणे ऑक्टोबर १६२४ मध्ये अहमदनगर जवळ भातवडी या ठिकाणी मोगल आणि आदिलशाही यांच्या संयुक्त फौजा आणि निजामशाहीचा वजीर मलिक अंबर याच्या सैन्यात झालेल्या युद्धात शरीफजीराजे भोसले हे लढताना कामी आले. याप्रसंगी आपण भातवडीच्या युद्धाची पार्श्वभूमी आणि भातवडी युद्ध याची थोडक्यात माहीती घेणे प्रसंगोदत्त होईल..
जहागिर बादशहाचा दक्षिणेकडील प्रदेश जिंकावेत आणि तेथील शाह्या आपण अंकित कराव्यात हा बेत होता. आदिलशाह आणि कुतुबशहा मोगलांना खंडणी व प्रसंगी मदत करत असत त्यामुळे दक्षिणेत मोगलांचा जास्त धोका हा निजामशहास होता. १६२३ मध्ये आदिलशाहने निजामशाहीचा वजीर मलिक अंबर विरुद्ध मोगलांना लष्करी मदत केली होती, सरलष्कर मुल्ला महमद यास ५००० निवडक स्वारानीशी बऱ्हाणपूर येथे मोगलांच्या मदतीस पाठवले होते. मलिक अंबर यामुळे संतापला आणि कुतुबशहाशी मैत्रीचा करार केला आणि आदिलशाहीवर आक्रमण करून बेदरचा प्रदेश जिंकून घेतला आणि विजापूरवर चालून गेला. मलिक अंबरने विजापूरास वेढा दिल्याचे समजतास आदिलशाही सरदार मुल्ला महमद व मोगल सरदार सरलष्कर खान विजापूरच्या दिशेने निघाले, ही बातमी समजतास मलिक अंबरने विजापूरचा वेढा उठवला व त्वरित आपल्या सैन्यानिशी अहमदनगरच्या दिशेने निघाला. त्याचवेळी मोगल-आदिलशाही या संयुक्त फौजेची आणि मलिक अंबरच्या सैन्याची गाठ भातवडी येथे पडली आणि युद्धास तोंड फुटले. या युद्धात महाबली शहाजी महाराज, शरीफजीराजे भोसले तसेच इतर मराठा सरदारांनी आपल्या पराक्रम आणि शौर्याच्या बळावर निजामशाहकडे विजयाश्री खेचून आणला..
भातवडीच्या युद्धात मोगल, आदिलशाही तसेच निजामशाहीच्या फौजेत कोणतेकोणते सरदार लढत होते त्यांची नावे तसेच युद्धाचे अतिशय अचूक आणि रसाळ वर्णन हे शिवभारत या समकालीन साधनात आलेले आहे. लेखनसीमे अभावी या युद्धात महाबली शहाजी महाराज आणि शरीफजीराजे भोसले यांनी गाजवलेल्या पराक्रम यांचे वर्णन अतिशय थोड्या शब्दात देणे योग्य राहील. शिवभारतकार नमूद करतात " नंतर शहाजी व शरीफजी, महाबलवान खेळोजी, सिद्दी, त्याचप्रमाणे हंबीररावप्रभूति इतर पराक्रमी वीर यांनी हातात बाण, चक्रे, तरवारी, भाले, पट्टे, घेऊन मोगलांच्या अफाट सैन्याची खूप कत्तल उडवली. तेंव्हा ते भयभीत होऊन जीव वाचवण्यासाठी दाही दिशा पळू लागले. ती मोगलांची सेना पसार झालेली पाहून इब्राहिम आदिलशहाच्या सैन्यासही पळता भुई थोडी झाली. "
ही धांदल सुरू असतानाच मनचेहर नावाचा मोगल सरदार त्या सैरावैरा पळणाऱ्या सैन्याच्या पिछाडीचे रक्षण करू लागला. मनचेहर यास पाहून महाबली शहाजी महाराज, शरीफजीराजे इत्यादी सर्व भोसल्यांनी पुन्हा शत्रूची कापाकापी सुरू केली. युद्धात शरीफजीराजे भोसले यांनी भाल्याच्या फेकीने हत्तीदळावर हल्ला चढवला होता, याप्रसंगी शत्रूच्या बाणाच्या हल्ल्याने शरीफजीराजे भोसले धारातीर्थी पडले. आपला धाकटा भाऊ शरीफजीराजे धारातीर्थी पडलेले पाहून महाबली शहाजी महाराज मनचेहर व त्याच्या सैन्यावर वेगाने चालून गेले. महाबली शहाजी महाराज यांच्या भीतीने मनचेहर हा मोगल हत्तीदळासह पळून जाऊ लागला, तेंव्हा शहाजीराजे यांनी पळणाऱ्या शत्रूंचा पाठलाग केला आणि मनचेहरसहित अनेक लोकांना कैद केले..
भातवडीच्या युद्धात महाबली शहाजी महाराजांचे धाकटे बंधू शरीफजीराजे भोसले कामी आले. शरीफजीराजे भोसले यांची समाधी स्थान शोधून त्या समाधीच्या जीर्णोद्धाराचे काम दुर्गमहर्षी, इतिहास संशोधक दिवंगत प्रमोद (भाऊ) मांडे सरांनी शिवप्रेमी आणि गावकऱ्यांच्या मदतीने केले. प्रमोद मांडे सरांचे हे उपकार इतिहासप्रेमी कधीही विसरणार नाहीत..
महापराक्रमी शरीफजीराजे भोसले यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन..
- राज जाधव

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...