माधवराव पेशवे-
बाळाजी बाजीरावांस विश्वासराव, माधवराव,व नारायणराव असे तीन पुत्र होते. विश्वासराव हा पानिपतच्या तिसऱ्या युद्धात पडल्यामुळें माधवरावास पेशवाईची वस्त्रे मिळाली. त्या वेळी माधवरावाचें वय अवघे सोळा वर्षांचे असल्यामुळे त्याचा चुलता रघुनाथराव हा कारभार पाहू लागला. वास्तविकपणे माधवराव हा जरी अल्पवयीन होता, तरी तो बुद्धिमान असल्यामुळे त्याने पेशवाईतील घडामोडी मोठया सूक्ष्म रितीने अवलोकन केल्या होत्या.
पानिपत येथे मराठयांचा पुष्कळ नाश होऊन नंतर थोडक्याच अवधीत नानासाहेब मरण पावले, तेव्हा ही संधी मराठ्यांवर स्वारी करण्यास उत्कृष्ट आहे असे पाहून निजामाने लढाई सुरू केली. त्यावेळी राघोबा प्रमुख असल्यामुळे सेनापती राघोबाने राक्षसभुवन येथे निजामाच्या सैन्यास गाठून लढाई दिली. त्यात राघोबाचा पराभव व्हावयाचा परंतु ऐनवेळी माधवरावानें आपल्या तुकडीनिशी निजामाच्या सैन्यावर हल्ला करून जय मिळविला. त्या मुळे निजामाचा उद्देश सिद्धीस न जाऊन त्यास पेशव्यांशी तह करावा लागला. परंतु पुढे राघोबा व माधवराव यांच्यांत वैमनस्य आले, ती संधी साधून निजामाने मराठ्यांकडील बराच मुलूख परत घेतला.
पानिपत येथे मराठ्यांस आलेले अपयश धुवून कढण्याची माधवरावांस फार इच्छा होती. पण इ.स. १७६८ पर्यंत राज्यकारभाराची सूत्रे राघोबा याजकडे असल्यामुळे माधवरावांस विशेष काही करिता आले नाही. तदनंतर राघोबास ठिकाणी बसविल्यावर रामचंद्र गणेश व विसाजी कृष्ण यांजबरोबर ५०,००० फौज देऊन माधवरावाने त्यांची उत्तर हिंदुस्थानांत रवानगी केली. तिकडे शिंदे, होळकरांचे सैन्य त्यास मिळाले.
मग त्या सर्वांनी मिळून रजपूत व जाट या लोकांकडून राहिलेली खंडणी वसूल केली व पानिपतमध्यें रोहिल्यांनी त्रास दिल्याबद्दल त्यांचा मुलूख लुटून रोहिलखंडातून पुष्कळशी लूट आणली.
माधवरावाच्या वेळच्या किरकोळ संस्मरणीय गोष्टी-
इ.स. १७६५ मध्ये मल्हारराव होळकर मरण पावले. तेव्हा त्यांची सून अहिल्याबाई होळकर ह्या जहागिरीची व्यवस्था पाहू लागल्या. त्यांचा कारभार प्रजेस अत्यंत सुखदायक झाल्यामुळे त्यांचे नाव उत्तर हिंदुस्थानात सर्वांच्या तोंडी होते.
दुसरी गोष्ट म्हणजे महादजी शिंद्यांची दौलतीवर नेमणूक होणे ही गोष्ट होय.
तिसरी संस्मरणीय गोष्ट म्हणजे साडेतीन शहाण्यांची प्रसिद्धी. निजामाचा दिवाण विठ्ठल सुंदर, भोसल्यांचा दिवाण जिवाजीपंत चोरघडे, व पेशव्यांकडील मुत्सद्दी सखाराम बापू हे त्या वेळी तीन शहाणे असे समजले जात. तर नाना फडणवीस हा, लढाया न खेळणारा, म्हणून अर्धा शहाणा मानला जाई. जिवा, सखा, विठा, नाना अशी संक्षिप्त रूपे वापरली जात.
©maratha_riyasat
No comments:
Post a Comment