विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 10 November 2020

छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशवृत्त

 छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तुत्व,त्यांनी केलेले पराक्रम, त्यांनी मिळविलेली लौकिकता पाहता अशा वीर महापुरूषाचे


वंशवृत्त पाहणे आवश्यक ठरेल.


छत्रपतींच्या भोसले घराण्याच्या वंशवृत्ताचा विचार करता उपलब्ध असलेल्या निरनिराळ्या वंशावळी पाहणे महत्वाचे ठरते.

उदेपूरच्या सिसोदिया घराण्यातून भोसल्यांची उत्पत्ती झाली यावर अनेकांचे एकमत आहे. तर उपलब्ध असलेल्या सर्वच वंशावळींमध्ये सुरूवातीला लक्ष्मणसिंह, अजयसिंह, दिलीपसिंह अशा सुरूवातीच्या पुरूषांच्या नावात साम्यता आढळते.

परंतु बाबाजी भोसल्यांच्या पुर्वीच्या पुरूषांच्या नावांत भिन्नता आहे. तेथुन पुढे मात्र एकवाक्यता आहे.

या ठिकाणी आपण शिवछत्रपतींच्या पुर्वंजाच्या माहितीचे काही संदर्भ बघुयात.

भोसले वंशाच्या पूर्ववृत्ताबाबतीत सभासदाने त्याच्या सभासद बखरीमध्ये शहाजी महाराज हे सिसोदिया वंशाचे असे नामनिर्देशित केले आहे. सभासदाने दक्षिणेतील आणि उत्तरेतील विद्वानांना व रजपूतांना हे मान्य होते, असे स्पष्ट करतांना मिर्झाराजे जयसिंग याच्या तोंडी पुढील वाक्य घातले आहे.

“ तुम्ही सिसोदे रजपूत आम्ही तुम्ही एकाचे एक आहोत. ”

यावरून भोसल्यांचे रजपूतत्व म्हणजे क्षत्रियत्व , शिसोदिया वंशत्व हे त्याकाळी म्हणजे शहाजींच्या काळी दक्षिणेतील व उत्तरेतील विद्वानांना व रजपूताना मान्य होते,

(सभासद बखर)

शहाजीचे उपनाव भोसले, वंश शिसोदे, वर्ण-क्षत्रिय उर्फ राजपूत, गोत्र - कुशिक, मुळ पुरुष वलिपास(दिलीपसिंह), (हा शब्द अवनी पार्श्व अपभ्रंश - अर्थ पृथ्वी पतीत श्रेष्ठ राजेश्वर) अशी ग्वाही शहाजीचा समकालीन कवी जयराम पिंड्ये देतो.

(राधामाधवविलासपंचू-जयराम पिंड्ये)

कवी भूषण भोसले वंशासंबंधाने म्हणतो की,

“सूर्यवंशी रूपी मुकूट या भरतभूमीस शोभतो ,याच वंशात कंसमर्दन करणाच्या प्रभुचा अंश निरनिराळ्या रूपाने पुन्हा पुन्हा अवतरीत होतो. 'सिसौदिया' नायक क्षत्रीय सर्व क्षत्रीयात श्रेष्ठ आहे. त्या वंशात एक महापराक्रमी राजा झाला . त्याने ईश्वरचरणी मस्तक वाहिले होते. म्हणून तो सिसौदिया झाला. त्या कुळात मालोजी नावाचा मोठा राजा झाला." (संदर्भ- शिवराज भूषण)

खुद्द शहाजी राजांच्या एका पत्रात "आम्ही रजपुत लोक आहो" असा उल्लेख आहे. (शिवकालिन पत्रसार संग्रह- ७१०)

याबरोबरच सभासदाने बखरीत म्हटले आहे की,

"राजियांच्या वंशाचा शोध करिता राजे शुध्द क्षत्रिय,शिसोदे,उत्तरेकडुन दक्षिणेत एक घराणे आले तेच राजियाचे घराणे असे शोधिले"

भोसले हे ९६ कुळीचे मराठेच आहेत यात काही शंका नाही. तरीही राज्याभिषेकाच्या वेळेस भोसल्यांच्या मूळ घराण्याची खात्री करण्यात आली.

©maratha_riyasat 

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...