विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 27 December 2020

इतिहास


 इतिहास म्हणजे अनेक भूतकाळातील मनुष्यांच्या कृत्यांची, घटनांची नोंद व ज्ञान होय. इतिहास म्हणजे काही निराळी गोष्ट नाही. राष्ट्रांत पराक्रमी किंवा दुष्ट मनुष्य निर्माण होतात. त्यांच्या मानवी कृतींनी राष्ट्राचा इतिहास बनतो.‌

राष्ट्राचा उदय काळ आला म्हणजे पराक्रमी, तेजस्वी आणि विशेषतः नीतिमान मनुष्ये उत्पन्न होतात. तोच राष्ट्राच्या अवनीतीचा काळ आला म्हणजे पराक्रम आणि विशेषतः नितीमत्ता नसलेली माणसे राजकारणात वावरू लागतात. महाराष्ट्राच्या इतिहासाकडे पाहिले असता या विधानाची सत्यता दिसून येते.
इसवी सन १६३० मध्ये पुण्यश्लोक थोरल्या स्वामींचा जन्म झाला. तेव्हापासून महाराष्ट्र उदय पावू लागले. त्यावेळची माणसे कितीतरी नीग्रहाची, स्वार्थत्यागाची, न्यायप्रिय आणि धर्मपरायण होती. त्यांचे नाव उच्चारल्या बरोबर त्यांचे चरित्र आपल्या डोळ्यासमोर उभे राहते. आणि आपल्या राष्ट्रात आपल्या राज्यात अशी माणसे निर्माण झाली होती हे पाहून अभिमान, आनंद व पुढील काळात झालेल्या राष्ट्राच्या पतनामुळे खेदाने अंतकरण भरून जाते.
पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज सर्व व्यक्तींमध्ये शिरोमणी होतेच परंतु त्यांच्या समकालीन इतर माणसेही अलौकिक तेजाची व नीतीची होती. छत्रपती शिवाजी महाराजांची माताच डोळ्यांपुढे आणली तरी निश्चय, अभिमान, करारीपणा, शहाणपणा, स्वराष्ट्रप्रेम, धर्मपरायणतेची मूर्ती आपल्यापुढे उभी राहते. श्री विष्णूंनी अवतार घेतल्याबरोबर इतर देवता ही निरनिराळ्या योनीत अवतार घेतात असे धर्मग्रंथांत वर्णन आहे ते अक्षरशः खरे वाटते. महान विभूतींच्या समकालीनच इतर दिव्य विभूती निर्माण होतात. आणि परमेश्वराचे ईप्सित हेतू सिद्धीस नेतात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या बरोबरच अनेक लोकोत्तर माणसे महाराष्ट्रात निर्माण झाली व त्यावेळी सर्व जातीत आणि स्त्री-पुरुषांत तेजस्वी व नीतीमान वीर निपजले हे आश्चर्यकारक नव्हे काय?
शिलेदारांत तानाजी, येसाजी, हंबीरराव मोहिते, नेताजी पालकर, प्रतापराव गुजर, बाजीप्रभू, स्त्रियांत जिजाबाई, सईबाई, येसूबाई, ताराबाई, कारभारी मंडळीत रामचंद्रपंत, प्रल्हाद निराजी, गागाभट्ट कित्येक साधूवर्य, इत्यादी अगणित-ज्ञात-अज्ञात महान निरनिराळ्या व्यक्ती त्या वेळेस निर्माण झाल्या आणि त्यांनी महाराष्ट्राच्या स्वराज्याचा पाया मजबूत व खोल घातला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्युनंतर म्हणजे १६८० पासून पुढे कित्येक वर्ष हिंदुस्थानचा सार्वभौम कपटशत्रु असलेल्या औरंगजेबाने मराठ्यांच्या स्वराज्याची ही इमारत ढासळून पाडण्याचा जिवापाड प्रयत्न केला परंतु तो सिद्धीस गेला नाही. शिवपुत्र शंभूराजांनी या औरंग्यारुपी यवनी आक्रमणाला यशस्वीरीत्या तोंड दिले. या काळातही लोकोत्तर पुरुष निर्माण होऊन त्यांनी स्वराज्याचे रक्षण केले. राजाराम महाराजांस धनाजी, संताजी, प्रल्हाद निराजी, रामचंद्रपंत, इत्यादी स्वदेशाभिमानी मुत्सद्दी व वीर पुरुषांचे पाठबळ मिळाल्याने सत्तावीस वर्षांची आपत्ती महाराष्ट्राने स्वराज्यात पराक्रमाने आणि हिमतीने काढली. अर्थात औरंगजेबाच्या साम्राज्याच्या प्रचंड लाटेने मराठी साम्राज्याच्या इमारतीचा पायाही ढासळला नाही.
इसवी सन १७०७ मध्ये औरंग्या मरण पावला आणि महाराष्ट्राचा ग्रीष्मकाळ म्हणजेच मराठ्यांचे स्वातंत्र्ययुद्ध संपले. औरंगजेबाच्या प्रखर आगीतून महाराष्ट्र स्वराज्याचा वृक्ष तगून राहिला तो पुढे इतका फोफावला की त्याच्या जोरदार शाखा सर्व हिंदुस्तानभर पसरल्या. यावेळेसही राष्ट्रात नवीन माणसे उदयास आली व त्यांनी आपल्या पराक्रमाने शहापणाने व कर्तुत्वाने महाराष्ट्राचा अंमल सर्व हिंदुस्थानभर बसविला.
संकेत पगार,
१६ डिसेंबर २०२०

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...