विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 30 January 2021

रामाजी पांगेरा यांच्या पराक्रमाचा साक्षिदार , 'कण्हेरगड ' ......

 










रामाजी पांगेरा यांच्या पराक्रमाचा साक्षिदार , 'कण्हेरगड ' ......
( गड- किल्ले : २०२१/०३)
पोस्ट सांभार ::Santosh Chavan
दि ०९ जानेवारी १६७१ रोजी औरंगजेबाने हुकूम काढला" दख्खनमध्ये उतारा आणि मराठयांनी काबीज केलेला शाही मुलुख परत जिंकून या", त्या नुसार बहादूर खान दिलेरखान, अमरसिंह चांद्रवत दक्षिणेत उतरले . दिलेरखान सुमारे तीस हजार पठाणी फौज घेऊन बऱ्हाणपुराहून निघाला आणि १६७१ ऑक्टोबर च्या दरम्यान नाशिक जिल्ह्यात घुसला . येथील किल्ले मराठ्यांनी कब्जात घेतलेले होते. त्यातीलच कण्हेरगड या नावाचा डोंगरी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात होता. दिलेरखानाने मोगल सैन्यासह या किल्ल्यावर हल्ला केला होता. दिलेर हा अत्यंतकडवा आणि हट्टी असा सरदार होता.
त्या वेळी कण्हेरगडाचे किल्लेदार रामाजी पांगेरा हे होते.
हा रामाजी विलक्षण शूर होता. प्रतापगडच्या युद्धात अफझलखानच्या सैन्याविरुद्ध जावळीच्या जंगलात या वाघाने भयंकर थैमान घातले होते ,त्याने पराक्रमाची शर्थ केली होती. गडावर सुमारे सातशे मावळे होते , गडाला मोगल सैन्याने वेढा घातला होता. या वेढ्यावर अचानक हल्ला चढवण्याची व्यूहरचना किल्लेदार रामाजी पांगेरा यांनी आखली. मदतीची वाट पाहणे शक्य होते पण मदत वेढा भेदून आत येणे अशक्य होते. मोगल सैन्य संख्येने फार जास्त होते. या शिवाय किल्ला फार उंच नव्हता. त्यामुळे मोगल सैन्याचा वेढा पूर्ण होण्याच्या आत वेढा तोडणे आणि सैन्य उधळणे हा ही हेतू त्यात होता.दिलेरखान मोठ्या फौजेनिशी चालून येतोय हे त्या चिमुकल्या मराठी तुकडीला समजलेच होते. पहाटेच्या अंधारात रामाजी पांगेरा यांच्या नेतृत्वाखाली मावळ्यांनी मोगलांच्या भल्यामोठ्या सैन्यावर हल्ला केला. रामाजी आपल्या लोकांच्या पुढे उभा राहिला आणि मोठ्या आवेशात तो गरजला , ' निदान करावयाचे , आपले सोबती असतील ते उभे राहणे ',‘ मर्दांनो , खानाशी झुंजायचंय , जे योद्धे असतील ते येतील. मर्दांनो , लढाल त्याला सोन्याची कडी , पळाल त्याला चोळी बांगडी ‘ असे बोलून रामाजीने आपल्या अंगावरचा अंगरखा काढून फाडून फेकला. डोईचे मुंडासेही फेकले. अन् दोन्ही हातात हत्यारे घेऊन त्याने उघडाबोडका ,शिरोवस्त्र न घालता , एकच हरहर केला. साक्षात जणू भवानीच संचरली. अवघ्या मराठी सैन्यानेही तसेच केले. मूतिर्मंत वीरश्रीने कल्लोळ मांडला. उघडे बोडके होऊन मराठी सैन्य थयथयाट करू लागले.वणव्यासारखे युद्ध पेटले. तलवारबाजीने दिलेरखान थक्कच झाला. दिलेरखानास पुन्हा एकदा पुरंदरगड अन् मुरारबाजी देशपांडा आठवला असेल.
यावेळी फक्त ७०० मावळे रामाजींसोबत होते. अचानक पडलेल्या छाप्याने मोगल सैन्य गोंधळले. सातशे मावळ्यांनी बाराशेच्यावर मोगल कापून काढले. पण तरीही संख्याबळाच्या जोरावर दिलेरखानाने पळणारे मोगल सैन्य थांबवले. मराठ्यांनी पराक्रमाची शिकस्त केली. संख्येने कमी असूनही मराठे मागे हटले नाही. सुमारे तीन तास कण्हेरगडाच्या परिसरात हे रणकंदन सुरू होते. रामाजी आणि त्याच्या मराठ्यांनी शौर्याची कमाल केला. प्रतिहल्ला झाल्यावर कोणतीही कुमक शिल्लक नसल्याने मावळ्यांनी स्वराज्यासाठी प्राण दिले. सभासदाची बखरीत या लढाईविषयी लिहून ठेवलेले आहे, की " एक प्रहर ( तीन तास) टिपरी जैसी सिमगीयाची दणाणते तैसे मराठे कडाडले.' सिमगीयाची म्हणजे शिमगा या सणात जशी टिपरी हलगीवर वारंवार कडाडते तसे मावळे तुटून पडले होते.
अशा प्रकारे रामाजी पांगेरा व सातशे मावळ्यांच्या पराक्रमाचा साक्षिदार असलेला कण्हेरगड आजही अवशेष घेऊन ताट मानेने उभा आहे.
६६० मीटर उंच अशा गडावर पोहचल्यावर खडकात खोदलेला बुरुज दिसतो. येथून थोडे पुढे गेल्यावर एक नेढं आहे. नेढ्याच्या समोरून जाणारी वाट थेट गडमाथ्यावर घेऊन जाते.गडमाथा बराच प्रशस्त आहे. संपूर्ण गडमाथा फिरण्यास १ तास लागतो. धोडप किल्ल्याच्या समोर तोंड येईल अशी गुहा एका कड्यात खोदलेली आहे.
सहा-सात पाण्याची टाके, तुळशी वृंदावन, शिव पिंड आणि नंदी सह गडावर वाड्यांचे काही अवशेष आढळतात. गडाचे दुसरे टोक हे धोडपच्या माची सारखेच आहे. गडावरून पश्चिमेला सप्तश्रुंगी, मार्कंड्या, रवळ्या जवळ्या, धोडप कंचना, हंड्या , ईखारा ,इंद्राई, चांदवड किल्ले अशी संपूर्ण सातमाळ दिसते. अवश्य पहावा असा कण्हेरगड, जेथील मातीला अजूनही स्वराज्याच्या रक्षणासाठी वाहिलेल्या रक्ताचा सुगंध आहे.
.

No comments:

Post a Comment

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...