विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 30 March 2021

( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी ) भाग 7

 व्हडले राजीक’ – गोव्याची ‘थोरली स्वारी’


( संभाजी महाराजांनी फिरंगाणावर केलेली स्वारी )
भाग 7
फोंड्याच्या वेढयात येसाजी आणि कृष्णाजी कंक यांनी पराक्रमाची शर्थ केली. दोघांना ब-याच जखमा झाल्या होत्या. संभाजी महाराजांनी दोघांना घरी मावळात जाण्याची आज्ञा दिली. घरी परतल्यानंतर कृष्णाजी कंक यांचा जखमा फुटून मृत्यू झाला. त्यांच्या पराक्रमाबद्दल संभाजी महाराजांनी कृष्णाजीस बक्षिसाची मोईन करून दिली अशी – ” पत्रवतन कृष्णाजी कंक पडती नायेक राज्यामंडळ शके १२ क्रोधन नाम संवत्सर आषाढ शु २. फोंडीयाच्या कोटात फिरंगीयांनी लगट केला (,) राजश्री स्वामी राजापुरीहून फोंडीयास गेले (,) गानिमासी गाठी घालून झुंज बहुत केले (,) ते वक्ती दोघांना जखमा लागून चकचूर झाले (,) स्वामिनी घरी जावयाची आज्ञा केली (,) जखमा फुटोन कृष्णाजी मयत झाले ” सदर मोईन पत्र मोठे असून आशयास्तव हे पत्र संक्षिप्त स्वरुपात दिले आहे (शि.च.सा.ले-३९९)
विजरई कोंदि द आल्व्होर याने फोंड्यावर स्वारी का केली हे त्याने पोर्तुगीज राजाला लिहून पाठवलेल्या पत्राद्वारे समजते.
त्यात तो पुढील प्रमाणे कारणे देतो –
१) शत्रूस चौलचा वेढा उठविण्यास भाग पाडणे.
२) पोर्तुगीज अमलातील गोवा-साष्ट-बार्देश यांचे रक्षण करणे.
३) संभाजीच्या जुलमामुळे कोकणातील जनतेस आपणावर पोर्तुगीजांची सत्ता असावी असे वाटते, म्हणून त्या प्रदेशाला आपल्या अंमलाखाली आणण्याकरिता प्रयत्न.
४) कोकणाचे उत्पन्न मोठे असल्यामुळे तो प्रदेश ताब्यात घेणे.
५) मोगलांनी दक्षिण कोकण घेण्यापूर्वी ते पोर्तुगीझांनी हस्तगत करणे. (पो.म.सं-९८)
मनुचीने तर विजरई कोंदि द आल्व्होर याचे फोंड्यावर स्वारी करण्याचे कारणच वेगळे दिले आहे तो म्हणतो – ” त्याने (संभाजीने) पढवून पाठवलेले हेर गोव्याच्या विजरई कडे आले. मराठी राज्यातील फोंडा हा किल्ला गोव्याहून अगदी जवळ आहे. त्या किल्ल्यात खजिना भक्कम आहे. तो किल्ला तुम्ही घेतलात तर मुबलक खजिना तुमच्या हाती पडण्याची शक्यता आहे. अशी बातमी संभाजीने पढवून ठेवलेल्या हेरांकडून विजरई कोंदि द आल्व्होर यास समजली ” (अ.हो.मो-२१३). सदर माहिती विश्वसनीय वाटत नाही.
जेधे शकावली प्रमाणे – “रुधिरोदागरी संवत्सरे कार्तिक व ७ शके १६०५ संभाजी राजे बांदयास गेले. गाविकार फिरंगी यांनी कोतास वेढा घातला होता त्यासी लढाई करून तो वेढा उठविला तेथे येसाजी कंक आणि कृष्णाजी कंक यांनी युद्धाची शर्थ केली”
तसेच फोंडा किल्ल्यात पीर अब्दुल्लाखान याचे देवस्थान आहे. किल्ल्यातील मराठा सरदारांनी त्यास नवस केला होता, जो त्यांनी नंतर संभाजी महाराजांकरवी फेडून देखील घेतला. संभाजी महाराजांनी पीर अब्दुल्लाखान या देवस्थानास बक्षिसाची मोईन दिली. संभाजी महाराजांचा प्रिय कवि कलश याने फोंड्यास पाठवलेले पत्र उपलब्ध आहे त्यात तो लिहितो – ” हजरत पीर अब्दुल्लाखान कोट फोंडा, बहुत जागृत स्थळ. फिरंगीयांनी गानिमाई करून कोटास वेढा घातला, कोट बहुत जर केला तेव्हा कोटाचा हवालदार, सरनोबत, सबनीस, लोको प्रार्थना केली, गनिमाचा पराभव करणे. छत्रपती स्वामी विनंती करून ‘उर्जा चाले सारखी पोख्ती सरंजाम करून घेऊन’ राजश्री स्वामीची फत्तेबाजी होऊ देणे. स्वामीची स्वारी कोट मजकुरी होऊन फिरंगी गनीम मारून काढिले. स्वामी आले. फत्ते झाली. ऐसी पिराची करामात म्हणून धर्मदाय देवीला “ (स.प.सा.ले-१११)

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...