एक मराठा सरदार. हा शिवरायांच्या पदरी प्रथम होता. पुढें संभाजी राजे यास कंटाळून हा औरंगझेबास मिळाला होता. राजारामाच्यावेळीं हा विशेष प्रख्यातीस आला. राजाराम जिंजीस असतां औरंगझेबाकडून फुटून हा परत राजारामास मिळाला (१६९०) नंतरं यास तेथून महाराष्ट्रांत पाठविण्यांत आलें. महाराष्ट्रांत औरंगझेबाच्या फौजांचा पराभव करण्याकडे जी सरदार मंडळी गुंतली होती तींत हा एक प्रमुख होता. त्यानें एकदां (१६९८) आठ हजार फौजेसह खानदेशांत घुसून नंदुरबार, शिरपूर, थाळनेर वगैरे गांवें लुटलीं. थाळनेरजवळ मोंगलांचा सरदार हुसेन-अल्ली याचा मोड करून त्यास पकडून कैदेंत ठेविलें व जबर खंडणी घेऊन मग त्याची सुटका केली. पुढील सालीं राजारामानें गंगथडी, खानदेश, वर्हाडपर्यंत जी मोठी मोहीम केली तींत नेमाजी होता. मोहिमेवरून परत येतांना प्रत्येक प्रांतांत आपल्या एकेक सरदाराची नेमणूक (खंडणीवसुली व बंदोबस्तासाठीं) राजारामानें केलीं, त्यांत नेमाजीकडे खानदेश आला होता. पुढें शाहूची सुटका होईपर्यंत नेमाजी बहुधां खानदेशांतच सुभेदार असावा. शाहू दक्षिणेंत आला त्यावेळीं त्याला पहिल्यानें मिळालेल्या मंडळींत नेमाजीहि होता (१७०७). पुढील सालीं बहादुरशहानें कामबक्षावरील स्वारींत शाहूची मदत मागितली असतां त्यानें नेमाजीसच पाठविलें. नेमाजीनें हैद्राबादनजीक चढाई करून कामबक्षाचा शेवट केला (१७०८). हुसेनअल्ली दख्खनचा सुभेदार होण्यास आला असतां बर्हाणपुरास दाउदखान पन्नी याची व हुसेनची लढाई झाली, त्यावेळीं नेमाजी हा जवळच राहून लढाईचा परिणाम पहात होता. कारण बादशहानें व हुसेननें दोघांनींहि मराठ्यांकडे मदतीचा संदर्भ लावून ठेविला होता व शाहूनें त्यासाठींच नेमाजीची नेमणूक खानदेशांत केली होती (१७१८) [ सप्तप्रकरण बखर; जेधे; शिवदिग्विजय; राजारामाची बखर; शाहूचें चरित्र ]
No comments:
Post a Comment