विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 16 April 2021

२७ ऑक्टोबर १७९५ - पेशवे सवाई माधवरावांचा मृत्यू

 


२७ ऑक्टोबर १७९५ - पेशवे सवाई माधवरावांचा मृत्यू

ऑक्टोबर १७९५ मध्ये पेशवे सवाई माधवरावांची तब्येत ठीक नव्हती. सारखा ताप येत होता. गव्हर्नर जनरल सर जॉन शोअर त्या वेळी मछलीपट्टणला होता. पुण्याचं राजकारण अतिशय महत्त्वाचं होतं. पुण्याचा रेसिडेंट मॅलेटला सूचना दिलेली होती की पेशव्यांच्या तब्येतीचे अपडेटस दिवसातून ३ वेळा मछलीपट्टणला कळवले जावेत.
२७ ऑक्टोबर १७९५ रोजी सकाळी पेशवे त्यांच्या आजी (आईची आई) दुर्गाबाईंसोबत बोलत महालात बसले होते. सोबत वैद्यही होते. पेशव्यांना असह्य डोकेदुखी होत होती. तापही होता. त्याच तिरमिरीत अचानक ते उठले आणि कोणी थांबवायच्या आधीच बाहेरच्या सज्ज्यात गेले. तेथे अचानक चक्कर आल्याने त्यांचा तोल जाऊन उंचावरून ते खाली कारंज्यावर पडले.
उंचावरून पडल्याने पेशव्यांच्या मांडीचे हाड मोडले होते. एक हात आणि चेहेऱ्याला जबर दुखापत झाली होती. वैद्यांनी त्यांना वाचवायचे प्रयत्न केले पण व्यर्थ! नाना फडणवीसांनी आईबापाशिवाय वाढवलेल्या ह्या पोरक्या पेशव्याने वयाच्या अवघ्या २१ व्या वर्षी २७ ऑक्टोबर १७९५ रोजी संध्याकाळी जगाचा निरोप घेतला.
ही बातमी इतकी महत्त्वाची होती की पुण्याहून रात्रीच्या डाकेने ती लगेच मछलीपट्टणला गव्हर्नर जनरलला कळविण्यात आली -
"... I lose not a moment in acquainting you that the PESHWA IS DEAD.
Poona 27 October 1795
10 pm..."
- संकेत कुलकर्णी (लंडन)
सोबतचे जेम्स वेल्स ह्या चित्रकाराने काढलेले सवाई माधवरावांचे चित्र. आणि ‘पेशवा इज डेड’
©️ संकेत कुलकर्णी, लंडन

No comments:

Post a Comment

! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !!

  ! ! यादव / राजे जाधवराव या मराठा क्षञिय घराण्याचा वंशविस्तार !! प्रस्तुत वंशावळीची मांडणी आपणास तीन टप्प्यात करावी लागेल. १] श्रीमन्नारायण...