संताजी विरुद्ध धनाजी : एक घोर दुर्दैव
पोस्तसांभार
संभाजी महाराजांच्या निर्घृण हत्येनंतरचा काळ म्हणजे अत्यंत धामधुमीचा काळ. मोगली अजगर स्वराज्याला आता गिळून टाकणार अशी सगळ्यांची खात्री पटली होती - आणि सुरवातीला असेच काहीसे घडले सुद्धा. स्वराज्याचा छत्रपती मारला गेला आणि नवीन युवा छत्रपतीला स्वसंरक्षणार्थ महाराष्ट्र सोडून जिंजीला जावे लागले. स्वराज्याचा पूर्ण शेवट करायची हीच संधी आहे असं औरंगजेबाने जाणले. पण अशा खडतर काळात मोगलांसमोर खंबीरपणे उभे होते ते मराठ्यांचे अतुलनीय शौर्य आणि पराक्रम. सर्व मराठी कारभारी आणि सरदार ह्यांनी एकजूट होऊन जमेल तसे आणि जमेल त्या प्रकारे मोगलांचा सामना केला आणि स्वराज्याचा नाश थांबवला. ह्या सगळ्या मंडळींमध्ये लष्करी हालचाली आणि लढायांमध्ये अग्रभागी होते स्वराज्याचे २ रणमर्द - संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव.
६ वर्ष पराक्रमाची शर्थ
१६९० ला संताजींना सरनोबत पद देण्यात आले. तेव्हापासून संताजी आणि धनाजी ह्या जोडगोळीने मोगल प्रदेशात तुफान हैदोस घातला. युद्धाचे क्षेत्र आता नुसते महाराष्ट्र पुरते मर्यादित न राहता कर्नाटक आणि जिंजी-वेल्लोर पर्यंत पसरले होतं. महाराष्ट्रात स्वराज्याची व्यवस्था पाहणाऱ्या रामचंद्रपंत अमात्य आणि शंकराजी नारायण ह्यांनी सुरवातीला संताजी-धनाजीना महाराष्ट्रातल्या युद्धात नामजद केले. नंतर दोघांनाही राजाराम महाराजांच्या मदतीला जिंजीचा वेढा तोडण्यासाठी रवाना करण्यात आले. त्यांच्यावर टाकलेली प्रत्येक जबाबदारी आणि मोहीम त्यांनी चोख पार पडली. दोघांच्याही नावाचा दरारा आणि दबदबा मोगली सैन्यात निर्माण झाला - मोगली फौज संताजी आणि धनाजींनी वेगवेगळ्या लढायात पूर्णपणे झोडपून काढली.
समुद्रासारख्या अफाट मोगली फौजेला स्वराज्य संपवणं जमले नाही ह्याच्यात महत्वाचा एक घटक होता संताजी व धनाजी ह्यांची युद्धनीती आणि पराक्रम. संताजी म्हणजे प्रत्यक्ष विजेचा लोळच जणू - शिवाजी महाराजांच्या तालमीत मोठा झालेला आणि त्यांच्या युद्धनीती आणि शिस्तीचे पालन करणारा सच्चा मावळा. संताजींनी कासीम खान , अलिमर्दा खान, हिम्मत खान आणि इतर अनेक मोगल सरदारांच्या केलेल्या पराभवामुळे औरंगजेबाची अनेक वेळा पीछेहाट झाली. महाराष्ट्र आणि कर्नाटक मध्ये चौफेर घोडे फेकून दोन्ही महावीरांनी मोगलांना अक्षरशः जेरीस आणले. राजाराम महाराज जिंजीला वेढ्यात सापडले होते आणि परिस्थिती कठीण झाली होती - तेव्हा एकीकडून संताजींनी आणि दुसरीकडून धनाजींनी एकत्रित हल्ला चढवून हा वेढा बहुतांशी उधळून लावला. थोड्या वेळात मोठे अंतर कापणे, गनिमाला कधीही अंदाज येणार नाही अशा ठिकाणी गाठणे आणि गनिमी कावा वापरून गनीम झोडपणे - ह्या गुणांमुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक व जिंजी-वेल्लोर-तंजोर भागात संताजी-धनाजी जोडगोळीची मोगलांना पक्की दहशत बसली होती. अशा रीतीने १६९० ते साधारण १६९६ च्या सुरुवातीपर्यंतचा युद्ध-काळ संताजी-धनाजींनी गाजवला. औरंगजेब पूर्णपणे हताश व्हायच्या मार्गावर होता कारण इतकी वर्ष मोहीम चालवूनही ह्या दोघांच्या पराक्रमापुढे त्याला म्हणावे असे काहीच यश मिळेना.
असंतोष , कुरबुर, मतभेद
रामचंद्रपंत-शंकराजींच्या मुत्सद्देगिरी आणि नियोजनामुळे आणि संताजी-धनाजी जोडीच्या अचाट पराक्रमामुळे आता मोगल सैन्याचे धाबे दणाणले होते - असेच चालू राहिले असते तर कदाचित औरंगजेब परत दिल्लीच्या वाटेला लागला असता. पण ह्याच वेळी समोर आली ती संताजी व राजाराम महाराज ह्यांच्यातली भांडणे आणि संताजी व धनाजींमध्ये निर्माण झालेली दुही. दोघांमधील ह्या मतभेद आणि दुहीचे परिणाम जाणून घेण्याआधी काही गोष्टी जाणून घेणें महत्वाचे ठरेल.
पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे दोघांच्या स्वभावातला फरक. वर वर्णन केल्याप्रमाणे संताजींचा स्वभाव अतिशय कडक आणि शिस्तप्रिय - त्यांच्या ह्या स्वभावाचे सविस्तर वर्णन रियासतकारांनी तसेच खफी खानाने ही केले आहे. अतिशय आक्रमक आणि चलाख प्रवृत्तीच्या संताजींना आपल्या हाताखालच्या मावळ्यांनी केलेली चूक अजिबातच खपायची नाही. कोणी चूक केली तर त्याला कठोर शिक्षा मिळायची. शिवाजी महाराजांच्या शिस्तीचे आणि नीतिमूल्यांचे काटेकोर पालन संताजी करत होते - त्यात थोडीही ढिलाई त्यांना पसंत नव्हती. ह्या उलट धनाजींचा स्वभाव थोडा मवाळ आणि सर्वांना सामावून घेणारा होता. संताजींसारखा कठोर न्याय धनाजींच्या ठायी दिसत नाही. त्यामुळे धनाजींच्या सैन्यात राहणे ही त्या मानाने सुकर गोष्ट होती. संताजीचे अनेक सरदार त्यांच्या पडत्या काळात धनाजींना सामील झाले.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे १६९४ मध्ये झालेले प्रतिनिधी प्रल्हाद निराजी ह्यांचे निधन. प्रल्हाद निराजी जिंजीला राजाराम महाराजांबरोबर राहून राज्यकारभार हाताळत होते - सदरेवरचे हे सर्वात वरिष्ठ आणि वजनदार असे व्यक्तिमत्व होते. संताजी आणि धनाजी ह्यांच्यात लहान मोठ्या कुरबुरी आणि भांडणे सुरवातीपासूनच चालू असावीत. पण दर वेळेला प्रल्हाद निराजी मध्यस्ती करून परिस्थिती हाताळत. त्यांच्या मृत्यूनंतर मात्र अशा तर्हेने मध्यस्ती कोणालाही करता आली नाही असे दिसते. खुद्द राजाराम महाराज आणि रामचंद्रपंत सुद्धा संताजींना हुशारीने नियंत्रणात ठेऊ शकले नाहीत. त्यामुळे प्रल्हाद निराजींनंतर ह्या भांडणाच्या ठिणगीने पेट घेऊन त्याचे वणव्यात रूपांतर झाले.
एक शक्यता आहे कि ह्या दोघांमधल्या ह्या हेव्या-दाव्यांना सेनापतिपद संताजींना मिळाल्यापासूनच सुरुवात झाली असणार. पद एक आणि त्या पदाची योग्यता असलेले दोघं. अशा स्थितीत दोघांमध्ये स्पर्धा निर्माण झाली असली तर आश्चर्य नाही. ह्या अंतर्गत कलहाची पहिली मोठी ठिणगी उडाली ती मार्च-एप्रिल १६९३ च्या आसपास. डिसेंबर १६९२ मध्ये संताजींनी एका बाजूने आणि धनाजींनी दुसऱ्या बाजूने झुल्फीकारखानाच्या जिंजीच्या वेढ्यातल्या मोगल फौजेवर तुफान हल्ला चढवला. ह्या हल्ल्यात मोगल फौजेचे मोठे नुकसान झाले आणि फौज संताजी-धनाजींनी अडवलेल्या रसदीच्या अभावी तडफडू लागली. ह्या हल्ल्यातच संताजींनी अलिमर्दा खान आणि धनाजींनी इस्माईल मका अशा मोठ्या मोगल सरदारांना अटक करून जिंजीला आणले.अशा निर्वाणीच्या स्थितीत जुल्फिकारखानाची फौज असताना त्यांना पूर्णच संपवायचा मोका चालून आला होता. पण त्या वेळी जुल्फिकारखानाने ठेवलेला तहाचा प्रस्ताव राजाराम महाराजांनी मान्य केला आणि खानास वाट दिली (ह्याला बहुदा राजाराम महाराज आणि खानात असलेला छुपा समजौता कारणीभूत असावा - बऱ्याचशा ढिलाईने जिंजीचा वेढा चालू ठेऊन दोघेही स्वतःचे हेतू साध्य करायला बघत होते - सविस्तर हकीकतीसाठी - वेढा जिंजीला शिकस्त मोगलांना - पहा ). हा सला बहुदा संताजींसारख्या आक्रमक आणि स्वाभिमानी माणसाला रुचला नसावा. ह्या नंतर मार्च १६९३ ची जेधे शका. मध्ये एक नोंद आहे - वैशाख मासी संताजी घोरपडे राजारामसि हि बिघाड करून देशासी गेले त्यावरी धनाजी नामजाद केले. संताजींचे राजाराम महाराजांशी भांडण हे आधी म्हणल्याप्रमाणे खानाशी केलेल्या सल्या वरूनच झाले असावे व ते महाराजांवर रुसून जिंजीहुन निघून गेले असं दिसतंय. पण "धनाजीला नामजद केले" म्हणजे नक्की काय हे खुलासा होत नाही - असे वाटते की धनाजींना तात्पुरते सेनापतिपद देण्यासारखा काही विचार\निर्णय झाला असावा. पण प्रत्यक्षात सेनापतिपद संताजींकडेच ठेवण्यात आले असे पुढे १६९५ च्या आसपासच्या पत्रातून दिसते. त्यामुळे धनाजींना नामजद करणे म्हणजे नक्की काय खुलासा होत नाही
ह्या नोंदीनंतर १६९४ ची एक महत्वाची नोंद आहे - ती आहे शंकराजी नारायण ह्यांनी संताजींची काढलेली समजूत आणि त्यांना सांगितलेली काही मार्गदर्शक तत्वे. ते संताजींना झाले गेले मतभेद विसरून परत पहिल्यासारखी राजाराम महाराजांच्या चरणी सेवा करायला सांगतात. रियासतकार म्हणतात तसे ह्या पत्रात ह्या सगळ्यात २ वाक्य बरेच काही सांगुन जातात - राजश्री स्वामी जवळ मुद्दे घालू नयेति आणि मर्यादेने राहून वेढा उठवावा. संताजी एकदम रोखठोक स्वभावाचं व्यक्तिमत्व आणि खुद्द राजाराम महाराजांसमोर आपले मुद्देआणि ठाम मतं मांडण्यात ते पुढे मागे बघत नसावे. कोणाचीही भीड न ठेवता अशा थेट मतप्रदर्शनामुळे छत्रपती आणि इतर कारभारी\सरदारांबरोबर मतभेद आणि खडाजंगी होत असावी.
संताजी आणि धनाजी मध्ये थोड्याफार कुरबुरी आणि स्पर्धा पहिल्यापासूनच असावी असे वाटते. राजवाडे खंड ८ मधील संताजींचे १६९५ मध्ये रामचंद्रपंत अमात्यांना लिहिलेले एक पत्र आहे - संताजी अमात्यांच्या अख्त्यारीतच काम करत होते - पण ह्या पत्रातून रामचंद्र पंतांबद्दल असंतोष आणि धनाजींच्या बरोबर असलेली स्पर्धा पुढे येते. संताजी लिहितात - "आम्ही त्याप्रांती असता दहावीसांचे साक्षीनसी ऐकिले की संताजी घोरपडेंस त्याप्रांती ठेऊन राजश्री धनाजी जाधवराऊ यांस पाठवून देणे.....................त्यावरूनच द्वैतप्रकार दिसून आला" . संताजींना कर्नाटक प्रांतातच ठेऊन धनाजींना महाराष्ट्रात पाठवावे असे अमात्यांनी राजाराम महाराजांना सांगितले आणि ह्यातून संताजींसाठीचा दुजाभाव दिसून येतो असे संताजी पत्रात म्हणतात.
अशा तर्हेने छोटे-मोठे मतभेद, रुसणे-रागावणे, हेवे-दावे हे सगळे ह्या ६ वर्षात सुद्धा चालूच होते. शेवटी जे होऊ नये ते झालं आणि वर म्हणल्याप्रमाणे ह्या ठिणग्यांचे रूपांतर शेवटी वणव्यात झालं
सह्याद्रीचे दोन कडे आमने सामने
साधारण एप्रिल १९९६ ला संताजी व धनाजी दोघेही राजाराम महाराजांबरोबर जिंजीला होते. तिथून जेधे शका. मधल्या नोंदी नुसार राजाराम महाराजांशी भांडण होऊन संताजी जिंजीहुन बाहेर पडले. ह्या वेळचे भांडण खूप मोठे झाले असणार - कारण खुद्द राजाराम महाराज आणि धनाजी संताजींच्या पाठलागावर निघाले. हे भांडण नक्की कशावरून झाले - त्या वेळेस काय हेवे दावे केले गेले हे कळायला काही मार्ग नाही. अशीही शक्यता आहे कि ह्या भांडणाच्या परिणामस्वरूपी संताजीचे सेनापतिपद काढून धनाजींना देण्यात आले असावे. नोंदी मधल्या पुढच्या हकीकतीनुसार कांचीपुरम जवळ संताजी विरुद्ध धनाजी आणि राजाराम महाराज ह्यांच्यात लढाई झाली. ही अंत्यंत दुर्दैवी घटना जून १६९६ मध्ये घडली. रियासतकारांच्या मतानुसार इतर कागदपत्रांच्या आधारे ही लढाई कांचीपुरम जवळ नाही तर वृद्धाचलम जवळ आयवरगुडी/आईवरकुट्टी इथे झाली असावी. सनदापत्रे मधील हणमंतराव घोरपडे ह्यांच्या २४ डिसेंबर १६९६ च्या पत्राचा ते उल्लेख देतात ज्यात - आयेवरकुटीयाचे मुक्कामी संताजी घोरपडे व राजश्री धनाजी जाधवराव या उभयतांमध्ये झुंज जाहले - असा स्पष्ट उल्लेख आहे. हकीकत पुढे सांगते की ह्या लढाईत धनाजींचा पराभव होऊन ते महाराष्टात पळून आले. धनाजी जाधवांच्या सैन्यातील मोठा सरदार अमृतराव निंबाळकर ह्यांना संताजींनी पकडले व मारले. मस्सीर मधल्या वर्णनानुसार अमृतरावांना संताजींनी हत्तीच्या पायाखाली देऊन मारले( संताजींना कपटाने मारणाऱ्या नागोजी मानेचा अमृतराव हे मेहुणा होय). मस्सीर मध्ये ह्या लढाईबद्दल अजून एक वर्णन येते - अर्थात मोगल इतिहासकाराच्या ह्या वर्णनाची खातरजमा करणे कठीण. ह्या वर्णनानुसार ह्या लढाईच्या दुसऱ्या दिवशी संताजी राजाराम महाराजांसमोर आले आणि त्यांना बोलले - "मी नेहमीप्रमाणेच तुमचा निष्ठावंत सेवक आहे. माझा आक्षेप ह्या गोष्टीला आहे की तुम्ही धनाजी व मला एकसमान समजता. धनाजींवर जास्त भरवसा ठेवता हे बरोबर नाही. आपल्या सेवेस मी नेहमीसारखाच सदैव तत्पर आहे" आधी म्हणल्याप्रमाणे ह्या प्रसंगाची खातरजमा होणे मुश्किल आहे.
ह्या लढाईनंतर विजापूरच्या बाहेर दोघांमध्ये पुन्हा चकमक झाली - ह्या लढाईच्या वेळेस संताजींची बरीच फौज फितूर होऊन धनाजींना जाऊन मिळाली. संताजी राहिलेल्या फौजेसह पळून जाऊन शिंगणापूरला महादेवाच्या डोंगररांगेत आले. नंतर साधारण ९-१० महिन्याच्या कालावधीत अशी कुठे ही हकीकत सापडत नाही ज्याच्यात संताजींची समजूत काढण्याचा प्रयत्न झाला किंवा त्यांना कुठली मोहीम देण्यात आली. ह्या उलट राजाराम महाराजांचे रामचंद्रपंतांना लिहिलेल्या पत्रात (२७-ऑक्टोबर-१६९६) लिहिलेल्या पत्रात असा स्पष्ट उल्लेख आहे - "संताजी घोरपडे यांणी स्वामींच्या पायाशी हरामखोरी केली...... त्यांस सेनापतीपणाचा कार्यभाग होता तो दूर करून ........." . त्या महापराक्रमी सरदाराचे वास्तव्य त्या वेळेस शंभू महादेवाच्या डोंगरातच होते - एके काळचा सरनोबत आता बंडखोर ठरला होता. औरंगजेबाने संताजींच्या मागावर गाजदीखानास पाठवले होते. राजाराम महाराज आणि धनाजींची फौज पण त्यांच्या मागावर होतीच. शिवाय राजाराम महाराजांच्या आव्हानाला उत्तर देत संताजींचे बरेचसे सरदार व सैन्य महाराजांना मिळाले होते.
निर्वाणीची म्हणता येईल अशी लढाई मार्च १६९७ मध्ये साताराला दहिगाव जवळ झाली. धनाजींच्या फौजेच्या मदतीने हणमंतराव निंबाळकरांनी संताजींच्या सैन्यावर हल्ला चढवला. ह्या लढाईच्या वेळी संताजीचे जवळजवळ सगळे सरदार व सैनिक त्यांना सोडून धनाजींकडे गेले. संताजींचा पराभव होऊन ते अत्यंत मोजक्या साथीदारांसह म्हसवडला निघून गेले. ह्या नंतर थोड्याच दिवसांनी संताजींचा कपटाने दुर्दैवी अंत झाला.
ह्या दोन महापराक्रमी रणझुंजारांमधला हा संग्राम म्हणजे मराठा इतिहासातली एक अत्यंत दुर्दैवी अशी घटना !!! मोगल सैन्याला ह्या दोघांनी सगळीकडून शह दिला होता आणि त्यांची अवस्था दिवसेंदिवस बिकट होत चालली होती - औरंगजेबाचा दोघांच्या पराक्रमासमोर नाईलाज झाला होता. पण अचानक दोघांमध्येच पेटलेल्या ह्या यादवीमुळे जणू मोगल मोहिमेला नवीन संजीवनीच मिळाली. जर दोघांमध्ये भांडण झाले नसते तर काय झाला असता ह्याची आता आपण फक्त कल्पनाच करू शकतो - पण इतिहासात जर-तर ला जागा नाही. शेवटी एकच गोष्ट इथे सांगावीशी वाटते की संताजीचे छत्रपतींशी कितीही भांडण किंवा तीव्र मतभेद असू देत - पण त्यांनी कधीही स्वार्थ साधण्याच्या उद्देश्याने किंवा वतनाच्या लोभाने मोगलांची वाट धरली नाही आणि स्वराज्याशी बेईमानी केली नाही.
No comments:
Post a Comment