मराठा साम्राज्यास दगा करणारा आणि शनिवारवाड्यावर इंग्रजांचे निशाण, युनियन जॅक फडकविणारा तो देशद्रोही बाळाजी नातू भोरमध्ये नोकरीस होता...
नातू, बाळाजी नारायण -
पेशवाईच्या अखेरीच्या ऐतिहासिक माणसांत हा एक होता. हा मोठा धोरणी व व्यावहारिक माणूस होता. यानें शनवारवाड्यावर इंग्रजांचें निशाण लावण्याचा देशद्रोह केला एवढीच कायती माहिती त्याच्याबद्दल बहुतेकांस असल्याचें दिसतें.
बाळाजीपंत मूळ कोंकणांत (पेण तालुका) वाक्रुळ येथील राहणारा; त्यानें रोजगारासाठीं म्हणून भोरास येऊन त्या ठिकाणीं दरमहा पांच सहा रुपयांची नोकरी पत्करली. पुढें तो पुण्यास आला, व रास्त्यांच्या पदरी राहिला. त्यापूर्वी तो भिवाजी नाईक हुजरे, नंतर बसबनीस यांच्याकडे कारकून होता असें एके ठिकाणीं लिहिलेलें आढळतें. यावेळीं रावबाजी व रास्ते यांच्यात बेबनांव असून, रास्ते पेशव्यांच्या भीतीनें इंग्रजांशीं दोस्तीनें वागत. संगमावर राहणारा ब्रिटिश रेसिडेंट याच्याशी बोलणें करण्याकरितां रास्त्यांनां गुमास्ता ठेवावा लागे; व तो पूर्ण विश्वासू व मुत्सद्दी असा असणें अवश्य होतें. बाळाजीपंतांची पारख करून रास्त्यांनीं त्याला या कामगिरीवर नेमलें. पेशवे हे रास्त्यांचे शत्रु असल्यानें त्यांच्या चहाड्या किंवा गुप्त गोष्टी साहेबास सांगितल्यास आपल्या यजमानाचें आपण जास्तच हित केल्यासारखें होईल, असा मनाशीं विचार करून, बाळाजीपंत रेसिडेंटास पेशव्यांकडील बातम्या देई. १८०३ सालापासून बाळाजीपंताचा इंग्रजांशी संबंध येत गेला. त्यावेळी पुण्यास सर बॅरी क्लोज हा रेसिडेंट होता. क्लोजबरोबर १८१० सालीं बाळाजीपंत माळव्यांत होता; त्यावेळीं ``पालखी, पंचवीस स्वार व पन्नास माणूस’’ त्याच्या तैनातींत होतें; यानंतर एल्फिन्स्टन रेसिडेंट झाला. पुढें पेशवे व इंग्रज यांच्यामध्यें वितुष्ट वाढत जाऊन गंगाधरशास्त्राच्या खुनानें त्यावर कळस चढविला. अशा आणीबाणीच्या प्रसंगी बाळाजीपंताचे साहाय्य एल्फिन्स्टन यास अत्यावश्य वाटून, त्यानें त्याला आपल्या नोकरींत घेतलें (१८१६). पेशवेहि असा मनुष्य आपल्या हातचा जाऊं देऊं नये म्हणून खटपट करीत होते; पण त्यांची या कामी निराशा झाल्यावर त्यांनीं फोर्डमार्फत रेसिडेंटास सांगून पाठविलें कीं, हा मनुष्य आपल्याजवळ येऊं देऊं नये. तथापि एल्फिन्स्टनास या मनुष्याची पूर्ण पारख असल्यानें त्याने जामीन देऊन बाळाजीपंतास आपल्याजवळ ठेवून घेतले.
अशा रीतीने इंग्रजांजवळ बाळाजीपंत दादांचें वजन वाढतां वाढतां तो रेसिडेंटाचा प्रायव्हेट सेक्रेटरीसारखा होऊन राहिला होता. एल्फिन्स्टनचा हुकूम पेशव्यांकडे रुजूं करण्यास तो वाड्यांत येई. कधी कधी पेशव्यांसहि इंग्रजांशी नमून वागण्यास उपदेश करी. नातूमुळें इंग्रजांस पेशव्यांच्या अंतस्थ बातम्या कळू लागल्या व त्याकारणानें पेशव्यांची कारस्थानें फसूं लागलीं. पेशव्यांनीं शेवटी इंग्रजी लष्करांत फितुरी आरंभिल्याचा जो बोभाटा झाला त्याची बातमी प्रथण बाळाजीपंतानें एल्फिन्स्टन यास देऊन सावध केलें. याप्रमाणें नातू एल्फिन्स्टनचा उजवा हात बनून राहिला पण त्याने स्वजन त्याला दुष्मानाप्रमाणें लेखींत. पेशवे पुणें सोडून गेल्यावर दादानेंच शनवारवाड्यावर इंग्रजांचा बावटा लावला. अशा रीतीनें इंग्रजांचें काम फत्ते करून दिल्याबद्दल एल्फिन्स्टननें दादाची खूप वाहवा केली, व त्याला एक जहागिरी देण्याबद्दल गव्हर्नर जनरलला लिहिलें; व जहागिरीमुळें कदाचित् त्याचें पेन्शन कमी करतील या भीतीनें पेन्शन पूर्ववत् तितकेंच चालू ठेवण्याविषयीं एल्फिन्स्टननें मुद्दाम याच शिफारसपत्रांत गव्हर्नर जनरलला लिहिलें. दादाचें वर्णन त्याला प्रत्यक्ष पाहून अर्वाचीनकोशकारांनीं पुढीलप्रमाणें दिलें आहे. ``बाळाजीपंत दादा मोठ्या उंच आकृतीचा, गौरवर्णाचा व साधाच परंतु इभ्रतदार पुरुष होता. यास आम्ही स्वत: पाहिलेलें आहे. याचे सर्व कामांत नियम बांधलेले असत.’’ प्रतापसिंह छत्रपतींचें पेशव्यांविरुद्ध जें कारस्थान चालें तें ददामार्फत चालें. पुढें प्रतापसिंह इंग्रजांविरुद्ध कारस्थान करूं लागला तेव्हां त्याची बातमी दादानेंच इंग्रजांस दिली.
दादाला सातारा येथें ग्रँट डफच्या हाताखाली दुय्यम रेसिडेन्ट नेमिले होतें. डफच्या सांगण्यावरून त्यानें एक तत्कालीन हकीकतीची बखर लिहिली होती. डफ म्हणतो कीं ती फार उपयुक्त व मोठी असून तिचें भाषांतर रिचर्ड मॉरिस यानें (इंग्रजीत) केलें होतें; ती बखर दादाजवळच शेवटपर्यंत होती. तत्कालीन सरदार लोकांचें इंग्रजांशीं जे तहनामे ठरले ते याच्यामुळें ठरले. बाळाजीनें श्रावणमासाची दक्षणा कायम करविली व देवस्थानांच्या नेमणुकाहि कायम करविल्या. इनामदार व जहागिरदार यांचीहि इनामें त्यानें इंग्रजांकडून पुढें चालविण्याबाबत पुष्कळ खटपट केली. यास तीन पुत्र व दोन कन्या होत्या. पैकीं एक कन्या प्रसिद्ध नीलकंठशास्त्री थत्ते यांची सून होय. पुत्रांपैकीं वडील गणपतराव यानें लिंगपुराणावर एक संस्कृत टीका लिहिली आहे. बाळाजीपंत हा शेवटी सहकुटुंब काशीस जाऊन राहिला व थेंच वारला. हल्ली याचे वंशज पुण्यास आहेत.
संदर्भ :-
[भा.इ.मं. इतिवृत्त १८३८; अ. कोश; चित्रमयजगत, मार्च १९२३; बसू- सातारा.]
- केतकर ज्ञानकोशातून
विशेष आभार :- @labad boka (facebook)
बाळाजी नातू याना पेन्शन १८४२ पर्यंत देत असल्याचा हा पुरावा ...त्या काळी हि रक्कम खूप जास्त होती
No comments:
Post a Comment