अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील अळकुटी गावात सरदार कृष्णाजी आणि व्यंकोजी कदमबांडे यांची भव्य गढी म्हणजे मजबूत भुईकोट आहे. अळकुटी हे गाव पुणे - नगर महामार्गावरील शिक्रापूरपासून ५६ कि.मी , पारनेर या तालुक्याच्या गावापासून २७ कि.मी अंतरावर आहे. गढीचे प्रवेशद्वार भव्य आणि भक्कम आहे. प्रवेशद्वारावर शरभशिल्प आहे. गढीची तटबंदी, बुरूज आजही सुस्थितीत आहेत. गढीच्या आतील जुने वाडे कालाच्या ओघात ढासळून गेले आणि त्या जागेवर नवीन बांधकाम आले. तरीही जोत्याचे अवशेष पहायला मिळतात. गढीत आत आड आहे. तटबंदीवर जाण्यासाठी पायरीमार्ग आहे. जवळच एक उत्कृष्ट शिवमंदिर आहे. मंदिरात एक शिलालेख पण आहे. गावाला वेस आहे. गावातील ग्रामदेवता जानाई देवी आहे.
नाणेघाट जुन्नर-पैठण असा प्राचीन काळी वाहतुकीचा व व्यापाराचा मार्ग होता. अळकुटी हे त्या मार्गावरील गाव होते. या भागावर सातवाहन राजे राज्य करीत होते. पैठण ही सातवाहनांची राजधानी व जुन्नर ही उपराजधानी होती. इ.स. दुसऱ्या आणि तिसऱ्या शतकात या भागात व्यापार मोठा होता. अम्बरिष ऋषींची तपोभूमी म्हणून या गावास पूर्वी 'अमरापूर' असे नाव होते. संत ज्ञानेश्वर व त्यांची भावंडे आळंदीस जाताना अमरापूर येथे थांबल्याचा उल्लेख आढळतो. शहाजीराजांच्या व छ. शिवाजीमहाराजांच्या कारकीर्दीत कदमबांडे हे एक मातब्बर सरदार होते. इंग्रजांनी या घराण्याचा उल्लेख हे एक मातब्बर घराणे, स्वतःस राजे समजणारे, स्वतंत्र सिंहासन, स्वतंत्र ध्वज, घोडदळ, पायदळ बाळगणारे असे होते. छ. शाहूमहाराज हे औरंगजेबाच्या कैदेतून सुटल्यावर अमृतराव कदमबांडे यांना येऊन मिळाले. त्यानंतर अमृतराव व कुंठाजी यांनी गुजरात स्वारीतून प्रचंड धन प्राप्त केले.
कुंठाजींच्या घोडदळात मल्हारराव होळकर हे होते ते पुढे मोठे सरदार झाले. बाजीराव पेशव्यांच्या कारकीर्दीत कुंठाजीरावांनी गुजरात मोहिमेत पराक्रम गाजविला. त्या वेळी त्यांना धुळे, रनाळा, कोपली, तोरखेड हा भाग मिळाला. रघोजीपुत्र मल्हारराव यांच्याशी छत्रपती शाहूराजांनी आपली कन्या गजराबाई यांचा विवाह करून दिला व भोसले आणि कदमबांडे यांची सोयरीक झाली. त्यांनी अळकुटी येथील वाड्याच्या तळघरात त्र्यंबकेश्वराहून आणलेल्या शिवलिंगाची स्थापना केली. मल्हारराव तोरखेड येथे स्थायिक झाले. रघोजीरावांचे दुसरे पुत्र कमळाजी हे मात्र अळकुटी येथे राहिले. त्यांनी खडर्याच्या युद्धात पराक्रम केला. इ.स. १७५० मध्ये त्यांनी वाड्याजवळच एक सुंदर शिवमंदिर बांधले. त्यातील शिलालेख खालीलप्रमाणे आहे
"श्री सविचरणी दृढभाव
कमळाजी
सुत रघोजी कदमराव पाटील
मोकादम मौजे अमरापूर ऊर्फ आवळकंठी प्रगणे कई सरकार जुन्नर शके १६७२
श्री मुख नाम संवत्सरे मार्गशीर्ष शुक्ल प्रतिपदा"
साभार- डाॕ सदाशिव शिवदे सर
टीम - पुढची मोहीम
No comments:
Post a Comment