विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 30 June 2021

सरदार विठ्ठल शिवदेव यांची विंचूर येथील गढी :

 






सरदार विठ्ठल शिवदेव यांची विंचूर येथील गढी :

🚩
विठ्ठल शिवदेव हे महाराष्ट्राच्या इतिहासातील मानाचे पान, त्यांच्या तलवारीचे पाणी खर्या अर्थाने पेशवाईत दिसुन आले. पानिपताच्या लढाईत जे मातब्बर सरदार सदाशिवराव भाऊ यांच्यासमवेत होते, त्यापैकी हे एक महत्वाचे सरदार.
अशा या मातब्बर सरदाराची गढी किंवा वाडा, कांद्याची बाजारपेठ समजल्या जाणार्या लासलगांवजवळ विंचूर या गावात नासिक-औरंगाबाद मार्गावर आहे. याला विंचूरकरांचा वाडा असेही संबोधले जाते.
वाड्याचे प्रवेशद्वार भरभक्कम असुन त्यावरिल कोरीव नक्षीकाम लक्ष वेधून घेते. द्वाराच्या वर दोन्ही बाजुला सहसा न आढळणारे गोम सदृश शिल्प आहे, तर शिल्पाच्या वरच्या अंगाला मयुरशिल्प आहे.
वाड्याला तीन बुरुज असुन, ऐसपैस अशा २० पेक्षा जास्त खोल्या आहेत. वाडा दुमजली असुन दोन भागात त्याचा विस्तार आहे. एका भागातून दुसर्या भागात जाण्यासाठी गैलरी रस्ता केलेला आहे.
वाड्याचे प्रथमदर्शनी रुप पाहुन आपसुकच आपण वाड्याच्या प्रेमात पडतो. बाहेरुन दिसणारे नक्षीदार सज्जे, त्याखालील मर्कटशिल्प. सगळचं मोहात पाडतात. ह्या परिसरात विंचूरकरांना मोठा मान, नव्हे त्यांना येथील प्रजा, राजाचे संबोधन लावी.
ह्या भागात अनेक मंदिरे ह्या सरदाराने उभारली.
💧 *अभिनव पाणी व्यवस्थापन पद्धती* 💧
विंचूरमधील पाणी व्यवस्थापन हा खरे तर वेगळा विषय होवू शकेल. जवळपास २ कि.मी. अंतरावरून गावामध्ये पाणी आणलेले आहे. दगडाने बांधलेली ही रचना म्हणजे पाण्याचे भुयारच जणू, एक माणुस ह्या पाणी योजनेतून वाकुन चालू शकतो, विशिष्ट अंतरानंतर कारंजे, चेंबर्स, पाण्याचा वेग कमी-जास्त करण्यासाठी केलेली रचना केवळ अप्रतीम. यावरुन तिनशे वर्षांपूर्वी आपले स्थापत्यशास्त्र किती पुढारलेले होते याची कल्पना येते.
गावाबाहेर सरदार विठ्ठल शिवदेव यांची समाधी आहे.
या घराण्याला ब्रिटिशांनी सुद्धा मोठा मान दिला होता.
आजमितीला जरा बर्या स्थितीत असलेला हा वाडा दुर्देवाने त्याच्याकडे होणारे दुर्लक्ष यामुळे नामशेष तर होणार नाही ना अशी शंका निर्माण करतो.
जायचे कसे - नासिक औरंगाबाद महामार्गावर विंचूर हे गाव आहे. अंतर नासिक ते विंचूर 50 किमी. अंदाजे.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...