


नागठाणे व चोरे येथील राजे चोळ अर्थात चोर साळुंखे
-------------------
-------------------.......

सतीशकुमार सोळंके देशमुख,
शिवाजी राजांनी फतेखान सोबत जमिनीवर लढलेल्या बेलसर येथील पहिल्या युद्धात सेनानायक म्हणून लढलेले भिकाजी चोर व त्याचे सख्खे बंधू भैरव चोर यांचा पराक्रम इतिहासात अजरामर आहे. शिवाय या दोघांनी शिरवळ येथील किल्ल्यात आदिलशाही सैन्याविरोधात केलेला विजयी पराक्रम देखील थक्क करणारा आहे. साताऱ्याजवळील देगाव पाटेश्वर ते पाटण या मोठ्या चौरस पट्ट्यात राजे साळुंखे चाळुक्यांची अनेक वंशजांची आडनाव तसेच पडनावाने राहणारी वतनदार गावे असून राजे साळुंखे यांनी ही वंशजांची गावे इ.सनाच्या सहाव्या शतकापासून या भागात बसविणे सुरू केल्याचे लक्षात येते. या प्रत्येक गावातील साळुंखेंना मुस्लिमशाही आणि मराठेशाहीच्या काळात मोठा इतिहास असला तरी तो सूत्रबद्ध लिहिला नसल्याने इतिहासात पुस्तकबंद करणे मुश्किल होते.
--------------
श्लोक :
----------
परवीरश्रियां चोरश्चोरवंशो गणाग्रणी:।
भीको$तिभीषणानीको$त्यभीको रणकर्मणि॥
वैरिवित्रासजननो युधि भैरवभैरव:।
सभाभिर्भासमानो$स्य सनाभिरपि भैरव:॥
----------
इतिहासाचे एक अस्सल साधन असलेल्या शिवभारतातील वरील श्लोकातून श्रीमंत सरदार भिकाजी चोर साळुंखे आणि भैरव चोर साळुंखे या पराक्रमी सरदारांचे उल्लेख आलेले असून शिवभारताने त्यांच्या पराक्रमाचे थक्क करणारे पराक्रमी वर्णन शिवभारतातून केलेले आहे. सहाशे वर्षाच्या इतिहासाचा राजवंशीय आणि वैभवशाली व पराक्रमी वारसा असलेल्या राजे चोर साळुंखे यांचा मराठेशाहीच्या काळात सुद्धा खूप मोठा पराक्रमी इतिहास असल्याचे दिसून येते.
नागठाणे गावात श्रीमंत सरदार कुकरोजी राजे चोर साळुंखे आणि त्यांचे पुत्र हिरोजी राजे चोर साळुंखे या दोन सरदार वीरांची समाधी मंदिरे लक्ष वेधून घेणारी आहेत. कुकरोजी राजे यांच्या चितेवर त्यांची एक बायको सती गेली होती, तर हिरोजी राजेंच्या चितेवर एकाच वेळी दोन बायका सति गेल्या होत्या. त्याची सती शिल्पे समाधी मंदिराशेजारी आजही दिसून येतात. गावात चोर साळुंखे यांचे सहा मोठे वाडे आहेत, आज त्यांच्या पडझड झाल्यामुळे फक्त काही अवशेष शिल्लक राहिलेले दिसतात.
नागठाणे, ता. जि. सातारा येथील चोर साळुंखे यांचा मुस्लिमशाही आणि मराठेशाहिच्या काळात मोठा सरदारी थाटाचा इतिहास दिसतो. मात्र त्यांचा हा पराक्रमी इतिहास दुर्दैवाने त्यांनी सूत्रबद्धरित्या लिहून ठेवलेला आढळत नसल्यामुळे हा इतिहास लक्षात येत नसला, तरी या गावातील दिसणाऱ्या ऐतिहासिक अवशेषांना पाहून हा पराक्रमी इतिहास नजरेत भरतो !
बदामी चाळुक्यांचे थेट वंशज असलेले वेंगीचे राजे साळुंखे चाळुक्य म्हणून तीनशे वर्ष राज्य केल्यानंतर पुढील तीनशे वर्ष चोळ चाळुक्य म्हणून दक्षिण भारतात राज्य केलेल्या राजवंशाचे राजे चोर साळुंखे हे वंशज आहेत.
हरिश्चंद्रवंशीय भोगशक्ती या बदामी चाळुक्यांच्या सामंताच्या इतिहासाची मी आठव्या शतकाच्या पूर्वार्धातील पोस्ट नुकतीच माझ्या वॉलवर टाकली आहे. महाराष्ट्राच्या नाशिक प्रांतावर सामंत असलेल्या या राजवंशाचा सूत्रबद्ध इतिहास लिहिलेला सापडत नसल्याने त्यांचे महाराष्ट्रात आज कोण वंशज असतील, हे शोधणे अशक्यप्राय होते! मात्र नागठाणे येथील चोर साळुंखे यांना सुदैवाने त्यांचा वंश माहित असला, तरी मुस्लिम व मराठेशाहीतील त्यांचा इतिहास सूत्रबद्ध लिहिलेला सापडत नसल्याने मोठा इतिहास असूनही इतिहास मांडणीत अडथळे येतात.
राजे चोर साळुंखे यांच्या चोरे, नागठाणे, बोरगाव, भादे, वाठार, चोराची उंडवडी, चोरवाडी चोर माऊली, सुरवडी वगैरे गावातील चोर साळुंखेंचा इतिहास देखील असाच पराक्रमी आहे. चोरांच्या वरील गावातील चोरे, नागठाणे आणि बोरगाव ही चोरांच्या मूळ वतनाची गावे दिसतात, तर खंडाळा तालुक्यातील भादे, वाठार, बारामती तालुक्यातील चोराची उंडवडी आणि फलटण तालुक्यातील सुरवडी येथील चोर साळुंखे हे नागठाणे येथील राजे चोळ चाळुक्य अर्थात राजे चोरांचे वंशज आहेत. तसेच घोडनदी शिरूर तालुक्यातील आलेगाव पागा येथील वाघचौरे देशमुख हे भादे येथील चोर साळुंखे यांचे वंशज आहेत. बाकी नगर जिल्ह्यातील उत्तरेकडील संगमनेर वगैरे भागातील वाघचौरे देशमुख हे कुळाच्या बाबतीत कन्फ्यूज असावेत असे वाटते! ते स्वतःला पवार कुळी म्हणवून घेताना दिसतात! उर्वरित चोर माऊली, चोरवाडी वगैरे गावातील चोर साळुंखे नेमके चोरे, नागठाणे की बोरगावपैकी एखाद्या गावचे वंशज असावेत हे अभ्यासांती लक्षात येईल.
श्रीमंत सरदार कुकरोजी राजे चोर-साळुंखे यांना अनुक्रमे 1) श्रीमंत सरदार हिरोजी कुकरोजी राजे चोर-साळुंखे 2) श्रीमंत सरदार महादजी कुकरोजी राजे चोर-साळुंखे 3) श्रीमंत सरदार विठोजी कुकरोजी राजे चोर-साळुंखे 4) श्रीमंत सरदार हरजोगी कुकरोजी राजे चोर-साळुंखे 5) श्रीमंत सरदार मुलकी पाटील (नाव माहीत नाही) कुकरोजी राजे चोर-साळुंखे या पाचही मुलांचे एकेकाळी गांवात सहा मोठाले (राज)वाडे होते. मात्र आज दुर्दैवाने या वाड्यांचे फक्त काहीच अवशेष शिल्लक आहेत. कुकरोजी राजांच्या वरील पाच मुलांपैकी एका मुलाला दोन बायका असल्याने त्याचे स्वतंत्र दोन वाडे होते.
श्रीमंत सरदार हिरोजी कुकरोजी राजे साळुंखे यांच्या घुमटाच्या समाधी मंदिराशेजारीच त्यांचे वडील श्रीमंत सरदार कुकरोजी राजे साळुंखे यांचे समाधी मंदिर आहे. नागठाणेच्या राजे साळुंखे यांचा पाच+एक अशा सहा वाड्यांचा भावकी विस्तार आज नागठाणे गावात पहायला मिळतो. तो श्रीमंत सरदार कुकरोजी राजे साळुंखे यांच्या पाच मुलांचा आहे. श्रीमंत सरदार कुकरोजी राजे साळुंखे यांचे लहान बंधूंचा विस्तार नागठाणे गावाच्या उत्तरेला चिकटून असलेल्या बोरगाव या गांवात आहे. बोरगाव हे देखील राजे साळुंखे यांची नागठाणे सारखीच मोठी लोकसंख्या असलेले हायवेवरील एक मोठे गाव आहे. नागठाणे आणि बोरगाव या दोन गावांच्या मधून उरमोडी (उर्वशी) नावाची नदी वाहते. नागठाणे आणि बोरगाव या दोन गावांच्या सासन काठ्या एकमेकांच्या गांवात पोहोचल्याशिवाय दोन्ही गावातील देवाची यात्रा भरत नाही, हे मात्र विशेष आहे. दोन्ही गावातील ही पूर्वापार चालत आलेली प्रथा म्हणजे आजतागायत सुरू आहे.
( अपूर्ण )
-----------
मार्गदर्शक :
--------------
प्रोफेसर डॉ.नीरज साळुंखे,
(Dr. Neeraj Salunkhe )
असोसिएट प्रोफेसर,
पीएचडी गाईड.
--------------
@
शब्दांकन :
सतीशकुमार सोळंके-देशमुख,




सिद्धीविनायक कॉलोनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बीड.


मी अशोक वाघचौरे सध्या मी शिरसोडी ता.मालेगाव जिल्हा नाशिक येथे राहतो भाट लोकांनी सांगितल्याप्रमाणे शिरूर तालुक्यातील आळेगाव रांजणगाव या ठिकाणच्या आहोत. साळुंके हे कुळ आहे आणि तुळजा भवानी कुलदेवता आहे.
ReplyDelete7588205175