विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 21 August 2021

हत्तीवरून राजकारण


 The Great Maratha Warriors

'हत्तीवरून राजकारण'
पहिल्यांदा आपण कोणाकडे किती हत्ती होते ते पाहू:
गझनीच्या मुहम्मदाने जेंव्हा सण १०२४ मध्ये हिंदुस्थानवर स्वारी केली तेंव्हा त्याच्या सैन्यात १३०० हत्ती होते.
इतिहासातील क्रूरकर्मा तैमूरलंगाने सण १४०० मध्ये समरकंद येथे म्हशीदी बांधण्यासाठी लागणारे दगड वाहण्यासाठी ९५ हत्तींचा वापर केल्याचा उल्लेख आहे.
कॅप्टन हॉकिन्स म्हणून एक युरोपियन सण १६०७ मध्ये जहांगीरच्या पदरी आग्रा येथे होता. त्याने जहांगीरच्या सैन्यात बारा हजार हत्ती असल्याचे नमूद करुन ठेवले आहे.
मार्किस होस्टींगने फरुकाबादच्या नवाबाकडे हजारो हत्ती असून नुसत्या वाघाच्या शिकारीच्या वेळी हा नवाब सहाशे हत्ती वाघाला वेढ्यात पकडण्यासाठी नेत असे असे
म्हंटले आहे.
अब्दुल रझाक ह्या इराणी प्रवाशाने सण १४४३ मध्ये विजयनगरच्या रामराजाने तालिकोटच्या लढाईत ५०० हत्ती आघाडीवर पाठविल्याचे लिहिले आहे.
सभासदाच्या बखरीनुसार छत्रपती शिवाजी महाराजांकडे १२६० हत्ती, हत्तीणी, आणि छावे होते. तर चित्रगुप्ताच्या बखरीत हीच संख्या २००० सांगितली आहे.
संभाजी महाराजांनी राज्याभिषेक केला तेंव्हा त्यांच्या १८ कारखान्यांची मोजदाद केली होती. मराठी साम्राज्याची छोटी बखरेत संभाजी महाराजांकडे ११२५ हत्ती असल्याचे म्हंटले आहे.
लढायांच्या प्रसंगीही युद्धात शत्रूचा पराभव करून हत्ती जिंकत असत. मराठ्यांच्या युद्धात मराठ्यांनी असे बरेच हत्ती जिंकलेले आहेत.
शब्दविस्तार भयास्तव थोडकेच इथे देतो. ते असे:
शिवाजी महाराजांनी प्रतापगडच्या युद्धात अफझलखानाला मारल्यावर मराठ्यांना १२०० उंट आणि ५५ हत्ती मिळाले होते.
सालेरीच्या लढाईत ६००० उंट आणि १३५ हत्ती मराठयांनी जिंकले होते.
हुसेनखान मायेना पठाणाच्या लढाईत हंबीरराव मोहित्यांनी ४५०० घोडी आणि १२ हत्ती जिंकून आणले होते.
तसेच पुढे कर्नाटक स्वारीत चंदी जिंकल्यावर त्रिमल महालात शेरखानाशी झालेल्या लढाईत शिवाजीमहाराजांना ५००० घोडे आणि १२ हत्ती पाडाव मिळाले होते.
राजाराम महाराजांच्या कारकिर्दीत संताजी घोरपडे यांनी रायगडला वेढा घालून बसलेल्या झुल्फीकारखानाच्या सैन्यावर हल्ला करून ५ हत्ती जिंकून पन्हाळ्यास नेले होते.
शाहू छत्रपतींच्या काळातही असे प्रकार पाहायला मिळतात.
१७२४ साली श्रीनिवास प्रतिनिधीने मिरजकर दिलेरखानाचा पराभव करून १२ हत्ती जिकंले होते.
१७२९ मध्ये थोरल्या बाजीरावाने बंगशबहाद्दर आणि दया बहाद्दर यांचा पराभव करून १८ हत्ती जिंकून आणले होते.
नासरजंगबरोबरच्या लढाईत चिमाजीअप्पाने ३ हत्ती जिंकून आणले होते.
उदगीरच्या लढाईत भाऊसाहेबाने ७ हत्ती लुटीत जिंकले होते.
महादजी शिंद्यानी (ह्यांना पाटीलबाबा असेही म्हणत) १७९० साली मिर्झा बेगचा पराभव करून २१ हत्ती जिकंले होते.
शत्रूकडून खंडणीच्या रूपातही हत्तीची भरपाई करून घेण्यात येत असे. जुनागढच्या संस्थानिकाशी बडोद्याच्या गायकवाडांची लढाई झाली. ह्या लढाईत जुनागडवाल्यांनी गायकवाडांच्या हत्तीचे शेपूट कापून नेले. त्या काळी हा अत्यंत
अपमानजनक प्रकार समजत. ह्यामुळे चिडून जाऊन गायकवाडांनी परत १८०४ साली जुनागढवर हल्ला करून त्यांचा दारुण पराभव केला. जुनागढच्या नवाबाने घाबरून जाऊन खंडणी देण्याचे कबूल केले. पण गायकवाडांनी खंडणीत नगाला नग प्रत्यक्ष एक हत्तीच घ्यायचा असे ठरविले होते. परंतु जुनागढच्या नवाबाकडे हत्तीच नव्हता. सबब नाईलाजास्तव हत्ती इतकी किंमत वसूल करण्यात आली.
एक ऐतिहासिक वाचलेला मार्मिक किस्सा सांगतो. गोव्यात जाताना प्रवाशांना पूर्वी जकातघरावर खूप जकात द्यावी लागे. परमुलखांतुन गोव्यात जाणाऱ्या हर एक गोष्टींवर जकात भरावीच लागे. जकात घेणाऱ्या जकातदाराजवळ कुठल्या वस्तूची किती जकात घ्यायची ह्याची एक यादी असे. एकदा असा प्रसंग घडला कि तिकडील एका मराठा सरदाराने आपल्या मुलाचे लग्न काढले. लग्न समारंभ टोलेजंग आणि आपल्या वैभवानुसार झाला पाहिजे म्हणून घाटावरच्या एका मोठ्या जहागीरदाराकडून लग्नासाठी त्या सरदाराने हत्ती मागविला.
त्या जहागीरदारानेही तो हत्ती पाठविला. पण हत्ती
गोव्यात शिरताच जकातनाक्यावर पंचाईत झाली. हत्ती कधी जकातनाक्यावरून गेला नसल्याने जकातदाराला हत्तीचे नाव जकात घेण्याच्या यादीत सापडेना. बरं यादीत नाव नाही म्हणून एवढा प्रचंड प्राणी जकातीशिवाय सोडावा तर तेही चुकीचे.
शेवटी त्याने आपले कारकुनी डोके लढविले. हत्ती आपले झालदार अब्दागिरी एवढे विशाल कान सारखे हलवीत उभाच होता. तेंव्हा ते पाहून " हे पाखरूच खरें " असे म्हणून
पक्ष्यांच्या यादीत त्याला कोंबून मामुली जकात घेऊन त्याने हत्ती आत सोडला.
पेशवाईतील बायका एकमेकींशी भांडताना 'ढालगज भवानी' असे म्हणत असत. 'ढालगज भवानी' हा शब्द बायकांच्या तोंडी सारखा असे. एखाद्या 'अरेरावी धीट' स्त्रीला तो शब्दप्रयोग वापरीत. वास्तविक ढाल म्हणजे निशाण, आणि गज म्हणजे हत्ती. आणि भवानी हे पेशव्यांकडे असलेल्या मराठ्यांच्या निशाणाच्या हत्तीचे नाव. हा हत्ती स्वारीत आघाडीवर असायचा.
त्यावरून 'ढालगज भवानी' अशी म्हण पुढे रूढ झाली. ( चुकून बायकोस 'ढालगज भवानी' असं म्हणू नका. )
ऐतिहासिक कागद पाहता हत्ती फार दुर्मिळ आणि महाग विकत मिळत.
आपल्याकडे हत्ती खरेदीच्या नोंदी सापडतात. एकदा सवाई जयसिंगाने पेशव्यास 'अनुपगज' नावाचा हत्ती नजर केला होता. त्याची किंमत १० हजार रुपये धरण्यात आली
होती. आणि दुसरा उल्लेख हा नानासाहेब पेशव्याचा. नानासाहेब पेशव्याने स्वतःच्या पीलखान्यासाठी १० हजार रुपयास एक हत्ती खरेदी केला होता.
सामान्यतः मध्यम स्वरूपाचा हत्ती दोन ते चार हजारापर्यंत मिळत. १८०१ साली पेशव्याने सर जॉन शोअर यास १०३७ रुपये किमतीचा हत्ती भेट दिला होता.
शाहू छत्रपतींच्या काळात औरंगाबादेत हत्तींचा बाजार भरत असे. १७६४ साली पेशव्याने मल्हार बाबुराव यास औरंगाबादेत हत्ती खरेदीविषयी लिहिले होते. पेशव्याच्या ह्या पत्राला मल्हार बाबुराव ह्याने उत्तर दिले कि " हत्तीची खेप नांदेड बसमत जवळ आली आहे. त्यांत १० छावे व २५ हत्ती आहेत. १५/२० दिवसांनी औरंगाबादेस येतील. हत्तीचा येथे फार शोध घेतला. कोठे विकाऊ नाहीत. "
हत्ती ही फार भारी आणि अपूर्व चीज असल्यामुळे येनकेन प्रकारे दुसऱ्याकडून चांगले हत्ती उपटण्याचा हमखास प्रयत्न होत असे. आणि उलटप्रसंगी आपल्याकडून जर हत्ती देण्याचा प्रसंग आलाच तर म्हातारे-कोतारे काहीतरी व्यंग असणारे हत्ती
समोरच्याच्या गळ्यात बांधण्याचा प्रयत्न केला जात असे. याची काही गमतीदार उदाहरणे पाहू:
शाहू महाराजांनी पहिल्या बाजीरावाच्या अखेरच्या काळात त्याला एक हत्ती नजर केला. हत्ती दिसायला सुरेख आणि जवान होता. पण त्याच्या दोन्ही डोळ्यात मात्र फुले (पडदा) पडली होती. नानासाहेबाने आणि चिमाजीअप्पाने हत्ती मिळताच त्याच्या माहुताला विश्वासात घेऊन हत्तीची परीक्षा करविली. त्यात हे लक्षात आले. पण करतात काय? खुद्द स्वामींकडून आलेली देणगी. नको म्हणणेही कठीण.
अखेर माहुताने आश्वासन दिले कि हत्तीचे डोळे औषधोपचाराने बरे होण्यासारखे आहेत. तेंव्हा त्यावर समाधान मानून पेशव्यांनी तो हत्ती आदरपूर्वक ठेऊन घेतला.
असाच आजून एक प्रसंग:
एकदा खासा शाहू महाराजांना स्वारीसाठी हत्तीची गरज पडली. महाराजांजवळ खाशा स्वारीचे बरेच हत्ती होते. परंतु अलीकडे महाराज फार अशक्त झाले होते. त्यांचे स्वारीचे हत्ती हे फार दणादण चालणारे असल्यामुळे त्यावर बसून त्यांस त्रास होऊ लागला. ह्याचवेळी नानासाहेब साताऱ्यास आले होते. त्यांना शाहू महाराजांनी आज्ञा केली कि 'पेशव्याकडून आमच्या स्वारीलायक हत्ती ताबडतोब पाठवून द्या.'
ह्या पत्रात नानासाहेब; बाजीरावास आणि चिमाजीअप्पास शाहू महाराजांस हत्तीची किती निकड आहे ते सांगतो आहे. नानासाहेबाने साताऱ्याहून लागलीच बाजीराव व चिमाजीअप्पास पुण्यास पत्र लिहिले कि, " स्वामींनी आम्हास आज्ञा केली कि आमचे खासा स्वारीस व महालचे ( महालची म्हणजे शाहू महाराजांच्या राणीसाहेबांसाठी ) स्वारीस हतनी दोन बसावयास नाहीत. आमचे हत्ती आहेत. परंतु आमचे स्वारीयोग्य अथवा महालचे स्वारीयोग्य गरीब नाहीत. यास्तव तुम्हास (म्हणजे पेशवे यास) दोन हत्तिणींविषयी लिहिणे. आमची व महालची स्वारी या दोन्ही नाजूक. दोन्ही स्वारीकडे गरीब हतनी पाहिजेत. त्या आणिक कोणी मेळवून देतो ऐसे नाही. तुम्ही पेशवे आहात. तुम्ही दोन हतनी गरीब आमच्या व महालच्या स्वारीस आणून देणे. निदान पैका मागाल तरी देऊ असे बोलिले. तरी स्वामींच्या चित्तांनरूप होईल तरी हतनीची
तरतूद करावी."
बरं नुसता हत्तीचं देऊन चालायचं नाही तर त्या बरोबर त्याचा माहुतही द्यावा लागत असे. महाराजांची मागणी आल्यावर पेशव्यांना मुकाट्याने स्वतःजवळच्या दोन हतनी साताऱ्यास शाहू महाराजांकडे पाठवून द्याव्या लागल्या.
आजून एक किस्सा सांगतो.
पेशव्याजवळ 'तख्तगौरी' नावाची एक हत्तीण होती. तिची शाहू महाराजांनी स्वतःसाठी मागणी केली. व आजून एक हत्तीण मुरारजी गायकवाड ह्यांसही द्यावी असे फर्माविले. पेशव्यास मोठा पेच पडला. पुण्यास पेशव्याजवळ हत्ती व हतनी होत्या. परंतु त्यांपैकी काहीही देण्यास पेशवे मनात नाखूष असत. पण छत्रपतींची आज्ञा.
मुरारजी गायकवाडांना हत्ती देण्याखेरीज काही पर्याय नाही असे पाहिल्यावर चिमाजी अप्पाने नानासाहेबांस कानमंत्र दिला कि, " असो. तुम्ही हतनीच्या माहुतास एकांती बोलावून आणून हतनी व हत्तीची गोष्ट पुसणे. हतनी व हत्ती मध्ये जो हत्ती निरस, म्हातारी असेल ते मुरारजी गायकवाडांस देणे. छत्रपतींना 'तख्तगौरी' हत्तीण तर द्यावीच लागेल. तेंव्हा तुम्ही साताऱ्यास स्वामींकडे जाल तेंव्हा बरोबर घेऊन जाणे."
पण पेशव्याने ह्यातही लबाडी केली ज्यामुळे शाहू महाराज पेशव्यावर भयंकरच चिडले.
झाले असे कि पेशव्याजवळ 'लक्ष्मी' नावाची एक व 'तख्तगौरी' नावाची एक, अश्या दोन नामांकित हतनी होत्या. त्यांपैकी 'तख्तगौरी' शाहू महाराजांस हवी होती. पण
पेशव्याने दुसरीच 'लक्ष्मी' नावाची हतनी रहमान नावाच्या माहुताबरोबर साताऱ्यास पाठवून दिली.
हतनी पोहचल्यावर महाराजांनी चौकशी केली असता त्यांना वरील फसवेगिरी उघडकीस आली तेंव्हा त्यांनी रागारागाने ती 'लक्ष्मी' नावाची हतनी आणि पूर्वी एकदा पेशव्याने दिलेली आजून एक हतनी अश्या दोन हतनी पेशव्यास परत पाठवून दिल्या. प्रकरणाचा बोभाटा झाल्यामुळे खजील होऊन पेशव्यास ह्या प्रकरणामुळे लाज वाटून माफी मागण्यासाठी साताऱ्यास जावे लागले.
दयाबहादूरच्या स्वारीच्या वेळेस चिमाजीअप्पाला जी मोठी लूट मिळाली होती त्यात बरेच हत्तीही मिळाले होते. त्यात एक 'गजराज' नावाचा हत्ती होता. लुटीच्या वाटणीत हा हत्ती सरदार पवारांकडे गेला. हे जेंव्हा बाजीरावाला कळले तेंव्हा त्याने चिमाजीअप्पास पत्र लिहिले कि, " 'गजराज' नावाचा हत्ती कोणास न देणे. 'गजराज' हत्ती पवारांपासून तजविजीने बसावयास अगर निशाणास म्हणून अगत्य मागून घेणे. आम्ही लिहिलेसे पवारांस कळों न द्यावे. "
म्हणजे बाजीराव गुपचूप चिमाजीस पत्र पाठवून काहीही करून हत्ती पवारांकडून घेण्याचा आग्रह करत होता.
लुटीच्या वाटणीत मिळालेला 'गजराज' हत्ती पवारांनी पेशव्यास दिला का?
नाही. हत्ती दिल्याचा पुरावा उपलब्ध नाही. ह्या अर्थी तो हत्ती दिला नसावा.
टिपूवरील मराठ्यांच्या मोहिमेत हरिपंत फडके व निजाम ह्यांची एका ठिकाणी समारंभपूर्वक भेट झाली. ह्या भेटीत मराठ्यांतर्फे निजामास एक हत्ती नजर करण्यात आला. पण निजामाने तो हत्ती न घेता मराठ्यांचा 'हनवंतगज' हाच हत्ती पाहिजे असा हट्ट धरला होता.
राक्षस भुवनच्या लढाईच्या वेळेस राघोबादादांचा हत्ती निजामाने पळवून नेला. राघोबादादाला काही त्या हत्तीशिवाय चैन पडेना. " तो हत्ती आणून देईल त्यास मागाल ते बक्षीस देऊ " असे राघोबादादाने सरदारांस सांगितले.
सरदार शितोळे हे निजामाकडून हत्ती आणण्यास तयार झाले. पण शितोळे सरदारांनी राघोबास एक अट घातली कि ; "आम्हास तुमचा 'बसता' नावाचा हत्ती दिला पाहिजे. "
'बसता' हत्ती हा पेशव्यांचा खास स्वारीचा हत्ती. राघोबादादा संकटातच सापडला.
पण निजामाकडून गेलेली आब्रू परत मिळविण्यासाठी तो शितोळ्यांस 'बसता' हत्ती देण्यास तयार झाला. शेवटी शितोळे सरदारांनी पराक्रमाची शर्थ करत राघोबाचा निजामाने पळवून नेलेला हत्ती परत आणला.
शितोळ्यांचे हे शौर्य पाहून राघोबाबरोरच माधवरावानेही त्याचा 'रामबाण' नावाचा हत्ती शितोळ्यांस बक्षीस दिला.
आता शेवटचा एक किस्सा सांगतो आणि थांबतो.
१७२४ साली कंठाजी कदम व त्यांचा भाऊ राघोजी कदम यांच्या साहाय्याची पेशव्यास फारच नितांत गरज होती. पेशव्याने कदमांस सांगितले कि "तुम्हास पाहिजे तो सरंजाम
देऊ पण तातडीने तुमची फौज घेऊन येणे."
सरंजामाचा वायदा ठरल्याप्रमाणे कदम तयार झाले.
पिलाजी जाधवांमार्फत पेशव्याने कदमांकडे सरंजाम पोचता केला. पण ह्या ठरलेल्या सरंजामात एक हत्ती होता. तो मात्र दिला नाही.
ह्यावरून कंठाजी कदम हत्तीसाठी अडून बसले. बरीच घासाघाशी झाली. बाजीरावाच्या मनात निजामाकडून एखादा हत्ती मिळवून तो कदमांस द्यायचा विचार होता.
पण कदमही हट्टी. त्यांस पेशव्याचाच हत्ती पाहिजे होता. शेवटी पेशव्यांनी कदमांच्या हट्टापुढे शरणागती पत्करून त्यांस हवा तो हत्ती दिला आणि कदमांनीही आपली फौज पेशव्यास मदतीस पाठवून दिली.
तर असे हे 'हत्तीवरून राजकारण.'
लेख कसा वाटला ते जरूर सांगा.
लेखन विश्रांती.
श्री भवानी शंकर तत्पर
सतीश शिवाजीराव कदम निरंतर
☀🔥⛳|| हर हर महादेव, जय श्रीराम ||
|| जय भवानी, जय शिवाजी....||⛳🔥☀

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...