


वाकी, ता. आष्टी, येथील वाकेश्वर शिवमंदिर
-----------------
-----------------
सतीशकुमार सोळंके देशमुख,
@..............

सीना नदीच्या पूर्व तीरावर वसलेल्या वाकी, ता. आष्टी या बीड जिल्ह्यातील गावात अकराव्या बाराव्या शतकातील निर्मित भगवान शिवाचे हेमाडपंथी मंदिर आहे. मंदिराचे निर्माण सार्वभौम चक्रवर्ती सम्राट दख्खनाधिपथेश्वर षष्ठ विक्रमादित्य या उत्तरकालीन कल्याणच्या साळुंखे चाळुक्य नरेशाच्या शैलीतील निर्मित आहे. ज्या राजाने वडील आणि मोठ्या भावासोबत राज्य केल्यानंतर वयाच्या एकतिसाव्या वर्षी चाळुक्यांच्या गादीवर येऊन अनेक पराक्रमी इतिहास रचत संपूर्ण दख्खनावर तब्बल ५१ वर्षाचे स्थिर शासन करीत धर्मराज्य केले होते.
षष्ठ विक्रमादित्याचे एक नाव हेमाद्री (हेम्माडी) होते. त्याचा पराक्रम आणि त्याने तब्बल ५१ वर्ष स्थिर शासन करून रचलेले अनेक पराक्रमी इतिहास; यामुळे त्याच्या पुढील काळातील मुलांकडील आणि मुलीकडील अनेक नातवांची नावे हेमाद्री असलेली पहावयास मिळतात. या ठिकाणी हे सांगण्याचा उद्देश एवढाच, की काही इतिहासकारांनी साळुंखे चाळुक्य नरेश षष्ठ विक्रमादित्याच्या मंदिर निर्माणाचे हे क्रेडिट, विटावर विटा मांडण्याचा कसलाही अभिलेखिय पुरावा नसलेल्या दुसऱ्याच कोण्या हेमाद्रीला केवळ पंत आहे म्हणून द्यावे, हे ऐतिहासिक दुर्दैव वाटते. या कुभांडाला साकार करण्यासाठी इतिहासकारांनी मंदिर निर्माणाचा हा इतिहास दीड-दोनशे वर्षांनी पुढे सरकवण्याचा खटाटोप करावा हे इतिहासाचा गळा घोटण्यासारखे दिसते!
संपूर्ण दख्खनाचे सम्राट म्हणून दीर्घकाळ लौकिक असणाऱ्या बदामीच्या राजे साळुंखे चाळुक्यांनी डोंगरांच्या एकाच कातळ खडकात लेण्या खोदून असंख्य लेणी मंदिरांच्या निर्मिती केल्या. खरं तर याच चाळुक्यांनी दगडाच्या मंदिराची स्थापत्य शैली प्रथमतः आत्मसात करून आणि त्यासाठी गदग, ऐहोळे वगैरे ठिकाणी मंदिर निर्माणाच्या कार्यशाळा उभ्या केल्या. या कार्यशाळेच्या ठिकाणी स्थपती, कारागीर, शिल्पी, मजूर यांच्या प्रगत टोळ्या करून या डोळ्यांना त्यांनी आपल्या संपूर्ण दख्खन राज्यात फिरवून अनेक मंदिरे निर्माण केली. बदामी चाळुक्यांचे थेट वारसदार असलेल्या उत्तरकालीन कल्याणच्या राजे साळुंखे चाळुक्यांनी त्यांचाच कित्ता गिरवत संपूर्ण दख्खनभर शेकडो हजारो मंदिरांच्या निर्मिती केल्या. हे शाश्वत सत्य असताना उगाचच या इतिहासाची मोडतोड करून त्याची ढकलाढकली केवळ 'पंत' आहे म्हणून कोणा दुसऱ्या हेमाद्रीच्या नावावर करावी चीड आणण्याजोगे वाटते!
उत्तरकालीन कल्याण साळुंखे चाळुक्य राजवंशातील षष्ठ विक्रमादित्य याने चाळुक्यांच्या मंदिर निर्माण शैलीत बदल करून दगडांच्या फिनिशिंगवर अधिक लक्ष केंद्रित केलेले दिसते. यामुळे इ.सन १०७५-७६ ते ११२६ या विक्रमादित्य उर्फ हेमाद्री (हेम्माडी) च्या ५१ वर्षाच्या कालावधीत त्याचे हातून निर्माण झालेल्या शेकडो-हजारो मंदिरांना हेमाडपंथी मंदिरे म्हटले जाते. मात्र इतिहासकारांनी मारून मुटकून कोण्या 'पंत' असलेल्या हेमाद्रीला दीड दोनशे वर्षांनी मंदिर निर्माणाचा हा इतिहास पुढे ढकलत क्रेडिट द्यावे हे हसण्याजोगे वाटते.
वाकी तालुका आष्टी येथील सीना नदीच्या काठावर असलेल्या वाकेश्वर मंदिराचे निर्माण षष्ठ विक्रमादित्याच्या शैलीतील दिसते. वाकी येथील हे मंदिर शिल्प शैलींनी युक्त नसले, तरी या ठिकाणी राजे साळुंखे चाळुक्यांच्या मंदिर निर्माण शैलीतील अनेक वैशिष्ट्ये (टोटैम्स) आहेत. हे मंदिर चाळुक्यांच्या नित्याच्या समतल छत प्रकारातील निर्मित आहे. मंदिराचे निर्माण उंच जोत्यावर अधिष्ठित असून, प्रवेश मंडप, सभामंडप (नवरंग मंडप), अंतरंग आणि गर्भगृह अशी मंदिराची रचना आहे. मंदिराचा प्रवेश मंडप काळाच्या ओघात नष्ट झाला आहे. मंदिरासमोर नंदी मंडप असावा, मात्र तो पण काळाच्या ओघात पूर्णतः नष्ट झाला आहे. मंदिरातील प्राचीन नंदी काळाच्या ओघात नष्ट झालेला असून त्याऐवजी मंदिराच्या सभामंडपात नवीन नंदी ठेवलेला दिसून येतो. एवढेच नाही तर मंदिराच्या गर्भगृहातील मूळ वाकेश्वर शिवलिंगाऐवजी या ठिकाणी नवीन शिवलिंग ठेवलेले असल्याचे लक्षात येते. सध्याचे हे हेमाडपंथी मंदिर वीस खांबावर उभे आहे.
वाकेश्वर मंदिराच्या दक्षिणेकडून पूर्वीच्या काळी बहुतेक करून विष्णू मंदिर असावे, मात्र या मंदिराला ढासळून त्या जागेवर मंदिराचा पूर्णतः नव्याने जीर्णोद्धार करण्याचे काम सुरू आहे. हे काम महानुभव पंथाच्या वतीने सुरू आहे. कारण वाकी हे सध्या महानुभाव पंथाचे तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपाला आलेले क्षेत्र दिसते. या ठिकाणी तेराव्या शतकाच्या मध्यात अथवा उत्तरार्धात महानुभाव पंथाचे मुख्य प्रवर्तक श्री चक्रधर स्वामींनी एक महिना आणि तीन दिवस वास केलेला आहे. म्हणून वाकेश्वर मंदिर आणि त्याच्या दक्षिणेकडून असलेल्या प्राचीन विष्णू(!) मंदिरावर सध्या महानुभाव पंथीयांचा हक्क असल्याचे दिसून येते!
वाकेश्वर मंदिराच्या भिंती जीर्ण झाल्या असून त्या कोणत्याही क्षणी ढासळण्याच्या स्थितीत आहेत. तर वाकेश्वर मंदिराच्या दक्षिणेकडून असलेल्या चाळुक्य निर्मित प्राचीन विष्णू मंदिराचे काहीच स्तंभ आणि एखाद दुसरी द्वाररक्षक पट्टी जशास तसी ठेवून उर्वरित मंदिराचा पूर्णपणे नव्याने जीर्णोद्धार सुरू आहे. यामुळे जुने मंदिर उकलल्याने त्याच्या निघालेल्या मोठमोठ्या शिळांचे ढिगारे मंदिराच्या आजूबाजूला इतस्ततः विखुरलेले पाहावयास मिळत आहेत. वाकेश्वर मंदिराकडेही यापुढील काळात दुर्लक्ष झाल्यास त्या ठिकाणीसुद्धा येणाऱ्या काळात एखादे नवीन मंदिर दिसले तर नवल वाटू नये!
------------
मार्गदर्शक :
------------
प्रोफेसर डॉ. नीरज साळुंखे,
(Dr. Neeraj Salunkhe ),
असोसिएट प्रोफेसर,
पीएचडी गाईड,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा यूनिवर्सिटी औरंगाबाद.
------------
@
सतीशकुमार सोळंके-देशमुख,




सिद्धीविनायक कॉलोनी गेवराई,
ता. गेवराई, जि. बीड


No comments:
Post a Comment