विनोद जाधव एक संग्राहक

Saturday 28 August 2021

सेखोजी आंग्रे

 

२८ ऑगस्ट इ.स.१७३३.

सेखोजी आंग्रे यांचा स्मरणदिन ॥•
छत्रपती शिवाजी महाराजांच्या तालमीतच तयार झालेल्या कान्होजी आंग्रे यांनी आपल्या कारकिर्दीत भारताच्या संपूर्ण पश्चिम समुद्र किनारपट्टीवर मराठ्यांचा दरारा निर्माण केला. इ.स.१७२९ मध्ये कान्होजींच्या मृत्यूनंतर त्यांच्या ६ मुलांपैकी ज्येष्ठ पुत्र सेखोजी उर्फ जयसिंगराव हे मराठा आरमाराचे प्रमुख म्हणजे "सरखेल" झाले. त्यावेळी सेखोजींचे वय होते अवघे २४ वर्षे. आपल्या पित्याप्रमाणेच सेखोजी अत्यंत शूर व कडक शिस्तीचे होते. परंतु दुर्दैवाने ते अल्पायुषी ठरले.
कान्होजींच्या मृत्यूमुळे आतापर्यंत दबून राहिलेले इंग्रज, पोर्तुगीज, डच, सिद्दी, वाडीकर सावंत व इतर स्वकीय शत्रू देखील मराठ्यांचे आरमार संपविण्यासाठी टपून बसले होते. या सर्वांशी सेखोजींनी अत्यंत चलाखीने लढा दिला. सेखोजींनी छत्रपती थोरले शाहू महाराज व श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांच्याशी सलोख्याचे संबंध ठेऊन या सर्वांशी कडवी झुंज दिली. शिवाजी महाराजांपासून आपला पिढीजात वैरी असणाऱ्या सिद्दीला सेखोजींनी सळो की पळो करून सोडले. सिद्दीकडे असणारा कोकणातील बराचसा प्रांत जिंकून घेण्यात आला. स्वराज्याची राजधानी असणारा रायगड किल्ला त्यावेळी सिद्दीच्या ताब्यात होता. तो देखील छत्रपती, पेशवे, प्रतिनिधी व आंग्रे यांनी एकत्रीत व्यूहरचना करून जिंकून घेतला. सिद्दीच्या जंजिऱ्यावर देखील चौफेर हल्ला करण्यात आला. या सर्व मोहिमांमध्ये सेखोजी आंग्रेंसोबत त्यांचे बंधू व त्यांच्या आईने देखील हिरीरीने सहभाग घेतला होता.
सततच्या मोहीमा व दगदगीमुळे दि.२८ ऑगस्ट १७३३ रोजी वयाच्या अवघ्या २८ व्या वर्षी सेखोजी आंग्रे यांचे निधन झाले. त्यांना आणखी आयुष्य लाभले असते तर मराठ्यांचे आरमार अखंडही राहिले असते आणि बलिष्ठही झाले असते.
शिवरायांच्या काळी ज्या परकीय सत्ताधाऱ्यांकडून आपल्या जहाजांना परवानगी घ्यावी लागत असे, त्याच परकीयांना आता परवाने घेणे आंग्र्यांनी बंधनकारक केले होते. त्यामुळे चिडलेल्या यूरोपियनांनी अनेकवेळा आंग्रे व त्यांचे आरमार संपविण्याचा प्रयत्न केला. मात्र ते त्यांना कधीही शक्य झाले नाही. वास्तविक पाहता त्यावेळी इंग्रज, पोर्तुगीज, डच हे समुद्रावरील अनभिषिक्त सम्राट होते. त्यांच्याशी समुद्रावर लढा देणे, ही बाब फार कठीण होती. यामुळे हे युरोपीयन आंग्रेंना "पायरेट" (समुद्री चाचे) म्हणू लागले. आपल्याच समुद्रावर संचार करण्यासाठी या परकीयांची परवानगी घ्यावे लागणे म्हणजे एकप्रकारची गुलामगिरीच होती. आणि ती गुलामगिरी दर्याराज आंग्रेंनी साफ धुडकावून लावलेली होती.
शिवरायांनी जागवलेली "स्व"राज्याची ज्योत सेखोजी उर्फ जयसिंगराव आंग्रे यांनी समुद्रावर देखील तेवत ठेवली.
अशा या कालौघात विस्मरण झालेल्या अपराजित सागरी सेनानीस त्रिवार मुजरा...

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...