विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday 21 September 2021

पंत अमात्य बावडेकर यांचा वाडा.. (गगनबावडा, कोल्हापूर महाराष्ट्र)

 



पंत अमात्य बावडेकर यांचा वाडा.. (गगनबावडा, कोल्हापूर महाराष्ट्र)
हे ठिकाण म्हणजे तब्बल पाच छत्रपतींचा पराक्रमी कार्यकाळ पाहिलेले हुकुमतपनाह रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांचा २५० वर्षापूर्वीचा वाडा.
आज जरी वाड्याचे अस्तीत्व संपलेले असेले तरी तिन फुट उंचीचे भव्य दगडी चौथरे बऱ्यापैकी अस्तीत्वात असलेला नगारखाना पाहीले की शिवशाहीतील कर्तुत्ववान व्यक्तीमत्व रामचंद्रपंत अमात्य यांची मुर्ती डोळ्यासमोर उभी राहते. अशा या थोर व्यक्तीमत्त्वच्या कार्यकर्तुत्वाचा इतिहास साठवून उभा असणारा १०० बाय १०० फुटांचा दुमजली भव्य वाडा भक्कम खांब,तुळया व वासे तक्तपोशी आणि मातीच्या पक्क्या विटांच्या भिंती आणि भाजक्या पन्हाळी कौलासह एखाद्या डौलदार एअरावता प्रमाणे उभा होता. समोर आपले अस्तित्व टिकून असलेल्या नगारखाना पाहिल्यावर पंतांच्या अमात्य पदाची शान लक्षात येते. दोन चौकाचा वाडा जंगली लाकूड आणि पांढरा मातीच्या विटांनी बांधला गेला असावा हे वाड्याच्या आजच्या अवशेषांच्या वरून दिसुन येते. भक्कम घडीव दगडांचे तीन फुटी उंचीचे जोते हे तत्कालीन बांधकामाचा उत्कृष्ट नमुनाच म्हणावा लागेल. आज जरी वाड्याचे अवशेष शिल्लक असले तरी त्यावरून वाड्याच्या भव्यतेची कल्पना येते. सुमारे एक हजार चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या या वाड्यात तत्कालीन काळात बावडा जहागीरीचा कारभार चालत असे. घडीव दगडांचा एका चौथऱ्यावर बसून प्रशासन दरबार न्यायदान चालत असे वाड्याच्या मध्यभागी देवघर होते. त्यात समर्थ रामदासांनी रामचंद्रपंत यांना दिलेली सोन्याची रामपंचायतन रघुवीर होती. अलीकडे इमारत धोकादायक झाल्यामुळे उतरविण्यात आली आहे.( तत्कालीन काळातील एक जुना फोटो खाली देत आहोत या वरून वाडा कसा होता हे चित्र स्पष्ट होईल)
लाल मातीच्या कच्च्या सडकेवरून दुतर्फा लावलेल्या गर्द झाडीतून वाड्याच्या मुख्य गेट जवळ येऊन पोहोचतो. हा वाडा तर सगळ्यांनाच माहीत आहे. भरत जाधव यांचा मराठी चित्रपट पछाडलेला प्रदशिर्त झालेपासुन या वाड्याला भेट देणाऱ्या लोकांची संख्याही वाढु लागली. आज हि भेट देणार्यांची संख्या गेटच्या बाहेर लावलेल्या गाड्यांवरून लक्षात येत होते. ब्रिटिश अमदानीत १९३५ साली बांधला गेलेला हा नवीन वाडा "माधवबाग कॅम्प" या नावाने ओळखला जातो. हा वाडा चुनामिश्रित बांधकामात बांधला गेला असुन लोडबेअरिंग पद्धतीचे त्याचे बांधकाम पाहिल्यावर आपण थक्क होतो. पंचवीस खोल्यांच्या या दुमजली हवेलीत दोन प्रशस्त दिवाणखाने आहेत. बंगल्याचे बांधकाम हे अतिशय मजबूत असून सागवानी लाकडाचे रिक्यू फर्निचर, शिसवी दरवाजे, खिडक्या, तक्तपोशी, काम सज्जे आणि विशेषत: त्याचे छत हे बंगलोरी कौलांचे आहे. त्याच्या रचनेचे वैशिष्ट्ये आपल्या नजरेत भरते आणि रुबाबदार खानदानी पगडीधारी विद्वतेचे तेज दाखवणाऱी बावडेकर अमात्यांची पिढी आपल्या डोळ्यासमोर उभी राहते.
बावडेकरांची सध्याच्या पिढीचे वास्तव्य इथेच आहे. या वाड्याचे सध्या संग्रहालयात रुपांतर करण्यात आलेले आहे. वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ सुरक्षारक्षकांची चौकी आहे. इथुनच संग्रहालय पाहण्याकरीता प्रति व्यक्तिस तिस रुपये देऊन तिकीट घ्यावे लागते. पंत अमात्य बावडेकरांचा इतिहास, बावडा जहागिरीची माहिती, त्यांच्या काळातील भांडी, वाड्याचं बांधकाम चालू असतानाचे फोटो, तलवारी, भाले, झुंबर, तोफा, शूटिंग झालेल्या चित्रपटांचे पोस्टर, मराठेशाहीच्या पगड्या, सारीपाटाचा डाव, भातुकलीचा खेळ, बुद्धिबळाच्या सोंगट्या, करवीर रियासातीमधील संस्थानिकांच्या मुद्रा आणि बरंच काही पाहण्यासारखं आहे. पण मधील फोटो घेण्यास मनाई आहे.
अशा या वैभवशाली इतिहास लाभलेली ऐतिहासिक वास्तू नक्कीच एकदा वेळ काढून पाहून या...!

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...