देवासच्या पवारांचा इतिहास (थोरली पाती)
भाग -२
धार देवास या पवारांच्या संस्थानांची बीजे पवार सरदारांच्या याच पराक्रमामुळे रोवली गेली .
औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुगल सत्तेला मराठ्यांचे हादरे मोठ्या प्रमाणात बसू लागले. मुगल बादशहा बहादुर खान याच्या काळात झुल्फिकारखान दक्षिणेच्या सहा सुभ्यांवर सुभेदार होता ; त्याला मराठ्यां बरोबर सहकार्याचे धोरण ठेवणे पसंत होते. जे मराठे सरदार शाहू महाराजांचे वर्चस्व मान्य करतील , त्यांना सहा सुभ्यांतून चौथाई द्यावी असे झुल्फीकार खानाने आपला दक्षिणेतील कारभारी दाऊदखान पन्नी यास फर्माविले होते. पुढे झुल्फिकार खानाचा वध झाल्यावर दाऊद खानाची रवानगी गुजरात मध्ये झाली होती , तेव्हा मुघलांनी मराठ्यांना ही चौथाई देणे बंद केल्याने चौथाई वसूल करण्यासाठी दक्षिणेतील मुगल सरदार बरोबर युद्ध करणे भाग पडले.
याच काळात सय्यद अब्दुल्ला व सय्यद हुसेन अली या सय्यद बंधूंच्या मदतीने फारुखसियार दिल्लीच्या तख्तावर आरुढ झाला. फारुखसायारने १७१३ पासून १७१९ पर्यंत राज्य केले. सन १७१८ मध्ये मराठ्यांनी दिल्लीचे राजकारण प्रत्यक्ष हाती घेतले या कामगिरीत पवार घराण्यातील कृष्णाजीराव-विश्वासराव , उदाजीराव , तुकोजीराव , आनंदराव या प्रमुख पुरुषांची कामगिरी नेत्रदीपक होती.
सन १७१५ च्या एप्रिल महिन्यात सय्यद हुसेन अलीला दक्षिणेचा सुभेदार म्हणून नेमले . तेव्हा मराठा सरदारांनी चौथाई वसूल करण्यासाठी मोगलांच्या ताब्यात असलेल्या खानदेश, गुजरात, माळवा या प्रांतावर स्वाऱ्या करण्यास प्रारंभ केला. याप्रसंगी छत्रपती शाहू महाराजांनी पन्नास हजाराच्या फौजेसह जे मराठा सरदार पाठवले होते त्यामध्ये पवार विश्वासराव हे होते. हे पवार विश्वासराव म्हणजे काळोजी पवार.या युद्धात काळोजी पवारांनी जो पराक्रम केला त्याचे वर्णन एका वीर गीतात खालील प्रमाणे आहे .
"कालू कर लिन्हो कबज बंकट धरा बराड ।
मारी दल मुगलानकी , रोपी अनहद राड ।।"
मुघलांच्या मुलुखांवर चालू असलेल्या स्वार्यांमध्ये पवार घराण्यातील काळोजी पवार यांच्याबरोबर त्यांचे पुत्र तुकोजीराव व कृष्णाजीराव तसेच संभाजीराव पवार यांचे पुत्र उदाजीराव व मालोजी पवार हे होते. या पवार सरदारांनी केलेल्या पराक्रमामुळे इसवीसन १७१६ च्या एका राजपत्रात उदाजीराव,तुकाजीराव व कृष्णाजीाव हे सर्व सेनापंचसहस्री तर मालोजी पवार हे सेनाबारासहस्री असे लिहिले आहे .
बादशहाने सय्यद बंधू विरुद्ध कारस्थाने केल्याने सय्यद हुसेन अली मराठे व मोगल बादशहा अशा दुहेरी संकट संकटात सापडल्याने त्याने शाहू महाराज व मोगल बादशहा मध्ये तह घडून आणला ; पण या तहातील अटी मोगल बादशहास पसंत पडल्या नाहीत.तदनंतर बादशहाने सय्यद बंधू मधला त्याचा वजीर सय्यद अब्दुल्ला यांचा नाश करण्यासाठी फौजांची जमवाजमव सुरू केली तेव्हा अब्दुल्लाने त्याच्या संरक्षणासाठी हुसेन अलीस दक्षिणेतून बोलावून घेतले. सन १७१८ च्या नोव्हेंबर महिन्यात हुसेन अलीने औरंगाबाद सोडले , त्याने तहात ठरल्याप्रमाणे मराठ्यांची अकरा बारा हजारांची फौज सोबत घेतली .या स्वारीत बाळाची पेशव्यां बरोबर जे निवडक सरदार होते त्यात केरोजी पवार , उदाजीराव , आनंदराव , कृष्णाजीराव तुकोजीराव ही पवार मंडळी आपल्या फौजेसह होती. मराठा फौजा २८ फेब्रुवारी १७१९ ला दिल्लीत पोहोचल्यावर बादशहाच्या फोजे विरुद्ध मराठा व सय्यद बंधू यांचे युद्ध झाले. सय्यद बंधूंनी बादशहाचा खून करून नवीन बादशहा रफीउद्दराजन याला तख्तावर बसवले.या युद्धात पवार सरदारांनी मोठा पराक्रम गाजवला. पवारांच्या सैन्यातले चारएकशे सैनिक जखमी झाले ; पण या युद्धाचा फायदा असा झाला की मार्च १७१९ मध्ये मराठ्यांना चौथाई , सरदेशमुखी व स्वराज्याच्या सनदा बादशहाकडून प्राप्त झाल्या.ही हक्कप्राप्ती छत्रपती शाहूंनी आखलेल्या राजकीय धोरणाचा पाया होय. यानंतर मराठ्यांची सत्ता हिंदुस्थानात पसरवण्यास सुरुवात झाली. या महत्त्वाच्या हक्क प्राप्तीच्या युद्धात ज्या मराठा सरदारांनी दिल्लीत पराक्रम गाजवले त्यात केरोजीराव , तुकोजीराव व कृष्णाजी राव यांची नावे प्रामुख्याने घेतली जातात.
(पवार सरदारांची नावे व आपसातील संबंध समजण्यासाठी वंशावळ पहावी)
महेश पवार
राजे धार पवार युवा सामाजिक प्रतिष्ठान.
No comments:
Post a Comment