विनोद जाधव एक संग्राहक

Thursday, 4 November 2021

*देवासच्या पवारांचा इतिहास (थोरली पाती)* भाग ३

 


*देवासच्या पवारांचा इतिहास (थोरली पाती)*
भाग ३
पोस्तसांभार ::
महेश पवार
राजे धार पवार युवा सामाजिक प्रतिष्ठान
*पवारांच्या माळवा प्रांतावरील व लढाया*
सन १७२३-२४ या दोन वर्षांमध्ये माळवा प्रांतावर ज्या स्वाऱ्या करण्यात आल्या त्यामध्ये तुकोजीराव , कृष्णाजीराव पवार विश्वासराव तसेच उदाजीराव व आनंदराव हे पेशव्यांबरोबर कामगिरीवर असल्याचा उल्लेख पंतप्रधानाच्या स्वारीच्या रोजनिशीत आहे.
१ ऑक्टोबर १७२४ रोजी निजाम व दक्षिणेचा सुभेदार मुबारीजखान यांच्यामध्ये सावखेडा येथे लढाई झाली . या लढाईत मराठ्यांनी निजामास मदत केली होती आणि मुबारीजखानाचा पराभव केला होता. या लढाईत तुकोजीराव पवार आपल्या फौजेसह होते आणि त्यांनी या लढाईत मोठा पराक्रम केला होता. या लढाईत त्यांच्या फौजेतील २५ लढवय्ये जखमी झाले होते.
*जुलै १७२४ मध्ये धार व झाबुवा या परगण्यांचा मोकासा पवार घराण्यास एकत्रित देण्यात आला.यावेळी पवार घराण्याचा विश्वासराव पदाचा सरंजाम एकूण ६३१५५०/- सहा लाख एकतीस हजार पाचशे पन्नास रुपये होता. हा सरंजाम काळोजी पवार , संभाजी पवार , मानाजी पवार , केरोजी पवार यांच्यात सामायिक विभागलेला होता.*
पुढे मराठ्यांनी माळव्यातील मुलखावर अंमल बसवण्याचे काम जोरात सुरू केले ,परंतु माळव्याचा सुभेदार गिरीधर बहाद्दर मराठ्यांना चौथाई व सरदेशमुखी चा अंमल देण्यास विरोध करू लागला; त्यामुळे १७२६ मध्ये मराठे व गिरीधर बहाद्दर यांच्यात लढाई झाली व या लढाईत गिरीधर बहाद्दर चा पराभव झाला. या लढाईत तुकोजीराव पवार व इतर मराठे सरदार होते.
पुढे तुकोजीराव पवार कोट्याकडे खंडणी मिळवण्यासाठी जात असताना पोटाजवळ चंदेलशी गाठ पडून त्यांची लढाई झाली, तेव्हा चंदलने रणांगणातून पळ काढला .तुकोजीरावांनी त्याचा पाठलाग सुरू केला असता त्यांच्या मदतीला आनंदराव यांचे सुपुत्र यशवंतराव पवार आले व ते चंदेलच्या समोर उभे ठाकले अशाप्रकारे चंदेल दोन पवारांच्या फौजेत सापडून चिरडला गेला. तुकोजीरावांनी चंदेल चा जरीपटका, चौघडा,सोन्या-चांदीचे हौदे, अंबारीसह हत्ती आणि इतर बराच मुद्देमाल लुटून घेतला.
*पालखेडची लढाई*
दक्षिणेचा सुभेदार निजामउल्मुक एक अतिशय धूर्त व राजकारणी होता. त्याने दक्षिणेतील आपला प्रतिस्पर्धी मुबारीजखानास मराठ्यांच्या मदतीने संपवले पण पुढे मराठ्यांना चौथाई व सरदेशमुखी देण्यास राजी होत नव्हता. त्याने करवीरकर छत्रपती संभाजी महाराज व चंद्रसेन जाधव यांच्याशी जुळवून घेऊन शाहू महाराजांना विरोध करणे सुरू केले .तेव्हा त्याचे परिपत्य करण्यासाठी शाहू महाराजांनी सर्व सरदारांना आज्ञापत्रे पाठवली.
मराठा सरदारांनी निजामाशी गनिमीकाव्याने लढायचे ठरवले. मराठा फौजांनी निजामाचे जालना,बुरहानपुर,गुजरात या ठिकाणी छापे घालून लुटालूट केली. पुढे निजामाबरोबर वैजापुर जवळ तुकोजीराव पवार व रायाजी जाधव यांची लढाई झाली परंतु यात मराठी फौजांना माघार घ्यावी लागली. दि.२५ फेव्रुवारी १७२८मध्ये औरंगाबाद पैठण यांच्यामध्ये असलेल्या पालखेड येथे मराठे व निजाम यांचे युद्ध झाले व त्यात निजामाचा पराभव झाला दि.६मार्च १७२८ रोजी मुंगी शेवगाव येथे निजामाने मराठ्यांशी तह केला. निजामाच्या अंमालाखाली असलेल्या वर्हाड परगणे, जळगाव येथील मोकासा तुकोजीराव पवार यांच्याकडे असल्याने त्यांनाच मोकासा चे अधिकार तहाप्रमाणे प्रधानाने दिले.
महेश पवार

No comments:

Post a Comment

राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला 🚩 भाग 9

  राजमाता जिजाऊसाहेब चरित्रमाला भाग 9 लखुजीराजे जाधवरावांची हत्या भातवडीच्या युद्धानंतर मलिक ...