विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 10 July 2022

फलटण संस्थान----------------३

 


फलटण संस्थान----------------३
मुधोजीराव

जगपाळराव पश्चात त्याचा प्रौढ मुलगा मुधोजीराव (दुसरा) फलटणचा अधिकारी झाला. त्याला दोन बायका असून वडील बायकोला साबाजीराव व जगदेवराव, आणि धाकटीला बजाजी राव व सईबाई अशीं मुलें होती. ह्या सावत्र मुलांत तंटे लागून ते विकोपास गेले. साबाजी व जगदेव हे दोघे घर सोडून मातुश्रीसह विजापुरास गेले. तेथें दरबारांत खटपट केल्यावर त्यांस दहिगांव व भाळवणी हे दोन गांव स्वतंत्र तोदून मिळले (१६३४). अशा रीतीनें निंबाळकरांच्या तीन स्वतंत्र शाखा झाल्या. ह्या गृहकलहामुळें जहागिरांचे नुकसान झालें. मुधोजीराव आजूबाजूस पुंडावे करूं लागला म्हणून त्यावर आदिलशहाची फौज चालून आली; त्याचा पराभव होऊन, आदिलशहानें त्यास बंडखोर ठरवून सातारच्या किल्ल्यावर कैदेत ठेविलें (स.१६३१). येथें तो सात वर्षें होता. त्या मुदतीत फलटणची जहागीर जप्त होती. मुधोजीनें आपली धाकटी बायको व तिची मुलें बजाजी व सईबाई यांस, आपल्याजवळ बोलावून घेतलें. पुढें शहाजी राजे विजापूरच्या नोकरींत राहिल्यावर त्यानें आपलें वजन खर्च करून मुधोजीची (१६३८) सुटका करविली. ह्या उपकारामुळें मुधाजीनें आपली मुलगी शिवाजी राजास दिली. (१६३९).
शिवाजी राजांनी पुढें जो स्वतंत्र होण्याचा उपक्रम चालविला त्यास मुधोजीचें साहाय्य होते ही गोष्ट विजापूरदरबारास खपत नव्हती. शिवाय मुधोजीच्या मनात असे होतें कीं, आपल्या पश्चात फलटणचा कारभार बजाजीस मिळावा. ह्या गोष्टीस त्याचे वडील मुलगे कबूल नव्हते. ते विजापुरची मदत घेऊन मुधोजीवर चालून आले. शिरवळनजीक भोळी येथें लढाई होऊन मुधोजी एका वडाच्या झाडाखाली पुत्राच्या हातून मारला गेला, त्यास बापमारीचा वड असें म्हणतात (इ.स.१६४४). ह्या लढाईंत बजाजीस कैद करून विजापुरास नेलें. तेथे बापाच्या अपराधाबद्दल त्यास जिवें मारण्याची आज्ञा झाली. परंतु आदिलशाहाच्या मुलीनें त्याला बाटवून त्याच्याशीं लग्न केल्याने त्याची शिक्षा रद्द झाली. बजाजी काहीं काळ विजापुरी राहिल्यावर देशमुखीनें फर्मान घेऊन फलटणास आला (१६५१). फलटणास अद्यापि बजाजीची समाधि (घुमट) आहे. त्यास पुढें जिजाबाईनें शुंभुमहादेवाच्या देवळांत प्रायश्चित्त देऊन परत जातींत घेतले आणि त्याचा मुलगा महादजी ह्यास शिवाजी राजाची मुलगी सखूबाई दिली.

No comments:

Post a Comment

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...