विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday, 17 August 2022

एक वतनदार पद पाटील

 


एक वतनदार पद
पाटील
पोस्तसांभार :: शुभम सरनाईक
मुळात पाटील ही पदवी किंवा उपाधी वगैरे नसून एक वतनदार पद होते.
नंतरच्या काळात पिढीजात पदं मिळू लागल्याने हा एक आदरणीय असा सामाजिक दर्जा झाला आणि त्या पदावर त्या समाजाची व्यक्ती नसतानाही तो दर्जाचा मात्र तिला मिळत असे. तेव्हा याबद्दल माहितीचा आढावा घेताना दोन प्रकारे घ्यावा लागेल तो म्हणजे
  • अधिकारी पद म्हणून
  • समाजातील आदरणीय लोकं म्हणून
अधिकारी पद म्हणून
एक आधिकारीक पद म्हणून बघितले असता लक्षात येते की हे पद जरी पूर्वापार असले तरीही याला स्थलकालपरत्वे वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या ठिकाणी विभिन्न नावं होती. आपल्याला या अधिकारी पदाशी संबंधित विविध नावं मिळतात ती अशी
  • ग्रामिक: हे नाव आपल्याला अगदीच जुन्या काळात बघायला मिळते. वैदिकोत्तर काळ, मनुस्मृती, वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध यांचे समकालीन मगधचे राजे बिंबिसार यांच्यापासून ते मौर्य, गुप्त, कुशाण इत्यादी सर्वांच्या काळात ग्रामिक हा ग्रामप्रमुख होता ज्यास उत्तर काळात काही ठिकाणी ग्रास्वामि, ग्रामभोजक म्हटले आहे.
  • ग्रामणी: महाराष्ट्राचा ज्ञात आद्य वंश म्हणजे सातवाहन वंश. या वंशातील प्रसिद्ध कवी राजा हाल याने आपल्याकाळी अनेक लोकांनी महाराष्ट्री प्राकृतात रचलेल्या गाथा संकलित करून बनवलेल्या गाथा सप्तशती किंवा गाथा सत्तसई ग्रंथानुसार सातवाहन राजवटीच्या काळी गावप्रमुख म्हणजे ग्रामणी असत. याव्यतिरिक्त पतंजली लिखित महाभाष्यात हा शब्द येतो.
  • ग्रामसमिक: इंडोग्रीक राजा मिनँडर ऊर्फ मिलिंद याच्याशी झालेल्या बौद्ध धर्माच्या चर्चेतून उत्पन्न मिलिंदपन्हात ग्रामप्रमुखास हा शब्द वापरला आहे.
  • समाहर्ता आणि पौर: मौर्यकाळात शहराचा प्रमुख पौर तर गावांचा समाहर्ता असे. यांच्या हाताखाली गोप आणि स्थायिक हे अधिकारी असत.
  • ग्रामकूट: गुप्त काळातील सौराष्ट्राच्या मैत्रक राजांच्या शिलालेखात हे नाव मिळते.
  • स्कंदग्राम: कल्हण पंडिताने इसवी सन ११४८-११४९ मध्ये काश्मीरचा समग्र इतिहास आपल्या ८ तरंगांच्या आणि जवळपास ८००० श्लोकांच्या राजतरंगिणीत लिहून ठेवला आहे. या ग्रंथाच्या पाचव्या तरंगात कल्हण नगरप्रमुखास स्कंदग्राम म्हणतात.
  • पाटील: या नावाची व्युत्पत्ती देताना इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे तर्क मांडतात की हा शब्द पट्टकीलक या संस्कृत शब्दावरून आला असावा, मौर्य सम्राट अशोकाच्या वेळीं कापसाचे विणलेले पट्ट लिहिण्याकरितां वापरत. जमिनीच्या मालकीची नोंद ह्या पट्टांवर करत आणि ते पट्ट कीलकांत (वेळूच्या पोकळ कांडांत) घालून सुरक्षित ठेवत. पट्टकील म्हणजे पट्ट ज्यांत ठेविले आहेत तीं वेळूचीं पोकळ कांडें. हे पट्टकील ज्याच्या ताब्यांत असत त्या गांवच्या ग्रामणीला पट्टकीलक म्हणत. त्यामुळे पट्टकीलक -> पट्टकील -> पट्टील/पट्कील -> पाटील अशी याची व्युत्पत्ती असावी. हे पद पूर्वी मराठी भाषिक सत्तांमध्ये रूढ होते ज्यामुळे कर्नाटकात आणि मध्यप्रदेश इत्यादी भागांमध्येही आपल्याला पाटील लोकं बघायला मिळतात. हे पद बहुतांश सर्वच समाजांमध्ये असले तरीही बहुधा या पदावर मराठा व्यक्तीची नियुक्ती होत असल्याने कालांतराने मराठा समाजास पाटील शब्द पर्यायी बनला आहे.
  • खोत: हे पद सहसा कोकणात बघायला मिळत. या पदाकडे पाटलांचे आणि त्यांचे सहाय्यक म्हणजे कुलकर्णी पदाचे सर्व अधिकार असत.
  • पटेल: पाटील आणि पटेल या शब्दांची पट्टकीलक -> पट्टकीक -> पट्टील/पट्कील -> पटेल उत्पत्ती अशी सारखीच असावी. पटेल हे नाव गुजरात, मध्यप्रदेश आणि उत्तरप्रदेशाच्या बऱ्याच भागात तसेच कर्नाटक आणि तेलंगणात काही प्रमाणात प्रचलित होते.
  • उरगौडा: कन्नड भाषेत उर/उरू म्हणजे गाव, बहुधा हा शब्द संस्कृतच्या पूर शब्दास बंधुभूत असावा. कर्नाटकात काही भागात महसूल गोळा करणाऱ्या व्यक्तीला गावुंड म्हणत जे नाव गाव या शब्दावरून आले आहे ज्याचा अर्थ संस्कृतमध्ये ग्राम. त्यामुळे या शब्दाचा गावुंड -> गावंडा -> गौडा असा इतिहास असणार. गावाचा महसूल गोळा करणारा प्रमुख म्हणून उर/उरू + गावुंड/गौडा अशी उरगौडा शब्दाची उत्पत्ती म्हणता येईल.
  • गावडा: हा शब्द गौडा या शब्दास बंधुभूत असून यांची उत्पत्ती सारखीच आहे. पूर्वी धनगरादिक पशुपालक लोकांचे फिरते तांडे असत जे पशूंसाठी चाऱ्याच्या शोधात दूरवर भटकत असत. या लोकांचा जो प्रमुख त्यास गावडा म्हणण्यात येत जो शब्द अर्थातच गावुंड -> गावंडा -> गावडा शब्दावरून आला असावा.
  • चौधरी: हे आपल्याकडे कृषि क्षेत्राशी निगडित पद असले तरीही हरियाणाच्या भागात पुढे हळूहळू या पदास पाटील पदाची कार्यं आणि प्रतिष्ठा मिळून ही पदं एकमेकांस पर्याय झाली. सहसा जाट या कृषक समाजाचे लोकं या पदावर असल्याने कालपरत्वे जाट लोकं आदरार्थी स्वतःस चौधरी म्हणवून घेऊ लागले आणि आता चौधरी हा शब्द जणू जाट समाजाचा पर्यायी शब्द बनला. या नावाबद्दल मी पूर्वी लिहिलेल्या उत्तराचा दुवा येथे देतो चौधरी .
  • ठाकूर: हा शब्द ठक्कुर या शब्दावरून आला ज्याचा अर्थ देव किंवा साहेब वगैरे अधिकारी. राजस्थान आणि उत्तर भारतात बहुतांश हा शब्द केवळ राजपूत समाजाचा पर्यायी शब्द बनला आहे तरीही बिहार, पूर्वांचल, छत्तीसगढ आणि महाराष्ट्रात हे पद इतरही समाजातील लोकांनी भूषविले आहे.
  • मोकादम/मुकद्दम: मुसलमानी रियासतींमध्ये हे पद आपल्याला बघायला मिळते, किंबहुना मुसलमान राजवटीच्या प्रभावामुळे मराठ्यांच्या हिंदवी स्वराज्यातदेखील पाटीलकीस पर्यायी म्हणून मोकादमी हा शब्द सर्रास वापरलेला दिसतो. मुघल आणि अगदी नंतर निजामाच्या काळापर्यंत हा शब्द प्रचलित होता. सांप्रत हा शब्द बहूअर्थी वापरला जातो.
समाजातील आदरणीय लोकं म्हणून
आता या दर्जाच्या विविध भागातील विशिष्ट समूहवर्गांबद्दल सांगायचे झाल्यास खालीलप्रमाणे नावं दिसतात
  • खंडायत: ओडिया भाषिक क्षत्रिय म्हणजे खंडायत, जसे उत्तर भारतात आणि महाराष्ट्रात राजपूत आणि मराठे असतात तसेच ओडीसात खंडायत लोकांकडे गजपती राजवट आणि नंतरच्या काळात नानाविध अधिकार होते. तेव्हा समाजात यांना विशेष दर्जा रहायचा.
  • कम्मा: तेलुगू भाषिक प्रदेशात कुतुबशाही काळात पूर्वीच्या नायक/नायडू असलेल्या कम्मा समाजाच्या लोकांची गावात सर्वोच्च अधिकारी म्हणजे चौधरी म्हणून नेमणूक होऊ लागल्याने या समाजाचा दर्जा गावात महत्वाचा असायचा. आज हे लोकं नायडू किंवा चौधरी ही आडनावं लावतात, किंबहुना चौधरी हा शब्द कम्मा लोकांना पर्यायी म्हणून वापरला जातो.
  • रेड्डी: हा तेलुगू भाषिक जमीनदार वर्ग होता, यांच्याकडे वतनी, मुलकी अधिकार नसले तरीही जमीनदारीमुळे हे लोकं वैभव संपन्न असतात.
  • वक्कळीगा: हा कन्नड भाषिक कृषकवर्ग मध्य आणि दक्षिण कर्नाटकात बहुसंख्य असून हे नावामागे गौडा लावतात ज्यावरून यांच्याकडे पूर्वी पुढारीपण होते हे स्पष्ट दिसते.
  • नायर: केरळ आणि तमिळनाडूच्या काही भागात हे लोकं दिसतात. नायर, नायकर, पिल्लई वगैरे आडनावं यांच्यात बघायला मिळतात.
  • पाटीदार: गुजरात आणि त्याच्या सीमेवरील माळवा, खान्देश इत्यादी भागात या लोकांची वस्ती मोठ्या प्रमाणावर आहे.
  • छेत्री: हे मूळचे नेपाळी भाषिक क्षत्रिय लोकं.
  • भूमिहार/बाभन: हे लोकं पूर्वांचल आणि बिहारच्या भागात बहुसंख्य असून हे स्वतःस त्रिकर्मी ब्राह्मण म्हणविणारे क्षत्रिय आहेत.
संदर्भ
इतिहासाचार्य विश्वनाथ काशिनाथ राजवाडे लिखित सर्वसामान्य शब्दनाम व्युत्पत्ती कोष
Dr. D. N. Jha लिखित Revenue system in post Mauraya and Gupta times चा डॉ देगलूरकर यांचा अनुवाद मौर्योतर व गुप्तकालीन राजस्वपद्धती
महामहोपाध्याय वासुदेव विष्णु मिराशी लिखित सातवाहन आणि पश्चिमी क्षत्रप यांचा इतिहास आणि कोरीव लेख
कल्हण लिखित आणि माधव व्यंकटेश लेले अनुवादित राजतरंगिणी
W. H. Moorland लिखित India at the death of Akbar चा सुनंदा कोगेकर यांचा अनुवाद अकबरकालीन हिंदुस्थान

No comments:

Post a Comment

क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10

  क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 10 औरंगजेबाचा बिदरला वेढा: २८ फेब्रुवारीला औरंगजेब बिदरच्या परिसरात पोहोचला आणि त्याने २ मार्चला बिदरच्या किल्ल्या...