विनोद जाधव एक संग्राहक

Sunday, 21 August 2022

पुरंदरचे किल्लेदार सरनाईक घराणे

 


पुरंदरचे किल्लेदार सरनाईक घराणे
पोस्तसांभार :शुभम सरनाईक
बहमनी साम्राज्याची दक्षिण भारतात तुघलकांची सत्ता झुगारून स्थापना झाली. पुढे सोळाव्या शतकात बहमनी राजवटीचे विघटनही झाले आणि अहमदनगरची निजामशाही, विजापूरची आदिलशाही, गोवळकोंड्याची कुतुबशाही, बिदरची बरीदशाही, इलिचपूरची इमादशाही अशी ५ राज्ये होऊन त्यांच्यात राज्य विस्तारासाठी संघर्ष सुरू झाला.
त्यावेळी पुण्याजवळचा प्रदेश काही काळासाठी बरीदशहाकडे आला होता पण त्याला तेथील स्थानीय लोकांपासून तो टिकवून ठेवता येत नव्हता. जो जायचा तो मार खाऊनच परतायचा अशी गत झाली होती. शेवटी बरीदशहाने बिदरच्या देशपांड्यांना ह्या प्रदेशातील किल्ले श्री पुरंदरची जबाबदारी दिली. या बिदरकर देशपांडे घराण्याचे आडनाव चंद्रस असे होते (हे इतिहासास ज्ञात या कुळाचे सर्वात जुने आडनाव). हे चंद्रस तिघे बंधू, त्यातील १ भाऊ मकरंदपंत चंद्रस पुरंदरावर गेला तथा त्याने गड जिंकून परिस्थिती सांभाळली. त्यामुळे त्यास त्या किल्ल्याची सरनाईकी/किल्लेदारी मिळाली. काही काळातच बरीदशाही बुडाली तसा हा प्रदेश निजामशाहीकडे आणि तीही बुडाल्यावर आदिलशाहीकडे गेला पण सरनाईकी याच घराण्यात चालू राहिली.
आदिलशाहीत पुरंदर किल्ला समाविष्ट झाला त्यावेळी तेथील किल्लेदार हे मकरंदपंत चंद्रस-सरनाईक यांचे पणतू महादजी नीळकंठ सरनाईक होते. महादजीपंतांचा गडावर तर गडाखाली त्यांचेच मित्र शहाजीराजे भोसले यांचा अंमल होता. श्री शिवछत्रपतींनी आयुष्यात पहिले रणांगण गाजवले (फत्तेखानाविरुद्ध इसवीसन १६४९ मध्ये, पुरंदरची लढाई) ते याच पुरंदरावर आणि तेही महादजीपंतांच्या अखत्यारीत.
महादजीपंत गेले आणि त्यांच्या पश्चात त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव नीळकंठ महादजी सरनाईक (इतिहासात यांना निळोजी नीळकंठराव म्हणून ओळखतात कारण निळोजींचे आजोबा नीळकंठराव कर्तृत्ववान असल्याने त्यांचेच नाव घराण्यास उपनाव म्हणून वापरत) किल्लेदारी चालवू लागले. निळोजींचे सख्खे बंधू शंकराजी आणि सावत्र बंधू त्र्यंबक, विसाजी यांना मात्र निळोजी कोणत्याही कामात वाटा देत नव्हते ज्यामुळे या तिघा भावांसमोर उपजीविकेचा प्रश्न उपस्थित झाला. हे बंधू सहसा बाहेरील जगास आपापसातील कलह दाखवत नसत पण आतून या भावांची एकमेकांबद्दल मतं अतिशय गढूळ झालेली होती.
१६६० च्या दशकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य यज्ञास गती मिळालेली होती आणि ते मावळ प्रांतातील एकेक गड घेत शुक्लपक्षीय चंद्रकलेगत स्वराज्याचा विस्तार करून भूमीवर सुराज्य स्थापन करत निघाले होते. आणि याच उद्देशाने त्यांनी एक पत्र लिहून पुरंदर आणि सोबतच सरनाईक बंधूंना आपल्या या महत्कार्यात सहभागी करून घेण्यासाठी प्रयत्न केला होता.
शिवाजी महाराज निळोजींना या पत्रात म्हणतात
दादो कोंडदेऊ आम्हाजवळ ठेऊन दिले होते. ते मृत्यु पावले. आता आम्ही निराश्रीत जालो. तुमचे व आमचे वडिलांचा बहुत घरोबा, स्नेह यास्तव आश्रयेखाली माचीस येऊन राहिलो तुम्ही सांगाल तैसी वर्तणूक करित जावू.
या पत्रात वरवर जरी महाराज "तुम्ही सांगाल तैसी वर्तणूक करित जावू " असे म्हणत असले तरीही त्यांचा गर्भित हेतू हा वेगळा होता. हा अंतस्थ हेतू ओळखणे सरनाईकांना जमले नाही आणि म्हणून उत्तर देताना निळोजींनी महाराजांना कळवले की
उत्तम आहे, घर आणि किल्ला तुमचा आहे. दुसरा विचार नाही आपण यावे.
आता महाराजांचे इप्सित पूर्ण होणार हे स्पष्ट दिसत असल्याने महाराज आपला कुटुंबकबिला घेऊन गडाच्या पायथ्याशी आले. तिथे निळोजींनी आपले बंधू शंकराजी यांना राज्यांच्या दिमतीला पाठवले. काही दिवसांनी एकदा शंकराजींने राजांची मर्जी संपादून आपले मनोगत महाराजांना सांगितले की
आमचे बंधू आम्हास वाटा देत नाहीत व काही कामकाज सांगत नाहीत. आता मी साहेबांजवळ आहे. माझा वाटा मला देववून वतनाचा तिजाई वाटा मिळावा.
आता सकळराजकार्यधुरंधर छत्रपती महाराजांना गड घेण्याची जणू एक गुरुकिल्लीच मिळाली होती. पावसाळा संपल्यावर दिवाळीच्या दिवसात महाराजांना एक संधी मिळाली जीची ते वाटच बघत होते. निळोजींनी दिवाळीसाठी बंधू शंकराजींंस गडावर बोलावले पण शंकराजी म्हणाले
आम्हास एकट्यास येता येत नाही राजांचा प्यार आम्हावर बहुत आहे व शहाजीराजे व आपला घरोबा बहुत होता त्याचे पुत्रास स्त्रीस टाकून कैसे यावे. यास्तव आलो नाही. आमचा मार्ग न पाहवा आम्ही येत नाही.
असे म्हटल्यावर मात्र निळोजींनी शंकराजींना प्रत्युत्तर दिले की
खरी गोष्ट आहे एकट्यास येता न येणे त्यास बोलावून जिजाऊ व शिवाजीराजे व दहा वीस लोकं मानकरी यांस आमंत्रणे सांगून घेऊन यावे आम्ही साहित्य करतो.
म्हणजे आता जणू पुरंदर किल्लाच महाराजांचा भाग्योदय करायला बोलावणे देत होता की या राजे आणि मलाही आपल्या राष्ट्रकार्यात, धर्मकार्यात सामावून घ्या. पण महाराजही आपल्या लोकांना सोडून दिवाळी साजरी करायला गडावर येण्यास तयार नव्हते, शेवटी जन्मदारभ्य रयतेचे राजे ते ! अखेर सर्व भावांने मिळून ठरवले आणि सांगितले
समस्त लोकांसुद्धा चलावे.
दुसऱ्या दिवशी राजे आपली सर्व मंडळी घेऊन पुरंदरावर पोहोचले, दिवाळीचे सर्व दिवस सुखासमाधानाने दोन्ही कुटुंबांनी एकत्र घालवले. नंतर एकेदिवशी रात्री शंकराजीपंत आणि त्र्यंबकपंत बंधू महाराजांकडे आले आणि निळोजींविरुद्ध महाराजांकडून सहाय्य करायला माणसं घेऊन गेले.
उभयबंधुंंनी विद्यमान किल्लेदार नीळकंठ महादजी सरनाईक (निळोजी नीळकंठराव) यांना कैद केले आणि आपल्याला किल्लेदारी मिळेल अश्या आशयाने राजांकडे पोहोचले पण महाराज एक द्रष्टे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी या दोघा बंधूंनाही त्यांच्या कलुषित अंतःकरण आणि विचारांमुळे अटक केली आणि तीन दिवसांनी सोडून स्वराज्याच्या सेवेत शिलेदार, सुभेदार, वकील वगैरे अश्या नाना पदांवर रुजू केले.
संदर्भ: शिवचरित्र साहित्य खंड ३, लेख ३९९

No comments:

Post a Comment

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...