विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 21 August 2022

चौधरी

 

चौधरी

पोस्तसांभार :शुभम सरनाईक 

हे एक ऐतिहासिक पद होते जे पुढे आडनाव झाले. जॉन प्लॅट्स यांनी या शब्दाची व्युत्पत्ती चक्रधारी-चक्कधारी-चवधरी-चौधरी अशी मांडली तर हिंदीशब्दसागर, गावगाडा ग्रंथांंमध्ये याची उत्पत्ती चतुर्धारी या संस्कृत शब्दापासून झाली असून याचा अर्थ चार चौधे धरणारा, सावरून धरणारा, चोहोकडून धरून आणणारा, गोळा करणारा असा सांगितला आहे.

महाराष्ट्रात पूर्वी बारा कारू/बलुतेदारांवर चौधरी नामक अधिकारी किंवा हक्कदार असत. बाजारभावात चढउतार होऊ न देता जनतेस अथवा शासनास, सैन्यास धान्याचा पुरवठा करून देणे हे याचे मुख्य कार्य असत. सरकारच्या हुकुमावरून चौधरी या भावांचे चढउतार नियोजित करत आणि त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करत. धान्याच्या साठ्याची, तसेच त्याच्या गावांतून निर्यात आणि आयातीची सर्व माहिती जमा करून संग्रही ठेवण्यास आणि शासनास पुरविण्यास चौधरी लोकं कटिबद्ध असायचे.

उत्तर भारतात बादशाही काळामध्ये हे पद चांगलेच दृढ झाले. पूर्व भारतातदेखील हे पद मुघळकाळातच प्रबळ झाले असावे. पुढे इंग्रजांनी या पदाचे महत्त्व वाढवत त्यांच्या सन्मानपात्र लोकांच्या नेमणुका या पदावर केलेल्या दिसतात. आजही राजस्थानच्या ढुंढार, उत्तरप्रदेश (विशेषतः पश्चिम भाग) आणि हरियाणा या जाटबाहुल प्रदेशात चौधरींना विशेष महत्त्व असल्याचे जाणवते, या भागात ग्रामीण पातळीवर निवाडे वगैरे करण्याची कामं पूर्वापार ही मंडळी ग्रामप्रमुख म्हणून करायची.

बहमनी काळात कुतुबशाहीने चौधरी पद तिच्या राज्यात सुरू केले. कुतुबशाही शासकांने तेलुगू भाषिक कम्मा जातीच्या लोकांची या पदांवर नियुक्ती केली जी पुढे निजामानेही सुरू ठेवली आणि अश्याप्रकारे दक्षिण भारतात या पदाचा अंमल सुरू झाला. आज तेलुगू भाषिक लोकांमध्ये चौधरी हे नाव कम्मा ज्ञातीचे पर्यायी नाव म्हणून सर्रास वापरले जाते.

माहिती स्रोत:

  • पंडित महादेवशास्त्री जोशी संकलित भारतीय संस्कृतीकोश
  • श्रीधर वेंकटेश केतकर संकलित महाराष्ट्रीय ज्ञानकोश
  • त्रिंबक नारायण अत्रे लिखित गावगाडा

चित्र स्रोत:

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...