विनोद जाधव एक संग्राहक

Friday 23 September 2022

भोर संस्थान : शंकराजी नारायण गांडेकर

 


भोर संस्थान : शंकराजी नारायण गांडेकर

इतिहास
संस्थानचे मूळ संपादक शंकराजी नारायण गांडेकर हे देशस्थ ॠग्वेदी ब्राह्मण असून त्यांचें मूळचें गांव गांडापूर (निजाम इलाखा) हें होतें. शंकराजी याचा आजा मुकुंदपंत हा गांडापूर सोडून रोजगाराकरितां पुण्याच्या नैर्ॠत्येस आठ कोसांवर मांगदरी गांवीं येऊन राहिला. हें गांव हल्लीं राजगड तालुक्यांत आहे. त्याचा पुत्र नारोपंत. हा थोरल्या शिवरायांच्या सैन्यांत कारकून होता. शंकराजी हा प्रथम पेशवे मोरोपंत पिंगळे यांच्याजवळ नोकरीस राहिला. त्याचवर पेशव्यांची चांगलीं मर्जी बसली. संभाजी राजाच्या वेळीं रामचंद्र निळकंठ अमात्य याच्या हाताखालीं शंकराजी हा कारकुनीचें काम करीत होता. त्यावेळीं शंकराजीची कामांतील हुषारी व शौर्य आत्याच्या दृष्टोत्पत्तीस आलें. डोंगरांतील चोरवाटा पाहून ठेवण्याचा, व मावळे लोकांत मिसळण्याचा शंकराजीस नाद असे. यामुळें अमात्यानें शंकराजीस (१६८६ त) फौजी कामांत घेतलें. राजाराम जिंजीस गेला, तेव्हां महाराष्ट्रांत एकटा रामचंद्रपंत अमात्य होता. स्वराज्यरक्षणची सर्व जबाबदारी रामचंद्रपंतावर हाती. अमात्याच्या जवळ शंकराजी व परशुराम त्र्यंबक हे दोन साहसी पुरूष होते. शंकराजीनें राजगड किल्ला मोंगलापासून सोडविला व अनेक विश्वासाचीं कामें उत्तम रीतीनें पार पाडलीं. त्यामुळें राजारामानें शंकराजीस मदारूनमहाम (विश्वासनिधि = कारभारी) हा किताब दिला. पुढें (१६९८) राजाराम परत आल्यावर शंकराजीनें स्वराज्यरक्षणार्थ बजाविलेली कामगिरी लक्षांत घेऊन राजारामानें त्याला रिकामें असलेलें सचीवपद दिलें. ताराबाईच्या कारकीर्दींत मोंगली व मराठी फौज याचें महाराष्ट्रांत सारखें रण माजलें होतें. त्यावेळीं शंकराजीनें पुष्कळ शौर्याचीं कामें केलीं. त्यानें मावळांत कांहीं वतनें जोरावारीनें मिळविलीं व आपलें संस्थान वाढविलें. पुढें शाहु दक्षिणेंत येण्यास निघाला तेव्हां ताराबाईनें सर्व प्रधानमंडळीस व सरदारास बोलावून कळविलें कीं, हा शाहु खरा नसून तोतया आहे, तरी सर्वांनीं त्यास न मिळण्याबद्दल शपथ घ्यावी. तेव्हां सर्वांबरोबर शंकराजीनें शपथ घेतली. पुढें ताराबाईचा पराभव करून शाहू साता-यास आला व त्यानें सर्व सरदारांनां भेटीस बोलाविलें तेव्हां अडचण आली; तींतून निसटण्यास शंकराजीनें भोरानजीक अंबवडें येथें जाऊन चतुर्थाश्रम घेतला; थोड्याच दिवसांत विष खाऊन तो वारला (१७०७ नोव्हेंबर).

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...