विनोद जाधव एक संग्राहक

Friday, 23 September 2022

त्रिंबकराव दाभाडे:




त्रिंबकराव दाभाडे:— खंडेरावाची मुदत संपल्यावर पुढील वर्षाच्या मे महिन्यांत त्याचा मुलगा त्रिंबकराव यास शाहूमहाराजाकडून सेनापतीची वस्त्रें मिळाली. त्यानंतर थोड्याच दिवसांनी गुजराथच्या मोहिमेवर त्याची रवानगी झाली. इकडे बाजीराव पेशवे यांस शाहूने माळव्यांत मुलुखगिरीकरितां पाठविलें.

इ. स. १७२९ मध्यें सरबुलंदखानापासून मराठ्यांस गुजराथच्या चौथ व सरदेशमुखीच्या सनदा मिळाल्यावर त्या प्रांताचा मोकासा दाभाड्यास देण्यांत आला, व सरदेशमुखीचा कांही अंश गोळा करण्याचें कामहि त्याकडेच सोंपविलें. परंतु बाजीरावानें गुजराथच्या कारभारांत ढवळाढवळ करावी, ही गोष्ट दाभाड्यास मुळीच न रूचून या दोन मराठा सरदारांत कायमचें वैमनस्य आलें. पुढें दोघांनीहि ही गोष्ट शाहूच्या कानांवर घालून त्याची आज्ञा विचारली. शाहूनें आज्ञा केली की, बाजीरावास माळव्याची मोहीम सांगितल्यामुळें त्यावर त्यानेंच अंमल करावा, मात्र त्रिंबकराव यानें जिंकलेल्या गुजराथेंत ढवळाढवळ करूं नये. यामुळें बाजीराव निरूत्तर झाला. परंतु दाभाड्याच्या मनांत बाजीरावाविषयी मत्सर उत्पन्न झाला असल्यानें त्यानें सैन्याची जमवाजमव करून राज्याचें रक्षण करण्याकरितां आपण जातो असा उद्देश जाहीर करून तो दक्षिणेंत निघाला. कंठाजी व रघूजी कदम बांडे, उदाजी व आनंदराव पवार, चिमणाजी मोघें, वगैरे सरदार त्यास सामील झाले व दक्षिणेंत आल्यावर निजामहि त्यांस येऊन मिळणार होता. त्रिंबकरावानें निजामाशी सख्य केल्याचें बाजीरावानें शाहूस सिद्ध करून दाखविलें. तरीहि पेशव्यानें लढाईला प्रत्य़क्ष सुरूवात होईपर्यंत दाभाड्याशी तहाचें बोलणें सुरू ठेविलें होतें. बाजीरावाजवळ दाभाड्याच्या अर्धे देखील सैन्य जमलें नसतांहि मोठमोठ्या मजला करून त्यानें दाभाड्याच्या सैन्यास गुजराथेंतच डभई व बडोदें यांच्या दरम्यान गांठलें ( १ एप्रिल १७३१), पहिल्याच हल्ल्याबरोबर त्रिंबकरावाच्या सैन्यांतील नवशिक्या सैनिकांनी पळ काढला तरी, त्रिंबकराव मोठ्या शौर्यानें लढत होता. परंतु त्याला अकस्मात् एक गोळी लागून तो ठार झाला. तेव्हां त्याची सर्व फौज पळून गेली. दाभाड्याकडील मालोजी पवार, पिलाजी गायकवाडाचा एक पुत्र वगैरे मंडळी टार होऊन उदाजी पवार व चिमणाजी मोघे हे कैद झाले. आनंदराव पवार व पिलाजी गायकवाड हे जखमी झाले, परंतु ते पळून गेले. अशा रीतीनें बाजीरावाचा जय झाला

No comments:

Post a Comment

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...