विनोद जाधव एक संग्राहक

Saturday, 3 September 2022

मराठाशाहीतील कुरघोडीचा एक डाव म्हणजे 'पुरंदर कोळी दंगा'. भाग १

 




मराठाशाहीतील कुरघोडीचा एक डाव म्हणजे 'पुरंदर कोळी दंगा'.
पोस्तसांभार ::शुभम सरनाईक
भाग १
पानिपताचा अभूतपूर्व संग्राम आणि मराठ्यांचे तत्कालीन सकलकार्यधुरंधर प्रधान श्रीमंत बाळाजी बाजीराव उपाख्य नानासाहेबांच्या देहावसानानंतर मराठ्यांच्या विजयाश्वाचे लगाम जणू काही काळ खेचल्यासारखे वाटत होते. याच काळात सत्तेसाठी माधवराव आणि रघुनाथराव यांच्यातील अहमहमिकेने जोर धरला होता. या उभयतांच्या द्वंद्वात अनेक लोक पोळले गेले, राज्य होरपळून निघाले. असाच माधवरावांच्या ११ वर्षांच्या कार्यकाळात घडलेला कुरघोडीचा एक डाव म्हणजे 'पुरंदर कोळी दंगा'.
पूर्वापार राजकारणात चालत आलेल्या नियमांनुसार सत्तेत आल्यावर सुज्ञ राजकारणी विरुद्ध पक्षीय व्यक्तीस थेट हानी पोहोचवता येत नसल्यास अप्रत्यक्षपणे त्याचे खच्चीकरण करायला सर्वप्रथम प्रतिपक्षाच्या समर्थनार्थ उतरणाऱ्या लोकांचे पंख कातरतो आणि तदुपरांत जेव्हा विरोधी पक्ष क्षीण होतो तेव्हा त्यावर निर्णायक वार करतो. मराठी इतिहासातही या राजनैतिक न्यायाची बरीच उदाहरणे बघायला मिळतात ज्यातील एक म्हणजे घोड नदीच्या संघर्षाची परिणती. या युद्धात दादासाहेबांची (रघुनाथराव) रावसाहेबांवर (माधवराव) सरशी झाल्यानंतर दादासाहेबांचे पक्षधर बळावले. यात नीलकंठ महादेव उपाख्य आबा पुरंदरे आणि सखाराम भगवंत उपाख्य बापू बोकील हे पेशव्यांचे कारभारी म्हणून मुख्य होते. नानासाहेबांनी आपल्या अंत्यकाळात ज्या चतुष्टयांवर राज्यशकट हाकण्याचे दायित्व सोपवले होते त्यात रावसाहेब, दादासाहेब यांच्यासह बापू आणि आबादेखील होते ज्यावरून त्यांचे तत्कालीन राजकीय महत्व लक्षात येते.

No comments:

Post a Comment

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...