विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 26 October 2022

पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ इंदोरचे होळकर घराणे - भाग 5

 

पेशवेकालीन हिंदवी स्वराज्याचे आधारस्तंभ

इंदोरचे होळकर घराणे - भाग 5

 पोस्तसांभार ::

प्रशांत सुमती भालचंद्र ठोसर | मराठा नाणी संग्राहक, लेखक, व्याख्याते | नाणेघाट

हिंदवी स्वराज्याच्या कक्षा रुंदावण्यासाठी थोरल्या बाजीरावराऊस्वामींनी मध्य हिंदुस्थानात रोवलेले शिंदे-होळकर-पवार हे दख्खनदौलतीचे बुरुज यथावकाश बळकट तर झालेले होतेच, परंतु मनुष्यस्वभावानुसार थोडेफार स्ववर्चस्वासाठी देखील आग्रही बनलेले होते. अशाच वर्चस्वाच्या भावनेने बंधू काशिरावांना बाजूस सारून होळकरशाहीच्या गादीवर आरूढ झालेले हे कर्तृत्ववान महाराजा यशवंतराव होळकर पहिले, ज्यांनी संस्कृत शब्दांत देवनागरी लिपी असलेला ‘नजराणा’ रुपयाही पाडला होता.

होळकरशाहीचे संस्थापक मल्हारबाबा होळकर यांचे नातू असलेले आणि तुकोजीराव पहिले यांचे तृतीय पुत्र असलेले यशवंतराव होळकर (पहिले) यांचा जन्म 3 डिसेंबर 1776 रोजी पुण्यामध्ये झाला. पुढे वडील तुकोजीराव महाराज यांचे भावी वारसदार कोण असावेत, असा प्रश्न उपस्थित झाला तेव्हा सगळ्यात ज्येष्ठ असलेले काशिराव आणि द्वितीय पुत्र मल्हारराव यांच्यात विवाद झडले. मल्हाररावांचा युक्तिवाद होता की, तेच राजगादीवर बसायला पात्र आहेत कारण त्यांचा जन्म झाला तेव्हा तुकोजीराव ‘सुभेदार’ झालेले होते आणि वडीलबंधू काशिराव यांचा जन्म झाला होता. तेव्हा तुकोजीराव साधे शिपाई होते. मात्र, तुकोजीरावांनंतर काशिराव गादीवर आले. काशिरावांनी भाऊबंदकीमुळे अखेर बंधू मल्हारराव यांना इसवीसन 1797 मध्ये ठार मारले आणि त्यांचे पाठीराखे असलेले बंधू यशवंतराव जे त्यासमयी पुण्यात होते त्यांना दौलतराव शिंदेंच्या सांगण्यावरून नागपूरकर रघूजी भोसले यांनी कैद करून तुरुंगवासात टाकले. मात्र, लवकरच ते मोकळे झाल्यावर बंधू मल्हाररावांच्या मृत्यूनंतर दीडएक वर्षात ते खानदेशात येऊन दाखल झाले. तेथे त्यांना चिमणभाऊ हे त्यांचे भावी मार्गदर्शक भेटले ज्यांनी यशवंतरावांना एक उत्तम घोडी (षशारश्रश हेीीश) आणि 300 रुपये देऊन माळवा प्रांतात जाण्याचा सल्ला दिला. आता 22 वर्षांचे तरुण तडफदार यशवंतराव तेथून कूच करून आधी बरवानी येथे, नंतर धरमपुरी आणि अखेरीस धार संस्थानात येऊन पोहोचले. धार संस्थानाधिपती आनंदराव पवार यांनी त्यांचे अतिशय आपुलकीने स्वागत केले. येथील सुमारे तीन एक महिन्याच्या वास्तव्यात यशवंतरावांनी पिंढार्‍यांच्या हल्ल्यांपासून धार संस्थानाचे संरक्षण केले. या कामगिरीवर संतुष्ट होऊन आनंदरावांनी त्यांना दहा हजार रुपये आणि 7 घोडे दिले. या साहाय्याने यशवंतरावांनी आगेकूच करून देपालपूर हा परगणा जिंकला.

यानंतर यशवंतराव लोकांच्या मनात हे ठसवण्यात यशस्वी झाले की, ते मल्हारबाबा आणि खंडेराव यांच्याच मार्गाने पुढे जाऊन होळकरशाहीच्या उत्कर्षाकरिता झटत राहतील. त्यांच्यासोबत आता पिंढारी, भिल्ल, मराठे, अफगाण, राजपूत असे अनेक जण जाऊ लागले. देपालपूरच्या विजयानंतर यशवंतराव जावरा, बर्दावाड, महिदपूर, सस्नेर, सारंगपूर, शुजालपूर आदी ठिकाणी आक्रमण करून साम, दाम, दंड, भेद वापरून विजय आणि पैसे मिळविण्यात यशस्वी झाले. शुजालपूरला मिळालेले 10000 रुपये त्यांनी आपल्या सैनिकांत वाटले. या सर्व बाबींमुळे यशवंतरावांची प्रतिमा शूर आणि चतुरस्त्र धुरीण म्हणून लोकमानसात ठसली. इतके की काशिरावांच्या सैन्यातील लोक देखील यशवंतरावांना येऊन मिळाले. यांसोबत नजीबखान, कालेखान आणि रामपुरा प्रांताचा सद्रुद्दिन आदी महत्वाची मंडळी पण होती. आता यशवंतरावांकडे पाच हजार पायदळ आणि दोन हजार घोडदळ जमले होते. बेगमपूरवर आक्रमण करून त्यांनी ते लुटले. हे बघून शेजारच्या नरसिंहगढच्या अधिकार्‍याने नजराणा म्हणून रोख 2000 रुपये, 400 घोडे आणि 2000 सैनिक पाठवले. यशवंतरावांनी आता आसपासच्या राज्यकर्त्यांकडून जवळपास 30-32 हजार रुपये खंडणी स्वरूपात मिळवले. यानंतर त्यांनी सनावाड, खरगोण आदी ठिकाणाहून अजून 35000 रुपये मिळवले.

आता यशवंतरावांनी महेश्वरकडे कूच केले आहे, हे ऐकून पुणे येथे असलेल्या काशिरावांनी प्रतिकारार्थ नागो जिवाजी आणि ड्युड्रेनेक / र्ऊीवीशपशल या फिरंगी अधिकार्‍यासोबत 13000 सैनिकांची कुमक, तसेच इंदोरहून अजून एक 500 सैनिकांची तुकडी पाठवली. मात्र, यशवंतरावांनी या सैन्याचा कसरावद येथे सहज पाडाव केला. यशवंतराव महेश्वरला जाऊन जानेवारी 1799 मध्ये होळकरशाहीच्या गादीवर खंडेराव होळकरांचे प्रतिनिधी / ठशसशपीं म्हणून आरूढ झाले. मात्र, त्यांनी धूर्तपणे स्वतःची मुद्रा न वापरता खंडेराव यांचे विश्वासपात्र (दुय्यम) यशवंतराव अशी पर्शियन भाषेतील राजमुद्रा वापरून होळकरशाहीच्या निष्ठावंतांना एकत्र आणण्यात महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. महेश्वर येथे त्यांच्याजवळ आठ हजार घोडेस्वार आणि 15 हजार पायदळ जमा झाले. याआधी पराभूत झालेला काशिरावांचा फिरंगी अधिकारी फिरून मार्च 1799 मध्ये यशवंतरावांवर चालून आला आणि त्याने चौली येथे युद्ध करून यशवंतरावांना परत महेश्वरला मागे ढकलले. महेश्वरला यशवंतरावांना अहिल्याबाईंचा खजिना आणि दागदागिने मिळवण्यात यश आले आणि त्याच्या जोरावर त्यांनी आपली फौज अधिक बळकट करून ड्युड्रेनेकची रसद तोडून त्याला तहासाठी, तसेच यशवंतराव महाराजांना होळकरशाहीचे अधिकृत प्रतिनिधी म्हणून मान्यता देण्यास राजी केले.

या सततच्या युद्धप्रसंगातही यशवंतराव जातीने, तसेच गोविंद रघुनाथ गानू आणि भारमल होळकर यांच्यामार्फत पंतप्रधान पेशव्यांशी सातत्याने पत्रव्यवहार करून होळकर घराण्यात समझौता होण्यासाठी प्रयत्नशील होते, असे आढळते. पेशवे तसेच बंधू काशिराव यांच्यासोबत स्नेहभाव राखून तख्ताची सेवा करण्यासही मान्यता देण्यास यशवंतराव राजी होते. दुर्दैवाने 1801 मध्ये यशवंतरावांचे बंधू विठोजी होळकर हे आक्रमण / हल्ला ारीर्रीवळपस करताना पेशव्यांच्या सैनिकांकडून कैद केले गेले. पेशवे विठोजींशी सौहार्दपूर्ण वागण्यास तयार असताना देखील विठोजी स्वतःसाठी देहदंडासाठी आग्रही बनून राहिले होते. अखेर नाईलाजास्तव विठोजींना हत्तीच्या पायी देण्यात आले. यशवंतरावांनी या अघटित घटनेबद्दल पेशव्यांना कधीही क्षमा केली नाही. त्यांनी फत्तेसिंह माने यांना पाठवून शिंदे तसेच पेशव्यांच्या जहागिरीत धुमाकूळ माजवला आणि त्यांची दाणादाण उडवली. आघाडीवर राहून यशवंतराव ऐन दिवाळीच्या दोन दिवस आधी, म्हणजे 25 ऑक्टोबर 1802 रोजी पुण्यात येऊन धडकले. सुमारे तीन महिन्यांपर्यंत मग त्यांनी पुण्याची यथेच्छ धूळदाण उडवली. अशाप्रकारे स्वतःचे सैनिकी सामर्थ्य वाढवत असताना यशवंतरावांनी शिंद्यांवर हल्ला करून उज्जैनची धूळदाण उडवली. पुढे शिंद्यांचे सरदार सर्जेराव घाटगे यांनी 14 ऑक्टोबर 1801 ला इंदोर पासून 3 मैलांवर असलेल्या बिजलपूर येथे होळकरांवर जोरदार प्रतिहल्ला करून इंदोर शहराची वाताहात केली. खुद्द यशवंतराव विंध्य पर्वतराजीतील जामघाट येथे मागे हटले.

या आणि अशा असंख्य प्रसंगांतून यशवंतराव जात होते. यशवंतरावांनी स्वतःला ‘महाराजाधिराज राजराजेश्वर’ या उपाधीने गौरविले आहे. या वाटचालीत सेंधवा येथील युद्धप्रसंगात काशिरावांचा 1808 मध्ये मृत्यू झाला. ऑक्टोबर 1808 मध्येच यशवंतरावांमध्ये काहीशी वेगळी बुद्धीभ्रंशाची लक्षणे (ळपीरपळीूं) दिसून येऊ लागली. ते दिवसागणिक अधिक उग्रप्रकृती, कोपप्रवृत्ती (तळेश्ररपीं) होऊ लागले होते. त्यांची पत्नी तुळसाबाई या काही कारभारी मंडळीच्याद्वारे होळकरशाहीचा कारभार बघत होत्या. मात्र, आता आर्थिक स्थिती पण बिकट झालेली होती. सैन्याचे वेतन वेळेवर होत नव्हते, बंडाळीचे प्रसंगही उद्भवत होते. अखेर हा धाडसी महाराजा यशवंतराव होळकर यांचे भानपुरा येथे 27 ऑक्टोबर 1811 रोजी निधन झाले.

यशवंतरावांनी पाडलेली उल्लेखनीय नाणी म्हणजे म्हणजे संस्कृतमध्ये लिहिलेला नजराणा रुपया आणि त्याचसोबत अरेबिक भाषेत पाडलेला नजराणा रुपया. यातील संस्कृत रुपयावर शके 1728 यासह
‘श्री
इन्द्रप्रस्थस्तितो
राजा चक्रवर्ती
भूमंडले तत्प्रसादा
त्कृता मुद्रा लौकेस्मिन्वै
विराजते’
हे एका बाजूला
आणि दुसर्‍या बाजूला
‘श्री
लक्ष्मीकांतप
दांभोजभ्रमराय
तचेतसः येशवंतस्य
विख्याता मुद्रैषा
पृथवीतले’
असा मजकूर आहे . हा संस्कृत नजराणा रुपया आजही नाणीसंग्राहकांसाठी एक ‘मानाचे पान’ मानला जातो. यशवंतरावांनी मल्हारनगर, तसेच महेश्वर टांकसाळीत चांदीची नाणी पाडली आहेत. तांब्याची नाणी पण पाडलेली आढळून येतात. परंपरेनुसार महेश्वर टांकसाळीच्या रुपया, तसेच अर्ध्या रुपयावर शिवलिंग आणि बिल्वपत्र छापलेले आहे. मल्हारनगरच्या नाण्यांवर सूर्य अधोरेखित केलेला आहे. मागील बाजूस हिजरीसन कोरलेले असते ज्यावरून आपणांस हे नाणे कोणत्या राजाने पाडले हे ओळखता येते.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...