विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 16 November 2022

।। इ.स.१६७० मध्ये शिवाजी महाराज व पोर्तुगीज यांच्यात झालेला तह.।।

 

।। इ.स.१६७० मध्ये शिवाजी महाराज व पोर्तुगीज यांच्यात झालेला तह.।।


।। इ.स.१६७० मध्ये शिवाजी महाराज व पोर्तुगीज यांच्यात झालेला तह.।। शिवछत्रपतींचे आरमार- ग.भा.मेहेंदळे, शिवछत्रपतींची पत्रे- डाॅ.सौ.अ.गो. कुलकर्णी यांच्या प्रकाशित साधनांच्या आधारे.
छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी ताब्यात घेऊन पुढे आरमार बांधले, त्यासाठी पोर्तुगीज नवशिल्यांची मदत घेतली होती. महाराजांचे आरमार समुद्रात उतरे व कमी काळात ते सक्षम हि झाले. मग आरमारी सत्ता पोर्तुगीज, इंग्रज, सिद्धी यांना स्वताच्या आरमारी सत्तेला सुरुंग लागतो कि काय असी भिती निर्माण होऊ लागली. त्या जंजिरेकर सिद्धी हे शिवाजी महाराजांच्या मुलखात कागाळ्या तर करतच होता पण अदिलशाही मुलखातील हिंदु रयतेवर हि अन्याय अत्याचार करत होताच. यातुन सिद्धीला आळा घालण्यासाठी महाराजांनी मोहिमा उभारल्या. अन सिद्धीना हे पोर्तुगीज लोक गुप्त पणे मदत करुन लागले. या कारणावरून शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या पोर्तुगीज आरमाराशी काही झटापटी झाल्या. शिवाजी महाराजांच्या आरमाराने पोर्तुगिजांच्या काही नौका पकडल्या आणि पोर्तुगिजांनी इराणच्या आखातातून येत असलेले शिवाजी महाराजांच्या मुलखातले एक तरांडे धरले यानंतर लवकरच, डिसेंबर १६६९ मध्ये, शिवाजी महाराजांचे मुघलांशी पुन्हा युद्ध सुरू झाले. " बहुधा म्हणूनच त्यांनी पोर्तुगिजांशी तह करण्याकरिता आपला वकील विठ्ठल पंडित याला गोव्याला पाठविले. तर ६ डिसेंबर १६६७ रोजी शिवाजी महाराजांनी पोर्तुगीज गव्हर्नर विजरई कोंदी यास पत्र पाठवले ते पत्र उपलब्ध आहे. त्यातून पोर्तुगीजांच्या या कागाळ्या उघडकीस येतात. पोर्तुगीजांनी १९ नोव्हें. १६६७ रोजी शिवाजी महाराजांच्या मुलखातील कोळी लोक लहान मुले महिला पुरुष यांना धरुन लुटून घेऊन गेले. त्यांच्या बळजबरीने धर्मांतरण करु लागले. लखम सावंत, केशव नाईक देसाई या शिवाजी महाराजांच्या मुलखात उपद्रव करणारे यांना पोर्तुगीजांनी आश्रय दिला होता. मग शिवाजी महाराजांनी पत्र पाठवून हि पोर्तुगीज ऐकत नाहीत म्हणून त्यांच्यावर स्वारी करुन पोर्तुगीजाना झटका दाखवला. या नंतर मग पोर्तुगीजांच्या भिती पोटी शिवाजी महाराजांसोबत तहासाठी तयार झाले. व गोव्याचा पोर्तुगीज गव्हर्नरने फेब्रुवारी १६७० रोजी अटी थोडक्यात अशा होत्या-
१)पोर्तुगिजांच्या दोन प्रजाजनांकडून जबरदस्तीने घेण्यात आलेले तीन हजार होन शिवाजीराजांनी दोन महिन्यांच्या आत परत करावेत. २)पूर्वीच्या रिवाजानुसार जकात दिल्यावर गोवा आणि मुख्य भूमी यांतील व्यापारी वाहतूक अडथळा न करता, चालू द्यावी. शिवाजीराजे आणि आदिलशाह यांच्यात युद्ध सुरू झाले तरीही ती चाहतूक, दोन्ही बाजूंच्या म्हिणजे शिवाजी महाराज आणि पोर्तुगीज यांच्या हिताच्या दृष्टीने व्यापारात भरभराट व्हावी म्हणून,चालू द्यावी. ३) पोर्तुगिजांच्या प्रजाजनांची शिवाजीराजांच्या आरमाराने धरलेली जहाजे परत करावीत. ४)पोर्तुगिजांच्या शेजारचा जो मुलूख शिवाजीराजांनी काबीज केला आहे त्याच्या - पोर्तुगीज मुलखाला लागून असलेल्या हद्दीवर शिवाजीराजांनी किल्ला बांधू नये, ५) दोन्ही बाजूंमध्ये मैत्रीचे संबंध राहावेत.
पोर्तुगीज गव्हर्नरांनी त्यांच्या बाबतीत खालील शर्ती मान्य केल्या होत्या: (१) शिवाजीराजे (अथवा त्यांचे प्रजाजन) यांची पोर्तुगिजांनी धरलेली जहाजे ते परत करतील. २) शिवाजीराजांच्या प्रजाजनांनी त्यांच्या जहाजांकरिता पोर्तुगिजांच्या शत्रूची बंदरे वगळून इतर कोणत्याही बंदराला जाण्यासाठी मागितलेले परवाने (कार्ताझ), मुघल बादशाहाच्या प्रजाजनांकडून जसे शुल्क घेतले जाते तसे शुल्क घेऊन, देण्यात येतील. ३) करंजाहून गोव्याला अन्नधान्य घेऊन येणाऱ्या लहान नौकांना परवाने (कार्ताझ) घ्यावे लागणार नाहीत. अशा लहान नौकांना पोर्तुगीज जहाजे अडवणार नाहीत.४) शिवाजीराजे आणि पोर्तुगीज परस्परांच्या जहाजांना आपापल्या बंदरात येऊ देतील आणि कोणताही माल खरेदी करू देतील. ५) दंड्याचा सिद्दी पोर्तुगालच्या राजाचा मांडलिक आहे. म्हणून त्याला मदत करण्याची व त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी गव्हर्नरांवर आहे. पण तसे करण्याने शिवाजीराजांशी असलेल्या मैत्रीत बिघाड होईल म्हणून सिद्दी व शिवाजीराजे यांच्यात दोघांनाही समाधानकारक असा समझोता घडवून आणण्याचा गव्हर्नर प्रयत्न करतील. शिवाजी महाराजांनी पोर्तुगिजांच्या हद्दीवर किल्ला बांधू नये अशी हमी पोर्तुगीज मागत होते, पण आपण सिद्दीला मदत करणार नाही अशी हमी मात्र ते देत नव्हते. याउलट पोर्तुगिजांनी मराठ्यांच्या शत्रूंना मदत करू नये आणि समुद्रसंचाराकरिता पोर्तुगिजांचे परवाने घेण्याचे बंधन आपल्या प्रजाजनांवर असू नये अशी शिवाजी महाराजांची अपेक्षा होती. पोर्तुगिजांच्या भूमिकेत बदल घडवून आणण्याकरिता कोणते दडपण आणले पाहिजे हे महाराज ओळखून होते. महाराजांचा प्रतिनिधी विठ्ठल पंडित याने तहाकरिता गव्हर्नरांना सुचविलेली कलमे अशी होती.
१) शिवाजीराजांच्या जहाजांना समुद्रसंचाराकरिता पोर्तुगीज प्रतिबंध करणार नाहीत. २) सिध्यांना पोर्तुगीज आश्रय देणार नाहीत आणि कोणताही पुरवठा करणार नाहीत. ३) शिवाजीराजांच्या प्रजाजनांची पोर्तुगिजांनी धरलेली जहाजे, त्यांतील मालमत्तेसह, ते परत करतील. ४) शिवाजीराजांच्या सुभेदारांशी सलोख्याने राहावे अशी पत्रे देऊन गव्हर्नरांनी त्यांचा प्रतिनिधी शिवाजीराजांच्या वकिलाबरोबर पोर्तुगिजांच्या सर्व ठाण्यांच्या अधिकाऱ्यांकडे पाठवावा. ५) मस्कतच्या इमामाच्या जहाजांना आश्रयाकरिता व पाणी घेण्याकरिता आमची बंदरे, आम्ही ठरवू ते शुल्क घेऊन, वापरू द्यावीत असा प्रस्ताव इमामाने आमच्याकडे मांडला आहे. आमच्या आरमाराची मदत द्यावी अशीही विनंती त्याने केली आहे. पण आम्ही पोर्तुगिजांचे मित्र आहोत आणि म्हणून आम्ही त्याला कोणतीही मदत करणार नाही असा जबाब आम्ही त्याला दिला आहे. आमच्या या धोरणाचा प्रतिसाद म्हणून पोर्तुगिजांनीही आम्हाला आमचे त्याच्याशी युद्ध झाल्यास मदत करावी. आम्हीही पोर्तुगिजांचे इमामाशी युद्ध झाल्यास पोर्तुगिजांना मदत करू. त्या मदतीचा खर्च त्यांनी द्यावा. ६) आमचे मुघलांशी युद्ध सुरू आहे. म्हणून पोर्तुगिजांनी व आम्ही एकजुटीने राहावे. मुघलांच्या माणसांना पोर्तुगिजांनी त्यांच्या मुलखात आश्रय देऊ नये आणि आमच्याशी स्नेहाने वागावे. ७) पूर्वीच्या गोष्टी विचारात घेऊ नयेत. आम्हीही त्या विचारात घेणार नाही. या प्रस्तावाच्या ५ व्या कलमातील मेख अशी होती की पोर्तुगीज आणि मस्कतचा इमाम यांच्यात शत्रुत्व होते. जरी शिवाजी महाराजांनी आतापर्यंत आपल्या बंदरांमध्ये इमामाच्या आरमाराला सुविधा पुरविल्या नसल्या किंवा सक्रीय नाविक मदत केलेली नसली तरी ते भविष्यात तसे करू शकतील अशी गर्भित धमकीच त्या कलमात दिलेली होती. ही मात्रा बऱ्याच अंशी लागू पडली. झालेला तह असा होता:-
१) शिवाजीराजांच्या प्रजाजनांच्या लहान नौका समुद्रात मुक्तपणे संचार करू शकतील. मोठ्या जहाजांना मात्र समुद्रसंचाराकरिता परवाने घ्यावे लागतील. मुघल बादशाहाच्या प्रजाजनांना ज्या शर्तीवर परवाने दिले जातात त्याच शर्तीवर शिवाजीराजांच्या प्रजाजनांना दिले जातील. २) मान्य आहे. [म्हणजे शिवाजी महाराजांच्या वकिलाने दिलेल्या प्रस्तावातील दुसरे कलम मान्य आहे; म्हणजेच सिद्द्यांना पोर्तुगीज आश्रय देणार नाहीत आणि कोणताही पुरवठा करणार नाहीत.] ३) आमच्या प्रजाजनांची जहाजे त्यांतील मालमत्तेसह परत केल्यावर आम्हीही शिवाजीराजांची व त्यांच्या प्रजाजनांची पकडलेली जहाजे परत करू. ४) शिवाजीराजांच्या सुभेदारांशी व मंत्र्यांशी सलोख्याचे संबंध ठेवावेत अशी पत्रे पोर्तुगीज किल्लेदारांना पाठविण्यात येतील. ५) जर शिवाजीराजांचे मस्कतच्या इमामाशी युद्ध सुरू झाले तर शिवाजीराजांनी आमची मदत मागितल्यास ती दिली जाईल; मात्र शिवाजीराजांनी किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या बंदरांमधून इमामाला अन्नधान्याचा व पाण्याचा पुरवठा करता कामा नये. ६) हे {पोर्तुगीज} राज्य आणि मुघल बादशाह यांच्यात दीर्घ काळ सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्याच्या प्रजाजनांना संकटकाळात आम्ही आमच्या मुलखात आश्रय देण्याचे नाकारू शकत नाही. शिवाजीराजे आणि त्यांचे अधिकारी यांनाही गरज भासल्यास आम्ही तसेच साहाय्य करू. ७) दोन्ही बाजूंनी परस्परांशी सलोख्याने राहावे आणि पूर्वीच्या [परस्परवितुष्टाच्या] घटना विसरून जाव्यात.
या तहावर 'आंतोनियु द मेलु द काशत्रु व मानुयल कोर्ति रियाल द सांपायु यांच्या सह्या आहेत' आणि शिवाजी महाराजांची मुद्रा उमटविलेली आहे. शिवाजी महाराजांनी पोर्तुगिजांच्या सरहद्दीवर किल्ला बांधू नये आणि गोवा व मुख्य भूमी यांच्यात, शिवाजी महाराज व आदिलशाह यांच्यात युद्ध चालू असेल तेव्हाही, व्यापारी वाहतूक चालू द्यावी या मागण्यांचा या तहात उल्लेख नाही, म्हणजेच पोर्तुगिजांना त्या सोडून द्याव्या लागल्या. शिवाय, पोर्तुगिजांनी सिद्दीला मदत करू नये ही शिवाजी महाराजांची मागणी पोर्तुगिजांना मान्य करावी लागली आणि शिवाजी महाराजांच्या लहान नौकांना तरी समुद्रसंचार करण्याकरिता पोर्तुगिजांचे परवाने घ्यावे लागणार नाहीत ही एक सवलत महाराजांनी पदरात पाडून घेतली. पोर्तुगिजांच्या सागरी स्वामित्वाच्या आतापर्यंतच्या अभेद्य तटाला पडलेले हे लहानसे छिद्र होते. या तहामुळे सिद्दीला पोर्तुगिजांकडून उघडपणे मदत मिळण्याची शक्यता संपली.
संदर्भ:-
¤ शिवछत्रपतींचे आरमार- ग.भा.मेहेंदळे, सं.प्र.शिंत्रे
¤ शिवछत्रपतींची पत्रे खंड १ पत्र क्र. २९, डाॅ.सौ.अ.गो.कुलकर्णी
¤ द पोर्तुगीज अँड द मराठाज- पृष्ठ ३१ ते ३३ (The Portuguese and the marathas:- page - 31 to 36)
संकलन:-
दुर्गवेडा कृष्णा घाडगे

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...