विनोद जाधव एक संग्राहक

Sunday 13 November 2022

मराठा संस्थानिक घराणे – अलिबागचे आंग्रे

 

तत्कालीन कुलाबा जिल्हा आणि आताच्या रायगड जिल्ह्यातील मराठा संस्थानिक घराणे – अलिबागचे आंग्रे

 

दर्यावर्दी सरखेल आंग्रे कुटुंबाचे मूळ घराणे संकपाळ यांचे होय. याचा उल्लेख शिवकालीन पोवाड्यात येतो. सुपे चाकणजवळच्या काळोसे या पुणे जिल्ह्यातील भागास ‘आंगरवाडी’ असे ओळखले जाते. हेच आंग्रे संस्थानिकांचे मूळ स्थान. प्रत्येक घराण्याची ओळख असणारी एक जबरदस्त व्यक्ती असते. तद्वत या कुलाबा जिल्ह्यातील आंग्रे यांची ओळखही पराक्रमी, शूर सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांच्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचली आहे, असे म्हटले तर ते नक्कीच गौरवास्पद आहे.

या घराण्याचे मूळ पुरुष म्हणता येतील ते सेखोजी आंग्रे यांनी सुवर्णदुर्गाच्या तटबंदीचे काम केले होते, असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांत नमूद आहे. या सेखोजींचे पुत्र आणि कान्होजीराजे यांचे वडील तुकोजी आंग्रे हे इ. स. 1640 मध्ये सरलष्कर महाराजसाहेब शहाजीराजेंच्या समवेत कोकणच्या स्वारीत होते. शहाजीराजेंच्या सोबत चौल येथील समुद्रावरील लढाईत मर्दुमकी गाजवणार्‍या तुकोजी आंग्रे यांजकडे सुरुवातीला अवघी 25 सैनिकांची मुखत्यारी होती. तिथपासून इ. स. 1659 पर्यंत शिवाजी महाराजांच्या पदरी आपल्या पराक्रमाने अन् कर्तबगारीने तुकोजींनी सरनौबत या हुद्द्यापर्यंत भरारी मारली. शिवरायांच्या आरमारात 20 संगमेश्वरी जहाजांचा पहिला ताफा दाखल झाला तेव्हा तुकोजी आंग्रे महाराजांच्या आरमारात दाखल झाले. हर्णे बंदरालगतचा सुवर्णदुर्ग शिवरायांनी 1660 मध्ये जिंकून घेतला. या सुवर्णदुर्गवर आंग्रे यांचे कुटुंब राहत होते. 1669 मध्ये गोकूळाष्टमीच्या आदल्या दिवशी याच सुवर्णदुर्गावर कान्होजींचा जन्म झाला. तुकोजीराव यांच्या पत्नी बिंबाबाई यांनी ‘कान्होबा’ या जागृत दैवतास नवस बोलले असल्याने या नवजात पुत्राचे नाव ‘कान्होजी’ ठेवण्यात आले. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी या सुमुहूर्तावर (इसवी सन 1674) छत्रपती शिवाजी महाराजांना रायगडावर जो राज्याभिषेक झाला त्यासमयी कान्होजींचे वय हे अवघे पाच वर्षांचे होते. याच वर्षी महाराजांनी सुवर्णदुर्गाची बळकटी करून घेतली.

दक्षिण दिग्विजयाहून परतल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी 1678 मध्ये मुंबईकर इंग्रजांना वचक बसावा म्हणून खांदेरी हा जलदुर्ग बांधवून घेतला. तसेच 1680 मध्ये अलिबागच्या किनार्‍यालगत समुद्रात अजून एक बळकट जलदुर्ग ‘कुलाबा’ही बांधून घेतला. खुद्द छत्रपतींनी त्याचे कुलाबा हे नाव ठेवले होते, असे इतिहास सांगतो. त्याच वर्षी दुसरा पुत्र राजाराम याच्या विवाहानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे हनुमान जयंतीला रायगडावर अनपेक्षितपणे दुःखद निधन झाले. कान्होजींचे वडील तुकोजी आणि काका रायाजी हे सिद्दी आणि जलचर फिरंगी शत्रूंच्या बंदोबस्तासाठी सातत्याने घराबाहेर असत. म्हणून तुकोजींनी कान्होजीस शिक्षणासाठी हर्णे येथील जोशी नामक विद्वान ब्रम्हवृंदांकडे ठेवले होते. सदैव समुद्राच्या सानिध्यात असल्यामुळे कान्होजी यांस समुद्राचे भय काहीच उरले नव्हते. दर्यावर लाटांसोबत वरखाली होत फिरणारी जहाजे आणि जलविहार यास ते अवगत झाले होते. लेखन, वाचन आणि अन्य शिक्षणासह जोशी गुरुजींकडे गुरेही कान्होजी राखत असत. एका प्रसंगी कान्होजी दुपारी रानात विश्रांती घेत असता त्यांच्यावर पडणारी उन्हाची तिरीप एका नागाने अडवल्याचे अन्य गुराख्यांनी बघितले व ही आश्चर्यकारक घटना नंतर जोशी गुरुजींना कथन केली गेली. ज्योतिष जाणकार असलेल्या जोशींना यामागचा कार्यभाव समजून हे राजयोगाचे लक्षण आहे, हे समजले आणि त्यांनी ताबडतोब कान्होजींना बाकीच्या शिक्षणासोबत राजनीतीचे व्यवहार ज्ञान देण्यास सुरुवात केली. कान्होजींच्या भावी पत्रव्यवहारातून याची प्रचिती आपणांस येते.

1690 पासून छत्रपती राजाराम महाराजांच्या आरमारात दुय्यम अधिकारी असलेले कान्होजी पुढे अर्थातच ताराराणीसाहेब यांच्या पक्षात होते. मात्र औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्याच्या कैदेतील शंभुपुत्र शाहू महाराज स्वराज्यात परतले आणि मराठ्यांच्या गादीचा खरा हक्कदार कोण, यास्तव शाहू महाराज आणि ताराराणीसाहेब यांत संघर्ष सुरू झाला. या वेळी शाहूंकडे असलेले मुत्सद्दी बाळाजी विश्वनाथ यांनी हरउपायेकरून करून सरखेल कान्होजीस शाहू छत्रपतींकडे वळवले. नंतर एक एक पराक्रम गाजवून कान्होजीराजे मराठा आरमाराचे तसेच सुवर्णदुर्गाचेही अधिपती झाले. बाळाजी विश्वनाथ आणि कान्होजी हे दोघेही कोकणातील असल्याने हा मनसुबा बराचसा सहजपणे प्रत्यक्षात आला. आता कान्होजीराजांची सत्ता मनरंजन ( मांडवा – रेवस ) पासून विजयदुर्गपर्यंत पश्चिम किनार्‍यावर बळकट झाली. छत्रपतींच्या अनुज्ञेने कान्होजींना 10 जंजिरे (जलदुर्ग) मिळाले होते तसेच ‘सरखेल’ आणि ‘वजारतमाव’ हे किताब, 16 महालांतील मुलुख धरून तब्बल 34 लक्षांचा मुलुख प्राप्त झाला. यामुळे एका अर्थाने कान्होजी आंग्रे हे पश्चिम किनारपट्टीचे अधिपती झाले होते. त्यांच्या सागरी सामर्थ्यामुळे शिवछत्रपतींनी स्थापलेल्या मराठा आरमाराचा दबदबा आणि वचक इंग्रज, पोर्तुगीज आदी फिरंगी तसेच एतद्देशीय सत्तांना जाणवू लागला. ज्या पोर्तुगिजांचे दस्तक म्हणजे सागरावर संचारासाठी परवाने खुद्द आलमगीर औरंगजेबाला घ्यावे लागत असत त्यांना आता कान्होजी राजांच्या अनुज्ञेची कास धरावी लागत होती, इतका पराक्रम कान्होजींनी आपल्या कारकीर्दीत दाखवला. कान्होजींच्या बलाढ्य आरमाराचा पराभव तर सोडा बरेचदा विरोधही करता येत नसे, या कारणास्तव इंग्रज, पोर्तुगिजादी मंडळी कान्होजींना सागरी चाचा म्हणत असत. पण एका अर्थाने कान्होजीराजे त्यांचे ‘चाचा’ तर सोडा खर्‍या अर्थाने सागरी पराक्रमात ‘बाप’ होऊन राहिले होते. त्यांच्या असामान्य आरमारी पराक्रमामुळे त्यांना ‘समुद्रावरील शिवाजी’ असेही अभिमानाने म्हटले जाई. शौर्य आणि धाडस यासोबत विवेकीपणादेखील त्यांचे अंगी भिनलेला होता. सरखेल कान्होजींचे 4 जुलै, 1729 रोजी निधन झाले. अशा या कर्तबगार कान्होजींच्या वारसांनी पुढे अनेक वर्षे ही सागरी शौर्याची परंपरा सुरू ठेवलेली आढळते. मात्र दुर्दैवाने उत्तरकालात पंतप्रधान पेशव्यांसोबत झालेल्या काही मतभेदांमुळे पेशवे आणि इंग्रज यांची युती होऊन हे परदेशीय जलचर सत्तांवर दबदबा असलेले आंग्य्रांचे बलाढ्य आरमार बुडविण्याची अप्रिय घटना पुढे घडली. हे खरोखरीच मराठेशाहीचे अन् मराठा आरमाराचे दुर्दैव म्हणावे लागेल.

आंग्रे यांनी चांदीची स्वतंत्र नाणी पाडली होती, असे प्रतिपादन नामवंत अभ्यासक प्रिन्सेप आणि क्लून्सदेखील करीत आहेत. अलिबागच्या टांकसाळीत ही नाणी पाडली गेली असावीत, असा अंदाज बांधता येतो. यात पेशव्यांनी मुहियाबाद उर्फ पुणे येथे पाडलेल्या अंकुशी रुपयाबरहुकूम नाणकशास्त्रातील तज्ञांनी मान्य केलेला अलिबागच्या अंकुशाचे विशिष्ट वळण असलेला ‘अंकुशी रुपया’ तसेच 1/4 रुपया , 1/2 रुपया पण आढळतो. अलिबागचा आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण रुपया म्हणजे दोन्ही बाजूस देवनागरीत फक्त ‘श्री’ अक्षर छापलेला रुपयाही आढळून आला आहे. यात चांदीचे प्रमाण कमी असल्याने हा व्यवहारात तितकासा प्रचलित होऊ शकला नव्हता. कारण त्या वेळी धातूच्या शुद्धतेवर नाणी जोखली आणि स्वीकारली जात असत. या रुपयाचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे हा गोल तसेच चौकोनी आकारात पाडला गेला होता. याचा अर्धा रुपयादेखील पाडला गेला होता व तो काही नाणीसंग्राहकांच्या संग्रहात आहे. या ‘श्री’ रुपयाची मुंबई गझेटियरमध्ये ‘जंजिरा कुलाबा रुपया किंवा छशु अश्रळलरस रुपया’ अशी नोंद केलेली आहे. हा रुपया आंग्रे यांचे दिवाण / कारभारी म्हणजेच उहळशष जषषळलशी विनायक परशुराम बिवलकर यांनी सुमारे 1829 च्या आसपास पाडला होता, अशा काही नोंदी आढळतात. मात्र तो लोकमानसात न रुजल्याने पुढच्या दहा वर्षांतच चलनातून काढला गेला. आंग्रे यांच्या राजवटीत तांब्याची नाणी पाडल्याची नोंद आढळून येत नाही. पुढे इसवी सन 1844 मध्ये आंग्रे यांना ब्रिटिशांनी दत्तकविधानाची अनुमती नाकारल्याने त्यांचे स्वतंत्र संस्थान अखेर ब्रिटिशांच्या अधीन झाले. तरीही आंग्रे या मराठा संस्थानिकांनी स्वतंत्र नाणी पाडली होती, हा इतिहास मात्र पानांमध्ये सुवर्णाक्षरांनी लिहिला गेला आहे.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...