विनोद जाधव एक संग्राहक

Wednesday 7 December 2022

उत्तर मराठेशाहीतील सामाजिक स्थिती.---विवाह

 


उत्तर मराठेशाहीतील सामाजिक स्थिती.---विवाह

उत्तर मराठेशाहीतील सामाजिक स्थिती.---विवाह
लेखन :प्रकाश लोणकर
उत्तर मराठेशाहीतील म्हणजे छ. थोरले शाहू महाराज सिंहासनारूढ झाल्यापासून(इ.स.१७०८) ते दुसऱ्या बाजीरावांस इंग्रजांनी पेशवे पदावरून दूर करे (इ.स.१८१८)पर्यंत्च्या काळातील राजकीय घडामोडींप्रमाणे सामाजिक स्थिती पण जाणून घेणे आवश्यक आहे.कारण सामाजिक आणि राजकीय बाबी एकमेकींशी निगडीत असतात.त्या अनुषंगाने आजच्या पोस्ट मध्ये ‘ विवाह ‘ह्या बाबीवर चर्चा केली आहे.ह्यातील सर्व तथ्ये,आकडेवारी संदर्भीय ग्रंथातून घेतलेली आहे.
हिंदू धर्मियांच्या सोळा संस्कारातील एक अत्यंत महत्वपूर्ण संस्कार म्हणजे विवाह हा होय.विवाहाच्या अनेक उद्द्येशांपैकी एक महत्वाचे कारण संतती किंवा वंश पुढे चालविण्यासाठी कायदेशीर आणि सामाजिक मान्यता मिळविणे हा आहे.भारतीय परंपरेत विवाहाचे आठ प्रमुख प्रकार सांगितले आहेत.पण त्यातील बरेचसे समाजात रूढ झालेले नव्हते.
उत्तर मराठेशाहीत खालील प्रकारचे विवाह प्रचलित असल्याचे दिसून येते.यातील सगळेच विवाह सर्रास होत असत असेही नाही जसे कि राक्षस विवाह..जे क्वचित होत असत.
अ -बालविवाह:अशा प्रकारच्या विवाहात सामान्यतः मुलाचे वय १४ तर मुलीचे ८ वर्षे असायचे.पेशवे काळाचे बालविवाह हे वैशिष्ठ्य होते. प्रचलित सामाजिक रूढी,परंपरे नुसार ठराविक वयोमर्यादेत विवाह न झाल्यास मुलीच्या आईवडिलांना घोर,चिंता वाटायची.असे कुटुंब समाजाच्या कुचेष्टा,टिंगल टवाळीचा विषय बनत असल्याने कसेही करून उपवर मुलींचे विवाह उरकण्याची मुलीच्या आईवडिलांना घाई झालेली असायची.दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी तर इ.स.१७९८-९९ मध्ये नऊ वर्षांनंतर मुलगी बिना लग्नाची राहता कामा नये असे फर्मानच काढले होते.त्या काळात सदोदित युद्ध होत असल्याने कर्तीसवरती मंडळी मृत्यू पावून अल्पवयीन पत्नीस अकाली वैधव्य प्राप्त होऊन कौटुंबिक,सामाजिक बंधनात राहावे लागायचे हा ह्या प्रथेचा मोठा दोष होता.
बालविवाहाची काही उदाहरणे
१- मुली---थोरल्या बाजीराव पेशव्यांची मोठी बहिण भिउबाईचा विवाह बाबूजी नाईक जोशी बारामतीकर यांच्या धाकट्या भावाशी त्या चार वर्षांच्या असताना झाला तर धाकट्या अनुबाइचा विवाह वयाच्या सहाव्या वर्षी झाला.चिमाजी अप्पांची मुलगी बायाबाईचा ती साडेचार वर्षांची असताना विवाह झाला होता.राघोबादादांची कन्या दुर्गाबाई तसेच दुसऱ्या बाजीरावांच्या बयाबाई ह्या कन्येचे विवाह त्या ८ वर्षांच्या असताना झाले होते.दौलतराव शिंदे यांची पत्नी बायजाबाई विवाह समयी १४ वर्षांच्या होत्या.
२-मुलगे— थोरले बाजीरावाचा विवाह वयाच्या ११ व्या वर्षी झाला तर राघोबा दादांचा प्रथम विवाह ते ८ वर्षांचे असताना झाला होता.चिमाजी अप्पा आणि नानासाहेब आणि नाना फडणवीस प्रथम विवाह समयी ९ वर्षे वयाचे होते.विश्वासराव,थोरले माधवराव,नारायणराव,सवाई माधवराव आणि दुसऱ्या बाजीरावांचे प्रथम विवाह ते अनुक्रमे ८,५,१०,९ आणि १३ वर्षांचे असताना झाले होते.थोरले बाजीराव-मस्तानी पुत्र समशेर बहाद्दरचा पहिला विवाह पिलाजीराव जाधवांच्या मध्यस्थीने तो पंधरा वर्षांचा असताना पेठ(नाशिक)च्या संस्थानाधिपती लक्ष्धर उर्फ चिमणाजी दळवी यांच्या लालकुंवर ह्या कन्ये बरोबर झाला.
ब-विषम वा जरठ विवाह—ह्या प्रकारच्या विवाहात वर वधुपेक्षा खूपच मोठा,कित्येकदा तिच्या जन्मदात्याच्या,आजोबांच्या वयाचा असे.असे विवाह करण्यामागील मुख्य उद्येश आपल्या नंतर पण वंश चालत राहणे हा असायचा.त्यामुळे एका पत्नीपासून पुत्र संतती झाली नाही तर दुसरीशी,तिलाही नाही झाली तर आणखीन तिसरीशी,अशा पुत्राभिलाषेपोटी वय होऊन गेले तरी लोक विवाह करत असत.यातून जरठ कुमारिका विवाह व बहुपत्नीत्वाच्या प्रथा रूढ झाल्या.विषम वा जरठ विवाहाची तसेच बहुपत्नीत्वाची काही उदाहरणे खाली दिली आहेत.
व्यक्ती वय वधूचे वय विवाहांची संख्या.
१-ज्योत्याजीराव केसरकर ८० छ.शाहू महाराजांच्या आग्रहास्तव हा विवाह झाला.
त्यापासून ज्योतीजीरावाना दोन पुत्रांचा लाभ पण झाला.
२-नाना फडणवीस ६७ ९ वर्षे ९
३-सखाराम बापू बोकील ६३ ५
४-शिधोजीराव नाईक निंबाळकर २१
५-नानासाहेब पेशवे ४० ९ वर्षे २
६-रघुनाथराव पेशवे ४५ ९-१० वर्षे ६
७-महादजी शिंदे ६५ १२ ९
८- बाजीराव रघुनाथराव $ १२
९-छ.शिवाजी महाराज-दुसरे-करवीर गादी १४
१०-छ.शहाजी महाराज उर्फ बुवासाहेब करवीर गादी ८
$ बाजीराव द्वितीय यांचे पेशवेपद इ.स.१८१८ मध्ये गेल्यावर ते बिठूर इथे राहू लागले.तोपर्यंत त्यांचे सहा विवाह होऊन गेले होते.बिठूरला आल्यावर त्यांचे आणखीन सहा विवाह झाले पण त्याविषयी सविस्तर माहिती उपलब्ध नाही.आठव्या विवाहातून त्यांना तीन मुली झाल्या.तिसरी मुलगी जाने.१८४७ मध्ये झाली ज्यावेळी ते ७२ वर्षांचे होते.
क-असुर विवाह:वधू पित्यास द्रव्य,अधिकार देऊन त्या बदल्यात अशा व्यक्तीच्या मुलीशी होणाऱ्या विवाहास असुर विवाह असे धर्मशास्त्रात(स्मृती)म्हटले आहे.दौलतराव शिंद्यांनी सर्जेराव घाटगे यांना द्रव्य आणि अधिकार देऊन त्या बदल्यात त्यांच्या बायजाबाई ह्या कन्येशी विवाह केला होता.कुडाळ भागातील एका तांबोळी व्यक्तीने दोनशे रुपये घेऊन आपल्या मुलीचा विवाह ठरविला होता पण वराने पैसे न देताच जबरदस्तीने मुलीशी पाट लावल्याची तक्रार पेशव्यांकडे आली होती.काही प्रसंगी ब्राह्मण मुलींचे पण पैसा घेऊन असुर विवाह होत असत.अशा प्रकारचे विवाह थांबविण्यासाठी नानासाहेब पेशव्यांच्या पत्नी गोपिकाबाईनी दोषी व्यक्तिंस दंड ठोठावण्याचे आदेश दिले होते.दुसऱ्या बाजीरावांनी धन घेऊन मुलगी देणाऱ्या ब्राह्मणास जातीबाहेर काढावे अशी ताकीद दिली होती.
ख-राक्षस विवाह-वधूला तिच्या/मातापित्यांच्या इच्छे विरुद्ध पळवून नेऊन तिच्याशी केलेल्या विवाहास राक्षस विवाह असे म्हणतात.शिधोजीराव नाईक निंबाळकरांचा करवीर गादीच्या छ.शिवाजी महाराज(द्वितीय) यांच्या कन्ये बरोबर चा विवाह ह्या प्रकारातील होता.राक्षस विवाहाच्या अजून एका प्रकरणात वाई प्रांतातील वाघोलीच्या सिद्धनाथ मेढेकर ह्या व्यक्तीने एका जानो माणकेश्वर कुलकर्णी याची मुलगी जेवायला नेतो सांगून देवळात नेऊन जबरदस्तीने तिच्याशी लग्न लावल्याची नोंद आहे.मुलीच्या वडिलांनी पेशव्यांकडे तक्रार केल्यावर पहिला विवाह रद्द करून दुसरा विवाह करण्यास परवानगी दिली.
ग-खांडा विवाह-ह्या विवाहात प्रत्यक्ष लग्नाच्या वेळी वर उपस्थित न राहता तलवार/खांडा अशा शस्त्रांबरोबर विवाह लावला जाई.असा विवाह झालेल्या स्त्रीस खांडा राणी असे संबोधले जाई.अशा प्रकारे विवाह झालेल्या स्त्रीस लग्नाची पत्नी म्हणून समाज मान्यता मिळायची पण तिच्यापासून झालेली औरस संतती न समजता ‘ लेकावळे ‘ समजली जाई.खांडा राणीस पती निधनानंतर धर्म पत्नी प्रमाणे सती जाण्याची अनुमती होती.महादजी शिंदे राणोजी शिंद्यांच्या रजपूत वंशीय खंडाराणी चिमाबाई यांचे तृतीय अपत्य होते.दुसऱ्या बाजीरावांचा पण लाला मणिराम परदेशी यांच्या कन्येशी त्यांच्या कट्यारी बरोबर विवाह झाला होता.या विवाहातून खांडा राणी राधाबाईस तीन पुत्र झाले होते. सुभेदार मल्हारराव होळकर यांची खंडा राणी-हरकुबाई- बढवाणीच्या रजपूत राजघराण्यातील होती.
घ-विधवा विवाह/पुनर्विवाह-ब्राह्मण जातीत विधवा विवाह वा पुनर्विवाहास मान्यता नव्हती.बालपणीच विवाह होत असल्याने पती पत्नीच्या वयात खूप अंतर,युद्धजन्य परिस्थिती,अनुवांशिक आजार इ.कारणांनी पतीचा अकाली मृत्यू होण्याच्या घटना घडत.विधवा स्त्रियांवर केशवपन,विशिष्ठ रंगाची वस्त्रे परिधान करणे,शुभ कार्यातील सहभागावर प्रतिबंध,इ.बंधने लादल्याने त्यांचे उर्वरित आयुष्य निरस,दुखमय व्हायचे.
ब्राह्मणेत्तर समाजात मात्र विधवा विवाहास मान्यता होती.अशा प्रकारचे विवाह पाट/मोहोतूर आणि मुहूर्त पद्धतीने पार पडत. ह्या विवाह प्रकारात केवळ विधवा स्त्रियांचेच विवाह होत नसून पतीने त्यागलेल्या वा ज्यांचा पती प्रदीर्घ काळ बेपत्ता आहे अशा सधवा स्त्रियांचे सुद्धा विवाह होत असत.अशा विवाहास शास्त्राधार नसला तरी विवाह संबंध छेदनाची(काडीमोड)हि जुनी परंपरा होती.पाट विवाह करणाऱ्या नवऱ्यास पहिल्या नवऱ्यास ‘देज ‘ ( विशिष्ठ रक्कम)द्यावा लागायचा.अशा विवाहात पहिल्या पतीपासून झालेल्या संततीचा दुसरा पती शक्यतो स्वीकार करायचा.याला ‘ पोटाखाली जाणे ‘म्हणत असत.
विवाह प्रकारानुसार संततीचे वर्गीकरण:विविध प्रकारच्या विवाहातून जन्माला येणाऱ्या संततीचे समाजातील स्थान,दर्जा माता पित्यांच्या विवाहानुसार निश्चित होत असे.
१-कडू-आंतरजातीय विवाहातील संततीस कडू असे म्हटले जाई.अशा विवाहातून निर्माण झालेली संतती मूळ जातीत येऊन वंश संकर होऊ नये यासाठी तत्कालीन समाजाने काही बंधने टाकली होती.शक्यतो कडू संततीस जाती बाहेर ठेवण्याकडेच समाजाचा कल असायचा.तरी पण काही वेळा कडू संततीस चांगले दिवस आले,त्यांची भरभराट झाल्याचे दिसले तर त्यांच्याशी रोटीबेटी व्यवहार पुन्हा सुरु करण्यास आडकाठी नसायची.
पुण्यातील काही कडू कोष्ट्यानी संगमनेर परगण्यातील गोड कोष्ट्यांशी(फसवणूक करून)सोयरिक केली होती.वस्तुस्थिती लक्षात आल्यावर त्यांनी पेशव्यांकडे तक्रार केल्यावर पेशव्यांनी सगळ्यांनी आपापल्या जातीत वर्तावे असा आदेश दिला होता..
२-लेकावळे-बालविवाहाची पद्धत रूढ असल्याने पत्नी वयात येण्यास काही वर्षांचा काळ जाई.तसेच त्या काळात लढाई,युद्ध,लष्करी मोहिमा सतत चालू असल्याने त्यातील सहभागी पुरुष मंडळी आपल्या घरापासून बराच काळ दूर असत.ह्या दोन्हींच्या परिणाम स्वरूप विवाहबाह्य संबंध जसे कि,रक्षा,राख,उपपत्नी,नाटकशाळा,दासी आदी प्रकारच्या स्त्रियांशी संबंध येऊ लागले.यातून निर्माण झालेली संतती मुलगा असल्यास ‘ लेकावळा ‘व मुलगी असल्यास ‘ लेकावळ्या ‘ म्हणून ओळखल्या जात.ह्या संततीस औरस संततीचा दर्जा नसल्याने जन्मदात्याचा वारस म्हणून मिळणारे लाभ तिला मिळत नसत.पण त्यांची काळजी घेतली जात.त्यांना पागेचा प्रमुख,शिलेदारी,दुय्यम दर्जाची सरदारी,एकांडे शिलेदार यासारखी तैनाती मिळायची.तसेच सत्तेच्या जवळच्या परिघात त्यांचा वावर असायचा.
बाळाजी विश्वनाथ पेशवे(थोरल्या बाजीराव पेशव्यांचे वडील)यांना गुलवती नावाच्या नाटकशाळे पासून भिकाजी नावाचा थोरल्या बाजीरावांसारखाच दिसणारा मुलगा झाला होता.भिकाजीने थोरल्या बाजीरावांबरोबर बऱ्याच मोहिमात भाग घेऊन शौर्य दाखविले होते.थोरले बाजीराव आणि त्यांची आई राधाबाई यांच्यातील भिकाजी दुवा होता.राधाबाईंनी भिकाजीसारख्या पेशव्यांच्या लेकावळ्याना त्यांच्या निवासासाठी पुणे शहरात स्वतंत्र निवासी वसाहतीची स्थापना केली होती.
इंदूर शहरात होळकर घराण्यातील लेकावळ्यान्साठीची कुँवर आळी प्रसिद्ध आहे.ह्या लेकावळ्याना होळकरांकडून दरमहा ठराविक रक्कम पगार म्हणून मिळायची.त्यांना कागदोपत्री चिरंजीव म्हणून संबोधले जायचे.कुंवर लेकावळ्यात मराठा,धनगर,रजपूत,मुसलमान इत्यादी विविध जातीधर्मांची मंडळी असत.सर्व कुंवर मंडळी होळकर हेच उपनाम बहुदा लावतात.धर्मा कुंवर,हरनाथसिंह,भारमल दादा हे होळकरशाहीतील नामांकित लेकावळे होते.
थोरले बाजीराव आणि मस्तानी यांचा मुलगा समशेर बहाद्दूर पेशवे घराण्यात लेकुरवाळा म्हणूनच समजला जाई.नानासाहेब पेशव्याना येसू ह्या लाडक्या रक्षेपासून तीन तर स्वरूपापासून एक पुत्रप्राप्ती झाली होती. होती.राघोबादादास उपस्त्रीयांपासून अनौरस पुत्रांपेक्षा अनौरस कन्याच जास्त झाल्या.त्यात एक लक्ष्मणसिंह म्हणून लेकावळा होता.नानासाहेबांचे कृष्णसिंग,हैबतसिंग आणि लक्ष्मणसिंग हे लेकावळे दुसऱ्या बाजीरावांच्या कारकिर्दीत पण कार्यरत होते.
नीतिबाह्य लग्ने:सर्व जातीतील प्रजाजनांनी विवाहासारख्या बाबतीत आपापल्या जाती रिवाज,प्रथा,नीतिबंधने यानुसारच वागावे असे राज्यकर्त्यांचे धोरण होते.इ.स.१७७०-७१ मध्ये भिउबाई व्यास ह्या ब्राह्मण महिलेने आपल्या मुलीचे दोन वेळा लग्न लावले.हा प्रकार उघडकीस आल्यावर सर्व संबंधिताना शिवनेरी किल्ल्यावर कैदेत टाकण्यात आले. इ.स. १७५२-५३ मध्ये सिन्नर जिल्हा नाशिक येथील निंबाजी वल्द(पिता) झगडा..बहुदा झगडे असावे.याने धोंडाजी माळी ह्या बऱ्याच वर्षांपासून परदेशी गेलेल्या व्यक्तीच्या पत्नीशी धोंडाजी जिवंत आहे कि नाही याची खातरजमा न करता पाट लावला.यासाठी त्याला ८० रुपये दंड भरावा लागला.बापुजी माळी नावाच्या व्यक्तीने आपल्या मुलीचा प्रथम पती हयात असून देखील तिचा दुसऱ्या व्यक्तीबरोबर पाट लावून दिल्याने त्याला पण ८० रुपये दंड ठोठावण्यात आला होता.
विवाहाचा थाटमाट-लग्न समारंभ सामाजिक मान्यतेनुसार आपापल्या जातीतील रूढी,परंपरा,प्रथा यानुसार उभय पक्षांच्या समाजातील स्थान आणि सांपत्तिक स्थितीनुसार साजरे होत असत.देवक,देवप्रतिष्ठा,हळद,उष्टी हळद,वाग्निश्चय,सीमंत पूजन,वरात,मिरवणुकी आदी उत्साहात काढल्या जात.सवाई माधवरावांचा विवाह १०-०२-१७८३ रोजी पुण्यात झाला.त्यासाठी सबंध देशभरातून राजेरजवाडे,संस्थानिक,जहागीरदार आदि मंडळी आली होती.ह्या विवाहासाठी दुसरे छ.शाहू महाराज,निजामाचा मुलगा तसेच टिपू सुलतान पण येणार होते.शाही पंक्तीसाठी १५०० चांदीची ताटे,१२०० समया बनविण्यात आल्या होता.सुमारे एक महिना हा सोहळा चालला होता.
दौलतराव शिंद्यांनी पण त्यांच्या बायजाबाई बरोबर झालेल्या विवाहासाठी दोन कोटी रुपये खर्च केले होते.
सर्वसामान्य जनता पण लग्नकार्यासाठी अमाप खर्च करत असे,त्यासाठी कर्ज काढण्याची पण तिची मानसिकता असायची.एकंदरीत सर्व जाती जमातीत विवाह मोठ्या थाटामाटाने पार पडत असत.
संदर्भ:१-पेशवे –लेखक श्रीराम साठे
२-मराठ्यांचा इतिहास,खंड दुसरा-संपादक अ.रा.कुलकर्णी आणि ग.ह.खरे
३ भवानीशंकर बक्षी यांची रोजनिशी-संपादक रामभाऊ लांडे
४-पेशवाई –लेखक कौस्तुभ कस्तुरे
५-मराठी रियासत-खंड ८.लेखक गो.स.सरदेसाई

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...