विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 29 December 2022

घाशीराम कोतवालची अनसुनी कहाणी भाग २

 

घाशीराम कोतवालची अनसुनी कहाणी
पोस्तसांभार ::राजेंद्र म्हात्रे



भाग २
घाशीराम कोतवालचा काळ निरंकुशता व सत्तेचा दुरुपयोग या दोन गोष्टी प्रामुख्याने दर्शवतो.
त्याचवेळी, पुण्यात त्याला अनेक शत्रू निर्माण झाले. त्याच्या मुलीच्या नानांबरोबरच्या जवळीकीमुळेच घाशीराम कोतवालाचे महत्व वाढत असल्याचे अफवा पुण्यात पसरू लागल्या.
अफवा अशाकरिता, की कोणत्याही समकालीन कागदपत्रांमध्ये या घटनेचा उल्लेख इतिहासकारांना मिळाला नाही. त्यामुळे, या प्रकरणाची सत्यता निश्चित करणे जवळजवळ अशक्य आहे.
29 ऑगस्ट, 1791…
श्रावण महिना… मोठ्या संख्येने ब्राह्मण त्यांच्या विद्येला पुण्यातील धर्मशास्त्र्यांकडुन मान्यता मिळवण्यासाठी आणि पर्वती टेकडी मंदिराच्या पायथ्याशी दक्षिणा घेण्यासाठी पुण्यात येत होते. वाढत्या गर्दीचे नियमन करणे आणि सुव्यवस्था राखणे हे कोतवालाचे काम होते. नेहमीप्रमाणे श्रावण महिन्यात रात्रीच्या संचारबंदीसह कडक नियम लागू करण्यात आले होते.
तेलंगातून (आंध्र) ब्राह्मणांचा एक गट दक्षिणेसाठी पुण्यात आला होता आणि त्यांच्याकडून शांतता भंग करणाऱ्या व इतर अनियमित वर्तनाच्या अनेक घटना घडल्या. त्यांनी नियमांचे उल्लंघन केले, चोरी आणि दंगल केली. २९ ऑगस्ट रोजी त्या तेलंगा ब्राह्मणांना एका अंमलदाराने पकडून भवानी पेठेतील चौकीतील एका खोलीत कोंडून ठेवले होते. घाशीराम यांनी वैयक्तिकरित्या तुरुंगाच्या कोठडीला भेट दिली नाही, जी खराब वायुवीजन असलेल्या बोगद्याच्या रूपात होती. कैदी दिवसभर आणि एक रात्र कोठडीत राहिले आणि तिसऱ्या दिवशी सकाळी मानाजी फाकडे (महादजी शिंदे यांचा चुलत भाऊ) त्या वाटेने जात असताना त्यांना कसलातरी आवाज आला. ते स्वतः कोठडीत गेले तेव्हा तेलींग ब्राह्मणांपैकी एकवीस जण मरण पावल्याचे आढळले. त्यांनी तातडीने नाना आणि पेशव्यांना या दुर्घटनेची माहिती दिली.
तेवढ्यात, घाशीराम नानांकडे गेला आणि सांगितले की त्या ब्राह्मणांनी अफूचे सेवन केले होते, ते शहरात चोऱ्या करत होते आणि अफूच्या अतिसेवनाने त्यांचा मृत्यू झाला. घाशीरामने मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची परवानगी मागितली. तेवढ्यात पेशव्यांनी नानांना वाड्यात बोलावून विचारले की, ब्राह्मणांचा मृत्यू घाशीरामानेच घडवून आणला असल्याने त्यांना कोणती शिक्षा द्यायची?
ही बातमी पसरताच हजाराहून अधिक ब्राह्मण नानांच्या घराबाहेर जमले आणि त्यांनी घाशीरामला शिक्षा करण्याची मागणी केली. नानांनी मुख्य न्यायाधीश अय्या शास्त्री यांना भेटायला बोलावले, पण त्यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आणि त्यांचे कपडे फाडले गेले. मराठ्यांच्या राजधानीत एक संकट निर्माण होत असल्याचे दिसत होते आणि नागरिकांच्या संतापाचे कारण म्हणजे घाशीराम आणि त्याचे जनतेवरील जुलूम!. ते पाहून अखेर नानांनी कोतवालाला अटक करण्याचे आदेश दिले.
घाशीरामला अटक करण्यात आली आणि पाठीमागे तोंड करून एका उंटावर बसवण्यात आले. हात बांधून गारदी पायदळाच्या कडक पहार्याखाली शहरभर त्याची धिंड काढण्यात आली. काही ब्राह्मणांनी कोतवालावर दगडफेक केली. त्यानंतर त्याला पर्वती टेकडीजवळील रमणा येथे नेऊन बेड्या ठोकण्यात आल्या. मिरवणुकीत येणाऱ्या ब्राह्मणांना त्यांच्या इच्छेनुसार त्याला क्षमा किंवा शिक्षा करण्यास सांगण्यात आले.
या संपूर्ण घटनेची बातमी इंग्रज रहिवासी सर चार्ल्स मॅलेट यांनी जेम्स फोर्ब्सला पाठवलेल्या एका पत्रात दिली होती. संपूर्ण घाशीराम प्रकरण २९ ते ३१ ऑगस्ट १७९१ दरम्यान घडले.
त्याच्या पत्रानुसार, 'दशकभराच्या जुलूमशाहीमुळे आणि तेलंगा ब्राह्मणांच्या अलीकडच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या ब्राह्मणांनी घाशीरामला कोणतीही दया दाखवली नाही. दगड उचलून त्यांनी कोतवालावर मारा केला, अगदी तो मरेपर्यंत.
कुणालाही मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची परवानगी नव्हती आणि त्याची सर्व मालमत्ता जप्त केली गेली.'
एका महिन्यानंतर नाना फडणवीस यांच्या पत्रात संपूर्ण प्रकरणाचा उल्लेख आहे.
कोतवालाच्या गुन्ह्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या, म्हणून त्याला शिक्षा झाली. या विपरीत कोणी काही लिहिले असेल तर ते खोटे आहे. लोक अफवा पसरविण्यासाठी ओळखले जातात. पुण्याच्या लोकांची हीच पद्धत आहे...'
आज दोनशे एकतीस वर्षे होऊन गेली त्या घटनेला! मराठा साम्राज्याची राजधानी पुण्यात संतप्त जमावाच्या हातून कोतवालाची अत्यंत हिंसक, सार्वजनिक हत्या झाली. अठराव्या शतकात मध्ययुगीन काळातील क्रूरता घडली, जे त्याकाळच्या अगदी विपरीत असे होते! सुसंस्कृत पुण्याला एक कलंक कायमचा चिकटला जेव्हा सामान्य माणसांनी जुलमी अधिकार्यांच्या कृत्यांचा हिंसक बदला घेतला.
नमोस्तुते !

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...