विनोद जाधव एक संग्राहक

Monday 27 February 2023

सर्वश्रेष्ठ प्रशासक - महाराणी अहिल्याबाई होळकर भाग २


सर्वश्रेष्ठ प्रशासक - महाराणी अहिल्याबाई होळकर
लेखक : प्रा. हरी नरके,
कृषीवल, रविवार मोहोर, 3 जून 2012


भाग २

अहिल्याबाई- द्रष्ट्या प्रशासक :
अहिल्याबाईंची प्रतिज्ञा होती की, “माझे कार्य माझ्या प्रजेला सुखी करणे हे आहे. माझ्या प्रत्येक कृतीला मी स्वतः जबाबदार आहे. सत्तेच्या अधिकारामुळे येथे मी जे जे काही करीत आहे, त्या प्रत्येक कृत्याचा जाब परमेश्वर मला विचारणार आहे. परमेश्वराने ज्या जबाबदाऱ्या माझ्यावर सोपविल्या आहेत, त्या साऱ्या मला पार पाडावयाच्या आहेत.”
अहिल्याबाईंचा प्रत्येक लहानसहान व्यवहारही प्रजेचे हित बघून होत होता. त्याचे शेकडो कागदोपत्री पुरावे आज उपलब्ध आहेत. आपला प्रदेश मक्त्याने देताना त्या पुढीलप्रमाणे अटी घालत असत. 1) रयत राजी राखणे 2) राज्य समृद्ध करणे 3) नेमणुकी व खर्चाच्या मर्यादेतच खर्च करणे 4) लष्कराने पायमल्ली केल्यास कठोर दंड केला जाईल. 5) अफरातफर झाल्यास कडक शिक्षा केली जाईल.
अहिल्याबाई स्वतः न्यायनिवाडे करीत. प्रश्न सोडवित. पडीक जमिनी लागवडीखाली आणीत. शेतात विहीरी खोदून देत. सरकारी हिशोब स्वतः तपासून एकेक खाते सोलून बघत. अहिल्याबाईंनी प्रत्येक विभागाची आणि शाखेची नव्याने रचना केली. शेतसारा आणि करवसुलीची पद्धत बदलली. नवी घडी बसविली. नवे कायदे केले. त्या शेतकऱ्यांना वार्षिक 12 टक्के दराने शेतीसाठी कर्ज देत. व्यापार, वाहतूक, उद्योग वाढीला प्रोत्साहन देत. त्यामुळे महेश्वर हे विणकरांचे अखिल भारतीय केंद्र बनले. व्यापार आणि उद्योगाचे सुप्रसिद्ध ठिकाण बनले.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...