विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 27 April 2023

लातूर जिल्ह्यातील वडवळ नागनाथ येथील आण्णासाहेब पाटील यांची सात बुरुजांची आणि सात दरवाजे असणारी दमदार गढी.

 





लातूर जिल्ह्यातील वडवळ नागनाथ येथील आण्णासाहेब पाटील यांची सात बुरुजांची आणि सात दरवाजे असणारी दमदार गढी..
प्रत्येक देशाचा, राज्याचा , गावाचा एक वारसा असतो. हा वारसा टिकवणे, जतन करणे आणि पुढील पिढीसाठी तो व्यवस्थित राहिला याकडे लक्ष देणे आवश्यक असते. जगात हिंदूस्थानातील संस्कृती, येथील वारसा श्रेष्ठ समजला जातो. महाराष्ट्रातील गड, किल्ले, ऐतिहासिक घटना, स्थळांचा वारसा श्रेष्ठ आहे. त्याच प्रमाणे ग्रामीण महाराष्ट्रातील गढी आणि चिरेबंदी वाडे यांचा वारसा दैदिप्यमान असा आहे. पण काळाच्या ओघात आता तो लुप्त होत चालला आहे. तो जतन करणे वैयक्तिक स्तरावर कोणालाही शक्य नाही.
गावागावात चिरेबंदी वाडे होते असे सांगितले जाते. पंचक्रोशी मध्ये एकतरी गढी असायचीच. महसूल वसुली करणे, तो सुरक्षित ठेवणे आणि इच्छीत ठिकाणी पोहंचवणे यासाठी केलेली ती व्यवस्था होती. त्यामुळे चिरेबंदी वाडा आणि बुरुजांची दमदार गढी यांची सुरक्षा व्यवस्था ही एखाद्या किल्ल्याच्या तोडीची असायची.
लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील मौजे वडवळ नागनाथ येथील आण्णासाहेब बापूसाहेब पाटील यांची गढी पंचक्रोशी मध्येच नव्हे तर जिल्ह्यात प्रसिद्ध असणारी एक गढी आहे. पाटील यांची आठवी पिढी सध्या या गढीमध्ये राहतेय, म्हणजेच किमान साडेचारशे वर्षापुर्वीची ही गढी असावी असे सांगितले जाते. तब्बल दहा एकरांवर उभारलेली ही गढी आहे. सात मजबूत बुरुज आणि सात दरवाजे हे या गढीचे वैशिष्ट्य आहे. राहण्यासाठी ही गढी नव्हती तर परिसरातील गावांमधून जमा केलेला महसूल या ठिकाणी ठेवला जायचा आणि नंतर निजामशाही मधील जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या बिदरच्या किल्ल्यात पाठवला जायचा. त्यामुळे महसूल सुरक्षेसाठी अतिशय कडक सुरक्षा या ठिकाणी केलेली पाहण्यास मिळते. एखाद्या किल्ल्याच्या तोडीची सुरक्षा व्यवस्था या गढीमध्ये होती.
पुर्वाभिमुख पहिल्या प्रवेश द्वाराला हत्ती बांधण्यासाठी साखळदंडाची व्यवस्था होती. आजही प्रवेशद्वारावर साखळदंड पाहण्यास मिळतात. तटबंदीची माञ पडझड झालेली असल्याने ती दिसत नाही. दाराचा पट गायब झाला असला तरी पट अडकवण्याची दगडी व्यवस्था, आगळ व्यवस्था दिसून येते. मला मोठा दरवाजा गढीच्या भव्यतेची साक्ष देत उभा आहे.
या मुख्य प्रवेक्ष द्वारापासून आत गेल्यावर मोकळी जागा, जनावरे, घोडे बांधण्याची व्यवस्था होती. सध्या दक्षिण बाजूस शाळेची इमारत आहे. दुसरे प्रवेशद्वार ही भक्कम सुरक्षेसह असलेले दिसून येते. सध्या यांचाही लाकडीपट खराब झालेला असल्याने काढलेला आहे. या दाराच्या बाजूला पहारेकरी यांच्या साठीची बैठक, निवास व्यवस्था होती. या दारातून थोडेसे उत्तर दिशेला जाऊन पुन्हा पुर्वाभिमूख असणारे प्रवेशद्वार आहे. ते आजही सुस्थितीत आहे. दार बंद करुन आगळं टाकली की बाहेरुन आत येते नाही.
दारामधून आत गेले की बैठक व्यवस्था, ढाळज आणि वरच्या बाजूस पहारेकरी, बैठक व्यवस्था. सरळ गेले की थोडी दगडी चोप चढून गेल्यावर पुन्हा एक पश्चिम मुखी दरवाजा. हा दरवाजा एकदम सुस्थितीत आहे. दाराला आगळ आहे. तीथेही बैठक व्यवस्था आहे. पुन्हा उत्तर मुखी दरवाजा आहे. यातून आत गेल्यावर दोन्ही बाजूला धान्य कोठारे, लावणी, वरच्या मजल्यावर जाण्यासाठी दगडी पायऱ्या, पुढे आणखी एक उत्तर मुखी दरवाजा आहे. आत प्रशस्त माळवद, वरच्या मजल्यावर जाण्यासाठी व्यवस्था आहे.
*आगळ व्यवस्था अप्रतिम आहे*
या गढीला सात दरवाजे होते पण सध्या सहाच शिल्लक आहेत. प्रत्येक दाराला मजबूत आगळ आहेत. चार क्रमांकाच्या दाराला असणारी आगळ व्यवस्था जबरदस्त आहे. दार बंद करून आगळ लावल्या नंतर बाजूच्या भिंतीला एक आगळं दिलेली आहे. माञ त्याच्या मुखाला घडवलेला दगड बसवलेला आहे. त्याच्या मागे एक आगळ आहे ती पाठीमागे सरकवली आणि दगड लाऊन टाकला की दाराची आगळ लाॅक होऊन जाते. जोपर्यंत तो दगड काढून आगळ बाहेर काढली जात नाही तो पर्यंत मुख्य दाराची आगळ इंचभरही मागेपुढे सरकत नाही. विशेष म्हणजे दगडापाठीमागे असणारी आगळ पुर्ण बाहेर काढण्याची गरज नाही. सुमारे दीड ते दोन फुटापर्यंत ही आगळ पाठीमागे सरकवली जाते व पुढे ओढता येते. घडवलेला दगड अशा पध्दतीने बसतो की भिंतीमध्ये तो वेगळा दिसतच नाही.
या गढी मधून भुयारी मार्गाने गढीच्या बाहेर निघता येते. त्यातही आणखी वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे या गढीमध्येच लपून बसण्यासाठी च्या अनेक व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे या जागी लपून बसले तर संपूर्ण गढी ताब्यात घेऊन शोधून काढली तरी गुप्त ठिकाणी बसलेल्या व्यक्ती कोणालाच सापडून येत नाही.
pc - पञकार Abhay Mirajkar

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...