विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 29 June 2023

पेडगावच्या विठ्ठल मंदिराला मालोजीराजे भोसलेंनी दिली 75 एकर जमीन

 


पेडगावच्या विठ्ठल मंदिराला मालोजीराजे भोसलेंनी दिली 75 एकर जमीन
इतिहास संशोधकांकडून दानपत्राचे दस्तावेजांवर प्रकाश
लेखन :अरविंद अर्खाडे
महाराष्ट्राच्या इतिहासात विविध ठिकाणच्या देवांच्या दिवाबत्ती पासून रोजच्या नित्य सेवासोयीसाठी राजे महाराजे यांनी दानपत्र, इनाम दिले आहेत. असेच जुने इनाम कायम करण्यासाठी छत्रपती शिवाजीराजे यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी आपल्या जहागिरीतील पेडगाव (ता. श्रीगोंदा) येथील एक चावर म्हणजे सुमारे 75 एकर जमीन येथील श्री विठ्ठल मंदिराच्या व्यवस्थेसाठी अकोवा गोसावी, बिन गोदोबा गोसावी, बडवे ,पुजारी यांना इनाम दिली होती. ही बाब इतिहास संशोधकांनी उजेडात आणली आहे.
याबाबत नुकतेच इतिहास अभ्यासक प्रवीण भोसले आणि आशुतोष बडवे पाटील यांनी अभ्यासपूर्ण माहिती उपलब्ध करून दिली आहे. श्रीगोंदा तालुक्याला हजार वर्षांचा इतिहास आहे.छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा नगरच्या निजामशाहीतील प्रमुख सरदार, कारभारी होते. मालोजीराजे भोसले यांचे वडील बाबाजी राजे भोसले यांच्यापासून जहागीर असलेला श्रीगोंदे म्हणजे तत्कालीन चांभारगोंद्याचा परिसरात मालोजीराजे भोसले यांच्या काळात ऐतिहासिक महत्त्व आले. इथला आखीव रेखीव विकास आणि इमारती, धार्मिक स्थळ, तटबंदी उभारणीपासून इथल्या राजकारभाराची व्यवस्था त्यांनी लावली.
तसेच पेडगाव येथील पांडे पेडगावचा भूईकोट किल्लाही मालोजीराजे यांच्या जहागिरीत असल्याने तिथेही अनेक व्यवस्था उभ्या करण्यात भोसले घराण्याचा वाटा राहिला आहे. मालोजीराजे भोसले यांनीच संत श्री शेख महंमद यांना श्रीगोंदे येथे आणून एक मठ बांधून दिला तसे इनाम आणि मकरंद पेठ वसवली असल्याचे कागद उपलब्ध आहेत. भोसले घराणे हे मातब्बर घराणे असल्याने या घराण्याचे तुळजापूरची भवानी आणि पंढरपूरचा विठ्ठलावर विशेष श्रद्धा होती. तसेच आपल्या जहागिरी असलेल्या जागृत देवस्थानवरही भोसले घराण्याची श्रध्दा होती.
स्वराज्यांचे छत्रपती घराण्यापासून पुढे पेशवे, होळकर, शिंदे सरदार यांनी अनेक देवस्थानाच्या दिवाबत्ती नित्यसेवेसाठी जमीन इनाम दिल्याच्या नोंदी इतिहासात दिसतात. अशीच एक महजर म्हणजे जुना दस्तावेज उपलब्ध असून छत्रपती शिवाजी महाराज यांचे आजोबा मालोजीराजे भोसले यांनी दिलेल्या दानपत्रात पेडगावच्या विठ्ठलाच्या नित्य सेवा व्यवस्थेसाठी मालोजीराजे यांनी त्याच्या वडिलांनी दिलेले इनाम कायम ठेवल्याचा उल्लेख आहे.
यात पेडगावमध्ये विठ्ठल मंदिराच्या व्यवस्थेसाठी 31 डिसेंबर 1596 रोजी दिलेले पत्रामध्ये एक चावर अठरा गज जमिनीचे दानपत्र दिले आहे. यात पेडगावतर्फे मधील तत्कालीन बाबाजी चिकलठाणा (चिखलठाणे) आणि नामाजी चिकलठाणा यांना एक पत्र आणि मंदिराचे पुजारी यांना एक पत्र दिलेले असून यात बाबाजी आणि नामाजी यांची प्रत्येकी चावर निम म्हणजे दोघांनी अर्धी अर्धी जमीन या मंदिराचे इनाम म्हणून विठ्ठलाच्या नित्यव्यस्थेसाठी अकोवा गोसावी, बिन गोदोबा गोसावी, बडवे पुजारी यांना देणे बाबतीत हे पत्र आहे.
असे आहे दानपत्र
31 डिसेंबर 1596 चे हे पत्र फारसी सन जमादिलावल सब तिसैन तिसामयाही रोजीचे पत्र असून यावर फारसीत दोन शिक्के आहेत. अज रख्तखाने राजे श्री मालोजी राजे दामदौलत मी बजानी हुदेदारानी हाल व इस्तकबाल व मोकदमानि कसबे पेडिगाऊ कस पा. मजकुर विदानद साचा तिसैन व तिसा मैया (1596-97) अकोवा गोसावी पुजारी बिन गोदोबा गोसावी बडवे पुजारी यांना. इनाम बदल सदकोवाची जमीन चावर एक 18 गज सरायनी प्रजा. बाबाजी चिकलठाणा नामाजी चिकलठाणा चावर निम - चावर निम असा पत्रात उल्लेख आहे.

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...