विनोद जाधव एक संग्राहक

Thursday 30 November 2023

#करवीर_संस्थानचे_छत्रपती_राजाराम_महाराज ( दुसरे )

 


#करवीर_संस्थानचे_छत्रपती_राजाराम_महाराज
( दुसरे ) 
लेखन :महेश पवार
यांना पुण्यतिथी निमित्त #विनम्र_अभिवादन !
छत्रपती शिवाजी महाराज, तिसरे ( बाबासाहेब महाराज ) यांना आपत्य नसल्यामुळे त्यांच्या मृत्यु नंतर सरदार पाटणकर घराण्यातील नागोजीराव ( राजाराम महाराज दुसरे ) यांना दत्तक घेऊन गादीवर बसवण्यात आले. त्या वेळी छत्रपती राजाराम महाराज अल्पवयीन असल्यामुळे त्या वेळचे ब्रिटिश रेसिडेंट कर्नल एॅंडरसन यांच्या सूचनेवरून कॅप्टन एडवर्ड वेस्ट यांची असिस्टंट रेसिडेंट म्हणून नेमणूक करण्यात आली, महाराजांच्या शिक्षणासाठी जमशेटजी नवरोजी ,उनवाला या पारशी शिक्षकाची नियुक्ती केली गेली.
छत्रपतींनी आधुनिक पद्धतीच्या इंग्लिश शिक्षणात खूप प्रगती केली. शिक्षणाबरोबरच बिलियर्ड्स ,क्रिकेट , शिकारी यांचीही त्यांना आवड होती. मुंबईमध्ये ड्यूक ऑफ एडिनबर्ग याच्या स्वागताच्या वेळी झालेल्या कार्यक्रमात सफाईदार इंग्रजीत भाषण राजाराम महाराजांनी केले होते. कोल्हापुरातील जनतेलाही आधुनिक शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी 1869 साली राजवाड्या शेजारी एका हायस्कूलची स्थापना केली; तेच सुप्रसिद्ध #राजाराम_कॉलेज होय. खर्या अर्थाने शैक्षणिक चळवळीचा पाया कोल्हापुरात राजाराम महाराजांनीच घातला.
1870 साली छत्रपती राजाराम महाराज युरोप दौऱ्यासाठी इंग्लंडकडे बोटीने रवाना झाले. या दौऱ्यात अनेक देशांना त्यांनी भेटी दिल्या,आॅक्सफर्ड सारख्या मोठ्या युनिव्हर्सिटींना भेटी दिल्या.एतिहासीक ठिकाणे व म्युझियम पाहिली. इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये जाऊन लोकशाहीचे कामकाज कसे चालते ते पाहिले. पाश्चात्त्य देशांमधील खुले विचार व आधुनिकता पाहून राजाराम महाराज प्रभावित झाले त्यांनी स्त्रियांना देखील शिक्षण द्यायला हवे हा संकल्प केला.
इंग्लंडचा पाच महिन्यांच्या दौरा संपवून 1 नोव्हेंबरला राजाराम महाराज परतीच्या प्रवासाला निघाले. वाटेत जागोजागी थांबून त्यांनी अनेक स्थळे ,प्रसिध्द व्यक्ती यांना भेटी दिल्या. बेल्जियमच्या राजाशी त्यांनी भेट घेतली , त्याच वेळी त्यांना थंडीचा त्रास सुरू झाला. ऑस्ट्रियाच्या इन्सब्रुक येथे असतांना राजाराम महाराज यांची प्रकृती खूपच खालावली. इटलीची राजधानी फ्लोरेन्स येथे पोहोचल्यावर एका डॉक्टर कडून त्यांच्यावर उपचार सुरू असतांना त्यांचे दिनांक 30 नोव्हेंबर 1870 रोजी निधन झाले .
इटलीमध्ये हिदु रितीरिवाजानुसार अंतिम संस्कार करू देण्यास कर्मठ ख्रिश्चन प्रशासनाने परवानगी नाकारली. पण इंग्लंडच्या राणीच्या इटलीमधील वकिलांनी मध्यस्थी करून , हिंदू रितीरिवाजानुसार अंतिमसंस्कार करण्याची परवानगी मिळवली. या अंत्ययात्रेत राजघराण्यातील परंपरेनुसार एका भव्य फुलांनी सजवलेल्या रथामध्ये राजाराम महाराजांचे पार्थिव ठेऊन; राजकीय इतमामात अंतिम संस्कार पार पडले. या अंत्ययात्रेत मध्ये फ्लोरेन्स शहरातील नागरिक, इटलीच्या मंत्रिमंडळातील सदस्य , इंग्रज अधिकारी मोठ्या संख्येने सामील झाले होते. राजाराम महाराजांचा आस्थिकलश फ्लोरेन्सच्या महापौरांनी कोल्हापूरवासीयांच्या हवाली केला . भारतात गंगा नदी मध्ये त्याचे विधिवत विसर्जन करण्यात आले.
छत्रपती राजाराम महाराजांची अकाली निधन झाल्यानंतर त्यांचे दहन झाले त्या ठिकाणी फ्लोरेन्समध्ये सुंदर स्मारक उभारण्यात आले. त्याचे डिझाईन मेजर चार्ल्स मॅंट या सुप्रसिद्ध आर्किटेक्टने बनवले तर या चार्ल्स फुलेर या शिल्पकाराने महाराजांच्या लंडनमध्ये काढलेला फोटो वरून त्यांचा पुतळा बनवला. जवळपास चारशे एकर मोठा बगीच्या असलेल्या या जागेत राजाराम महाराजांचे स्मृतिस्थळ उभे आहे. येथे इटालियन , इंग्लिश , हिंदी आणि पंजाबी अशा चार भाषेत स्मृती फलक लावण्यात आले आहेत.
🙏🏻🙏🏻🌹विनम्र अभिवादन 🌹🙏🏻🙏🏻

No comments:

Post a Comment

सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा

  सांगली जिल्ह्यात छत्रपती शिवरायांच्या पाऊलखुणा शिवरायांच्या ताब्यात जिल्ह्यातील किल्ले मिरजेवरही केली होती स्वारी मानसिंगराव कुमठेकर ...