विनोद जाधव एक संग्राहक

Monday, 27 January 2025

क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 5





 क्रूरकर्मा औरंगजेब: भाग 5

मुलतानची सुभेदारी 1648 : मार्च 1648 मध्ये औरंगजेबाची रवानगी मुलतान मध्ये करण्यात आली. त्याच्यानंतर 1648 ते 1652 मध्ये तो मुलतान चा सुभेदार म्हणून त्याने त्याची सेवा मोगली साम्राज्याला दिली. या काळात दोनदा त्याची रवानगी कंदहारला वेढा घालण्यासाठी केली गेली. कंदहार हे आजच्या अफगाणिस्तानात असलेले एक प्रमुख ठाणे होते. याच्या उत्तरेला तैमानी आणि काबूल, पूर्वेला आणि दक्षिणेला बलुचिस्तान आणि पश्चिमेला फराह आहे. 17 व्या शतकात जेव्हा पोर्तुगालच्या आरमाराने हिंदी महासागरात पर्शियन समुद्रधुनीकडे जाणारे सर्व मार्ग रोखून धरले त्यावेळी मुघलांना कंदहारचे महत्त्व व्यापारिक दृष्ट्या जास्त भासली आणि त्याच करिता त्यांनी कंदहार पर्शियन लोकांच्या हातून घेण्यासाठी सदर मोहीम राबवली. मुघल साम्राज्यातून पश्चिमेकडे जाणारा सर्व माल खुष्कीच्या मार्गाने मुलतान तिथून पिशील आणि कंदहार मार्गे पर्शिया कडे आणि तिथून युरोपकडे जात असे. इसवी सन १६१५ मध्ये मालाने भरलेले १४ हजार उंट या मार्गाने पर्शिया कडे रवाना झाली यावरून आपण तत्कालीन व्यापाराच्या दृष्टीने कंदहार चे महत्त्व समजू शकतो.
कंदहार चा इतिहास सांगायचा झाला तर मुघल आणि पर्शियन साम्राज्य या दोघांनी एकमेकांनंतर या किल्ल्याचा ताबा वेळोवेळी स्वतःकडे घेतलेला आहे. 1522 मध्ये बाबराने कंदहार अफगाणी राजाकडून जिंकून घेतले त्याच्यानंतर पर्शियाच्या राजाने ते पुन्हा 1558 मध्ये काबीज केले. यानंतर अकबरांनी ते परत मिळवले तर पुढे जहांगीरांच्या काळातही तो पर्शियन लोकांच्या हातात गेला. 25 दिवसाच्या वेढ्यानंतर त्याने जेव्हा कंदहार किल्ला काबीज केला तेव्हा काही महिन्यांतच तो परत एकदा पर्शिया च्या हातामध्ये पडला. या प्रकारे जेव्हा कंदहार किल्ला या दोन्ही साम्राज्यांच्या अधिपत्याखाली येत जात राहिला तेव्हा कंदहार हा मुगल साम्राज्यावर बसलेला एक डागाचा ठिपका असे बोलून औरंगजेबाने त्याची हेटाळणी स्वतःच्या बापाकडे म्हणजेच शहाजहानकडे केलेली आहे.
हातातून गेलेला हा किल्ला घेण्याचा औरंगजेबाने खूप प्रयत्न केला. खंदक खोदणे ते रिकामे करणे, डोले उभारणे , तोफांचा मारा करणे, वेढा वाढवणे आणि काय काय परंतु काहीच साध्य होत नव्हते सर ते शेवटी त्याने कंदहारच्या युद्धातून माघार घ्यायचे ठरवले. औरंगजेबाच्या या अपयशाची शहाजहानला अतिशय चीड आली आणि त्याचा पराजय हा केवळ त्याच्या दौर्बल्यामुळे झाला आहे असा शहाजहानने त्याच्यावर ठपका ठेवला. परंतु,"कंदहार जिंकून घेण्याचे कामी अपयश आल्याबद्दल औरंगजेबाला दोष देणे हे त्याच्यावर अन्याय करण्यासारखे आहे." असे त्याने त्याच्या बापाला त्याच्या पत्रातून स्पष्टपणे लिहून पाठवले.
तो पुढे इथवर बोलतो की "जे काम माझे पूर्वजही यशस्वीरीत्या करू शकले नाही , ते माझ्याकडून झाले नाही म्हणून मला जर मला तुम्ही आरोपी करार करीत असाल तर माझ्या आधीचे तुम्ही सर्व ही तेवढेच आरोपी आहात".
शहाजहान आणि औरंगजेब यांच्यातील हा खरमरीत पत्रव्यवहार उपलब्ध आहे आपण तो वेळ काढून नक्कीच वाचावा पण या कंदहार मोहिमेमुळे नेमके झाले काय तर या तीन यशस्वी मोहिमांसाठी हिंदुस्तानच्या तिजोरीला दहा कोटी रुपयांचा फटका बसला आणि साऱ्या आशिया खंडात मोघलांच्या वजनाला उतरती कळा लागली मोघलांना इतके बलशाली असतानाही तोंड दिल्याबद्दल पर्शिया ची जिकडेतिकडे वाहवाही चालू झाली. एक बलाढ्य राष्ट्र म्हणून पर्शिया ख्याती सर्वदूर पसरू लागली आणि हे सर्व औरंगजेब स्वतः बघत होता आणि त्याच्या मनात ह्या गोष्टी होत असताना स्वतःच्या बापाबद्दल तिरस्कार निर्माण होत होता.
या साऱ्या प्रकरणानंतर पर्शिया ची इतकी दहशत झाली होती की यानंतर पर्शियाकडून हिंदुस्तानला पोहोचणारा संभाव्य धोका एखाद्या काळ्याकुट्ट ढगाप्रमाणे हिंदुस्तानच्या पश्चिम सरहद्दीवर लटकत राहिला. पर्शियाच्या एखाद्या सुलतानाच्या ज्यावेळी मृत्यू होई त्यावेळी औरंगजेब आणि त्याचे मंत्री सुटकेचा एक मोठा निःश्वास टाकीत.
ही गोष्ट पुढे जाऊन खरी ही झाली. पर्शियन सम्राट नादिरशहा याने 18 व्या शतकामध्ये भारताच्या पश्चिम सरहद्दीवर अगदी धुमाकूळ घातला होता.
कंदहार येथून युद्ध विराम वगेरे झाल्यावर काबूल ला आला. ही बाल्ख ची मोहीम चालू असतानाा 1652 साल उजाडले. त्याच्या हातात त्याची पुढची नेमणूक पडली.
परत एकदा दख्खन.
यापुढे येते, औरंगजेबाची 1652 ते 1658 सालची , त्याची दुसरी दख्खन सुभेदारी आणि त्याचा हिंदूप्रतापसूर्य श्रीमंत छञपती शिवाजी महाराजांसोबत आलेला पहिला संबंध.
क्रमशः
ॲड. वेदांत विनायक कुलकर्णी मुरुंबेकर
९२८४९९६५०२
पुणे / बीड

No comments:

Post a Comment

मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी!

  मराठा खेसे सरदार (कात्रड, राहुरी, अहमदनगर ) यांचा भुईकोट किल्ला /भव्य गढी! कात्रड भुईकोट किल्ला /कात्रड गढी कात्रड राहुरी अहमदनगर. Katrad ...