#पानिपत१७६१
#रीपोस्ट २०२२ ची
मराठ्यांच्या पराक्रमाची परमोच्च शौर्यगाथा म्हणून 'पानिपत' ची लढाई ओळखली जाते. कुसुमाग्रजांनी तर, महाभारताच्या लढाईसोबत याची तुलना केली आहे. पण आपल्या मनात अजूनदेखील असं झालं असतं तर, तसं झालं असत तर... हे विचार येतात, पण खरंच याला काही अर्थ आहे का? अरे असं-तसं बोलायला, जिथे मराठे दाण्यासाठी मोहताज होते तिथे आपले तर्क काहीच फायद्याचे ठरतं नाहीत. रस्त्यावरचे गवत खाऊन २ दिवस काढता येणार नाहीत तिथे महिनाभर मिळेल ते, मिळेल तेवढंच खाऊन देखील परकीय आक्रमनाशी दोन हात करणं, ते पण दिल्लीच्या रक्षणाची जबाबदारी घेतली आहे म्हणून..! हे फक्त मराठेच करू शकतात हे पानिपतच्या लढाईने दाखवून दिलंय.
खरं 'पानिपत' सुरू झालं होतं ते शौर्य दिनाच्या १ वर्ष आधी बुराडी घाटावर गिलच्यांनी दत्ताजी शिंदेंना मारलं तेव्हापासून..! इकडं महाराष्ट्रात घराघरांत संक्रांतीचा सण होता आणि तिकडे दत्ताजी शिंदे परकीय आक्रमणापासून मातृभूमीला वाचवण्यासाठी अनंतात विलीन झाले.
त्यानंतर सदाशिवरावभाऊसाहेब त्या गिलच्याचा समाचार घ्यायला महाराष्ट्रातीत प्रत्येक उंबऱ्याचा मावळा घेऊन उत्तरेकडे निघतात. वर सोबत मिळतं तर काय बाजार बुणगे, यात्रेकरू... त्यात २ कोटी कर्जात असलेल्या दौलतीवर अजून भार नको म्हणून निर्वाहासाठी लागणारी तजवीज जिकडे जाईल तिकडेच करू असा विचार... यातून एकच निष्पन्न होते, फक्त वेळेला पोटाला आधार जरी मऱ्हाठयांना मिळाला असता तरी पानिपतचा निर्णय वेगळा लागला असता. बाकी कोणी पळून गेले, माघारी वळाले, मदत केली नाही. या गोष्टींनी मराठ्यांना कधीच फरक पडत नाही.
अठ्ठावीशीतले सदाशिवरावभाऊ वयाने अनुभवाने छोट्या-मोठ्या अनेक सरदारांचे नेतृत्व करत होते. त्यांच्यातला समतोल राखणे ही वेगळीच तारेवरची कसरत, त्यात अनेक आप्तच लाचखोर... त्यांनाही युद्धाच्या ऐनवेळी दुखवता येत नव्हते. अशा परिस्थितीमध्ये परमुलखात भाकरदाण्याची तजवीज करून अनेक महिने शत्रूला तोंड देत हातात आलेले दिल्लीचे तख्त फक्त बंधुप्रेम आणि निष्ठेखातर पुतणे विश्वासरावांच्या हातात देणे, हे सदाशिवराव भाऊंसारखा योद्धाच करू शकतो.
पानिपत असे युद्ध आहे ज्यात लाख मराठा मारला गेला, तरी उपाशी मराठ्यांनी मरायच्या आधी अर्धा दिवस विजयश्री जवळजवळ स्वतःजवळ खेचून आणलीच होती, पण निसर्ग देखील शत्रूचे पारडे जड करत होता...
या युद्धात मराठ्यांच्या ३ पिढया खर्ची पडल्या. ओठावर मिसरूड न आलेल्या पोरांनी पण पराक्रमाची पराकाष्ठा केली. लाख बांगडी फुटली, ३वर्ष मोहिमेवर गेलेले परत कधीच परतून आले नाहीत. जे जगले वाचले ते वेगवेगळ्या मुलखात आजही वास्तव्य करून आहेत.
फक्त एका नजीबामुळे पानिपत घडले. बाकी सर्वांनी आपली भूमिका तत्कालीन परिस्थिती पाहून बदलली, त्यामुळे कोणाला दोष देता येत नाही. अहमदशहा अब्दाली आणि मराठ्यांच्या दरम्यान घडलेलं हे युद्ध बुधवार दिनांक १४ जानेवारी १७६१ या दिवशी घडलं. मध्ययुगीन कालखंडात सकाळी ९ वाजल्यापासून संध्याकाळी ५.३० पर्यंतच्या एका दिवसाच्या अल्पावधीत असं भयंकर, घनघोर, जीवघेणं युद्ध घडल्याचं आणि त्यामध्ये दोन्ही बाजूंची दीड लाख माणसं आणि ऐंशी हजार जनावरं मेल्याचं दुसरं उदाहरण नाही.
या युद्धाबद्दल ऐऱ्यागैऱ्यानी तर कधीच बोलू नये. कारण ज्याच्यासोबत मराठे लढले त्या अब्दालीनंच लिहून ठेवलंय, "मराठ्यांनी पानिपतावर युद्धाच्या दिवशी अत्यंत निकरानं आमच्या लष्करावर पुनःपुन्हा हल्ले चढवले. मराठ्यांचं हे असामान्य शौर्य पाहण्यासाठी त्या दिवशी आमचे रुस्तम आणि इस्फिंदार (अफगाण्यांच्या महाकाव्यातील कृष्णार्जुन) सारखे वीर मौजूद असते, तर त्यांनी मराठ्यांचा महापराक्रम पाहून आश्चर्यानं तोंडात बोटं घालून चावली असती! मराठ्यांसारखी युद्धाची अशी लालसा, अशी खुमखुमी आणि इतकं शौर्य इतरांकडून होणं वा दिसणं अशक्य!"
त्यानंतर अब्दालीनेसुद्धा पानिपतची एवढी दहशत खाल्ली की नंतर त्याने हिंदुस्थानवर आक्रमणे केली, तरी तो पानिपतच्या आसपास फिरकला नाही. नजीबाने नंतर दहा वर्षे दिल्लीवर हुकूमशाही गाजवली, पण स्वतःला बादशहा घोषित केले नाही. त्याच्या मृत्यूनंतर महादजी शिंदे अंतर्वेदीत गेले होते, तेव्हा त्यांनी नजीबाचे थडगे उध्वस्त केले. पानिपत हरलो तरी एवढी छाप मराठ्यांनी शत्रू सैन्यावर सोडली होती.
'नारायण गरुड, सोमजी गरुड' या आमच्या पूर्वजांनी देखील पानिपतात शौर्य गाजवले याचा आम्हांला सार्थ अभिमान आहे.
म्हणूनच आजही आम्ही म्हणतो, 'होय आम्हीच उभे होतो पानिपत च्या भूमीत घट्ट पाय रोवून मातृभूमीच्या रक्षणासाठी, दिलेला शब्द पाळण्यासाठी आणि शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याच्या जरीपटक्याची आब राखण्यासाठी..!'

No comments:
Post a Comment