विनोद जाधव एक संग्राहक

Tuesday, 30 December 2025

#प्रौढप्रतापपुरंदर - (भाग -२)

 


#प्रौढप्रतापपुरंदर - (भाग -२)

रात्रीचा एक प्रहर उलटून गेला असावा. पिठूर चांदणं संगतीला घेऊन चमचमणाऱ्या चंद्रकोरीच्या अंधुक दुधाळ प्रकाशात सर्वदूर पसरलेल्या सह्याद्रीची निळसर किनार अस्पष्ट दिसत होती. दिवसभरच्या उष्म्यानंतर आता गार हवा सुटली होती. डोंगरांवरच्या दाट झाडीतून तिचा घुमणारा आवाज जरा भीतीदायकच असे. हवेतला दिवसभर तोफा बंदुकीतुन उधळलेल्या दारूचा कुंद वास अजूनही विरला नव्हता. खालचं कर्हेचं खोरं अंधारात बुडून गेलेलं होतं. रातकिड्यांची किरकिर आणि काळदऱ्याच्या बाजूने मधूनच रडणाऱ्या कोल्ह्या-कुत्र्यांचे अभद्र आवाज वगळता भयाण शांतता भरून राहिली होती. खंडेरायाच्या डोंगरापासून दूर भुलेश्वराच्या घाटापर्यंत नजर फिरवली तरी कुठेच जिवंतपणाच्या खाणाखुणा दिसत नव्हत्या. क्वचित तिकडे लांब चिव्ह्यांच्या वाडीकडे मात्र एखाद दुसरा प्रकाशाचा पुसट ठिपका लुकलूकताना दिसे. खाली गड पायथ्याला तेवढी हालचाल दिसत होती. जागोजाग लवलवणाऱ्या मेहताबा आणि आगोट्या एवढ्या लांबूनही ओळखू येत होत्या. मंद आणि अपुऱ्या प्रकाशाने उजळलेल्या हजारो राहुट्या आणि शामियाने राखेतून डोकावणाऱ्या निखाऱ्यांगत भासत होते! तिथून लांब लांब झाडी-झुडुपातून वाट काढत चालणारे गस्तीच्या हशमांचे अस्तित्व हातातल्या मशालींमुळे अधून मधून जाणवत होते. खालच्या तटावर गडावरची नाईक मंडळी हातातल्या फरश्या परजून तीक्ष्ण नजरेने चौफेर नजर ठेवून पहारे देत होती. "अरं हुश्शाssर हो" ...मधूनच त्यांची हळी ऐकू येई. उंचच उंच आकाशाला भिडलेल्या शेंदऱ्या बुरुजारवरचा भगवा डौलात फडफडत होता...त्याच्याच खाली हात पाठीशी बांधून एक कासावीस नजर खालच्या मोंगली छावणीवर खिळली होती...विचारात गुंतली होती...
- 'मुरार, काय निमित्त लढाई लढतोय आम्ही? वतनासाठी? जहागिरीसाठी? नाही! गड्या, हे राज्य व्हावे ही तर श्रींची इच्छा! तिच्याच कृपेचे फळ! आपण मात्र निमित्त! इतकी वर्षे भाऊबंदकी निभावली. वैऱ्यांसारखे आपल्यातच भांडत आलो. आपलेच रक्त सांडत आलो. आपल्याच मुलुखात. कोणा करिता? ह्या सुलतान्या, ह्या बादशाह्या का आपल्या आहेत? अपल्यासाठी आहेत? चंद जहागीरदारांचे वाडे आणि वतनदारांच्या गढ्यासोडून खुशहाली आहे कुठे? आपल्याच लोकांनी केलेल्या फंद फितुरीच्या, स्वार्थाच्या, हरामखोरीच्या बुनियादीवर कायम झालेल्या यवनांची जुलमी हुकूमत कुठवर सहन करायची?...हा आपला मुलुख आहे मुरार..'
राजे त्या रात्री केवढ्या कळकळीने आपल्याला सांगत होते! अजून आठवतंय. चंदररायाच्या मिठाची नमकहलाली अदा करताना आनंद होत होता काय आपल्याला? गावातल्या बहिणींची बेअब्रू, थोरा-मोठ्यांची बेअदब, अन्याय, जुलूम रोजचेच झाले होते. दिसत का नव्हतं आपल्याला? आदिलशाहीचे मुजोर ठाणेदार-अंमलदार-सरदार वाट्टेल त्या माणसांचे खून पाडत, वाट्टेल ती बाई भररस्त्यातुन फरफटत नेत, जाळपोळ लुटालूट करत, सक्तीची करवसुली करत, धर्म बाटवत!! आणि चंदरराय? चंदररायाला ना देवा-धर्माच्या बेअदबीची फिकीर होती ना आयबहिणीच्या बेइज्जतीची परवाह! स्वत्व गहाण टाकून मिळालेल्या ऐशोआरामात चूर होता तो! जावळीचा राजा म्हणवून घेणारा, जावळीच्या अवघड मुलुखावर घमेंड करणारा चंदरराय होता शेवटी बादशाहीचा फक्त एक मुलाजीमच! त्याचाही जोर फक्त दुर्बळ रयतेवर... अश्या नालायक माणसाची नमकहलाली तहहयात करू शकलो असतो आपण?! केवळ खाल्ल्या मिठाला जगण्यासाठी तलवार घेऊन दस्तुरखुद्द महाराजांवर चालून गेलो..बुद्धीवर गुलामगिरीचा पडदाच पडला होता आपल्या..पल्याडचं कुठे काय दिसत होतं? इरेसरीने भांडण मांडलं..कित्येक धारकरी पाडले...शर्थ केली चंदररायासाठी... चंदररायासाठी!! म्हणजे आदिलशहासाठी! का? चंदररायाची वतनदारी सलामत राहावी म्हणून! आणि भांडलो कोणाशी?! तर आपल्याच मुलूखातल्या आपल्याच मराठी माणसांशी!! शेवटी तो आपल्या सर्वांना टाकून रायरीच्या डोंगरात पळाला! आणि आता ह्या मोंगलांशी भांडतोय ते कोणासाठी?! शिवाजी राजांसाठी? त्यांच्या जहागिरीसाठी?! नाही...हा लढा तर स्वातंत्र्यासाठी...स्वराज्यासाठी! हे श्रींचे राज्य..हे आपले राज्य...हे आपले लोक..आपला मुलुख...हा आपला राजा!! महाराज हेच तर बोलले होते त्या रात्री...
- '...हा आपला मुलुख आहे मुरार! हे आपले लोक आहेत. भांडायचे तर आपल्या माणसांसाठी, आपल्या माणसांशी नव्हे! जिंकायचे तर परक्याविरुद्ध...आपल्याच लोकांविरुद्ध नव्हे! चंद्रराव मोरा बेवकुफ, बदतमीझ आहे. रयतेला पीडणारा हा हरामखोर नीच! हा काय जनांचे गोमटे करणार? शेवटी तुर्की पातशाहचा गुलाम हा! तू अधर्मासाठी तलवार धरून आहेस. तुझी तलवार धर्मासाठी उठली पाहिजे! तुझ्यासारख्या माणसाची गरज स्वराज्याला आहे..तुझ्या राज्याला..तुझ्या मुलूखाला..तुझ्या लोकांना....आई जगदंबेची आण घेऊन आम्ही हा मुलुख पातशाह्यांच्या जबड्यातून बाहेर काढण्याचे योजिले आहे..तुझी साथ हवी आहे गड्या..."
खाडकन धुंद उतरली होती आपली! तलवार टाकून महाराजांपुढे झुकलो तेंव्हा मिठीत घेतलेलं महाराजांनी! केवढा आनंद! जणू नवा जन्म झाला आपला. मनावरचं ओझं क्षणात निघून गेल्यासारखं वाटलं. आयुष्याला नवे ध्येय मिळाले! खरा पुण्यवान मी!
किती किती खरे शब्द ते..हा मुलुख आपला आहे. माझा आहे. हे माझे लोक आहेत! ह्यांचे पालन करणे, म्लेंच्छ गनिमापासून माझ्या लोकांचे, माझ्या मुलुखाचे, माझ्या आई-बहिणींचे, माझ्या साधू-संतांचे, माझ्या धर्माचे...अगदी माझ्या गाय-वासरांचेसुद्धा रक्षण करणे हाच माझा खरा क्षात्रधर्म आहे..!
मी भांडणार! भिडणार! लढणार! माझ्या मुलुखावर कोणाची वाकडी नजर पडतेच कशी? जोवर श्वास आहे तोवर मी माझा मुलुख लढवणार...हा पुरंदर माझ्या अखत्यारीत आहे. महाराज साहेबांनी गडाची जिम्मेदारी विश्वासाने दिलीय मला! खुशाल झोपा महाराज..चिंताच करू नका! मी जिवंत आहे तोवर असल्या छप्पन बादशाही फौजा एकत्र उलटल्या तरी मी माझा पुरंदर देणार नाही...नाही म्हणजे नाही..!!
"धनी...धनी....धनीsss बाजी सरकार..."
येसाजीच्या हाकांमुळे विचारांत गढून गेलेले मुरारबाजी एकदम भानावर आले!! येसाजी केंव्हाचा जवळ येऊन हाका मारीत होता. मागे वळून मुरारबाजींनी येसाजीकडे पाहिलं. येसाजी हात जोडून हळू आवाजात बोलला -
"सफेत बुरुजाखाली ऐवज पुरायचं काम पुर्न झाल्यालं हाय..."
======================
पुरंदर! इस्फंदियार किला-ए-दक्खन पुरंदर!! पुण्याच्या दक्षिणेला डोंगरांची एक लांबच लांब रांग भिंतीसारखी उभी आहे. ती ओलांडून कर्हेपठारात उतरलो की अग्नेयेला तीसेक मैलांवर सह्याद्रीच्या उंचच उंच, अतिप्रचंड पर्वतावर पुरंदर विराजमान आहे. गडात गड पुरंदर गड!
आदिलशाहविरुद्ध स्वराज्याची पहिली लढाई पुरंदराच्या कडेवर बसूनच तर तर लढली गेली! बादशाहचा नामचीन सरदार फत्तेखान हजारोंच्या फौजा घेऊन स्वराज्यावर चालून आला तेंव्हा महाराज आणि मावळ्यांना खांद्यावर घेऊन पुरंदरच झुंजला त्याच्याशी! तेंव्हा तर पुरंदर स्वराज्यातही नव्हता. आदिलशाहीतच होता. पण पुरंदरच्या महादजी निळकंठराव सरनाईक नावाच्या किल्लेदाराची शहाजीराजांवर अतीव माया होती. हा म्हातारा बामण मायेपोटी बिघडला! शहाजी राजेंचं एवढंसं लेकरू भर सुलतानीत दंड-मांड्या थोपटून ताकतवर पातशाह्यांना ललकारू पाहतंय, गुलामगिरीची जोखडे त्याच सुलतानांच्या थोबाडावर मारून स्वराज्य आणू पाहतंय ह्याचं त्यांना मोप कौतुक होतं! नीळकंठरावांनी महाराजांच्या एका शब्दावर गडाचा सर दारवाजा महाराज आणि मावळ्यांसाठी सताड उघडा केला! मग काय बिशाद होती फत्तेखानाची? काय औकात होती? अवघ्या हजार बाराशे मावळ्यांच्या सांगाती महाराजांनी आणि पुरंदराने पार चेंदून टाकला त्याला! मार खाऊन पळाला बिचारा!
पुरंदर गड मोठा मोक्याचा, लढायला झुंजार, जिंकायला अवघड आणि राखायला अजूनच अवघड. जणू कर्हेपठाराचा रखवालदार! खूप उंच चढून गेल्यावर एका दरीवजा खिंडीमुळे डोंगराचे दोन भाग पडलेले आहेत. त्यापैकी जो मोठा विस्तीर्ण भाग आहे तो म्हणजे पुरंदर गड. आणि खिंडीच्या दुसरीकडचा लहानसा भाग म्हणजे वज्रगड! वज्रगड पुरंदरापेक्षा उंची आणि बांध्याने अगदी थोडासाच कमी. पण तितकाच लढाऊ आणि चिवट. जणू पुरंदराचा धाकटा भाऊ! अगदी रामाचा लक्ष्मणच!! ही खिंड फार फार तर फर्लांगभर रुंद. खिंडीपासून पुरंदरचा कोट सुरू होई जो पूर्ण डोंगर माथ्याला वळसा घालत जाई. ही होती पुरंदर माची. माचीच्या आत मध्यभागी अजून एक डोंगर सरळ उभा वर चढत जाई. त्यालाही वेगळा चिरेबंदी तट घातला होता. ह्या तटाच्या आतला भाग म्हणजे बालेकिल्ला. बालेकिल्ल्याच्या अनेक बुरुजांपैकी सर्वात उंच बुरुज म्हणजे शेंदऱ्याबुरुज! बालेकिल्ल्याच्या दरवाज्याला म्हणत सर दरवाजा. पुरंदरला भैरवखिंडीच्याबाजूला एक ताशीव उंच कडा आहे. त्यास म्हणत कंदकडा. खिंडीच्या दुसऱ्या बाजूला वर चढून गेलं की वज्रगडाची घडीव तटबंदी होती. तिलाही भक्कम बुरुज होते.
पुरंदर गडाच्या उत्तरेकडची बाजू म्हणजे पुण्याची बाजू . दक्षिणेकडे तिन्ही बाजूला उंच डोंगर होते आणि त्या मधल्या भागाला म्हणत काळदरी. काळदरीतुन एका अत्यंत अवघड वाटेने वर चढून गेल्यावरही गडात प्रवेश करायला एक दरवाजा होता. केदार दरवाजा. मोंगल ह्या दरवाजाला म्हणत - 'खिडकी'! ही वाट चढून जाणे फक्त मराठ्यांना शक्य होते!
खिडकी आणि सर दरवाजा एकदा का बंद झाला की पुरंदर आणि वज्रगडाच्या पिळदार मुठी इतक्या घट्टपणे बंद होत की त्या उघडणे भल्या भल्याना जमणे अशक्य.
पण ह्या सगळ्यात एकच कच्चा दुवा होता. वज्रगड झुंजार असला तरी लहान होता. शिवाय वज्रगडाला माची नव्हती. लहान असल्याने तिथे फौजफाटा फारसा नसेच. दुर्दैवाने जर वज्रगड शत्रूच्या हातात गेलाच तर त्याच्या तटबंदीवरून तोफांचा मारा सहज पुरंदरच्या बालेकिल्ल्यावर होऊ शकत असे आणि पुरंदराचे भविष्य धोक्यात येई. वज्रगडावर जर शत्रू मुस्तैद झाला तर पुरंदर आपोआप बंदुका-तोफांच्या माऱ्याखाली भरडून निघे आणि शत्रूच्या हातात पडे! दोघा भावांची ताकद एकीत होती. एक जरी पडला तरी दुसऱ्याचे मरण ठरलेले असे. पुरंदरचे शक्तीस्थान आणि दुर्बलस्थान दोन्ही एकच - वज्रगड! वज्रगडालाच 'रुद्रमाळ' असेही म्हणतात. वज्रगडावर त्यावेळी सुमारे तीनशे मावळे होते आणि पुरंदरावर होते सुमारे साडेतीन हजार. दोन्ही मिळून फार फार तर चारएक हजारांची छोटीशी शिबंदी! समोर शत्रू किती होता? वीस पट! सुमारे ऐंशी हजार राजपूत, पठाण, बुंदेले, कुरेशी, रोझभानी आणि मराठे...होय, मराठे देखील! अजूनही अनेक चंद्रराव मोरे मोकाट होतेच की... पण ते फक्त नावाचे मराठे! अस्सल नव्हेच!
वज्रगडाची नस मिर्झा राजेंच्या चाणाक्ष नजरेने आणि दिलेर खानाच्या शातीर दिमागाने ओळखली! हा हा म्हणता पुरंदराभोवती मोंगली अजगराचा विळखा पडला. दिलेरने गडाच्या चोहोबाजूनी जागोजाग पक्की मोर्चाबंदी केली. पण त्याचा मनसुबा वेढा घालून वाट पाहत बसण्याचा नव्हताच. त्याला जलदी होती किल्ला तसखीर करण्याची. मिर्झा राजांनी आणि दिलेरने आपले सर्व मोंगली बळ, सगळी ताकद, सगळी सकत, सगळी शक्ती वज्रगडावर केंद्रित केली. इंद्रामण बुंदेला, कुबादखान, तुर्कताज खान, बादील खान, किरतसिंह, अतिषखान वगैरे मोठमोठ्या मोंगली सरदारांच्या फौजा आणि तोफांची तोंडे वज्रगडावर एकवटली!
वज्रगडावर भयंकर हल्ला सुरू झाला. मोगलांच्या शेकडो तोफा गडाच्या तटबंदीवर आग ओकू लागल्या! एक क्षणही फुरसत न घेता तोफांचे धडाके सुरू झाले. इतका प्रचंड कोलाहल की झाडावर पाखरू बसेना. धुराचे लोटच्या लोट उठू लागले. मोंगली आरडा-ओरड्याने आणि आरोळ्यानी कर्हेपठार दणाणून गेले! फौजांच्या तुकड्या गडावर जास्तीत जास्त वर चढून बंदुकांमधून गोळ्यांचा वर्षाव करू लागल्या! लांबून बघितलं तर वाटावं की जणू गुळाच्या ढेपिवर हजारो मुंगळे चढतायत की काय!! चारही बाजूनी वज्रगडावर तुफानी झोड उठली...
गडावर लगीनघाई उडाली! गडातली मंडळीही तेवढ्याच हिमतीची! मराठ्यांनी वर चढू पाहणाऱ्या मोगलांना बंदुकीने टिपून टिपून उडवायला सुरू केले. गडाच्या बुरुजावरूनही तोफांनी मोंगली मोर्चांवर आग बरसवायला सुरुवात केली! मराठे बाहिम्मत हजारोच्या मोंगली सैन्याला कसून प्रत्युत्तर देऊ लागले. पुरंदरच्या बुरुजांवरून तीर, हुक्क्यांचे बाण, बंदुका आणि तोफा मोंगली फौजेला सडकून काढू लागल्या. माचीपसल्या कोटातून मराठ्यांनी मोठाले धोंडे मोंगलांवर फेकायला सुरुवात केली!! एप्रिल 1665ची ही सुरुवात...पुरंदरावर प्रचंड रणकंदनाला सुरुवात झाली...
===========================
राजगडावरच्या सदरेवर धीरगंभीर शांतता होती. मोगली फौजा स्वराज्यात सगळीकडे पिकात रानडुकरे घुसवीत तश्या घुसल्या होत्या. जागोजागहून लुटीच्या, जाळपोळीच्या, नासाडीच्या बातम्या आणि तक्रारी रोज गडावर येत होत्या. गावेच्या गावे ओस पडली होती, लुटली जात होती, जाळली जात होती. रयतेची अवस्था अक्षरशः चरकातून पिळून निघत असल्यासारखी होत होती.
सदरेवर जिजाऊ आऊसाहेब, मोरोपंत, रघुनाथपंत, बाळाजी, त्र्यंबकपंत आपापसात त्याच्याबद्दल चर्चा करत होते. महाराज मात्र सदरेवरल्या एका खिडकीपाशी लांब तिकडे पुरंदराकडे एकटक नजर रोखून पाहत उभे होते. महाराजांच्या नजरेत चिंता होती.
"राजे! तुमची आज्ञा असेल तर मिर्झा राजांकडे तहाचा खलिता..." - मोरोपंत महाराजांना जवळ जाऊन बोलतं करण्यासाठी बोलून गेले. महाराज वळले. क्षणभर कसलासा विचार करून पंतांना म्हणाले -
"इतक्यात नको पंत! मुरारसाठी तूर्तास पुरंदरावर कुमक पोचवण्याचा उपाय करा..!!"
क्रमशः
================
Suraj Udgirkar
टीप : कहाणी रंगवताना काही संदर्भ चुकले किंवा काही चूक भूल झाली तर मोठ्या मनाने माफ करा

No comments:

Post a Comment

गोव्याहून टेलरचे १४ डिसेंबर १६६४ चे पत्र सुरतेला गेले. त्यातील मजकूर :

  गोव्याहून टेलरचे १४ डिसेंबर १६६४ चे पत्र सुरतेला गेले. त्यातील मजकूर : "वेंगुर्ल्याच्या डच अधिकाऱ्याने वरवर तरी शिवाजी महाराजांपासून ...