मेडत्याची मर्दुमकी
महादजीच्या आयुष्यात ज्या काही महत्वाच्या लढाया झाल्या, त्यामध्ये राजपुतानामधील पाटण व मेडता येथील लढाया महत्वाच्या होत्या. या दोनही लढायांमध्ये मराठ्यांच्या लढाऊवृत्तीचा तसेच क्षात्रधर्माचा कस लागला असे म्हणावे लागेल. या लढायांमध्ये शिंद्यांचा एकनिष्ठ युद्धनिपुण फ्रेंच सेनापती डी बॉयन याने चांगलीच मर्दुमकी गाजवली व शिंद्यांना या दोन्ही लढायांमध्ये जय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला. डी बॉयन हा स्वतः या दोन्ही लढायात जातीने हजर होता व याच्या हाताखालील एका लष्करी अधिकाऱ्याने(बहुधा पेरॉन),त्याने मेडत्याच्या लढाईचे चक्षुर्वैसत्यम(eyewitness account) असे वर्णन लिहून ठेवले आहे. हे वर्णन ईस्ट इंडिया कंपनीच्या कलकत्ता येथील कंपनीच्या मुखपत्रात(गॅझेटमध्ये)प्रसिद्ध झाले होते. त्यातून या लढायांची तपशीलवार व संगतवार माहिती मिळते. पुढे दिलेला मेडत्याच्या लढाईचा वृत्तांत २४ जून १७९० दिवशी लिहिलेल्या पत्रातून जसाच्या तसा घेतलेला आहे.
मेडत्याची लढाई:१०जुलै१७९०च्या ईस्ट इंडिया कंपनीच्या कलकत्ता गॅझेटमध्ये मैत्राच्या लढाईचे सविस्तर वर्णन आढळते. या लढाईमध्ये ज्या लोकांनी पराक्रम गाजविला व विजयश्री खेचून आणली त्यांच्यामध्ये पराक्रमाच्या श्रेयाचे विभाजन करणे अतिशय कठीण आहे. या लढाईत सामील झालेले मराठ्यांचे तीन लष्करी गट म्हणजे डी बॉयन व त्याची कवायती फौज, महादजी शिंदे यांचे मराठे सैन्य आणि तुकोजी होळकर व त्याचे सैन्य. या लढाईच्या रिपोर्टमध्ये सुरुवातीला म्हंटले आहे की आम्ही अजमेरच्या भोवताली सतरा दिवस वेढा घातला होता, तेव्हा शत्रुपक्षाने अत्यंत जोशामध्ये जवळच्या मेडत्यापर्यंत येऊन आमच्यावर हल्ला करायचा बेत केला, तेव्हा जनरल डी बॉयन याने अजमेरच्या वेढ्यासाठी दोन एक हजार सैनिक नाकाबंदी करण्यास ठेवून बाकीचे सैन्य मेडता येथे लढाई करण्यास पाठवले.
कलकत्ता गॅझेटमध्ये छापलेल्या मेडत्याच्या लढाईच्या वर्णनानुसार,’ त्यासुमारास राजपुतांनामध्ये पडलेला दुष्काळ व तेथील अतिशय कोरड्या हंगामामुळे पाण्याची अति दुर्भिक्षता झाली होती, त्यामुळे आम्हाला (मराठ्यांच्या फौजेला) मेडत्यापर्यंत पोचायला सूर्यास्तानंतर कूच करीत वर्तुळाकार मार्ग घ्यावा लागला. त्यामुळे मध्यरात्रीपर्यंत आम्हाला कसेबसे वाटेतील निम्म्या अंतरावरील रिओला गावापर्यंत पोचता आले. थोड्याशा विश्रांतीनंतर मध्यरात्रीच्या सुमारास आम्ही आमची चाल तशीच पुढे चालू केली आणि शत्रूच्या अगदी जवळ पोचल्यावर सकाळी नऊच्या सुमारास त्यांच्यावर अचानक तोफांचा जोरदार भडीमार सुरू केला. लढाईच्या सुरुवातीलाच मराठ्यांचे सेनापती आपले घोडदळ घेऊन शत्रूवर चालून जाण्यास उत्सुक होते, परंतु त्यावेळेस डी बॉयन याने त्यांच्या चढाईस मनाई केली, मराठ्यांच्याकडील घोडदळ रात्रभर जवळपास दहा कोस घोडदौड करून थकले असल्याने त्याने असा विचार केला होता. एव्हढेच नव्हे तर तो सकाळचा ९-१० चा सुमार असल्याने तेथील वालुकामय परिसरातील वातावरण अतिशय तापून निघालेले होते. या लढाईत शत्रूकडे सुमारे तीस हजार घोडदळ आणि दहा हजार पायदळ होते तसेच पंचवीस तोफा देखील होत्या. आमच्याबाजूला जवळपास तेव्हढेच घोडदळ, सहा ते सात हजार कवायती फौज आणि ऐंशी तोफा होत्या.
लढाईचे वर्णन:दिनांक १०जुलै१७९० या दिवशी पहाटेपहाटे आम्हाला शत्रूवर हल्ला चढवण्याचा हुकूम मिळाला. दुपारी झाल्यावर वाळवंटातील उन्हाचा त्रास चुकविण्यासाठी चढाई करण्यासाठी अशी पहाटेची वेळ आमच्या सेनापतीने निवडली असावी. पाटणच्या संस्मरणीय लढाईप्रमाणेच यावेळी पण आमच्या सैन्याची रचना केलेली होती. लढाईच्या आरंभासच आमच्या बाजूने तोफांचा मारा सुरु झाला व उलट बाजूने त्याच प्रखरतेने प्रतिहल्ला चढवला गेला. त्यानंतर आमची पन्नास तोफांची जी पुढची फळी होती, त्यांनी आता बंदुकीच्या गोळ्यांच्या गुच्छफैरी(Grape shots)झाडायला सुरुवात केली. अशा वेळी आमच्या गोळीबाराच्या प्रखर माऱ्यामुळे व तिच्या प्राबल्यामुळे शत्रूचे अनेक सैनिक त्यांची लढाईतील केलेली व्यूहरचना सोडून सैरभैर झाले.यावेळी शिंद्यांचा एक अधिकारी लढाईतील तत्कालीन यशामुळे हुरळून जाऊन त्याची घोडदळ फौज घेऊन आमच्या तीन बटालियनच्या समोर येऊन हल्ला करायला उभा राहिला. त्यामुळे आमच्या बंदुकीच्या फैऱ्यांचा मार बोथट झाला. शत्रूने लगेचच या संधीचा फायदा घेतला आणि पुढे आलेल्या आपल्या घोडदळावर एव्हढा जोराचा प्रतिहल्ला चढविला की घोडदळातील स्वार कसाबसा जीव वाचवून मागे फिरू शकले.नंतर या यशाने उत्साहित झालेल्या शत्रुसैनिकांनी आमच्या मुख्य फौजेवर समोरून आणि दोन्ही बाजूने व पाठीमागून असा चारीबाजूने जोरदार प्रतिहल्ला चढविला.परंतु या समयी जनरल डी बॉयन याचा पूर्वानुभव आणि प्रसंगावधान यामुळे आम्ही जीवानिशी वाचलो. मराठ्यांच्याकडील वरील घोडचूक लक्षात आल्यावर डी बॉयन याने आमचा एक रिकामा चौकोन तयार केला ज्यायोगे आम्हाला चारी बाजूने शत्रूने घेरले तरी आम्ही त्यांच्यावर प्रतिहल्ला करू शकू. अशा रीतीने शत्रूच्या चारी बाजूने आलेल्या हल्ल्याला आमचे सैनिक चारी दिशेने शत्रूवर प्रहार करू लागले. या प्रकाराच्या आमच्या सैन्य रचनेमुळे शत्रूपक्षाचे फारसे चालेले नाही व सकाळी साधारण अकरा नंतरच्या सुमारास शत्रूने माघार घेण्यास सुरुवात केली. साधारण माध्यान्हीच्या सुमारास आम्ही त्यांच्या छावणीचा ताबा घेतला आणि तीन वाजता आम्ही तटबंदीने सुरक्षित असलेले त्यांच्या मेडता गावावर कब्जा मिळवला. या लढाईतून शत्रू सैनिकांनी माघार घेतल्याने आम्ही शत्रूपक्षाची सतत तीन दिवस लुटालूट केली आणि त्यावेळी शत्रूचे कोणते व किती सामान लुटले त्याची तपशीलवार माहिती दिली तर वाचणाऱ्याच्या तोंडाला पाणी सुटेल. त्या गावातील महिला आमच्या अचानकपणे येण्यामुळे सुरुवातीला थोड्याशा बावचळल्या होत्या पण काही वेळ गेल्यावर आमच्याशी व्यवस्थितपणे वागू लागल्या व शूरालाच विजयश्री व वीरांगना माळ घालते याची प्रचिती आम्हाला त्यावेळी आली.
राठोड सैनिकांची बहादुरी:आमच्या ताब्यात आलेले मेडता गाव हे बनारसपेक्षा क्षेत्रफळात मोठे होते व गावाच्या भोवताली मातीची मजबूत तटबंदी होती व सभोतालची बांधलेली सरंक्षक भिंत तीस फूट उंच आढळली. गावात दोन उंच मिनार आणि गावातील घरे पक्की होती. या लढाईत शत्रू फौजेचे सहा ते सात हजार सैनिक घायाळ वा मृत झाले. शत्रूसेनेचा सेनापती गंगाराम भंडारी जेव्हा तो एका नोकराच्या वेशात रणभूमीवरून पळून जायचा प्रयत्न करीत होता तेव्हा त्याला आमच्या लोकांनी अकराव्या दिवशी कैद केले. या लढाईत राजपुतांच्या केशरी कपड्यातील (केशरिया) सैनिकांनी जे शौर्य दाखवले ते साक्षात अवर्णनीय असे होते. केशरिया सैनिक म्हणजे हा जो रणांगणावर प्राण अर्पण करण्याच्या दृढ निश्चयाने अवतरलेला असतो. मी स्वतःच्या डोळ्याने पहिले की शत्रूच्या रचनेत गोंधळ होण्यास सुरुवात झाली तेव्हा शत्रूचे पंधरा वीस लोक आमच्या शंभर जणांच्या पायदळाशी येऊन भिडले होते, आमच्या बंदुकीच्या फैरी अखंड चालू असताना न डगमगता दहा पंधरा पावले ते तसेच वीरश्रीने पुढे आले आणि शेवटी आमच्या बंदुकीच्या गोळ्यामुळे सारेजण जागेवर मारले गेले व हुतात्मा झाले.
उजव्या बगलेवर नेतृत्व करणारा शत्रू पक्षाकडील युरोपिअन कॅप्टन बेहोरे (Baours) याला मांडीत जखम झाली व त्याने युद्धभूमीवरच आपले प्राण सोडले. तसेच त्यांचा लेफ्टनंट रॉबर्ट्स हा वर्मी घाव लागून घायाळ झाला कारण त्याला एका विशिष्ट प्रकारच्या बंदुकीच्या गोळ्या लागल्या होत्या.या बंदुकीला छत्तीस नळ्या होत्या. राठोडाकडील पांच प्रमुख सरदार ठार झाले त्यामध्ये राण्याचा पुतण्यापण होता. हे पांच सरदाराना जेव्हा कळून चुकले की ते आता पळून जाऊ शकत नाहीत तेव्हा त्यांनी घोड्यावरून जमिनीवर उड्या घेतल्या आणि एकेकजण आमच्यातील पंधरा वीस जणांशी प्राणपणाने लढला आणि शेवटी त्यांच्या देहाचे तुकडे तुकडे झाल्यावर त्यांनी प्राण सोडला. जगातील सर्वात शौर्यवान उदयपूरच्या घोडदळावरील आमचा हा विजय जनरल डी बॉयन याच्या शांत डोक्याने केलेल्या व्यूहरचनेमुळे आणि समयसुचकतेमुळे व बेडरपणामुळे शक्य झाला. लढाईच्या नंतर दोन दिवसांनी राजपुताना सामील असलेला इस्माईल बेग आमच्यापासून दोन कोस अंतरावर नागौर येथे अवतरला पण त्याला पोचण्यास फार उशीर झाला होता.
मराठ्यांच्या लेखणीतून मेडत्याच्या लढाईचे वर्णन: मराठ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मेडत्याच्या लढाईचे वर्णन असे आहे. पाटणच्या विजयानंतर जीवबादादांनी मारवाडवर मोर्चा वळवला. त्याने बिजेसिंगास पूर्वीप्रमाणे खंडणी देण्याचा हुकूम सोडला. पण त्याने खंडणी न देता युद्धाची हाक दिली. बिजेसिंगाने आपला दरबार भरवून आसपासच्या संस्थानिकांना मदतीचे आवाहन केले. यावेळी ते सर्व जण या आधीच्या पाटणच्या लढाईचा सूड घेण्यास सज्ज झाले. मारवाडमधील १४ वर्षांपासून ते ६०वर्ष वयापर्यंतचे ३०हजार शूर लोक लढाईला तयार झाले. बिजेसिंगाकडे पण स्वतःचे ६ हजार सैन्य होते. ते सर्व मेडत्याच्या मैदानावर लढाईला सज्ज झाले. मेडता हे स्थान अजमेरच्या पूर्वेस १५ कोस अंतरावर आहे. राजपूत व राठोड यांच्यामध्ये लढाईतील केसरी रंगाचा पोशाख म्हणजे ती व्यक्ती प्राणाच्या आहुतीस तयार आहे असे दर्शविते. राजपुतांचे सर्व सैन्य केशरी रंगाच्या पोशाखात होते. त्याचा अर्थ म्हणजे लढाईत मारणे किंवा मरणे असा त्यांचा निर्धार होता. लढाईतून पळून जाणे या पोशाखातील लोकांस शोभा देत नाही. राजपूत सैन्य अशा अविर्भावात लढायला आले होते.
अजमेरजवळच्या अजिंक्य,तारागड किल्ल्यावर जगोबा बापूने स्वारी केली.जगोबा बापूकडून तारागड काही केल्या सर होईना. त्यांना या किल्ल्याच्या तटबंदीचा व आतील फौजेचा अंदाज येईना. तेव्हा तारागड किल्ल्याची लढाई शिवबा नाना याजकडे सोपवून जगोबा बापू मेडतेकडे रवाना झाले.लखबादादा, गोपाळराव, दि बॉयन हे नदी उतरून मेडत्याच्या दिशेने या आधीच गेले होते.
मेडत्याच्या लढाईचे वर्णन:जीवबादादा लुनी नदी ओलांडून मेडते येथे पोचले. वाटेत दि बॉयनच्या तोफा वाळूत रुतून बसल्या. याला कारण म्हणजे त्याने तोफांची वाहतूक करताना पुरेशी काळजी घेतली नव्हती. त्यामुळे दि बॉयनला तेथेच अडकून पडावे लागले. या वेळी राजपुतांनी हल्ला केला असता तर मराठ्यांचे खूप नुकसान झाले असते. पण ते इस्माईल बेगच्या फौजेची वाट पाहत थांबले.राजपूत सेनानी भीमराज संघवी याचा विचार होता की इस्माईल बेगची फौज आल्यावर मराठ्यांशी लढाई करावी. जोधपूरचा राणा बिजेसिंग व दिवाण खुबचंद जोधपुरास थांबले होते. अर्वा येथील ठाकूर शिवसिंग व असोप येथील ठाकूर काहीदास या दोन शूर वीरांनी मराठ्यांचे वैरणीचे हजारो ढीग लुटून नेले. या गोष्टीचा नंतर मराठ्यांना खूप त्रास झाला.नंतर इस्माईल बेग राजपुतांस येऊन मिळाला. तोपर्यंत दि बॉयनच्या तोफा येऊन पोचल्या.जीवबादादांनी १०जुलै १७९०रोजी राठोडांवर हल्ल्याचा बेत केला. राजपूत झोपताना अफू घेउन झोपतात हे मराठ्यांना माहिती होते. त्यामुळे मराठ्यांनी त्या दिवशी पहाटेच राजपूत सेनेवर हल्ला चढवला. त्यावेळी झोपेत असणारे बरेच राजपूत त्यांनी कापून काढले. राजपूत सैनिक झोपेतून उठेपर्यंत मराठे राजपूत लोकांच्या गोटापर्यंत पोचले.तरी पण शूर राजपुत लोकांनी मराठ्यांवर प्रतिहल्ला चढविला. मराठ्यांचा तोफखान्यावर त्यांनी हल्ला चढवताच तो बंद पडला. अशा प्रकारे चवताळलेल्या व मरणास न भिणाऱ्या राठोडांनी मराठ्यांस जेरीस आणले.तोच शस्त्रांनी सज्ज असलेले हजारो ठाकूर,पुरभय्ये,रांगडे छावणीतून बाहेर पडले. दोन्ही सैन्य एकमेकात मिसळल्याने सैनिकातील भेद दिसेनासा झाला. या प्रसंगी मराठ्यांच्या लष्करात सेनापती जीवबादादा, लखबादादा, जगोबा बापू, गोपाळराव भाऊ,सदाशिव मल्हार, अप्पा खंडेराव वगैरे शूर व अनुभवी सरदार होते शिवाय तुकोजी होळकर, बापूराव होळकर व अली बहाद्दर यांचे सैन्य मदतीला होते. या धुमश्चक्रीत मराठ्यांची आधी सरशी झाली पण नंतर शत्रूची सरशी होऊ लागली. राजपुतांचे तिरंदाज दुरून शरसंधान करीत होते. त्यांचा अचानक एक बाण येऊन जीवबादादाच्या घोड्याला मर्मस्थानी लागला. तेव्हा तो घोडा खाली पडला.तर इकडे जीवबादादा पडला म्हणून आवई उठली.अशा तऱ्हेने मराठ्यांच्यात त्या क्षणास हाहाकार माजून काही मराठे पळू लागले. इतक्यात जीवबादादा दुसऱ्या घोड्यावर स्वार होऊन युद्धात दिसू लागले. तेव्हा पळणाऱ्या सैनिकांना धीर येऊन ते लढायला परतले. जीवबादादांनी आपल्या फौजेतील झालेली ही अव्यवस्था व झालेला गोंधळ ताबडतोप सुधारून परत त्यांच्यात वीरश्रीचा संचार केला. तलवार बहाद्दर राठोड त्यातच केशरी वेष घालून मारू वा मरू या त्वेषाने लढत होते. त्यांच्या पुढे नाईलाज होऊन दि बॉयनला मागे सरकावे लागले. राजपुताच्या हल्ल्यामुळे मराठ्यांची हिम्मतबहाद्दर फौज आता गनिमी काव्याने लढू लागली. राजपूत सैन्याला त्यांनी पुढे येण्यास वाट करून दिली. त्यामुळे राजपुतांची मराठ्यांच्या तोफखान्याशी लगट झाली.अशा वेळी जीवबादादांनी “हर हर महादेव” चा घोष करून सरदारांना प्रोत्साहित केले व राजपुतांवर हल्ला चढवला. एकमेकांच्या सैनिकांची अशी कापाकापी चालू असताना इस्माईल बेगच्या सैन्याने हल्ला केला. तुंबळ युद्ध झाले, राठोडांपैकी एक ही जिवंत राहिला नाही.असोप,आर्वी,चांदोड ,गोविंदगड,अलनिवास येथील मांडलिक शूर ठाकूर मारले गेले व बाकी फौज जीव वाचवून पळून गेली. मराठे व राजपूत यांच्यात जोराची लढाई झाली. राजपूत सैनिक छातीवर वार झेलत ठार झाले पण त्यांनी पळ काढला नाही. तरी पण मराठयांच्या पुढे त्यांचे काही चालले नाही. या लढाईत राजपुतांचे किती सैनिक धारातीर्थी पडले याचा हिशोबच नाही.
मेडत्याच्या या लढाईत राजपुतांचा मोठा पराभव झाला तरी मराठ्यांचेही प्रचंड नुकसान झाले. राजपुतांच्या शूर वीरांपैकी ज्या आवेशाने मराठ्यांच्यात प्रलय मांडला होता त्यापैकी आहवाचा ठाकूर शिवसिंग यास २७ जखमा झाल्या होत्या. तरी तो शेवटपर्यंत लढत होता. शेवटी तो घायाळ होऊन कण्हत कण्हत भूमीवर पडला. त्यांच्या लोकांनी त्यास रणातून आणून त्याच्यावर औषधोपचार केले. त्याचे शौर्य ऐकून राजा बिजेसिंग युद्धभूमीकडे त्याला भेटायला निघाला परंतु तो पोचेपर्यंत शिवसिंग याचे निधन झाले.या प्रमाणे भीषण लढाई होऊन जीवबादादांनी मेडते शहर काबीज केले. त्यात त्याला मुबलक लूट मिळाली. मारवाड्यांचा सरदार भोमराज संघवी पळून गेला व त्याने विष पिऊन आत्महत्या केली. दुय्यम फळीतील सरदार नायक गंगाराम बिनधारी व सरदार आलियावर बेग याना मराठ्यांनी कैद केले. बिजेसिंगने लढाईतील अपयशाने जीवबादादाशी तहाची बोलणी लावली. त्या वाटाघाटीत २० लक्ष रुपये खंडणी ठरली. त्यापकी ८लक्ष रुपये रोख, ८ लक्ष रुपये उत्पन्नाचा सांबर, रुपनगर वगैरे महाल व बाकी पुढे द्यावेत असे ठरले. या लढ्यात राजपूत व मराठे यांचे बरेच लोक मेले. अशा प्रकारे विजय मिळवून १७९० ऑकटोबरच्या अखेरीस मराठ्यांची फौज मागे फिरली.
मेडत्याच्या लढाईची परिणीती:पाटण व मेडता येथील वैभवशाली विजयामुळे महादजी शिंदे यांची ताकद राजपुतानामध्ये सर्वाना समजली आणि त्यांच्या आयुष्याच्या अंतापर्यंत त्यांना राजपुताकडून कधीही त्रास झाला नाही. ही गोष्ट येथे नमूद केली पाहिजे की या दोन लढयानंतर राजपुतांनी महादजी शिंदे याजबरोबर कधी ही छेडछाड केली नाही. या दोन विजयानंतर महादजी यांचे मनोबल उंचावले आणि याहून मोठ्या सैनिकी कारवाया करण्यासाठी त्यांना हुरूप दिला.त्यानी लष्करी महत्वकांक्षा विस्तारित जनरल डी बॉयन यांस अजून दोन ब्रिगेडची उभारणी करायला सांगितले. या ब्रिगेडने महादजी शिंदे यांना इंग्रजांना न जुमानता हिंदुस्थानातील सर्वशक्तिशाली सत्ताकेंद्र बनवले. केवळ हिंदुस्थानातच नव्हे तर हिंदुस्थानच्या बाहेर सुद्धा महादजी शिंदे यांच्या लष्करी हालचालींचा मागोवा घेतला जाऊ लागला.
मेडत्याच्या लढाईतील विजयानंतर देखील अजमेरचा किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला नव्हता तेव्हा जगोबा बापूशी सल्लामसलत करून जीवबादादांनी या किल्ल्यावर स्वारी केली. त्यावेळेस किल्लेदार डुमराज दम धरून होता. तरी जगोबा बापूनी महंमद जमादार व मानसिंग जमादार यांची मदत घेऊन जवळच्या नेमक्या उंच अशा जागा शोधून तेथून किल्ल्यावर तोफांचा मारा सुरु केला. हे दोघे किल्ल्यातील लढयात वाकबगार असल्याने त्यांना सर्व लोक ‘राजे’ म्हणत. मराठांच्या गोळ्या व तोफांच्या वर्षावाने किल्ल्याचे बुरुज ढासळू लागले. तेव्हा किल्लेदार डुमराज याने हिरकणी खाऊन आत्महत्या केली. त्यामुळे किल्ल्यातील लोकांचा धीर सुटला. लगेच थोड्या दिवसात अजमेरच्या किल्ला अजिमतारा मराठ्यांच्या ताब्यात आला.२महिन्याच्या लढाई नंतर शेवटी फेब्रवारी १७९१मध्ये किल्ला सर झाला. जगोबा बापूने किल्ल्यावर मराठ्यांचे निशाण लावले.
अजमेरचा ताबा:अजमेरच्या जयानंतर पुष्कराज हे पवित्र ठिकाण पण मराठ्यांच्या ताब्यात आले. बिजयसिंगाने या तहामुळे मराठ्यांना आठ लाख रुपये दिले. पुष्कराजला मराठ्यांनी एक प्रेक्षणीय असे सुंदर देवालय बांधले. अजमेरची सुभेदारी पाटीलबावांनी जगोबा बापूचे बंधू शिवबा नाना यास दिली. तेव्हा मारवाड प्रांतात दुष्काळ पडला होता. लोकांना खायला अन्न मिळेना. तेव्हा जीवबादादांनी पुष्कर तीर्थावर दोन लक्ष खर्च करून अन्नदान व धर्मादाय कामे केली. लखबादादा यांस राजपुतानाच्या जिंकलेल्या प्रदेशाची सुभेदारी देण्यात आली. अशा प्रकारे या महत्वाच्या व तितक्याच अवघड लढाया आटोपून विजयी होऊन महादजी शिंदे आपल्या आवडत्या ठिकाणी मथुरेला मुक्कामास परतले.
राजस्थानच्या इतिहासातून मेडत्याच्या लढाईचा मागोवा:जोधपूरचा राणा विजयसिंह हा पूर्वीपासूनच मराठ्यांच्या विरुद्ध होता आणि सतत मराठ्यांचे वर्चस्व झुगारून देण्याच्या प्रयत्नात होता. त्याने इंग्रज गव्हर्नर जनरल कॉर्नवालिस याला पत्र पाठवून आपल्याला मदत करायची विनंती केली ज्यायोगे तो मराठ्यांना हुसकावून लावू शकेल. परंतु कॉर्नवालिसने नकार दिला. सन १७९० मध्ये इस्माईलबेग जयपूर व जोधपूरच्या राण्यांच्या सहाय्यार्थ अजमेरला पोचला. जोधपूरचा राणा बिजयसिंह याने डी बॉयन शिंद्यापासून फोडण्यासाठी म्हणून अजमेर व त्याचा आसपासचा इलाका देऊ केला, परंतु हा प्रयत्न असफल राहिला. टॉड लिखित राजस्थानचा इतिहास मध्ये लिहिले आहे की लुनी नदीच्या काठी डी बायांच्या तोफा वाळूत रुतल्यावर राठोड सेनापती शिवसिंह याने मराठ्यांवर आक्रमण करण्याची सूचना केली, परंतु राठोडांचा प्रमुख खुबचंद याने इस्माईलबेगची वाट पहाण्याचा चुकीचा निर्णय घेतला. अशा प्रकारे मराठ्यांना नामोहरण करण्याची संधी वाया गेली.
टॉडच्या म्हणण्यानुसार बिकानेरची सेना बिजयसिंहाच्या मदतीस गेली होती परंतु लढाई सुरु होताच त्यांनी काढता पाय घेतला. सकाळी सुरु झालेलय लढाईत तीन वाजेपर्यंत राठोड सेनेचा पूर्ण पराभव झाला व मेडत्यावर मराठ्यांनी कब्जा केला. या लढाईत राठोडचे सहाशे ते सातशे लोक कामी आले. जोधपूरच्या इतिहासात नमूद केल्यानुसार राठोडांकडून प्रमुख सरदार ठाकूर विसनसिंह(चणोद),ठाकूर शिवसिंह (देवळी),शेखावत जालीमसिंह (बालदा),ठाकूर भारतसिंह अर्जुनसिंह (सुदानी) इत्यादी शहीद झाले. जोधपूरच्या इतिहासाला धरून मराठ्यांना ६० लाख रुपये देण्याचा तह झाला होता. टॉडने सुद्धा या रकमेला दुजोरा दिलेला आहे.लढाईनंतर १ जानेवारी १७९१ दिवशी डी बॉयन आपल्या सेनेसह मथुरेस महादजीने भेटायला गेला, तेव्हा महादजींनी त्याचा मोठा सत्कार केला.
लढाईची इतिश्री व पुढील घडामोडी: अशा प्रकारे राजपुतांशी शांतता प्रस्थापित केल्यावर महादजी शिंदे यांनी आपल्या राज्यकारभाराकडे लक्ष पुरविले.गोपाळराव भाऊ चिटणीस यास सरसुभेदार करून त्याच्या हाताखाली डी बॉयन,लखबादादा, जीवबादादा आणि अंबुजी इंगळे या सुभेदारांना नेमले. आपले घर व्यवस्थित केल्यावर महादजी यांच्या मनात पुण्यास जाण्याचे विचार घोळू लागले. आतापर्यंतच्या असंख्य काळज्या व चिंता यातून त्यांना आता थोडासा विश्राम मिळाला होता. आतापर्यंतचा त्यांचा आयुष्यातील काळ नुसता लढाईच्या व राजकारणातील धामधुमीत गेला होता. त्यांच्या मनावर सतत दडपणे असत. त्याचा परिणाम नाही म्हंटल तरी त्यांच्या तब्यतीवर होत असेल. राजपूत राजे व इस्माईल बेग यांच्याबरोबर युद्धे थांबली असली तरी इस्माईल बेग अजून जिवंत होता. तो परत त्याच्या सवयीनुसार कारवाया सुरु करणार यात शंका नव्हती. तरी सुद्धा मराठ्यांनी त्याला बऱ्याच वेळा मार दिला होता त्यामुळे इतक्या लवकर तो डोके वर काढेल अशी धास्ती कमी होती. या परिस्थितीत इस्माईल बेग पळून जाऊन कानोड व रेवडी प्रांतात गेला व तेथून त्याने बंड उभारले. तेव्हा महादजी शिंदे यांनी त्याचा यथोचित समाचार घेतला.
--------------------------------------------------------------------------
संदर्भ:महादजी सिंदिया मुकुंद वामन बर्वे, मराठी रियासत भाग ७: गो.स.सरदेसाई,बॅरीस्टर नातूकृत अलिजाबहाद्दर महादजी शिंदे, जोधपूरचा इतिहास,गौरीशंकर हिरालाल, टॉडकृत राजस्थानचा इतिहास लेखन व संकलन: प्रमोद करजगी
साभार
Pramod Karajagi

No comments:
Post a Comment